देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक २
निवडणूक आयोग, न्यायालयं, विद्यापीठं, नीतिआयोग, कॅग, ईडी-आयटी-सीबीआय सारख्या सगळ्याच केंद्रीय अथवा स्वायत्त-यंत्रणा वेड्यावाकड्या ताब्यात घेऊन, EVM चा कथित गैरवापर करुन, ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’सारख्या सरकारी-दरोडेखोरीच्या माध्यमातून प्राप्त हजारो कोटींच्या काळ्या पैशातून प्रचंड महागडा असा ‘आयटी-सेल’ चालवून; तसेच, शिक्षित-अशिक्षित ‘अंधभक्तां’च्या फौजेला सोबत ठेऊन आणि दमनकारी पोलिस-यंत्रणेकरवी ‘बुलडोझर-रिपब्लिक’ चालवून… भाजपाई मोदी-शाह सरकार हुकूमशाहीचा जो वरवंटा फिरवतेय…ती अघोषित आणीबाणी आहे; पण, ती १९७५च्या इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीपेक्षा भयंकर आहे!
१९४७ सालचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध आपण जिंकलो, ते लाल-बाल-पाल, म. गांधी, पं. नेहरु, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद यासारख्या महान पुढार्यांच्या नेतृत्त्वाखाली व भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, मंगल पांडे, अशफाक उल्ला खान, शिरीषकुमार, बाबू गेनू यासारख्या शेकडो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून!
दुसरं स्वातंत्र्ययुद्ध आपण १९७७ साली, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध, उर्वरित सगळ्या पक्षांची जनतादलाच्या रुपाने मोट बांधून, त्यांचा लोकसभा-निवडणुकीत पाडाव करत जिंकलो आणि आता त्यानंतर, बरोबर ४७ वर्षानंतर हे ‘तिसरं स्वातंत्र्ययुद्ध’ आपण लढतो आहोत आणि काळाचा महिमा बघा, ते तिसरं स्वातंत्र्ययुद्धही, १९७७ प्रमाणेच देशभरातले सगळे विरोधीपक्ष, सत्ताधारी भाजपाविरुद्ध ‘इंडिया-आघाडी’च्या बिरुदाखाली एकत्र येऊनच लढतो आहोत!
१९७५ची आणीबाणी, कायदेशीर मार्गाने आली आणि कायदेशीर मार्गानेच गेली. पण, ही अघोषित-आणीबाणी बेकायदेशीर आणि घटनाद्रोह करणारी आहे, कितीतरी अधिक घातकी आहे…त्यावेळी, इंदिरा-सरकारने ईडी/आयटी/सीबीआयच्या विरोधकांवर सर्रास धाडी नव्हत्या घातल्या आणि काही विरोधकांना तुरुंगात धाडण्यामागे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काहीप्रमाणात योग्य कारणं देखील होती व एकदा १९७७ साली निवडणुका जाहीर झाल्यानंतर इंदिरा गांधींनी सगळ्याच विरोधकांना निवडणूक लढविण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली होती… कुणालाही तुरुंगात ठेवलं नव्हतं, विरोधी पक्षांची बँक-खाती गोठवली नव्हती आणि आज काय हुकूमशाहीचा भयंकर तमाशा चाललाय देशात?
‘बोलता हिंदुस्तान’ हे प्रख्यात युट्यूब-चॅनेल सूचना न देता रातोरात बंद करण्यात आलंय आणि सरकारविरोधात ‘अबोल’ असणारा ‘गोदी-मिडीया’ मात्र, सरकारी-जाहिरातींच्या शेकडो-हजारो कोटीत खेळतोय! ही घटनात्मक मूलभूत अधिकार असलेल्या ‘भाषण व विचार स्वातंत्र्या’ची मुस्कटदाबी आहे, गळचेपी आहे…’लोकशाहीचा चौथास्तंभ’ असलेल्या पत्रकारितेला जबरदस्तीने मूठमाती देऊ पहाणं आहे. सरकारची ‘री’ ओढणाऱ्या, सरकारविरुद्ध अजिबात
न बोलणाऱ्या ‘गोदी-मिडीया’सकट सगळ्यांनाच हा दिल्लीश्वर-हुकूम’शहां’चा घातकी इशारा आहे! लक्षात घ्या, भाजपाई मोदी-शाह रासवट राजवटीत
‘Freedom of Speech’ जवळपास गेलंय आणि ‘Freedom to Rich’ मुक्तहस्ते आलंय, ते मिळालंय ‘अंबानी-अदानी’सारख्या मोदीजींच्या शे-दिडशे गुजराथी-भाषिक मित्रपरिवारातल्या (Crony-Capitalists) भांडवलदारवर्गाला…लुटा देशाला, लुटा जनतेला हवं तेवढं…“मोजक्या लोकांच्याच हातात सत्ता-संपत्ती ठेवायची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता त्यामागे आहे”! देश पूर्ण लुटून खाल्ला; तरीही, या ‘गुजराथी-लाॅबी’ला लागलेला ‘भस्म्यारोग’ बरा होणं शक्य नाही…तेव्हा, सावधान!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)