लेख क्र.८ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)

लेख क्रमांक ८

* *’भांडवलशाही’ हे ‘कधिही सुटणे नाही’, असं अंति सर्वनाशी व्यसन….
भांडवलशाही, ही जेमतेम पाचसहा शतकं पुराणी असणारी अगदी नवतरुण-व्यवस्था, इतकी समाजपुरुषाच्या हाडामांसी भिनलीय की, तिच्याशिवाय आज आपल्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा करता येणे नाही…हे विपरीत केव्हा घडतंय; जेव्हा, अशनी-उल्कापाताच्या एखाद्या विश्वविध्वंसक अपघाती आघातापूर्वीच ‘जागतिक-तापमानवाढी’च्या पर्यावरणीय महासंकटातून आजची ‘भांडवलशाही’, अवघ्या सजीवसृष्टीसह ‘मानवी-अस्तित्व’ संपवू पहातेय! त्यातूनच अंत होण्यापर्यंत नेणारं, ‘भांडवलशाही’ हे, ‘कधिही न सुटणारं’ असं व्यसन बनलंय…आणि, त्याचाच प्रचंड गैरफायदा समस्त काॅर्पोरेटीय क्षेत्र घेत असतं व आपल्यावर वेडीवाकडी, मनमानी हुकूमत गाजवत रहाते.

* *भांडवलशाही आणि नीतिमत्ता…???
जिचा जन्मच मुळी भयंकर रक्तपात व भीषण स्वरुपाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कटकारस्थानांतून झालाय व जे तिच्या चिरंतन-अस्तित्वाचं निधान आहे…त्या भांडवलशाहीला, जरादेखील लोकशाहीची चाड असेल वा नीतिमत्ता नावाची चीज असेल?
भांडवलशाहीला नसते कुठली नीतिमत्ता…असलीच, तर आत्यंतिक स्वार्थप्रेरित, आपल्या सोयीप्रमाणे भूमिका बदलणारी नीतिमत्ता (‘Flexibel’ Ethos) असते, भांडवलशाहीला नसतो कुठला धर्म, नसतो कुठला ‘देश’…डोळ्यासमोर सदैव असतो, फक्त रग्गड नफ्याचा (Surplus-Value) ‘धनादेश’!
लहान मुलांच्या दुधाच्या पावडरपासून ते अंगातोंडावर लावायच्या पावडरपर्यंत (आठवा, जॉन्सन बेबीपावडर) आणि खाण्याच्या न्यूडल्सपासून ते थेट शीतपेयांपर्यंत…नफे उकळण्यासाठी, जी बिनदिक्कत ‘कर्करोग’कारक (Carcinogens) घटक वापरु शकते, ती असते ‘भांडवलशाही’!

* *चीनची भिंत तडकली, तर लिंपली जाते….
भांडवलशाहीतल्या अतिरेकी विकासाच्या नादी लागून, आधी “माणूसपण संपतं, मागाहून माणूसच संपतो”!
…कुठल्या देशाच्या विकासाविषयी बोलत असतो आपण? देश, दगडधोंड्यांचा-काँक्रिटच्या बांधकामांचा असतो काय? तो असतो, जिवंत हाडामांसाच्या माणसांचा…आशाआकांक्षा, ज्यांच्या धमन्यांतून निरंतर धावत असतात, अशा भावभावना-संवेदनांच्या चेतासंस्थांनी परिपूर्ण माणसांनी भरलेला प्रदेश, म्हणजे असतो देश!
रासवट वृत्तीच्या (खरंतरं, पांढरपेशे गुंड व गुन्हेगारच ते) HR/IR वाल्यांकडून आणि त्यांच्या ‘बोलवित्या धन्यां’कडून…राजकारण्यांना हाताशी धरुन असंख्य कंपन्यांमधल्या युनियन्सचं साफ खच्चीकरण केलं जातंय…त्या कामगारांचे भोग, ज्याचे त्यालाच माहित! युनियन्स वगैरे काही फार आदर्शवत असतात…असं बिलकूल दावा असण्याचं कारण नाहीच. पण, “चीनची भिंत तडकली तर लिंपली जाते…तोडली जात नाही”, हे सूत्र मात्र ध्यानात असू द्या! संबंधित HR/IR अधिकारीवर्गाकडून कटकारस्थानं रचून; तसेच, कामगार खात्याला हाताशी धरुन, पैशाच्या बळावर पोलिसांची सरकारी-दमनयंत्रणा वापरुन व ‘कंत्राटदार’ बनवत स्थानिक राजकारणी-गुंड आणि खाजगी बाऊन्सर्स वगैरेंना हाताशी धरुन; तसेच, फक्त व्यवस्थापनासाठीच्याच सोयीची असलेली CCTVची करडी नजर ठेऊनच…हे कामगारघातकी उद्योग केले जातात. आयटी-उद्योगातलं रेड-फ्लॅगिंग व मोठ्या रकमेचे पर्सनल-बाॅण्डस लिहून घेण्याची लुटारु-व्यवस्था जाणिवपूर्वक दुरवरच्या प्रांतात केल्या जाणाऱ्या बदल्या व दहशतीसाठी कार्बाईनधारी कमांडोज सर्रास वापरण्यात आल्यानंतरची भयावह व संतापजनक परिस्थिती पाहिल्यानंतर… बळकट पण, विचारी-नीतिमान असलेल्या जातिवंत ‘युनियन्स’च्या आवश्यकतेची तीव्रता भासल्यावाचून रहात नाही!

