कॉर्पोरेट-दहशतवाद, ठोकशाही आणि झोपलेला कामगारवर्ग

भाजपाई-संघीय ‘भांडवली-विचारधारे’त वाढलेल्या व कामगारांच्या रक्ताघामाचा अतिशय ‘स्वस्तात सौदा’ करण्याच्या विचारधारेने पोसले गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी…गुंडपुंडांना ठोकण्याच्या शिवराळ भाषेच्या माध्यमातून कामगार-संघटनांना व कामगार-पुढार्‍यांना धमकावण्याऐवजी; थोडं आत्मचिंतन करत, कार्पोरेटीय क्षेत्रातील ‘कंपनी-दहशतवादा’वर (Corporate-Terrorism) बोलण्याची व त्याविरोधात, काही कृति करण्याची हिंमत दाखवावी, असं आम्ही त्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे थेट आव्हान देत आहोत.
…अलिकडे दोन्ही ‘इंद्र’ (नरेंद्र आणि देवेंद्र) ज्यापद्धतीचे कायदे, EVMच्या कृपाशिर्वादाने लाभलेल्या राक्षसी बहुमताच्या बळावर, संसदेतून व विधिमंडळातून पारित करवून घेतायत… त्या कायद्यांमधली ‘ठोकशाही’ विकृतीच, मुख्यमंत्र्यांच्या मुखातून अहिल्यानगर येथील सुपा औद्योगिक वसाहतीमधील दि. ८ फेब्रुवारी-२०२६ रोजीच्या भाषणाच्या निमित्ताने दिसून आली, असं म्हणणं वावगं ठरु नये….
…याच भाषणादरम्यान बोलण्याच्या ओघात, पुढच्या पाच वर्षांत ‘वीजदर’ वाढणार नाहीत (सर्वसामान्य ग्राहकांची मात्र, ‘Wheeling Charges’सारखे बनावट चार्जेस घेऊन व वीजेच्या वाढीव दरातून लूट चालूच ठेवणार) याची काळजी घेणारे मुख्यमंत्री, भांडवलदारांचे ‘हस्तक’ म्हणून…कंत्राटी-कामगार पद्धतीत अतिशय तुटपुंज्या पगारावर व डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार घेऊन काम करणाऱ्या त्या ‘कंत्राटी-गुलामां’चे, ते तुटपुंजे पगारदेखील न वाढण्याची व भांडवलदारांची ओटी भरण्याची काळजी, घेणार असतील…हे शेंबडं पोरही सांगेल!
…अशा, आपल्या पार्श्वभागावर कितीही लाथा बसल्या, तरीही फाजील-उत्सवप्रियतेत, पार्टी-संस्कृतीत व धर्मसंप्रदायी-नशेत चूर असलेला कामगारवर्ग, जागा होण्याची शक्यता दूरवर कुठे दिसत नाही; हे कामगार-चळवळीचं व म्हणूनच, मराठी-माणसांचं केवढं मोठं दुर्दैव आहे!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)