…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता?

(आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण-दिन… बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’, कार्ल मार्क्सप्रणित ‘साम्यवाद’ आणि गांधी-नेहरु-लोहियांचा ‘समाजवाद’…यांना एकाचवेळी तिलांजली देत, अमानुष विषमतेचा व माणुसकीशून्य व्यवहाराचा कहर माजवणार्‍या ‘भांडवलशाही’चं निर्लज्ज-निरर्गल प्रतिनिधित्व करणाऱ्या… ‘इन्फोसिस’वाल्या नारायणमूर्तींच्या कामगार-कर्मचारीविरोधी फुत्काराचा व सत्यस्थितीचा अपलाप करुन भांडवलशाहीचं आंधळं समर्थन करु पहाणाऱ्या विखारी वक्तव्याचा… ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘राजन राजे’कृत रोखठोक व जळजळीत पंचनामा…बघूया, त्यातून हा इन्फोसिसचा ‘वाल्या’ आणि तत्सम भांडवलदारवर्ग, सुधारुन ‘वाल्मिकी’ बनतोय का…की, ‘‘भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥’’, या संत तुकारामांच्या उक्तिनुसार, यांना वठणीवर आणावं लागतं का ते…!!!)

‘‘वानराचा नर करते, ते विज्ञान…नराचा नारायण करते, ते अध्यात्म आणि ‘नारायणाचा नर व नराचा वानर’, असा उलटा प्रवास घडवते, ती ‘भांडवलशाही’…!!!

तेव्हा, हा ‘नरोबा’ की, ‘वानरोबा’ ??? नीट बोल ‘नार्‍या’ म्हणावं; तर, नार्‍या म्हणतो, ‘‘मांडवाला आग लागली’’…!!!

अति पैसा, अतिरेकी नफा कमावल्यानंतर भल्याभल्यांची बुद्धी चाळवते, साफ बिघडून जाते…तशी तुमची बुद्धी-तुमची मती बिघडलीय, (वा)नरायणमूर्ती! नराचा, वानर होणं…यालाच म्हणतात. एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडून तत्काळ तपासणी करुन घ्याच! कार्ल मार्क्सने, हे अचूक जाणलं होतं…म्हणून, त्याने त्याच्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं! भांडवलाचा गुणधर्मच असा की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी तुमची त्या अब्जावधी डाॅलर्सच्या अन्याय्य-अनितिमान वरकड-कमाईने (Surplus-Value) मती फिरलीय. ‘मानवीमूल्यं’ पायदळी तुडवत, दुसर्‍यांवर सतत कुरघोडी करत, मानवी-जगण्यातली शांति-समाधान उध्वस्त करुन…तुम्हा लोकांना नेमका कुठला ‘राक्षसी-सैतानी विकृत आनंद’ मिळतो…ज्यासाठी ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ अशा हव्यासाने, संपूर्ण जगच तुम्ही वेठीला धरताय?

‐——–‐—————————————————————–

जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योग-सेवाक्षेत्रातील रोजगार-क्षमता मारली जात असताना (ही, ‘Jobless-Growth’ केवळ, नव्हे; तर, ‘Jobloss-Growth’ आहे…म्हणजे, एखाद्या कंपनीची अत्याधुनिक तंत्राने व तंत्रज्ञानाने वार्षिक-उलाढाल वाढत असताना, मुळात असलेले रोजगारच झपाट्याने संपुष्टात येत जाणं) कामाचे दिवस व दिवसाचे कामाचे तास कमी करण्याकडे सार्वत्रिक कल असतानाच… ‘जू बैसले मानेवरी आणि चाबूक हा पाठीवरी’, घेऊन आठवड्याला म्हणे, ‘‘राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी ७० तास काम करा’’… असा, नार्‍याने ठरवून पद्धतशीर ‘आवाज’ टाकताच…मी मी म्हणणारे, भांडवली ‘सामंत व समंध’ एकदम जागे होऊन… ‘इसबेला आयला’, सिंगल-माल्ट व्हिस्कीचा पंचतारांकित पेग मारुन…तारस्वरात (वा)नरायणमूर्तींची ‘री’ ओढू लागले.

…तरीही, रस्त्यावर उतरुन तर सोडाच; पण, समाजमाध्यमातूनही साधा निषेध न करताच, कामगार-कर्मचारीवर्ग नेहमीप्रमाणे झोपलेलाच!

त्यांना बसल्या जागी, काहीही न करता, जागचं बूड न हलवता…केवळ, स्वतःसाठीच सगळं हवंय. ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या गुलामीत रोज पिचल्या जाणाऱ्या, आपल्या इतर नवतरुण लाखो कामगार-बांधवांची, त्यांना बिलकूल फिकीर नाही. या दळभद्री मनोवृत्तीतूनच कामगार-चळवळ आज आचके देतेय आणि कामगारविरोधी धोरणं (‘भाजपा’सरकारने लादलेली ४ काळ्या कायद्यांची काळीकुट्ट ‘कामगार-संहिता’ वगैरे) व या (वा)नरोबासारखी कामगारविरोधी वाजणारी थोबाडं, काहीकेल्या थांबायला तयार नाहीत!

