प. पू. रामदेवस्वामींच्या प्रारंभपर्वातील ‘योगशिष्य’ होण्याचं भाग्य मला लाभण्यापूर्वी एक सर्वसामान्य ‘योग साधक’ या पवित्र नात्यानं भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) प्रचलित असलेल्या अनेकानेक योगगुरूंच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेता झालो! त्याव्दारे मला व्यक्तिगत स्तरावर झालेल्या बहुआयामी सकारात्मक परिणामांचा त्यांच्या गति आणि व्याप्तिचा त्यात अंतर्भाव असलेल्या यौगिक क्रियांची क्लिष्टता व श्रम, राबवलेल्या व्यवस्थापन पध्दती याचा तौलनिक अभ्यास करत असताना मला तीव्रतेनं जाणवलं की, या यौगिक प्रवासातील प. पू. रामदेवस्वामींची सामान्यांच्या आवाक्यातील सहजसोपी तरीही विलक्षण परिणामकारक अशी ‘योग-प्राणायाम पध्दती’ ही अनेक दृष्टींनी निदान मला भावलेलं ‘अंतिम स्थानक’ होय !
कुठलंही अवडंबर ‘न’ माजवता प. पू. रामदेवस्वामींनी आम्हा प्रारंभीच्या ‘प्राणायाम पध्दतीतील साधकांना, “शिका आणि शिकवा” हा लाखमोलाचा सल्ला बिनधास्त दिला! हा एक आगळावेगळा क्रांतिकारी विचार होता! त्यामुळे अतिरेकी गूढतेचं वलय वितळू लागलं व त्या प्रमाणात ही ज्ञानगंगा सामान्यांच्या कवेत आली. मी कुणी मोठा साधक नव्हे, तरीही ‘परफेक्शन्’ चा ध्यास कुठल्याही क्षेत्रात बाळगणारा असल्यानं, स्वाभाविकच मी स्वामींची पध्दत अभ्यासपूर्वक नीट जाणून घेतली. जसा एखादा सुवर्णपदक जिंकणारा अव्वल कोटीचा विद्यार्थी सर्वोत्तम शिक्षक होतोच, असं नव्हे, पण एखादा सर्वसामान्य विद्यार्थी मात्र चांगल्या दर्जाचा शिक्षक बनावा! असं काहीसं माझ्या बाबतीत घडलं असावं, म्हणूनच आजतागायत कुठलाही गाजावाज न करता वेगवेगळ्या स्तरांवर किमान २००० हूनही अधिक जणांपर्यंत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ‘महर्षी पतंजलींच्या’ महाविद्येचा काही अंश, प. पू. रामदेवस्वामींच्या मार्गदर्शनाव्दारे सुयोग्यरित्या पोहोचविला, गेल्या काही वर्षातील या तपः साधनेची जी फळं नियमित योगाभ्यास करणाच्या साधकांना मिळाली, ती अनुभवल्यानंतर अशा तऱ्हेचा उपक्रम आपल्या नित्याच्या व्यापातून वेळातवेळ काढून ठाण्यात मोठ्याप्रमाणावर करून पहावा, हा माझ्या सहकाऱ्यांच्या नितांत आग्रह होता. एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की, आमजनतेबरोबरच सर्वात जास्त जर कुणाला योगाभ्यास प्राणायामाची गरज असेल, तर ती छोटया-मोठ्या सर्वपक्षीय राजकीय कार्यकत्यांना व पोलीस दलाला आहे!
