{आधुनिक जगताच्या कार्बन-रसायनकेंद्री ‘जीवनशैली व अर्थव्यवस्थे’च्या धारणांमुळे व धोरणांमुळे…’जागतिक-तापमानवाढ’ अनियंत्रित होत चाललेली असताना व त्यातून उद्भवलेल्या, जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटांमुळे (ज्याला, ‘जागतिक-हवामानबदल’, असं सौम्य नामाभिधान दिलं गेलं आहे) दिवसेंदिवस असह्य होत चालल्याच्या पार्श्वभुमीवरील…५ जून-२०२६, या ‘जागतिक पर्यावरणदिना’च्या निमित्ताने….}
अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्धादरम्यान, जगभरात ‘तेल-संकटा’विषयी जोरदार चर्चा सुरु असताना…आजच्या (५ जून-२०२६) ‘जागतिक पर्यावरणदिना’ निमित्ताने…’जागतिक-तापमानवाढ’ दिवसेंदिवस असह्य होत चालल्याच्या पार्श्वभुमीवर, आपल्याला हे जबाबदारीने समजून घेणं गरजेचं आहे की, “संकट तेलाचं नव्हे…तर, तेल, हेच संकट आहे!”
————————————-
भांडवली-व्यवस्थेतील ऐशोआराम व चंगळवादाचं ‘व्यसन’ जडलेल्या मानवी समाजाची जीवनशैली व अर्थव्यवहार…अवघ्या सजीवसृष्टीच्या मुळावर येत चालले असूनही; त्याकडे, आपलं अक्षम्य दुर्लक्ष होत रहावं, यापरतं दुसरं दुर्दैव काय असू शकतं?
व्यक्तिगतस्तरावर दरडोई खनिज-तेलाचा, लोखंडाचा, सिमेंटचा (आणि, हल्ली काँप्युटर-मोबाईलचा) खप किती किंवा राष्ट्रीयस्तरावर प्रत्येक राष्ट्राचं भौतिक-संसाधनरुपी ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किती…हेच, आमच्या आधुनिक-प्रगतीचे ‘मापदंड’ बनलेत; जे मूलतः व अंतिमतः, ‘जीवनविरोधी’ आहेत!
आंतरराष्ट्रीय पातळीवर नासाचे माजी संचालक जेम्स हॅन्सेन (“Storms of My Grandchildren” पुस्तकाचे लेखक) आणि आपल्या देशात, ‘भारतीय पर्यावरण-चळवळी’चे जनक ॲड. गिरीश राऊतांसारखे अनेक पर्यावरणतज्ज्ञ… “पृथ्वी, ही नोकरी देण्यासाठी नाही, धंदा-व्यवसाय-करियर फुलविण्यासाठी नाही; तर, फक्त आणि फक्त, आदिम-नैसर्गिक स्वरुपात निखळ आनंदाने जगण्यासाठी आहे”, असं गर्जून व तळमळून सांगत असतानाही, आपली अवस्था म. गांधींच्या तीन माकडांसारखी ‘आंधळी, बहिरी व मुकी’ अशी का व्हावी? “कार्बन ओकणारी मोटरगाडी नव्हे; तर, पशुऊर्जेवर चालणारी बैलगाडी…हेच, शाश्वत-विकासाचं प्रारुप आहे”, इतकी प्रत्ययकारी व आजच्या घटकेला धक्कादायक वाटणारी मांडणी, जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ करत असताना; पिसाटल्यासारखं अवघं जग, ‘कार्बनकेंद्री-विकासा’च्या मागे धावत सुटलंय; हा पुढील पिढ्यांसाठी धोक्याचा ‘लाल बावटा’ आहे.
‘मनुष्य व पशू ऊर्जे’चाच जीवन जगण्यासाठी प्रामुख्याने वापर करणं आणि लाकूड, पाणी, माती, वनस्पती, प्राणी या नैसर्गिक-संसाधनांचाच कौशल्याने व निसर्ग-पर्यावरणाची पुनरपि सहजी भरुन निघेल, एवढीच मर्यादित हानी करुन, जगण्याची कला व कलेतला आनंद साधण्याची गरज व आव्हान, आपल्यापुढे असताना…आपण, मर्कटांसारखं बेफाम व बेजबाबदारीने वागत, निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस करत सुटलोत. आपल्या प्रदुषणकारी जगण्याच्या, या विनाशकारी घटनाक्रमाला पुरती तीन शतकं देखील झालेली नसताना, जर ‘जागतिक-तापमानवाढी’तून निसर्गाचा एवढा प्रकोप निर्माण होत असेल; तर, मग थबकून आपण कुठे चाललोयत, याचा आपल्या नातवंडांच्या-पंतवंडांच्या व पुढील पिढ्यापिढ्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीकोनातून, आपण गांभीर्याने विचार करायला नको?