अरे, (वा)नरोबा, तंत्रज्ञानाने माणसांचं जीवन हलकंफुलकं, कमीतकमी कष्टाचं व सुखासमाधानानं भरलेलं आणि सुरक्षित-निश्चिंत, आरामदायी होणार नसेल; तर ते तुमचं तंत्रज्ञान, काय चुलीत घालायचंय, सरपण म्हणून? कुठल्या देशाच्या विकासाविषयी बोलताय आपण? देश, दगडधोंड्यांचा-काँक्रिटच्या बांधकामांचा असतो काय? तो असतो, जिवंत हाडामांसाच्या माणसांचा… आशाआकांक्षा ज्यांच्या धमन्यांतून निरंतर धावत असतात, अशा भावभावना-संवेदनांच्या चेतासंस्थांनी परिपूर्ण माणसांनी भरलेला प्रदेश, म्हणजे असतो देश!

आठवड्याच्या ७० तासांच्या कामाचा, कामगार-कर्मचारीविरोधी ‘भांडवली-सट्टा’ लावून… तेवढं अचकट-विचकट बोलून आपण थांबला नाहीतच. पैसा आणि यशाची नशा डोक्यात भिनलेल्या टिपीकल ‘भांडवलदारा’सारखं (जेफ बेझोस, एलियाॅन मस्क… या आपल्याच कुळातल्या विकृत धनदांडग्यांसारखेच) आपलं बरळणं पुढे चालूच राहीलं आणि नुकतीच आपली जीभ थेट घसरली, ती गोरगरीबांना मिळणाऱ्या तथाकथित फुकट्या सवलतींवर…म्हणे, ‘‘कुणालाही राष्ट्रीय योगदान दिल्याखेरीज फुकट काही दिलं जाऊ नये आणि भारतासारख्या गरीब राष्ट्राला समृद्ध बनवण्यासाठी ‘उदारमतवादी-भांडवलशाही’ हाच एकमेव पर्याय होय!’’

…एवढा देशाविषयी कळवळा आहे; तर मग, तब्बल २५ लाखांची बड्या भांडवलदारांची कर्ज, मोदी-शहांच्या भाजपा सरकारकडून माफ करण्यात आली…त्याविषयी, कधि काही बोलला नाहीत ते? आणि, भारतीय-बँकांचे हजारो कोटी बुडवून पळून गेलेल्या उद्योगपतींना काय ‘भारतभूषण’ पुरस्कार द्यायचा, असं आपलं म्हणणं आहे की, काय…कारण, त्यावरही आजवर आपली अळीमिळी गूपचिळीच?

(वा)नरायणमूर्ती, तुम्ही किंवा तुमचं कुटुंब, ‘उदारमतवादी’ वगैरे अजिबात नाहीच (किडूकमिडूक दानधर्म करुन कोण ‘उदारमतवादी’ होत नसतो…तुम्हा कुटुंबियांच्या अफाट संपत्तीचा किमान ९०% हिस्सा, राष्ट्राच्या सार्वजनिक शिक्षण-आरोग्य सेवेला अर्पण करा…मगच, या विषयावर आपण बोलू). निदान जगासमोर असा उघडा पडलेला तुमचा भंपकपणा, आतातरी दूर सारा आणि ‘इन्फोसिस’ची जरा ‘ताटी’ उघडून बघाच…

** इन्फोसिसमध्ये डझनावारी कार्बाईनधारी कमांडोज कशासाठी असतात? उद्योग व सेवा क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांतील मौजूदा ‘कंपनी-दहशतवादा’विषयी (Corporate-Terrorism) आपलं काय म्हणणं आहे? …तो ‘कंपनी-दहशतवाद’ पोसण्यासाठीच तिथे कार्बाईनधारी कमांडोज किंवा टगे बाऊन्सर्स ठेवलेले नसतात काय? कारण, काय तर म्हणे, ‘दहशतवाद्यां’कडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून कंपन्यांचं संरक्षण करण्यासाठी कमांडोज नेमलेले असतात…खरंतरं, युनियन्स वगैरे करण्याची हिंमत, कामगार-कर्मचारीवर्गाने करुच नये…म्हणूनच, तिथल्या कर्मचाऱ्यांवर ‘व्यवस्थापकीय-जरब’ बसवण्यासाठीच ठेवलेले, ते कमांडोज-बाऊन्सर्स नसतात काय? जोडीला कर्मचाऱ्यांवर CCTV ची करडी नजर सदैव रोखलेली!

तेव्हा, ‘दहशतवादा’चा धोका, कंपन्यांच्या बाहेर अस्तित्वात नाही; तर, तो तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने, आयटी-उद्योगाच्या आत चांगलाच हातपाय पसरुन आहे…म्हणूनच, संपूर्ण आयटी-उद्योगात नावाला देखील युनियन्स नाहीत किंवा एवढा अन्याय-अत्याचार-शोषण असूनही, त्याविरोधात संघटित स्वर, कुठेही उमटू शकत नाही!

..तरीही, ‘भांडवली-व्यवस्था’ उदारमतवादी असू शकते, राहू शकते…असा आपला दावा असावा, (वा)नरोबा?

** सगळ्याच आयटी व इतर कंपन्यांमधील ‘प्रोजेक्ट’ वगैरेच्या नावावर चाललेली कामाची जबरदस्ती, जरा डोळे उघडून नीट बघा. आंधळा धृतराष्ट्र नका होऊत (वा)नरायणमूर्ती! दिव्यदृष्टी बाळगलेला महाभारतातला ‘संजय’ व्हा; तरंच काही कळेल, काही दिसेल…नाहीतर, दिव्याखाली अंधारच वस्तीला रहायचा, याहीपुढे तसाच….

** ‘रेड-फ्लॅगिंग’, हे मानवी-स्वातंत्र्याची गळचेपी करणारं बेकायदेशीर तंत्र, नॅसकाॅमसारखी आयटी-शिखरसंस्था युनियनबाजी करणाऱ्या व व्यवस्थापनाला नडणार्‍या कर्मचाऱ्यांना…समस्त आयटी-उद्योगातून कायमचं बहिष्कृत करण्यासाठी वापरते किंवा नाही; यावर, (वा)नरोबा भाष्य करा. ‘रेड-फ्लॅगिंग’, ही काय भानगड आहे…ते कोणाचं अपत्य आहे आणि ते कोणी, कशासाठी वाढवलंय, हे आम्हा पामरांना कळेल काय?

** आयटी’ची ऐट संप(व)ताना…माहिती-तंत्रज्ञानाचाच गुन्हेगारी दुरुपयोग करुन वेठबिगारासारखं नव्या उच्चशिक्षित आयटी-इंजिनियर्सकडून व्यक्तिगत ‘बाॅण्ड’ जबरदस्तीने लिहून घेणं, हाच का आपला ‘भांडवली-उदारमतवाद’? आणि, त्याहीपेक्षा अधिक जबरदस्तीने व घृणास्पदरित्या ते ठोकून वसूल करण्याची यंत्रणा, आजवर कोणी उभारलीय व कोणी चालवलीय आयटी-क्षेत्रात?

अडल्यानडल्या नवतरुण आयटी-इंजिनियर्सकडून इन्फोसिससह विविध आयटी-व्यवस्थापनं, प्रसंगी पगाराच्या पंधरा-वीस पटीपेक्षाही जास्त रकमेचे ‘पर्सनल-बाॅण्ड्स्’ लिहून घेतायत आणि ‘रेड-फ्लॅगिं’गच्या अमानुष-घृणास्पद प्रथेच्या धमकावणीतून ते सहजी वसूलही करतायत…त्याच, भांडवलशाहीला ‘उदारमतवादी’ म्हणता, (वा)नरायणमूर्ती?

…औषधाला तरी ‘लोकशाही’, तुमच्या आयटी-उद्योगात किंवा भारतातल्या इतर उद्योग-सेवाक्षेत्रात शिल्लक आहे का, (वा)नरायणमूर्तीं…या प्रश्नाचं आधी उत्तर द्या आणि मगच, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला करत’, अशी बेजबाबदार विधानं करा!

** महाराष्ट्रातल्या तरुणाईला दूर आसाम, राजस्थान, तामिळनाडूत पाठवायचं..तर, तिथल्या तरुणांना महाराष्ट्रात, गुजराथला किंवा अन्य कुठल्यातरी दूरच्या प्रांतात पाठवायचं, जेणेकरुन ते बावचळून तिथे निमूटपणे संघटित न होता, अन्याय-अत्याचार-शोषण सहन करत निमूट रहातील. बरं, तुमच्या आयटी-उद्योगातलं व्यवस्थापन एवढं भावनाशून्य व बेपर्वा की, दूरच्या प्रांतातून अथवा शहरातून येणाऱ्या नव्या नोकरदारांना रहाण्याची-येण्याजाण्याची सोय करण्याबाबत काडीचंही लक्ष घालत नाही (खरंतरं, विनामूल्य वा वाजवी दरात, या सुविधा संबंधित कंपन्यांनीच पुरवायला हव्यात). परक्या शहरात-प्रांतात आलेल्या, त्या बिचार्‍या तरुण मुलामुलींची बिलकूल पर्वा केली जात नाही (इन्फोसिस, ही देखील त्यातलीच)…ही तुमची, ‘उदारमतवादी भांडवलशाही’ का?

** तुमच्या आयटी-उद्योगात जेवढे अन्याय-अत्याचार-शोषण आहे, तेवढं बघून बाहेरच्या औद्योगिक-विश्वालाही शरम वाटावी. नियमितपणे १०-१२ तास मान मोडून कामं करवून घेऊन, कामाच्या नोंदी (Records) व्यवस्थित राखण्यासाठी ८ तास काम केल्याच्या कथितरित्या खोट्या नोंदी सर्रास ठेवल्या जातायत…यासंदर्भात, प्रतिकार तर सोडाच; पण, थोडी खळखळ जरी कुणाकडून केली गेली; तरी तुमची ती, ‘उद्यापासून कामावर नको’ कळवणारी, ‘गुलाबी-पावती’ (Pink Slip) संबंधित कर्मचाऱ्याच्या हाती ठेवली जाते (माझी भाची काम करत असलेल्या, एका मोठ्या आयटी-कंपनीत तर, अशा धक्कादायक घटनेमुळे रक्तदाब वाढून नुकताच कामाला लागलेला एक तरुण इंजिनिअर बेशुद्ध पडला होता; तरीही, त्याकडे तिथल्या HR/IR वाल्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही)…

** लग्नातल्या गर्दीत, जेवणाच्या पंक्तिला जेवणार्‍यांच्या मागे उभे रहातात, त्याप्रमाणे ‘बेंच’वर बसवलेले (कधिकधि दोन वर्षाहून अधिककाळ देखील) जादा आयटी-कर्मचारी, तुमची जागा पटकवायला तयारच ठेवलेले बघून, कोण अन्याय-अत्याचार-शोषणाविरुद्ध आवाज उठवेल? ‘क्युबिकल’मध्ये बसलेले काय किंवा ‘बेंच’वर बसलेले काय…दोन्ही एकप्रकारे गुलामच!

** लैंगिक-शोषणापासून अनेकविध गैरप्रकार, आय-टी उद्योगात सुरु आहेत…पण, तरीही ‘काॅर्पोरेटीय-शांति’चा सन्नाटा पसरलेला आहे तिथे. ही कुठल्याही प्रार्थनास्थळीची पवित्र-शांतता नव्हे; ती आहे, स्मशानातल्या मुडद्याफरासांची अपवित्र-निर्जीव शांतता, (वा)नरोबा…पण, तुम्ही कशाला तिकडे लक्ष घालाल? नको तिथे तोंड खुपसायला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे…पण, ‘कंपनी-दहशतवाद’ग्रस्त (Corporate-Terrorism) आयटी-उद्योग वा इतर औद्योगिक-विश्वाबद्दल (जिथे, सशस्त्र बाऊन्सर्स ठेवले जातात) कधि, ब्र तरी काढलाय तुम्ही?

** ड्रायव्हरला कंपनीने शेअर्स देऊन (Stock Options) कोट्यधीश करण्याचा ‘इन्फोसिस-जमाना’ केव्हाचाच मागे पडलाय, पार जुन्या झाल्या त्या भाकड गोष्टी…आता, त्याऐवजी, आऊटसोर्सिंगचे ‘कंत्राटी-गुलाम’ वापरताना, शरम नाही वाटत कुणाला इन्फोसिसमध्ये? तुम्ही भांडवलदार लोकं, संपत्ती निर्माण करण्यात खूपच हुशार हो…पण, संपत्तीच्या न्याय्य वाटपाच्या वेळी, आपली कुशाग्र बुद्धी कुठे पेंड खाते?

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला ‘उदारमतवादी’ म्हणता?

जेव्हा, सुरुवातीला ‘आयटी’ची ऐट होती; तेव्हासुद्धा, तुमच्या तरुण आयटी-इंजिनियर्सना आमचा कायमचा प्रश्न राहीलेला होता, ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही…तो असा की, *’’मान्य, तुमची पिढी खूप नशीबवान, खूप संसाधनसंपन्न, खूप श्रीमंत जरुर आहे…पण, तुम्ही क्षणभर तरी, खराखुरा निश्चिंतपणे ‘विश्राम’ कधि करु शकता (Can You Relax?) का?’’ …हेच, ते त्यांच्या जगण्यातलं सहजसोपं नैसर्गिक सौख्य, निखळ मैत्र, मानवीमूल्यांची कास धरणं…तुम्ही हिरावून घेतलंयत! म्हणून, ही पिढी आतून ढासळलेली आहे,

‘‘तंत्रज्ञानालाच ब्रह्मज्ञान’’ समजण्याची घोडचूक करुन बसलीय…त्याची कटू फळं, त्यांच्या वाढत्या वैफल्यग्रस्तेत आहेत. त्यातूनच, ती विविध अंमली-पदार्थांच्या आहारी जाऊ पहातेय (‘उडता पंजाब’, अजून वेगळं काय दर्शवतो?) …प्रामुख्याने तुमच्याच आयटी-इंडस्ट्रीमध्ये उठसूठ ‘पार्टी-संस्कृती’, काॅर्पोरेट-क्षेत्रातर्फे जाणिवपूर्वक रुजवण्यामागे कुठली कारणं आहेत, सांगा? खुट्ट काही झालं की, टोकाची पावलं उचलणारी ही पिढी ‘आत्महत्याग्रस्त’ होण्याचं प्रमुख कारण, तेच आहे.

…(वा)नरोबा, ही तुमची पापं आहेत, तुमच्या भांडवली-व्यवस्थेची ‘कृष्णविवरं’ (Black Holes) आहेत. अगदी रतन टाटांसकट, आता एकही उद्योगपती, ‘खरा उदारमतवादी’ वगैरे बिलकूल राहिलेला नाही…तुम्ही सगळेच, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेच्या (Vampire-State System) आधारस्तंभांपैकी एक आहात आणि ज्या बड्या राजकारण्यांच्या घरीदारी तुम्ही लोकं जाता, ऊठसूठ भेटता, गळ्यात गळे घालता…ते सगळेच प्रस्थापित राजकारणी आर्थिक स्वार्थापोटी, तुमच्या भांडवली-व्यवस्थेच्या पालखीचे भोई झालेले आहेत, बस्स्! नीरा राडिया प्रकरण काय किंवा प्रत्येक कर्मचाऱ्यावरची (तुमचंच माहिती-तंत्रज्ञान गैरप्रकारे व गुन्हेगारीवृत्तीने वापरुन) तुमची सदैव चाललेली हेरगिरी किंवा तुमच्याकडून ठेवली गेलेली पाळत…तर, KGB, CIAचं काय; पण, ‘पेगॅसस’सारख्या अत्याधुनिक ‘स्पाय-साॅफ्टवेअर’चा वापर करुन चालणाऱ्या इस्रायलच्या ‘मोसाद’ला देखील लाजवणारी असताना…(वा)नरोबा, भांडवलशाहीला ‘उदारमतवादी’ म्हणता? तुमच्यासारखीच, बनेल आणि गुळमुळीत भाषा, रतन टाटांनीही मागे शहाजोगपणे वापरलेली होती…ते म्हणाले होते, ‘‘The Capitalism has failed to deliver, kind of ‘societal-benefits’, it is capable of delivering’’…पण, त्यांच्याच टाटा-समूहातील कंपन्यांमध्ये आणि आयटी-उद्योगातल्या ‘टीसीएस’मधील परिस्थिती काय सांगते?

———————————————————————————

…अहो (वा)नरायणमूर्ती, भांडवलशाहीच्या उद्गात्या ॲडम स्मिथनेच ज्या व्यवस्थेला, मुळातूनच ‘माणूस म्हणजे वासनांचं गाठोडं’ म्हणत जन्माला घातलं आणि पुढे भांडवलशाहीचा, वखवखलेल्या वासनांच्या मागे धावणारा, भांडवली-गोतावळा जगभर तयार झाला…त्या वासना-विकारांची पिल्लं, आज जगभर वळवळत, अवघ्या माणुसकीलाच विषारी डंख मारुन संपवतायत, तरीही भांडवलशाहीला ‘उदारमतवादी’ म्हणण्याचं धार्ष्ट्य दाखवता, (वा)नरोबा?

‘वासनांच्या गाठोड्या’वरच जिची उभारणी…ती भांडवलशाही, स्वयंभूरित्या उदारमतवादी कधि असू शकेल? कुठल्या अस्तित्वात नसलेल्या तार्किक-शक्यतेबद्दल बोलतोय आपण?? भांडवलशाही, ना कधि उदारमतवादी होती, ना कधि असेल! भांडवली-व्यवस्थेचं सगळ्यात मोठं पातक, हे निव्वळ ‘शोषण’ करणं नसून (ते तर आहेच, पण ते नंतरचं आहे), सगळी ‘मानवीमूल्यं’च समूळ नष्ट करणं, हेच ते महापातक होय!

‘भांडवलशाही-व्यवस्था’ (Capitalism), ही दारु आणि अंमली (ड्रग्ज्) पदार्थांसारखी विलक्षण ‘झिंग’ पैदा करणारी चीज होय! एकवेळ, दारु-सिगरेट-अंमली पदार्थांचं व्यसन सुटेल; पण, ‘भांडवली-व्यवस्थे’तल्या चैनबाजी, ऐशोआराम, सुखसंसाधनांचं जडलेलं व्यसन सुटणं मोठं कर्मकठीण. व्यक्तिगत व्यसन, हा एखाद्या व्यक्तीला किंवा फारतर, त्या संबंधित व्यक्तिच्या कुटुंबाला बरबाद करेल…पण, हे ‘भांडवली-व्यवस्थे’चं व्यसन, एवढं खतरनाक व व्यापक आहे की, संपूर्ण पृथ्वीतलावरच्या सजीवसृष्टीचाच सर्वनाश घडवून आणण्याची राक्षसी अंगभूत क्षमता, त्यात मौजूद आहे.

‘बळी, तो कानपिळी’, या जंगली, असुरक्षित व अमानुष अवस्थेतून बाहेर येण्यासाठीच, द्विपाद मनुष्यप्राण्यांनी जंगलं तोडून गावं-शहरं-उपनगरं वसवली…आणि, भांडवली-व्यवस्थेतून पुन्हा, तिचं विषवल्ली रुजवताय?

तेव्हा, ‘‘नारायणाचा नर आणि नराचा वानर’’ करणाऱ्या, तुमच्या तथाकथित ‘उदारमतवादी-भांडवलशाही’चं ‘सत्यस्वरुप’ जरा, थोडक्यात जाणूनच घेऊयाच….

उद्योग-सेवा क्षेत्रातील ’सर्वात कमी वेतनमान आणि सर्वोच्च वेतनमान’ यात १ : १२ पर्यंत जास्तीतजास्त प्रमाण किंवा गुणोत्तर राखायला जी ‘नकार’ देते आणि हे प्रमाण/गुणोत्तर यथावकाश संधि शोधून वा जबरदस्तीने अथवा अनुकूल परिस्थिती निर्माण करुन (उदा. कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग वगैरे टोकाचं शोषण करणाऱ्या पद्धती लादून, धड पाच आकडी नसलेल्या ‘किमान-वेतना’वर बहुसंख्याक कामगार-कर्मचारीवर्गाला राबवून घेऊन आणि दुसर्‍या बाजुला मोजक्या व्यवस्थापकीय मंडळींना मनमानी पद्धतीने, शेकडो कोटींच्या डोळे फाडणार्‍या वार्षिक-पॅकेजच्या आकड्यांमध्ये पगार/भत्ते/सोयीसवलती/’Severance Package’ वगैरे देऊ करुन) फुगवत फुगवत, एकास शेकडा नव्हे; तर हजारोंच्या घरात नेऊन अमानुष आर्थिक-विषमता निर्माण करत जाते, तिला म्हणतात ‘भांडवलशाही’!

तळागाळातला कामगार-कर्मचारीवर्ग तुटपुंज्या पगारावर राब राब राबत असताना, बड्या व्यवस्थापकीय मंडळींचे अवास्तव व बेछूट मोठे पगारभत्ते, हाच काॅर्पोरेटीय क्षेत्रातला सगळ्यात मोठा ‘कायदेशीर भ्रष्टाचार’…पण, त्याबद्दल आपण कधि तोंड उघडलंत?

** ‘‘कामगार/कर्मचारी म्हणजे, जणू प्रक्रिया करायचा ‘कच्चा-माल’च…कसाही वापरा आणि वापरुन झाला की, फेकून द्या’’, अशी निर्घृण ‘मनोविकृती’, ज्या व्यवस्थेत बळावते, असंच नव्हे; तर, ज्या व्यवस्थेचा तो अंगभूत गुणधर्मच असतो…तिलाच ‘भांडवलशाही’ म्हणतात!

** या आधुनिक भांडवली-व्यवस्थेत समाजातला सगळाच बुद्धिमान, उच्चपदस्थ व व्यावसायिक-यशस्विता पदरी बांधणारा ‘अभिजनवर्ग’…एकमेकाशी संधान बांधून (Coalition Of Connected) समाजपुरुषाचं ‘शोषण’ करत मजेत-चैनीत जगत असतो आणि असं ‘चंगळवादी जीणं’ जगताना मूठभर भांडवलदारांची सत्तापिपासू वृत्ती, अहंकार, ऐय्याशी पोसण्यासाठी…अवघ्या मानवतेला व सजीवसृष्टीला वेठीला धरु पहाते, ती असते भांडवलशाही…

 

‘कार्बनकेंद्री’ भांडवली ‘अर्थव्यवस्था व जीवनशैली’तून नवनव्या प्रदूषणकारी कृत्रिम, घातकी गरजा बेलगाम-बेसुमार वाढवत नेण्यातूनच “जागतिक तापमानवाढी’सारखी पर्यावरणीय महासंकटं, पृथ्वीवर धुमाकूळ घालत असताना…COP-28 दुबई परिषदेत जीवाश्म-इंधनांचा (तेल, वायू, कोळसा) वापर थांबवणं…बेजबाबदारपणे अशक्यप्राय असल्याचं म्हणते आणि मानवजातीसह अवघ्या सजीवसृष्टीला सर्वनाशाप्रत नेऊ पहाते, तिचं नाव ‘भांडवलशाही’.

…कारण, रासायनिक, आण्विक व विद्युत-चुंबकीय घातकी प्रदूषणाविना ‘भांडवलशाही-अर्थव्यवस्था’ तत्काळ कोसळून पडेल…{संदर्भ : तुमचा जावईबापू आज, ज्या इंग्लंडचा पंतप्रधान आहे (ज्यांच्याविषयी, ब्रिटनमधील टोकाच्या ‘आर्थिक-विषमते’वर प्रहार करणारा गॅरी स्टीव्हन्सन, नावाचा चळवळ्या म्हणतो, ‘‘Most people don’t seem to be aware of just how insanely rich their PM is’’) त्या UK सरकारला ३० ऑक्टोबर-२००६ साली सादर करण्यात आलेला, निकोलस स्टर्न लिखित ७०० पानी ‘स्टर्न रिव्ह्यू’चा दस्तावेज}

** समुद्राचा तळ ओरबाडून मच्छिमारी करणं, समुद्राचा तळ खोदून बेसुमार तेल-वायू उत्खनन करणं, अवघा आसमंत प्रदूषित करुन हरित-वायू उत्सर्जनाची त्यात घातकी भर घालणे व ओझोन थराला जागोजागी छिद्रं पाडणे, पृथ्वीमातेवरील अन्न-पाणी प्रदूषित करुन निसर्गचक्रिय-व्यवस्था (उदा. कार्बन व नायट्रोजन चक्र) व सजीवांच्या विविध अन्न-साखळ्या उध्वस्त करत ‘जैववैविध्य’ नष्ट करणं…आणि, त्यातूनच सजीवसृष्टीसह मानवजातीच्याही अंताला कारणीभूत ठरणं…तुझं नाव, भांडवलशाही!

साम्यवादाचं-समाजवादाचं आव्हान होतं, तोपर्यंतच लोकशाही-स्वातंत्र्याचा व व्यक्ति-स्वातंत्र्याचा खोटा मुखवटा धारण करुन अमेरिकन-युरोपियन भांडवलशाही, जगभरातील ‘कम्युनिझम’ला दडपशाहीच्या मुद्द्यावर कडवा विरोध करत, छाती पुढे करुन मिरवत होती…शीतयुद्ध समाप्तीनंतरच्या काळात, विशेषतः, खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या ‘खाउजा’ धोरणापश्चात, साम्यवाद (Communism) आणि समाजवादाचं (Socialism) आव्हान मोडीत निघाल्यानंतर, भांडवलशाहीचा अतिशय भेसूर, क्रूर, विकृत; पण, खराखुरा चेहरा, जगभरात जागोजागी वेडावाकड्या पद्धतीने दिसायला लागला…अशा ‘गोंडस’ मुखवट्याआड जी लपलेली असते, ती नितीमत्ताशून्य-माणुसकीशून्य अशी, खरीखुरी भांडवलशाही!

** ‘शासकीय-भांडवलशाही’ (State-Capitalism), ही अंतरिम-व्यवस्था, साम्यवादी-व्यवस्थेच्या अंतिम-मांडणीसाठी आणता आणता…त्या ‘स्टेट-कॅपिटॅलिझम’लाच कवटाळून बसत रशिया-चीन वगैरे देशांनी केलेल्या ऐतिहासिक घोडचुकांचं आयतं ‘भांडवल’ बनवणाऱ्या भांडवलशाहीने तर, माणुसकीचं संपूर्ण भांडवलंच क्रूरपणे नष्ट करुन अमानुषतेचा कळस गाठलाय…उदा. ‘पंचतारांकित हाॅटेलातील भिकारीण’ अशी ज्या अमेरिकन भांडवली-व्यवस्थेची लक्तरं काढली जातात…ती, अमेरिकन-अर्थव्यवस्था, जगातली सगळीच युद्धं थांबली; तर, पळभर तरी चालू शकेल काय, (वा)नरोबा?

** भांडवलशाहीला नसते कुठली नीतिमत्ता…असलीच, तर आत्यंतिक स्वार्थप्रेरित, आपल्या सोयीप्रमाणे भूमिका बदलणारी नीतिमत्ता (‘Flexibel’ Ethos) असते, भांडवलशाहीला नसतो कुठला धर्म, नसतो कुठला ‘देश’…डोळ्यासमोर सदैव असतो, फक्त रग्गड नफ्याचा (Surplus-Value) ‘धनादेश’!

लहान मुलांच्या दुधाच्या पावडरपासून ते अंगातोंडावर लावायच्या पावडरपर्यंत (आठवा, जॉन्सन बेबीपावडर) आणि खाण्याच्या न्यूडल्सपासून ते थेट शीतपेयांपर्यंत…नफे उकळण्यासाठी, जी बिनदिक्कत ‘कर्करोग’कारक (Carcinogens) घटक वापरु शकते, ती असते ‘भांडवलशाही’!!

संधि शोधत वा निर्माण करत वजनमापात फसवणूक, भेसळयुक्त वस्तुमाल, कृत्रिम टंचाई, काळाबाजार, साठेबाजी, बेसुमार भाववाढ आणि शिवाय भरीला, ‘अर्थस्य पुरुषो दास:’, या कपटनीतिने ’राजकीय-व्यवस्थेला व प्रसारमाध्यमां’ना पैशाच्या बळावर मांडलिक बनवून जनतेवर लादलेली हुकूमशाही…म्हणजेच, ‘भांडवलशाही’!

…(वा)नरोबा, कसल्या ‘भांडवलदारी-उदारमतवादा’च्या भाकड गप्पा मारतो आहोत…आणि, तडफडणार्‍या, आक्रंदन करणाऱ्या जगाकडे ‘मला काय त्याचं’ वृत्तीने  पहाणाऱ्या, स्वांतसुखाय जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीयांना (भांडवली-व्यवस्थेचे अंशतः ‘लाभार्थी’ बनवून) उल्लू बनवतो आहोत आपण?

भांडवलशाहीला पक्कं ठाऊक असतं की, एकदा का ‘समाजाला नेतृत्त्व देणाऱ्या’ बुद्धिजिवी मध्यमवर्गाला आपल्या ‘मगरमिठी’त घेतलं की, मग तळागाळातल्या जनसामान्यांची अनिर्बंधरित्या कायमच ससेहोलपट-होरपळ सहजी करता येते…सध्या आपल्या देशात, तेच भयंकर आक्रित घडतंय; म्हणूनच, शोषित-पीडितांच्या आक्रोश-आक्रंदनाचा उद्रेक होणं दूरच, धड त्याचा उच्चार देखील होत नाही!

‘उदारमतवादी-भांडवलशाही’, हे निव्वळ थोतांड, स्वप्नरंजन किंवा दिवास्वप्नच आहे; तर, आजच्या सत्य-स्वरुपातील ढोंगी-बेढंगी ‘भांडवलशाही’, हे अवघ्या मानवजातीला पडलेलं एक भयंकर ‘दुःस्वप्न’च!

जगभरातील भांडवलशाहीचा इतिहास सांगतो की, ‘‘जनमताच्या अथवा शासकीय रेट्यामुळे दबावाखाली आलेली ‘भांडवली-व्यवस्था’, सरड्यासारखे रंग बदलत, तात्पुरती वरकरणी ‘उदारमतवादी’ वगैरे बनते…पण, दबाव कमी होताच, संधि साधून कटकारस्थानं रचून पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ उक्तिनुसार आपलं काळाकुट्टं रंगरुप दाखवायला दणक्यात सुरुवात करतेच…त्यासाठी प्रसंगी, केवळ सार्वजनिक-भ्रष्टाचाराला ऊत आणूनच नव्हे; तर, भांडवली-प्रगतीआड येणाऱ्यांचे मुडदे पाडून देखील ‘भांडवली-व्यवस्था’ आपलं ‘इप्सित’ साध्य करायला, जराही मागेपुढे पहात नाही!’’

१९३०च्या महामंदीनंतरची अमेरिकन-अर्थव्यवस्था सावरताना (New Deal), तत्कालिन अमेरिकन-अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकन भांडवलदारवर्गावर १९४४ साली, सुरुवातीला वार्षिक १० लाख डाॅलर्सपेक्षा अधिक उत्पन्नावर १००% (म्हणजेच, एकप्रकारे ‘श्रीमंतीची रेषा’च आखली) व नंतर तो थोडा खाली आणून ९४% केला, जो पुढे १९६३ सालापर्यंत चालू होता (सध्याचा, सर्वात जास्त अमेरिकन आयकर-दर ४३.४% आहे)….पण, त्यानंतर, पुन्हा अमेरिकन भांडवलदारवर्गाने जोरदार उचल खाल्ली व पुन्हा अमेरिकेत भांडवली हडेलहप्पी चालू झाली आणि अमानुष आर्थिक-विषमतेचे वारे वहायला लागले, ते आजतागायत!

…अतिरेकी पैसा कमावण्याच्या राक्षसी हव्यासापोटी केल्या पातकी कृत्यांचा, आयुष्याच्या अंताला पश्चाताप होऊन, कमावलेल्या सगळ्या संपत्तीचा दानधर्म करण्यासाठी, ज्या जाॅन राॅकफेलरने ‘राॅकफेलर-फाऊंडेशन’ची निर्मिती केली…त्याने देखील, लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे, असले उद्गार कधि काढल्याचं ऐकिवात नाही. तुम्ही तर, सगळीच हद्द पार करुन बसलायत, आम्हाला तुमची लाज वाटते, (वा)नरायणमूर्ती!

भांडवलशाहीतल्या अतिरेकी विकासाच्या नादी लागून, आधी ‘‘माणूसपण संपतं, मागाहून माणूसच संपतो’’!

‘‘साधी रहाणी-उच्च विचारसरणी’’, भूतदया, मानवतावाद…या आमच्या भारतीय-अध्यात्माने व आमच्या महात्म्याने-राष्ट्रपित्याने दिलेल्या पृथ्वीमोलाच्या जीवनमूल्यांचाच आग्रह यापुढे धरायला हवा…

श्रीमंत एवढे श्रीमंत झालेत की, कुणालाही खरेदी करु शकतात आणि गरीब एवढे गरीब झालेत की, कुणालाही विकले जाऊ शकतात.

…संपत्तीचा अधिकार, मूलभूत-अधिकार नव्हेच; कुणाचं तरी खूप काही लुटल्याखेरीज-ओरबाडल्याखेरीज, अवघ्या समाजाचं खूप काही देणं नाकारल्याखेरीज आणि निसर्ग-पर्यावरणावर मोठे अत्याचार केल्याखेरीज…कुणीही ‘अतिश्रीमंत’ होऊच शकत नाही. तेव्हा, श्रीमंतीची-अतिश्रीमंतीची रेषा आता आखली गेलीच पाहीजे, यासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, (वा)नरोबा…???

जाता जाता, एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘‘आपल्या कानशीलावर ईडी/सीबीआय/आयटी वगैरे कुठल्या सरकारी दमन-यंत्रणेची बंदूक तर, ठेवली गेलेली नाही ना…की, ज्यामुळे एका पाठोपाठ एक, असे विखारी फुत्कार आपण टाकताय?’’

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)