“तो नसतो कुठल्या मंदिर-मस्जिदीत, नसतो कुठल्या गुरुद्वारा-चर्चमध्ये…तो तुमच्याआमच्या भोवतीच, अगदी आपल्याला सदैव खेटून बसलेला असतो आणि उघड्या डोळ्यांनी असतो की,….”

**आंधळ्या देशप्रेमाचा, जातिधर्माचा आणि काॅर्पोरेटीय-कारकीर्दीचा ‘काळा चष्मा’ चढवलेल्यांना…समाजातील इतर कुणाच्या पायाखाली काय जळतंय, कोण कसं होरपळतंय…याची काहीही दिक्कत नसते!
**जंगलातल्या आदिवासींना जंगलाबाहेरची जंगली जुलूमशाही-हुकूमशाही राजवट, त्यांच्या निर्दय-षडयंत्री भांडवली क्लृप्त्या…याच्याशी काही देणंघेणं नसतं आणि शहरातल्या सुशिक्षितांना (त्यात सगळा शहरी अभिजनवर्ग आलाच) आपल्या चंगळवादी-जीवनशैलीपुढे व काॅर्पोरेटीय अथवा सार्वजनिक सेवेतील ‘करियर’पुढे…जंगलं किती तुटतायत, आदिवासींना शोषण-दमन-विस्थापनासह कशाकशाला तोंड द्यावं लागतंय; तसेच, खाणकाम व काँक्रिटच्या विकास-प्रकल्पांपुढे निसर्ग किती भयंकर ओरबाडला जातोय…याच्याशी फारसं देणंघेणं नसतं!
**कामगारांना, शेतकऱ्यांच्या समस्या व लढे आणि शेतकऱ्यांना, कामगारांचे हक्क व लढे (अर्थात, मुळातून कामगारांनाच स्वतःच्या हक्कांची फारशी जाणीव आजकाल उरलेली नाही, ही वेगळीच गोष्ट आहे)

…हे सगळं तो पहात असतो (आणि, भारतापुरतं बोलायचं तर),
१) निवडणूक-आयोगाकरवी केलेलं EVM / SIR वगैरेचं गुन्हेगारी-व्यवस्थापन
२) ग्राहक व कामगार-कर्मचाऱ्यांचं निर्घृण शोषण करुन कमावलेला काॅर्पोरेटीय मोठा पैसा
३) महाकाय सार्वजनिक व खाजगी प्रकल्पांच्या टक्केवारीतून जमा केलेल्या प्रचंड काळ्या पैशाचं निवडणुकीदरम्यान कौशल्यपूर्ण वाटप व व्यवस्थापन
४) केवळ ‘आर्थिक-सोय’ म्हणून राजकारणात उतरलेले आणि पक्ष वरिष्ठांच्या ‘हुकूमाचे ताबेदार’ म्हणून, आपली सदसद्विवेक बुद्धी हरवून बसलेले बिनडोक-स्वार्थी ‘राजकीय-कार्यकर्ते’
५) आम जनतेप्रति, लोकशाही-राजवट व राज्यघटनेप्रति असलेल्या जबाबदाऱ्यांबाबत ज्यांच्या जाणिवा…निव्वळ, उदरनिर्वाहाच्या लागलेल्या आपल्या सोयीपुढे, क्षीण वा बोथट झालेल्या असतात; असे लष्करी जवान आणि सशस्त्र पोलिस

…या अशा ‘पंचसूत्री’वर आधारित, आधुनिक रक्तपिपासू-निर्दय-शोषक ‘भांडवली-व्यवस्था’ (Vampire-State System) भारतासह जगभर धुमाकूळ घालताना, तो तुम्हाला ‘कर्म-स्वातंत्र्य’ बहाल करुन त्रयस्थपणे पहात असतो…पण, लक्षात ठेवा, माणसांनी आपले डोळे सोयिस्कररित्या मिटून घेतले असले; तरी परमात्मास्वरुप ‘निसर्ग’ टक्क जागा आहे आणि तो अवघ्या मानवजातीच्या महापातकांचा भरलेला ‘घडा’, त्यांच्याच हाती ठेवत… पुढील उण्यापुऱ्या काही दशकातच ‘निवाडा’ करणार आहे; दुर्दैवाने, त्यात सजीवसृष्टीतील अन्य अश्राप-निष्पाप जीव भरडले जाणार आहेत…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)