प्रश्न क्र.१ : अठराव्या शतकातील क्रूर-अन्यायकारक ‘वसाहतवादी’ मनोवृत्तीसारखे भयंकर कामगार-कायदे (ज्याला, संस्कृत भाषेत भाजप-संघीय जाणिवपूर्वक ‘संहिता’ वगैरे गोंडस नावाने संबोधतायत) आणण्याची हिंमत भांडवलदारवर्गाला होतेच कशी?
प्रश्न क्र. २ : निवडणुकीत ‘बहुसंख्य मतदार’ असलेल्या कामगारांच्या मतांची वेळोवेळी भीक मागणाऱ्या राज्यकर्त्यांनाही, ती हिंमत कशी काय होते??
प्रश्न क्र. ३ : आणि, जो मराठी वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ आहे (उदा. लोकसत्ता, लोकमत, म.टा. इ.) यांना हे नवे कामगार-कायदे, कसे कामगारांच्या हिताचे आहेत, असं भाजप-संघीय धर्तीवर रेटून खोटं बोलण्याची हिंमत देखील कशी होते???
वरील तिन्ही प्रश्नांचं उत्तरं, “घोडा का अडला, पान का सडलं आणि भाकरी का करपली?” …जसं, “न फिरवल्यामुळे”, हे एकच आहे!
…तसंच, वरील तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे “झोपलेला कामगार, वेळीच न जागल्यामुळे”!
…ती वेळ होती, देशात Neo-Liberalism म्हणजे, ‘नवउदारमतवादी-विचारसरणी’ (प्रत्यक्षात, ‘नववसाहतवादी’) या गोंडस आवरणाखाली ‘खाउजा-धोरणा’पश्चात आणल्या गेलेल्या गुलामगिरी व नव-अस्पृश्यतास्वरुप असलेल्या कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध आवाज उठवण्याची!
…त्यावेळेस, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात कामगारांनी कुठलीही राजकीय-जागरुकता न दाखवल्यामुळेच आणि बुडाशी आग लागली असतानाही कामगार…भगवे, हिरवे, पिवळे, निळे झेंडे फुकाचे मिरवत बसल्यामुळेच आजची घृणास्पद व संतापजनक परिस्थिती उद्भवलीय!
लक्षात ठेवा, ‘कंत्राटी-गुलामी’विरुद्ध प्राणपणाने लढणारा तेव्हाही एकच नेता, संपूर्ण भारतात होता (केवळ, महाराष्ट्रातच नव्हे)होता व आजही आहे; त्याचं नाव ‘राजन राजे’! भांडवलदारांच्या देणग्यांवर चालणारा एकही प्रस्थापित राजकीय पक्ष वा राजकीय नेता, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध भूमिका घ्यायला तयार होत नाही; हे पाहून विमनस्क अवस्थेत त्याने “कंत्राटी-कामगार पद्धत निर्मूलन” हाच मुख्य विषय बनवून, कामगारांनी हाती सोपवलेल्या अत्यल्प संसाधनांनिशी आपला स्वतःचा पक्ष, त्याने वर्ष-२०११ मध्ये काढला, ज्याचं नाव “धर्मराज्य पक्ष”…श्रमिकांसाठी अधर्माचं राज्य संपवू पहाणारा ‘धर्मराज्य पक्ष’!
…पण, दुर्दैव हे की, लघुदृष्टीच्या कामगारांनी, खास त्यांच्यासाठीच काढल्या गेलेल्या पक्षाकडे साफ दुर्लक्ष केलं; त्या धर्मराज्य पक्षाकडे प्रसिद्धीसाठी पैसा नव्हता (तो केवळ, कामगारांच्याच थोड्याथोडक्या पैशांवर चालणारा होता; भांडवलदारांच्या बड्या पैशावर चालणारा नव्हे)…पण, नियतीने दिलेली हाती भाषणशैली, लिखाणशैली होती; त्याचा आजवर पराकोटीचा वापर व जीवाचं रान करुन देखील कामगार जागा व्हायला तयार नाही”, तर मग वेगळं काय घडणार…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