भारतापुरतं बोलायचं तर… ‘अनियंत्रित’ कार्बन-ऊत्सर्जन करणाऱ्या ‘विकासा’च्या नादाने खुळावून, ‘विनाशपुरुष’ (‘विकासपुरुष’ नव्हेच) बनलेली आपली मोदी-गडकरी-फडणवीस-शिंदे इ. राजकारणी मंडळी, गौतम अदानीसारखे भांडवलदार व संबंधित शासकिय अधिकारीवर्ग… बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे, गगनचुंबी इमारती, विस्तीर्ण महामार्गांचं जाळं, खाणकाम…इत्यादींसाठी, मुंबई आरे काॅलनी, झारखंड तसेच छत्तीसगडच्या हसदेव मधील जंगलावर व अरवली पर्वतरांगांच्या निसर्गावर आक्रमण करताना…ते थेट ग्रेट निकोबारमधील लाखो महाकाय पुराण-वृक्षांवर कुऱ्हाड चालवताना पहावं लागणं… हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. पण, ज्यांच्यासाठी ‘पैसा हाच परमेश्वर’ बनलाय आणि ज्यांना ‘सत्तासुंदरी’नं वेडपिसं करुन सोडलंय… अशा वखवखलेल्या वृत्तीच्या वरपांगी ‘हिंदुत्ववादी’; पण, खऱ्याअर्थाने, औषधालाही ‘धार्मिक’ नसलेल्यांना, ते काय आणि कसं आकळणार? आपल्या भारतीय-अध्यात्मातल्या कुठल्याही एका ग्रंथात, अशातऱ्हेच्या विनाशकारी विकास-प्रक्रियेचा ओझरता तरी उल्लेख, ही तथाकथित ‘हिंदुत्ववादी’ मंडळी दाखवू शकतील??
“अवघी चराचर सृष्टी, हीच परमात्म्याचंच प्रकट रुप आहे, आपण ‘निसर्गप्रेमी’ नसून निसर्गाचंच एक अपत्य, त्याचंच अविभाज्य अंग व त्याचाच आविष्कार आहोत”… पण, निसर्गाहून स्वतःला श्रेष्ठ समजण्यातून येणारे…कार्बन, रासायनिक, आण्विक ‘प्रदूषणकारी’ महाकाय-प्रकल्प म्हणजे, विकासाच्या गोंडस नावाखाली, रौद्रभीषण भविष्याची नांदी असलेलं, निसर्गाशी मांडलेलं ‘द्यूत’च… जे ‘भांडवली-व्यवस्थे’चं अटळ-अनिवार्य असं अपत्य आहे; ज्याला हे उमगलं, त्याच्यासाठी ‘निसर्ग’ हा धर्म व ‘पर्यावरण’ ही जात बनून जाते… दुसरंतिसरं काहीही शिल्लक रहात नाही!
“अनाकलनीय स्वरुपाचे हवामानातील तीव्र व घातकी बदल, हे गेल्या हजारो वर्षांतील मनुष्यजाती समोरचं सर्वात मोठं आव्हान व धोक्याचा कंदील आहे…तेव्हा, काँक्रिटच्या कार्बनकेंद्री ‘विकास’ नांवाच्या भुतानं झपाटलेल्या मराठी-तरुणाईनं, याबाबत अनभिज्ञ राहून कसं चालेलं? तेव्हा, उठा… “ठेविले अनंते तैसेचि रहावे…चित्ती असू द्यावे समाधान”, या संत तुकारामांच्या मराठमोळ्या वचनाला आपण जागूया!
“जगा, जगवा आणि जगू द्या”, हाच आपला जीवनमंत्र होऊ द्या… निसर्ग हाच आपला ‘धर्म’ आणि ‘पर्यावरण’ हीच आपली जात, होऊ द्या!
काँक्रिटचा ‘विकास’ नांवाचा अनर्थकारी ‘विकार’ जडलेल्या मूढांना, हे प्रतिपादन त्याज्य वाटणं स्वाभाविक आहे; पण, त्याने नजिकच्या भविष्यात होऊ घातलेला मानवासह सजीवसृष्टीचा संहार थांबणं केवळ अशक्य आहे! उणीपुरी काही दशकं मानवजातीच्या हातात आहेत….तेवढ्यात काही पावलं धोरणकर्त्यांनी, भारतासह जागतिक पातळीवर उचलली नाहीत; तर, आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल… तेव्हा कुठलाही उपाय मानवजातीच्या हाती शिल्लक राहीलेला नसेल, हा या आजच्या पर्यावरणदिनाचा भयकारी संदेश आहे!!!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)

