एकीकडे, डोनाल्ड ट्रंप यांच्यावर टेरिफ-निकालाचा झालेला असह्य ‘वार’ व एपस्टिन-फाईल्सची टांगती ‘तलवार’; तर दुसरीकडे, भ्रष्टाचारी नेतन्याहुंसाठी तुरुंग सजलेला व ऑक्टोबर-२०२६ च्या इस्रायलमधील निवडणुकांचा बिगुल वाजलेला….
अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याने केवळ, अमेरिकन काँग्रेस व कायदेच धाब्यावर बसवले गेले, असं नव्हे; तर युनो, ICJ वगैरे आंतरराष्ट्रीय-व्यवस्थेला देखील सुरुंग लावला गेलाय….
ज्या गोष्टीसाठी इस्रायल गेली ३० वर्षे अमेरिकेच्या मागे भुणभुण लावून आहे; ती गोष्ट आत्ताच कशी घडून येते?यासंदर्भातील, थोर आंतरराष्ट्रीय विचारवंत जेफ्री सॅक्स, यांच्या म्हणण्यानुसार इराणवरील हल्ला हा, “इराणच्या अण्वस्त्रसज्जते विरोधातील नसून वा अमेरिकेच्या हितासाठी नसून; तो केवळ इस्रायल-सरकारच्या हितासाठी आहे…त्यामुळे, तो बायबलचे संदर्भ घेऊन असेल किंवा ‘माईक हक्काबीं’सारख्या (ट्रंपने नेमलेले अमेरिकेचे इस्रायलमधील राजदूत) चर्च-सेवकांच्या दुराग्रहातून असेल अथवा ‘एपस्टिन-फाईल्स’मधल्या उघड ‘न’ केल्या गेलेल्या धक्कादायक गुप्त बाबींमुळे असेल; पण, तो हल्ला अमेरिकेच्या हितासाठी नक्कीच नाही!”
युद्धाची औपचारिक घोषणा न करताच (वाटाघाटींचं गुऱ्हाळ चालू ठेवत व तथाकथित भारतीय ‘विश्वगुरुं’ची इस्रायलमधून पाठवणी किंवा बोळवण करत) आणि UNO च्या सुरक्षापरिषदेची पूर्वपरवानगी न घेताच…आंतरराष्ट्रीय कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन करत, हा हल्ला करण्यात आलाय. नुकत्याच पार पडलेल्या ‘म्युनिक सिक्युरिटी काॅन्फरन्स’ची, ‘म्युनिक सर्कस’ बनवण्याचा घाट अमेरिका-इस्रायलच्या कुप्रभावाने घातल्याचं दिसतंय; कारण, त्यात आंतरराष्ट्रीय कायद्यासंदर्भात तावातावाने चर्चा झडून देखील, त्यात अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा साधा नामनिर्देशही करण्यात आला नाही.
विशेष नूमद करण्यासारखी बाब म्हणजे, वर्ष-१९८१च्या अंताला तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी जारी केलेल्या E.O.12333 या आदेशानुसार परदेशी नेत्यांच्या हत्यांना कडक प्रतिबंध केलेला असतानाच… हे गुन्हेगारी, बेकायदेशीर कृत्य करण्याचं क्रौर्य व औधत्य, डोनाल्ड ट्रंप या महाभागाने दाखवलंय. या सर्व बाबींमुळे, अमेरिकेची विश्वासार्हता, कधि नव्हे एवढी रसातळाला गेलीय. अमेरिकेतील अंमली-पदार्थांच्या व्यापारासाठी (Drug-Trafficking) मेक्सिको जबाबदार असताना, दोन महिन्यांपूर्वी ट्रंप यांनी व्हेनिझुएलावर शरसंधान केलं आणि आता ‘इस्लामिक-दहशतवादा’च्या नावाखाली (Islamic-Terrorism)…पाकिस्तान किंवा सिरीयाला जबाबदार धरण्याऐवजी, अडीच-तीन हजार वर्षांच्या प्राचीन पर्शियन-संस्कृतीचा वारसा असलेल्या ‘संस्कृती-सघन’ इराणला ‘लक्ष्य’ बनवण्याची घोडचूक केलीय; ती केवळ, मध्यपूर्वेत कायमस्वरुपी अनिर्बंध वर्चस्व मिळवण्याच्या इस्रायलच्या राक्षसी-हव्यासापोटीच! परिणामतः, सद्दाम हुसेन यांच्या इराकवर हल्ला करताना, जाॅर्ज बुश यांना ८०% नागरिकांचं समर्थन होतं; पण, आज ट्रंप यांच्या इराणवरील हडेलहप्पी व गुन्हेगारी हल्ल्यानंतर, परिस्थिती बदलून बरोबर १८०°नी त्यांच्यावर उलटलीय! सर्वात कौतुक करायचं ते ब्रिटनचे मजूर पक्षाचे (Left of Centre) ‘समाजवादी’ पंतप्रधान ‘केर स्टारमर’ यांचं…त्यांच्या अत्यंत संयमी भूमिकेबद्दल (“Britain does not believe in regime-change from skies”)! त्यांच्या सायप्रसमधील तळावर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला होऊनही त्यांनी…पहिल्या-दुसर्या महायुद्धात, जगातले देश युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, कोणाच्या बाजुने लढायचे; या विचारात जसे गुंतले होते…तशा प्रकारच्या चुका टाळून, आताच्या युद्धात अमेरिकेची साथ देण्यास स्पष्ट नकार दिलाय व त्यामुळे, तिसऱ्या महायुद्धाशकडे जग, अनिवार्य वेगाने झेपावण्याची शक्यता खूप कमी झालीय.
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