* *’उडता पंजाब’नंतर काय, आता ‘उडता महाराष्ट्र’…???
कामाच्या तणावामुळे व कंपनी-दहशतवादा’मुळे (Corporate-Terrorism) भारतात काॅर्पोरेटीय मानसिक-आजारांचा प्रकोप ‘कोविड-साथी’पेक्षाही जास्त पसरुन ‘उडता पंजाब’सारख्या घटना सर्वत्र घडतायत. पुणे-बंगळुरु-चेन्नईसारख्या हायटेक-सिटीमधला अत्युच्चशिक्षित तरुणवर्ग निव्वळ कामाच्या दबावापोटी आधी वैफल्यग्रस्त, मग व्यसनग्रस्त व सरतेशेवटी सहनशक्तिचा कडेलोट होऊन आत्महत्याग्रस्त होतोय. ‘लॅन्सेट सायकियाट्री कमिशन’सारख्या संस्था २० कोटीहून अधिकचा तरुणवर्ग आयुष्यातली अस्थिरता व वैफल्यामुळे अंमली-पदार्थांच्या आहारी गेल्याची सप्रमाण धक्कादायक मांडणी करत असतात!
म्हणजेच, अर्धशिक्षित औद्योगिक-कामगारांच्या सहकुटुंब आत्महत्या (‘कामगारांच्या आत्महत्या’, असं त्याला भांडवली-व्यवस्थेकडून जाणिवपूर्वक ब्रॅण्डिंग केलं जात नसलं तरीही) थांबायचं नाव नाही; त्यात, ही उच्चशिक्षितांची भर पडायला लागलीय.
उच्चशिक्षित-उच्चमध्यमवर्गीय आयटी-उद्योगात जेवढे अन्याय-अत्याचार-शोषण आहे, ते बघून बाहेरच्या औद्योगिकविश्वालाही शरम वाटावी. नियमितपणे १०-१२ तास मान मोडून कामं करवून घेऊन, कामाच्या नोंदी (Records) व्यवस्थित राखण्यासाठी ८ तास काम केल्याच्या खोट्या नोंदी सर्रास ठेवल्या जातायत…यासंदर्भात, प्रतिकार तर सोडाच; पण, थोडी विरोधाची वा निषेधाची खळखळ जरी कुणाकडून केली गेली; तर, ‘उद्यापासून कामावर नको’ कळवणारी ‘गुलाबी-पावती’ (Pink Slip) संबंधित कर्मचाऱ्याच्या हाती तत्काळ ठेवली जाते; कारण, जाब विचारायला ‘युनियन्स’ मुळातून तिथे अस्तित्वातच नाहीत. लैंगिक-शोषणापासून अनेकविध गैरप्रकार, आय-टी उद्योगात सुरु आहेत…पण, तरीही ‘काॅर्पोरेटीय-शांति’चा सन्नाटा पसरलेला आहे तिथे! ही कुठल्याही प्रार्थनास्थळीची पवित्र-शांतता नव्हे; ती आहे, स्मशानातल्या मुडद्याफरासांची अपवित्र-निर्जीव शांतता!

(क्रमशः)