आपल्याला १२३ कोटींच्या मुंबई-बँक घोटाळ्यातून सुखरुप बाहेर काढणाऱ्या देवेंद्रजींचे ‘नंबर एकचे हुजरे’ असलेल्या प्रवीण दरेकरांची ‘सभागृहाचा अवमान’ झाल्याची कारवाई करण्याची आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंची ‘टायरखाली घालण्याची’… स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामराबाबतची आत्यंतिक बेजबाबदार व दहशत निर्माण करु पहाणारी भाषा, हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला भयंकर कलंक आहे आणि तो सहजी पुसला जाणार नाही!
** जेव्हा, प्रत्यक्षात विधिमंडळाचे सदस्य असलेलेच अजित पवार, हे कुणाल कामरापेक्षाही कितीतरी अधिक जहरिली भाषा वापरत होते…तेव्हा, प्रवीण दरेकरांची दातखीळ बसली होती की, अजित पवारांवर ‘सभागृहाच्या अवमाना’ची कारवाई करण्याबाबत त्यांचे कुणी हात बांधले होते?
** ज्या गृहराज्य मंत्र्यांची जबाबदारी राज्यातली ‘कायदा-सुव्यवस्था राखण्याची’ आहे, त्यांच्या नाकासमोरच खुलेआम कायदेकानून धाब्यावर बसवून तोडफोड करणाऱ्या शिंदेसेनेच्या गुंडांना ‘टायरखाली घालायचं’ की, कुणाल कामराला, याचं उत्तर शंभुराजे देसाईंनी द्यावं! सत्तेची झिंग, सत्तेची नशा एवढी बरी नव्हे, शंभूराजे… पराक्रमी, विद्वान व अत्यंत ‘न्यायी’ असलेल्या ‘शिवपूत्र’ छत्रपती संभाजी राजेंवरुन, ‘तुमचं नाव’ तुमच्या मातापित्यांनी ठेवलंय…त्याची थोडीतरी बूज राखा!
…लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं साहित्यिक-दैवत असलेल्या पु. ल. देशपांड्यांनीच निखालसपणे एक वैश्विक-सत्य सांगून ठेवलंय (ज्यावर, नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय) की, “कुठलाही विनोद, हा ‘निर्विष’ असूच शकत नाही”… व्यक्ति व परिस्थितीनुरुप विखाराची मात्रा कमीअधिक होते व राजकारण्यांबाबत तर ती ‘विखारी-मात्रा’ अंमळ जास्तच रहाणार आणि तशी ती जास्त राहिलीच पाहिजे; तरच, आजच्या भ्रष्टदुष्ट राजकारण्यांच्या वागण्यात थोडाबहुत फरक पडला तर पडेल व जनतेचंही ‘प्रबोधन’ होईल…पण, हे समजून घेण्याची पात्रता नसेल; तर, एकतर तुम्ही शंभर टक्के त्या टिकेला पात्र असता किंवा राजकारणात रहाण्यास पात्र नसता!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)