“कुपोषणानं मरणासन्न होऊन, ऊन्हातान्हात निपचित पडलेली एक लहानगी ‘मुलगी‘, कधि मरतेय आणि कधि आपण तिचा फडशा पाडतोय, यासाठी टपून बसलेले एक गिधाड”, ….सुदान देशामधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, असं प्रत्ययकारी दृश्य कॅमेऱ्यात अतिशय कौशल्याने बंदिस्त करणाऱ्या ‘केव्हिन कार्टर’ला, त्या फोटोबद्दल पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय सन्मानाचं ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळालं खरं… पण, या सन्मानाचा आनंद काही त्याला, फार काळ उपभोगता आला नाही. लवकरच, काही महिन्यातच, वैफल्यग्रस्त अवस्थेत त्यानं आत्महत्या केल्याची बातमी, हां हां म्हणता जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सगळं जग हादरलं!
त्याचं झालं असं की, जगभरातल्या मोठमोठ्या वृत्त-वाहिन्यांवरुन (न्यूज चॅनेल्स) त्यानं संपादन केलेल्या यशाबद्दल त्याचं उदंड कौतुक सर्वत्र सुरु होतं…. आणि तो, या सगळ्या यशाचा मनस्वी आनंद लुटत होता, ही खरंतरं वस्तुस्थितीच होती.
पण, अशाच एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत “फोन इन् प्रोग्राम”अंतर्गत कोणीतरी त्याला फोन करुन प्रश्न विचारला की, “त्या सुदानी मुलीचं पुढे काय झालं?” ….आणि त्या अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नानं केव्हिन कार्टर समूळ हादरला…. चाचरत, गांगरतच तो उत्तरला, “फोटो काढून झाल्यावर मला विमान पकडायची घाई असल्यानं, मी त्या मुलीचं काय झालं, हे पहाण्यासाठी नाही थांबू शकलो!” ….आणि मग, न थांबता, तो प्रश्नकर्ता पुढे केव्हिनला म्हणाला की, “मी हे तुला सांगू इच्छितोय की, त्यादिवशी घटनास्थळी एकच ‘गिधाडं‘ नव्हतं…. दुसरंही एक ‘गिधाडं‘ तिथे मौजूद होतं आणि त्यापैकी एकाच्या हातात ‘कॅमेरा‘ होता!”
त्या विधानानं, केव्हिन कार्टरला प्रचंड मानसिक धक्का बसला… एक अफलातून फोटो आपण काढू शकल्याच्या नशेत, संभाव्य यशकिर्तीच्या धुंदीत, “त्या सुदानी लहानगीचं काय झालं असेल”, हा विचार त्याच्या मनाला तोवर शिवलाच नव्हता….आणि अचानक, आपण स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं असल्याची आतून जाणिव होताच, केव्हिन, अंतर्मुख बनला… त्या सुदानी मुलीची मदतीसाठी त्याच्याकडे रोखली गेलेली आर्त नजर, तिचा मदतीसाठी याचना करणारा असहाय्य चेहरा, आता त्याच्या नजरेसमोर फिरू लागला…. प्रयत्न करुनही, तो विचार काहीकेल्या त्याचा पिच्छा सोडेना…. त्या मुलीची करुण नजर, जणू त्याचा सर्वत्र पाठलाग करु लागली… विचाराच्या थैमानानं, अपराधीपणाच्या टोचणीनं, तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि पुढे लवकरच वैफल्यग्रस्त अवस्थेत तो आत्महत्या करता झाला… यशकिर्तीच्या धुंदकुंद अस्मानात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, हाती कॅमेरा असलेल्या, एका ‘गिधाडा‘च्या पंखांची फडफड अचानक थांबली !!!
आपण जे काही करतो, जी परिस्थिती पहातो, हाताळतो…. त्यातून काही मिळवण्याच्या अनावर लालसेपूर्वी, प्रथम माणुसकीचा, भूतदयेचा ‘ईश्वरीअंश‘ आपल्यात जागवायला हवा… ‘सहसंवेदनेचा दीप‘, आपल्या पंचप्राणांतून तडफडून पेटायला हवा…
केव्हिन कार्टरनं जर, त्या लहान असहाय्य मुलीला उचललं असतं आणि तेथील हाकेच्या अंतरावरील ज्या, ‘युनो’च्या अन्नऔषध-मदतकेंद्रात जाण्यासाठी ती, प्राणांतिक धडपड करत होती… तिथे, दाखल होण्यास तिला मदत केली असती; तर, आज ‘केव्हिन कार्टर’ हयात असता आणि ती लहानगीही!
मित्रहो, आपल्या संतसज्जनांच्या शिकवणुकीतून आलेला “जगा, जगवा आणि जगू द्या….”, हा ‘मराठी-संस्कृति‘तील माणुसकीचा धडा, त्या तथाकथित उच्चभ्रूवर्गातल्या खाजगी (Corporate World) आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी, अभिजनांसाठी आहे… जे, आपली प्रशासनिक वा व्यावसायिक जबाबदारी पार पाडताना, माणुसकी वा भूतदयेला साफ पायदळी तुडवतं बेमुर्वतखोरपणे निर्णय घेत जातात, नको तितक्या कठोरपणे वागत जातात…. या अशा वागण्यालाच ते, “व्यावसायिक-कौशल्य” (Professional Behaviour) म्हणून संबोधतात आणि उजळ माथ्याने जगात “यशस्वी व्यक्ति” म्हणून मिरवतात, चौकोनी सधन संसारात रममाण होतात…. जेव्हा, अनेक जीवांचे संसार त्यांच्या यशाच्या, धनाच्या आणि प्रतिष्ठेच्या लालसेपोटी केव्हाचेच उध्वस्त झालेले असतात !!!
आपली घरं भरताना, आपली ऐय्याशी राखताना आणि वेडीवाकड्या गतीने ती वाढवताना… आपण सामान्य जनतेला किती लुटायचं, निसर्गाला किती ओरबाडायचं, ‘नैसर्गिक-न्याया’च्या तत्त्वाला किती पायदळी तुडवायचं….. याचं भान, माणूस नांवाच्या प्राण्याला कधि येणार???
आपली संतकवियत्री बहिणाबाई म्हणून सांगून गेली, “अरे, मानसा मानसा, कधि व्हशिल रे मानूस???
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)