चोवीसतास अतिरेकी दगदग, वेळेअभावी व अज्ञानापोटी अयोग्य आहार-विहार-आचार, अतिरेकी ‘लोकांता’ मुळे परिपूंचा फाजील प्रभाव वगैरे कारणांनी जसजसे श्वास प्रश्वास अशा राजकीय कार्यकर्त्यांचे, पोलीस दलाचे व इतर व्यावसायिकांचे अतिजलद खर्च होत जातात, तसतसे ते दुर्बल व रोगग्रस्त (उदा. अनियंत्रित रक्तदाब व मधुमेह, सांधेदुखी इ.) बनत एकतर हकनाक अल्पायुषी ठरतात किंवा अकाली विकलांग ठरतात. “चले वाते चले चित्नम्” या न्यायानं श्वास–प्रश्वासाच्या वाढत्या गतिसोबतचं चित्त अधिकाधिक चंचल बनून, त्यांच्या हातून प्रसंगी समाजघातकी धोरण राबविली जातात. म्हणून “मनः प्रशयनोपायः योग इत्यभिधीयते!” (मनाला शांत करण्याचं तंत्र किंवा उपचार म्हणजे योग-योगवशिष्ठ) या सूत्रानुसार आमजनतेसोबतच सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यक्तिगत व एकूण सामाजिक हितासाठी ‘योगाभ्यासाला’ प्रवृत्त करणं आणि राजकीय प्रवाहात, सत् प्रवृत्तींना चालना देणं हे आम्ही “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यमाने आयोजित करीत असलेल्या ‘योग शिबिराचे’ प्रयोजन होय!
प्रदूषणाचा भस्मासूर व त्याव्दारे वातावरणातील अकल्पित बदल, यांत्रिक व रासायनिक शेतीव्दारे उत्पादित निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य-भाजीपाला-फळफळावळे आणि स्पर्धात्मक व गुंतागुंतीच्या आधुनिक जीवनातील हरघडी वाढत जाणारे ताणतणाव, सर्वदूर पसरत चाललेला चंगळवाद व व्यसनाधीनता या अनारोग्याला आमंत्रण देणाऱ्या पार्श्वभूमीवर तर शरीर-मनाचं निदानपक्षी जमेल तेवढं ‘Servicing व Overhauling’ (जे काळजीपूर्वक आम्ही आपल्या वाहनांच करतो, शरीर व मनासाठी काही करावं, असं मात्र दुर्दैवानं काही केल्या आपल्या ध्यानी येत नाही!) करावं ही काळाची गरज कधी नव्हे एवढी तीव्रतम बनलीय!
असा काळ येणं फार दूर नाही, की जेव्हा ‘एड्स्’ सारखे भयंकर विषाणू रक्ताऐवजी हवेतून हातपाय पसरतील किंवा कर्करोगसदृश (कॅन्सर) सहजसाध्य नसणारे रोग मोठ्या प्रमाणावर फैलावतील, अशा समरप्रसंगी कदाचित असं घडून येणं शक्य आहे की, प्रचलित औषधपध्दती निष्प्रभ ठरू शकेल व ज्या योगसाधकांनी ‘योगाग्नि त तापवून आपला देह ‘योगप्रदीप्त’ केलाय, तेच फक्त आपल्या शरीरांतर्गत नियमित योगाभ्यासाने लाभलेल्या प्रबळ रोगप्रतिकारक शक्तिच्या बळावर प्रचलित रोगांवर-व्याधिंवर व तसेच भविष्यकालीन रोगकारक संकटांवरच मात करू शकतील!
“न भाजलेल्या कच्च्या मातीच्या घडयातील पाणी जस गळून झिरपून जातं, कच्च्या भाजलेल्या विटा पावसाच्या तडाख्यात विरघळून जसं घराचं बांधकाम ठिसूळ-कमकुवत बनतं, त्याचप्रमाणे ‘योगाग्नित’ न तापवलेला-प्रदिप्त ‘न’ केलेला देह, झपाटयानं क्षीण बनून ‘व्याधिग्रस्त’ बनतो! ‘योगविद्येचा’ मला भावलेला सर्वोत्तम गुण म्हणजे, आत्यांतिक गरीबीत-विपन्नावस्थेतही, कुठलाही माणूस ‘योगविद्या’ अंगिकारून आनंदी राहू शकतो, तर योगविद्येविना अतिश्रीमंतही मनुष्य खराखुरा आनंदी-सुखी होऊ शकणार नाही! तव्दतच योगासने-प्राणायाम-ध्यानधारणेची कास धरल्यानं प्रत्येक व्यक्तिमध्ये सकारात्मक व विधायक अंतर्बाह्य बदल घडून येईल पर्यायानं समाजजीवन व राष्ट्रकारण सुखद आमूलाग्र बदल अनुभवेलं!!… याहून सूज्ञांस अधिक काय सांगावे ?”
“योग-प्राणायाम आत्म्याशी संवाद! चंगळवाद-आरोग्यहानी निर्विवाद!!”
– राजन राजे