“दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो”, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान‘ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, “अमृतातेहि पैजासी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके”, असा गर्वोन्नत छातीनं आपल्या मराठी भाषेचा उल्लेख केला…. त्या, आमच्या ‘मायमराठी‘ची, तिच्याच महाराष्ट्रात शब्दशः ससेहोलपट सुरु असताना, “गुजराथमध्ये काय घडतयं, ते जरा नीट डोळे उघडून पहा”!
अवघ्या भारतातल्या ७५% साधनसंपत्तीवर लबाडीने आणि विविध क्लृप्त्या लढवून (नेकीच्या उद्योजक-व्यापारी वृत्तीने मुळीच नव्हे) ‘मालकी हक्क’ प्रस्थापित करुन बसलेल्या गुजराथने, “आपल्या राज्यात शालेय शिक्षणादरम्यान गुजराथी भाषा सक्तिची करण्याचा नुकताच निर्णय जाहीर केलायं”. दक्षिणेतल्या राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत…. ही भाषा सक्ति आणि भाषिक अस्मिताच नव्हे; तर, आपापल्या भाषिकांचं बेधडक हितरक्षण करण्याचा निर्णय घेणारं गुजराथसुद्धा, एक राज्य, आता झालयं!
बरं, हे असं आज अचानक घडतयं, असं बिलकूल नव्हे! व्यक्तिशः मी गुजराथच्या दौऱ्यावर असताना अनेकवेळा हा अनुभव घेतलायं की, “अगदी स्टेट बँकेतील विविध अर्जदेखील, दोन्ही बाजूंनी फक्त ‘गुजराथी’ भाषेतच असतात… निदानपक्षी, दुसऱ्या बाजुला तरी इंग्रजीत तपशील असावेत, तर तसंही काहीही नसल्याचं मला अनेकवार आढळलयं…. खरंतरं आजचा, आपल्या देशाला भलाबुरा ‘पंतप्रधान’ देणाऱ्या या गुजराथ राज्यात, अशी टोकाची ‘भाषिक-अस्मिता’ चालू शकते?” त्यावर कडी म्हणजे, बँकेतला गुजराथी कर्मचारीवर्ग गुर्मीत, “तुम्ही गुजराथमध्ये आहात, तेव्हा तुम्हाला गुजराथी भाषा निदान वाचता आलीचं पाहीजे” असं म्हणतानाही मी स्वतः अनुभवलयं.
तसं पहाता, हा भारत देश, ‘देश’ म्हणून… युद्ध, क्रिकेटचे सामने आणि काहीप्रमाणात हिंदी सिनेमे वगळता सांस्कृतिक व मानसिकदृष्ट्या ‘एकसंध’ नसतोच कधि…. आणि नसेलही कधि! म्हणूनच, आपला देश, आपलं राष्ट्र “राष्ट्रकांचा समूह, म्हणूनच कायम गणलं जातं”. पण, या महाराष्ट्रावर मात्र भारतीयत्वाचं असह्य ओझं, ‘भारतीय राज्यघटने’तल्या ‘मूलभूत स्वातंत्र्या’चा दाखला देतं, आजवर ही ‘व्यवस्था’ लादत आलेली आहे! आणि, राज्यघटनेच्या दडपणाखाली आम्ही फारसा विचार न करता, विरोध न दर्शवता… ते भारतीयत्वाचं आपल्या खांद्यावर ओझं किंवा मानेवर ‘जू’ वागवीतही आलोत. अशा विपरीत स्थितीत, आपली ‘मराठी-अस्मिता’ नेमकी आयती सापडली ती… व्यावसायिक, हिशोबी व सोयीच्या “ठाकरी-राजकारणा”च्या तावडीत!!! त्यामुळे, तिच्या दुर्दैवाला आणि दशावताराला थारा उरला नाही आणि पहाता पहाता सामान्य ‘मराठी माणूस’ त्याचाच भूप्रदेशातून उखडला जाऊ लागला… परिणामतः आज तो, “दुय्यम-नागरिक” म्हणून, आपलं निव्वळ अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना महाराष्ट्राच्या सांदीकोपऱ्यातून दिसतोयं!
“महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीचं, मराठी माणसाच्या मुळावर येती झाली!”
राजकारण नांवाच्या ‘धंद्या’ला सरावलेल्या तद्दन बेगडी व ढोंगी मराठी राजकारण्यांच्या मराठीविषयक ‘पुतनामावशीच्या प्रेमा’चा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी, आपलं ‘मराठीभाषिक जनता’ म्हणून काय चाललयं?
प्रदूषण, फक्त वातावरणात-पर्यावरणातच पसरलेलं नाही; तर, आमच्या ‘अमृततुल्य’ मराठीच्या रंध्रारंध्रातही हे प्रदूषण आता आम्हीच भिनवलयं…. त्याचं अगदी रोजच्या व्यवहारातलं अस्वस्थ करुन सोडणारं उदाहरण म्हणजे, आम्ही कुठल्याही निर्जीव वस्तूला हल्ली ती “मिळाली” असं न म्हणता, सर्रास वस्तू “भेटली” असं म्हणू लागलोयं! भेटतात ती फक्त माणसं… ज्यामध्ये ‘नजरभेट, ओळखदेख वा गळाभेट’ होणं अपेक्षित असतं… तसं निर्जीव पदार्थात घडणं अशक्यप्राय असतानाही, बेधडक व बेबंदपणे आम्ही या महत्त्वपूर्ण भाषाशैलीकडे दुर्लक्ष करुन आपल्याचं सघन-संपन्न ‘मातृभाषे’ची एकप्रकारे ‘उपेक्षा व अवहेलना’ करत असतो, ते आमच्या गावीही नसतं! अगदी, शुद्धलेखनाचे सर्व कडक नियम तोंडपाठ असावेत, अशी काही कुणाची कधि फार मोठी अपेक्षा नसते…. पण, या साध्या साध्या मूलभूत भाषाविषयक अर्थवाही बाबींमध्येही आम्ही असेच बेफिकीर रहाणार असलो, तर याचा अर्थ एकच की, “आम्हालाच आमच्या सोन्यासारख्या मराठी भाषेची आणि मराठी संस्कृतीची काही फारशी पर्वा उरलेली नाही”, मग इतरांनी तिची तमा, ती काय म्हणून बाळगावी???
जागतिक पर्यावरणीय महासंकटांनी ‘अगतिक’ बनलेल्या मनुष्यजातीला वठणीवर आणून, “ठेविले अनंते, तैसेचि रहावे”, असा चिरंतनतेचा वा शाश्वततेचा संदेश देण्याची ‘वैश्विक-क्षमता’ असणाऱ्या, या शिवबा-संतांच्या महान मराठी भाषा-परंपरेला आणि संस्कृतिलाच आता आम्ही ‘भिक्षुकी’च्या पातळीवर आणून सोडलयं… इतरे प्रांतीयांना, तो काय आणि किती दोष द्यावा?
…. राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष)