नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी
होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली.
शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे उमटवून जाणारी. कुठुन आली ती? कशी आली? कुणासाठी? कधितरी पहाटेच ती आली असावी-ओलसर धुक्यांतून.. पैलतिरावरल्या आभाळाचं चुंबन घेत पहुडलेल्या आडव्या क्षितिजावरून- धुकं पूर्ण विरायच्या आतच !
मगं त्या क्षितिजाचेच तिला वेध का लागले होते काळ इतका क्रूर असू शकतो?
या वाळूत किती किल्ले बांधले आम्ही? त्यांना तर गणतीच नव्हती. मग बुरूज ढासळल्यासारखे एका फटक्यातच ते का कोलमडून पडले? शानूच्या पेरूच्या झाडावर नेहमी एक चिमणाचिमणीचं जोडपं बसायचं. आम्ही कितीतरीवेळ एकटक ते बघत बसायचो. शानू मग पटकन म्हणायची, “शाम, तू चिमणा आणि मी चिमणी किनैरे? मग आपण मोठ झाल्यावर त्यांच्यासारखं सुंदर घरटं बांधायच हं!” मोठे मोठे डोळे करून ती रंगात येऊन बोलायची. मला खूप गम्मत वाटायची. “शाम तू कधी ‘चिमणी आजारी पडलेली पाहिली आहेस का रे?” मान डोलावून मी नकार दिला.
“शाम, चिमणी कधी आजारी पडत नाही रे! शाम तुला रे काय वाटतं, चिमणा दूर गेल्यावर चिमणी काय करेल?” “काय करणार, वाट बघत राहील त्या चिमण्याची.
“चुकलास तू शाम मामा म्हणतो, चिमणी अन्न पाण्याला चोच लावीत नाही. तडफडून तडफडून मरते रे ती!” बोलता बोलता तिच्या डोळयांत धुकं उतरलं.
मला गदागदा हलवत ती म्हणाली, “शाम, काल मामानं मला चिमण्याकावळयाची गोष्ट सांगितली रे.. मी पुढं काही बोलायच्या आतच ती परकर सावरून सांगायला लागली, “एक होता कावळा, एक होती चिमणी एकदा काय झालं. “
“बस्स् कर गं तुझी गोष्ट… मला तर आईनं ती केव्हाच सांगितलीय” …… मी वैतागून बोललो.
“शाम, त्या चिमणीसारखचं मग आपण मेणाचं घर बांधूया हं.
“नाही, कावळयासारखं शेणाचचं घर बांधायचं आपण…
“नाही, मेणाचचं…
“सांगितल ना एकदा शेणाच म्हणून……… “
“मी तरी बाई मेणाचच बांधणार…
अस्सा भडकलो मी. त्या सरशीच दोन धपाटे दिले शानूला. भेदरलेल्या हरणीच्या पाडसासारखी दिसली तिची नजर! दचकल्यासारखी माझ्यापासून दूर होत आमच्या परसातून धावतच तिच्या वाडयात गेली. मला कससचं झालं. दोन दिवस ती खाडीकडे फिरकलीच नाही. खूप वाईट वाटलं मला. न चुकता नेहमीप्रमाणं मी माझा एक आणि जोडीला शानूचा छोटासा वाळूचा किल्ला बांधत होतो. शानू येत नाही म्हणून चिडून लाथेनं मोडून टाकत होतो.
तिसऱ्या दिवशी पहाटेच प्राजक्ताखाली फुलं वेचताना दिसली ती! प्राजक्ताहूनही कोमल प्राजक्ताहूनही सुंदर…….. ती एकदम वाटली मला माझ्यावर श्रावण- धारेसारखा प्रेमाचा वर्षाव करणारी, तर कधी उन्हातल्या आटल्या झयासारखी माझ्यावर फुरगटून बसणारी!
मी हलकेच ओळखीची शीळ वाजवली. क्षणात हातातली फुलांची परडी खाली ठेवत आनंदानं चमकून तिनं वर पाहिल
“शानू, अगं इकडे ये ना……..”
तिनं बघितलं मात्र… पण दुसऱ्याचक्षणी काहीतरी आठवल्यासारखं तिनं झटकन मान खाली घातली. पुन्हा तिची नाजूक नाजूक बोटं भरभर फुलं वेचू लागली.
शेवटी न राहवून मीच निवडुंगाच्या कुंपणातून वाट काढत तिच्याकडे गेलो. तशी माझ्यापासून दूर होत म्हणाली, “तू……..तुझी भिती वाटते मला!.
“अगं, भिती वाटायला मी काय राक्षस आहे, माणूस तर आहे. तुझा शाम आहे नं मी….” तिची समजूत घालत मी म्हणालो.
“शाम तू काय राक्षस नाहीच मुळी. तू आहेस दहा तोंडी रावण………”
“अगं मग तर बरचं झालं! तू सीता आहेस ना मग मी तुला पळवूनच नेतो कशी……..”
सरळ तिचा हात धरून मी तिला खेचत निघालो. तिला माझी कल्पना खूप आवडली असावी बहुधा धावत खाडीवर आलो दोघे. मी तिच्यावर चिडून मोडलेल्या किल्ल्यांची गम्मत सांगितली तिला. शानू विजयाच्या आनंदानं टाळया पिटत पोट धरधरून हसायला लागली. तिचं ते निर्झरासारखं खळाळून हसणं इतकं आवडायचं मला!
“शाम, सूर्याला आग लागलीय बघ. केवढा लालभडक झालायें !.. ..” किल्ला करताकरताच ती एकदम मोठे मोठे डोळे करून म्हणायची.
“ती सहन करत होती, कुढत कुढत जगत होती. एका अश्राप सीतेचं जीणं!” “तिला थकणं माहीत होत की नाही कोण जाणे. पण चालणं-चालत रहाणं हा तिचा स्वभाव होता! “रात्री अकरा- बारा वाजता केव्हातरी सामसूम झाली की, शानूच्या माजघरातला दिवा शांतपण जळत रहायचा. अशावेळी शानू एकतर ढीगभर भांडी विसळत रहायची किंवा इवलीशी पोरं ती गोदूबाईना दळणकांडणात मदत करायची.”
एकदा धुसमुसळेपणानं तिच्या हातून लोणच्याची बरणीच फुटली.
“कार्टे मेले, जळलं तुझं नशिब आग लाव एकदा सगळया घराला. आईबापाला घालवलन् आणि आम्हाला घालवायला निघालीय “ असं म्हणत कोपऱ्यात भेदरून कोकरासारखं अंग चोरून बसलेल्या शानूला मामीनं वेताच्या छडीनं इतकं बेदम मारलं.
“शानू हे… …हे कसले ग लाल वळ तुझ्या हातावर.. ..” शेवग्याच्या सालीसारख्या सोलवटून निघालेल्या तिच्या हाताच्या चामडीकडं पहात चरकून मी विचारलं. तिचे डोळे पाण्यात बुडुन गेले. पण ते न दाखवताच म्हणाली, “नाही रे, न्हाणी घरात घसरून पडले ना तशी हातावर वळ उठले” पण ‘त’ वरून ताकभात ओळखण्याइतपत मी सूज्ञ होतो.
माझं मनं तडफडून उठलं. वाटलं ही आंघोळीची जड शिळा उचलावी अन् शानूच्या मामीच्या डोक्यावर आदळावी. ही तर परवाचीच – कडाक्याच्या थंडीतील गोष्ट. थंडीनं कुडकुडत मामेभावंडांसोबत शानूनं गरमगरम चहाचा घोट चुलीशी ओणवी बसत ओठाला लावला काय अन् तेवढयात माजघरातून आलेली मामी विजेसारखी कडाडली, “अंगणातला केरवारा टाकून, कार्ट चहा ढोसतेयस?” मामीच्या एका लाथेसरशी कपातला वाफाळता चहा शानूच्या चेहऱ्यावर उडाला प्राजक्ताच्या ‘पाकळयां सारखा चेहऱ्याचा गौरवर्णी रंग भाजल्यानं ‘देठा’सारखा लालबुंद झाला! शानूला दुसऱ्याच दिवशी सणसणून ताप भरला जमिनीवर फाटक पोतेर अंथरून अंग मुडपून ती अतिश्रमानं ग्लानी आल्यासारखी पडली होती. मी तिच्याजवळ बसताच तिनं मोठ्या कष्टानं डोळे उघडले.
“शानू, शानू काय झालं ग तुला? आज शानू तू शाळेत नाहीस ना आलीस तर माझं बघ लक्षच लागत नव्हतं अभ्यासात नुसता एकटा एकटा पडलो होतो ग.. “ तिच्या शुष्क केसांवरून हात फिरवत मी म्हणालो.
तिचे डोळे सुजल्यासारखे लाल लाल झाले होते. काल रात्रभर ती रडली असावी. तापातच ती बडबडत होती, “शाम तू..नं खूपखूप मोठा हो. केवढा माहित्येयं? या या आभाळाएवढा मग तू मोठा बंगला बांधशील ना रे? त्या बंगल्याशेजारी एक झोपडी बांधशील तू माझ्यासाठी ?” एकाएकी ती रडायला लागली.
“शाम, मी तुझ्या बंगल्यात हं नकोच कशी मी मी आपली झोपडीतूनच डोळे भरून पाहीनं तुला. शाम शाम देशील ना रे तुझ्याशेजारी मला झोपडी बांधून? शाम देशील ना? “ माझ अंग अंग चाचपत तिचा थरथरणारा गोरापान हात फिरत राहीला. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. कसतरी एवढच म्हणालो, “शानू, शानू तुला झोपडी नाहीच देणार मुळी मी बांधून मुळीच देणार नाही. तू अन् मी दोघांनीही आपल्या चिमणाचिमणीच्या घरटयात राहायचं. फक्त तू अन् मी. मी तिचं मस्तक मांडीवर घेतलं. ती किंचित फिकट हसली आणि मग शांत झोपली.
मला तिचा मूर्खपणा कळायचा. पण किल्ल्यावरून तिचं लक्ष उडू नये म्हणून नाइलाजानं तिची समजूत घालत म्हणायचो, “अगं बघ ना, केवढी आग लागलीय. ती विझवण्यासाठीच तर तो खाडीच्या पाण्यात बुडी मारतोय………”
तिला माझं उत्तर पटलय की नाही, हे कळायला मार्ग नसायचा. क्षणभर एकटक त्या लाल लाल गोळयाकडे बघत रहायची अन् पुन्हा वाळूत बसकण मारायची. मला नेमकं तेच हवं असायचं !
ती जन्मताच तिचे आईवडिल गेले, हा काय तिचा गुन्हा होता? मामानं दोन महिन्यांची असतानाच तिला आपल्या घरी आणलं. मामाच्या घरचं दारिद्रय आणि त्यात हे नवं तोंड. शानूच्या मामीच्या मूळच्याच कजाग स्वभावाला आणखीनच धार चढली.
तिच्या डोळयातला झरा आटला होता की काय कोण जाणे! पण ती मुळी रडतच नव्हती! सुकल्या डोळयांनी माझा निरोप घेत होती.
“शाम जपून रहा काकाकडे. त्रास देऊ नकोस काकाकाकीला रत्नागिरीला शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत, डोळयापुढे आता फक्त एकच ध्येय ठेव……. भरपूर अभ्यास करायचा आणि खूपखूप मोठ्ठ व्हायचं!” असं बजावणाच्या आईकडे माझं लक्ष होतच कुठे…
“शानूच्या डोळयांतल्या दोन निरांजनांचं फिकट होत जाणारं तेज माझ्या अंगाअंगातून भरत चाललं होतं! “माझी पावल अधिकाधिक जड होऊ लागली.
शानूनं खुणेनचं मला त्यांच्या शेवग्याखाली बोलावलं. हातातल्या टोकदार दगडानं तिनं मला शेवग्यावर तिचं नांव कोरायला सांगितलं. मी सुंदर अक्षरात लिहिलं. …”शानू!” तिच्या इवल्या हातात कुठुन बळ आलं होतं कोणास ठाऊक. खोलवर कोरत तिनं लिहिलं. ……”माझा शाम !” आणि एकदम हमसाहमशी शानू रडायला लागली. आधार तुटलेल्या वेलीगत माझ्या खांद्यावर तिनं मान टाकली.
पण क्षणभरच सावरून माझ्यापासून दूर होत मोठे मोठे डोळे करत म्हणाली, “शाम जा, जा तू इथून शाम. परीकथेतला राजकुमार जातोना दूर-दूर सातासमुद्रापलीकडे अगदी तस्साच. आणि खूप खूप मोठा होऊन ये……..केवढा माहीती आहे? “
“हं, आभाळा एवढा ना?” – मी हसत म्हणालो.
“ऊं……..जा. मी नाही बोलणार जा तुझ्याशी. “ पायाच्या अंगठयानं माती उकरत लटक्या रागानं ती बोलली.
पावसाळयातल्या आभाळासारखे भरभर तिच्या चेहऱ्यावरचे रंग पालटत होते! काय होतं त्या रंगात ?
माझ्या विरहाचं दुःख? एकलेपणाची जीव कोंडून टाकणारी जाणिव? की की मी मोठ्ठ्ठा होणार
याचा ऊरभरला आनंद?
ते दुःखाश्रू होते की, आनंदाश्रू कळणं खूप कठीण होतं!
“शाम ……शाम तू खूप मोठ्ठा होशील. …मग तू मला विसरणार नाहीस ना रे? शाम तू ? ..मग.
माझ्या डोळयांतल्या पाण्यात तिला उत्तर सापडलं होतं. एकदम घट्ट मिठी मारली तिनं मला !
शानू मला खाडीवर पोहोचवायला आली. पडावात चढण्यापूर्वी मी नकळत खाडीची मूठभर वाळू उचलली. थोडी शानूच्या हातात दिली. … थोडी मी रूमालात बांधून घेतली! नक्की काय होतं माझ्या रूमालात ? आठवणीतल्या किल्ल्यांची खूणगाठ की, नुसत्याच किल्ल्यांच्या आठवणी?
क्षितिजाकडं पडाव झुकेपर्यंत मुठीत मी भरलेली वाळू घट्ट धरलेला तिचा गोरापान हात निरोप देत राहीला. वायनं बांग दिली. पण त्याहीपेक्षा भीषण वेगाचं वादळ माझ्या मनात सैरभैर फिरत होतं. वादळात दिसत होती, शानू प्राजक्ताखाली फुलं वेचणारी चिमणाचिमणीचं घरटं बांधणारी. साप चावला म्हणून भेदरणारी माझ्यावर रूसणारी अन् मला घट्ट बिलगणारी! काटा रुतला तर “शाम तुला रे काय वाटतं, चिमणा दूर गेल्यावर चिमणी काय करेल?” मी एकदम दचकलो. कसलातरी भास झाला मला.
आपले सुवर्णपंख मिटून घेत सूर्य अलगद अस्तांगताला जात होता. “शाम सूर्याला आग लागलीय बघ. केवढा लाल भडक झालायं “पुन्हा कसलातरी भास!
आजर्ल्याचा ‘चिरपरिचित’ किनारा नजरेआड झाला आणि रत्नागिरीचा ‘ठार अपरिचित’ किनारा दृष्टीपथात आला. छातीत केवढं गलबलून आलं माझ्या माझा श्वास तर घुसमटत नाही ना? मग असं कोंडल्यासारख का वाटतंय ?
काकाची रत्नागिरीला खूप मोठी वाडी होती. आमराईच्या मोठाल्या बागा होत्या. शेवगा, शेवंती, प्राजक्त, फणस, जाईजुई, पेरू, काजू आणखीही खूप खूप! माझ्याशी खेळायला माझ्या वयाची मुलं-मुली होती. माझ्या चुलत बहिणी होत्या. सारं काही होतं! पण सगळं असून नसल्यासारखचं! कारण कारण माझी शानूच मला कुठे दिसत नव्हती. काय करत असेल तिकडे शानू ? माझी वाट बघत असेल की, त्या चिमणीसारखीच. “असा विचार मनात आला की, माझं मन गारठूनं जायचं. मग मी पटकन काकीच्या कुशीत शिरायचो. मला आईची आठवण आली असावी असं वाटून काकी मायेनं मी निजेस्तोवर थोपटत रहायची. माझं मलाच नवल वाटत होत सारखं, इथं आल्यापासून मला आईची चुकुनसुध्दा आठवण आली नव्हती!
शाळेत गेल्यावर सारखे डोळ्यासमोर यायचे ते शानूचे पाण्यानं डबडबलेले मोठे मोठे डोळे अन् थरथरणारे तिचे विलग झालेले ओठ! घशापर्यंत आलेले उमाळे कसेबसे आवरतं – अश्रू गिळत वर्गात बसायचो अन् रित्या मनानं घरी परतायचो. अचानक त्या दिवशी काका म्हणाला, “शाम उद्या आंजर्ल्याला निघायचं बरं का. इथली हवा मानवलेली दिसत नाही तुला. रोडावत चाललायसं तो लेकाचा! आईचंही तसं पत्र आलयं तुझ्या……..” आईचं तसं पत्र का यावं याचं उत्तर शोधून सापडत नव्हतं!
शानू मला खाडीवर भेटायला आली नाही. अस्सा राग आला सांगू! एवढयातच विसरलीस ना शानू मला? तुझ्याशिवाय माझ्या तब्येतीचे बघ काय हाल झालेत! तू नव्हतीस ना शानू तर सगळं कसं उजाड-उजाड वाटत होत गं! आभाळाएवढं मोठ्ठ व्हायचं होत ना मला म्हणून गं गुदमरत कसातरी रहात होतो- तरीही नेटानं अभ्यास करत होतो, तुला मी मोठ्ठे झालेलं पहायचं होतं ना? शानू, ते चिमणाचिमणीचं घरटं विसरलीस? बांधायचयं ना ते आपल्याला? शेणाचे. नको तू म्हणतेस ना तू म्हणून मेणाचचं बांधू आपण……. हो शानू मेणाचचं बांधूया!अचानक माझ्या डाव्या डोळयाची पापणी फडफडली! हृदयात अस्पष्टशी कळ या कडेपासून त्या कडेपर्यंत दूरवर कुठेतरी उमटून गेली. आज कुण्णी काही बोलत नव्हतं. आंजर्ल्याची उदास संध्याकाळ मी प्रथमच अनुभवत होतो. शेवग्यानंही मी कोरलेलं शानूचं नांव. …….माझ्या शानूची “स्मृति” हृदयात सामावून घेतली होती. तिथं उरलं होतं फक्त खोलवर कोरलेलं…. “माझा शाम!”
“शाम, शाम लवकर जा रे डोळयात प्राण आणून शानू तुझी वाट बघतेयं, खूप आजारी आहे रे ती…… आईनं डोळयाला लावलेला पदर मला स्पष्ट दिसला.
तीरासारखा धावत… धापा टाकत मी शानूकडे आलो. तोच मला दिसला, समईच्या अंधुकशा पिवळया प्रकाशात तिचा विलक्षण पांढराफटक पडलेला निस्तेज चेहरा! आता ती रडत होती. पण पण डोळयात ते कोवळं धुकं नव्हतं. होतं फक्त निर्जीव पाणी पांढऱ्याफटक गालांवरून कसतरीच ओघळणारं!
आज एक चिमणी आजारी होती. आचके देत शेवटच्या घटका मोजणारी चिमणी काहीकेल्या माझ्या नजरेसमोरून हालेचना!
त्याही परिस्थितीत मला पहाताच त्या समईच्या मिणमिणत्या प्रकाशात तिचा चेहरा आनंदान क्षणात उजळून गेला. “शाम, सारखं वाटत होतं रे. तू येणारच. सातासमुद्रापलिकडून परिकथेतला राजकुमार येतो ना राजकन्येसाठी…. अगदी तस्साच तू मला पहायला येशिल याची खात्री होती मला. म्हणून तर केव्हाची अडून बसलेय तुझ्यासाठी!!!” कसल्या तरी भावतंद्रीत ती बडबडत होती.
“थांब शाम……..” म्हणत तिनं उशाखाली हात घालून मोठ्या कष्टानं कसलीतरी पुरचुंडी काढली. थरथरणाच्या हातानं घाईघाईनं मी ती उघडायला गेलो…….. तोच आतील वाळू सांडून सगळया अंथरूणभर विखुरली! पोटातली आतडी कळवळून घशात आल्यासारखं वाटलं मला! “शाम, शाम ती माकडीण बघ ना आपल्या पिल्लाला कशी पोटाशी धरतेय. शाम तू तू अशी छातीशी घे ना मला. शाम तू….. तू घेशील ना रे?” तिच्या थरथरणाऱ्या ओठांना पुढं काय बोलायचं होतं ते कानापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं!
डबडबलेल्या डोळ्यांनीच मान हलवली मी! ऊरापोटावर शानू अंथरूणात उठून बसण्यासाठी धडपडू लागली. क्षणात पुढे झुकत मी छातीशी घट्ट धरली तिला एकदम तिला नि मला रडू कोसळलं बांध फुटलेल्या प्रवाहासारखं! शानू सर्व ताकदीनिशी मला अधिकच घट्ट बिलगली!
“कोपऱ्यातली समईची फरफरणारी म्लान ज्योत हळूहळू बारीक होत पूर्ण विझली!” विळखा एकाएकी सैल पडला!
“शानू ