{रस्ता, वीज, पाणी, शालोपयोगी-साहित्य, पोषक-आहार, शिकवणारे शिक्षक…या कशाचीही धड सोय नसलेल्या, मुरबाड तालुक्यातील (जि. ठाणे) आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका चुणचुणीत मुलाने, देशातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची दिलेली मार्मिक उत्तरं…हा ‘रवीशकुमार ऑफीशियल व्हिडीओ’ पहाताना जरुर डोळ्याखालून घाला!}
१) प्रश्न : ज्ञानेशकुमार, नावात दडलंय काय?
उत्तर : EVM / SIR सारखी ‘वोटचोरी’ आणि राममंदिराच्या देणग्यांमधील ‘नोटचोरी’!
२) प्रश्न : रामजन्मभूमी अयोध्येच्या राममंदिरातून जर ५००० कोटींची लूट; तर, प्रस्तावित कृष्णजन्मभूमी मथुरेच्या कृष्णमंदिरातील संभाव्य लूट किती?
उत्तर : ‘दामदुप्पट’ म्हणजे, १०,००० कोटी; कारण, ‘राम’, हा विष्णुचा अपूर्ण ‘अवतार’; तर, कृष्ण हा ‘पुर्णावतार’ म्हणून!
३) प्रश्न : ‘मोहन यादव-कुटुंबियां’कडून शेकडो एकर, मनमोहक-मलईदार जमीन-खरेदी प्रकरणात, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री ‘मोहन यादव’ यांचा राजीनामा पं. नरेंद्र मोदी घेतील काय?
उत्तर : अजिबात नाही; कारण, मग त्यांना त्यांच्या दिवसाच्या १८-१८ तासांच्या कामात, तेवढाच एक उद्योग करावा लागेल…असं बघा की, याअगोदरच राजीनामा-मागणी रांगेत अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू, प. बंगालचे सम्राट चौधरी, आसामचे हिमंता बिस्वा सरमा उभे आहेत आणि त्यांच्या मागोमाग ‘एपस्टिन-फाईल्स फेम’ हरदीप पुरी, ‘NEET-CBSE परीक्षा-घोटाळा फेम’ धर्मेंद्र प्रधान, हे केंद्रीय मंत्रिमहोदय देखील त्याच रांगेत उभे आहेत… याच ‘गती व पद्धती’नुसार महाराष्ट्राचे विकास-पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘लोहपुरुष’ अडवाणींप्रमाणे ‘काँक्रिट-पुरुष’ असलेले नितीन गडकरी; ज्यांच्या पुरुषत्वात हल्ली ‘ईथेनाॅल-पुरुषत्वा’चीही भर पडलीय…ही अशी एकेक करत सगळीच दिग्गज वजनदार मंडळी रांगत रांगेत येणार; तेव्हा, मोदींनी काम तरी किती करायचं आणि कष्ट तरी किती घ्यायचे; त्याला काही मर्यादा नको? हा सगळा सारासार विचार करुनच, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं दिलंय!
...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
_____

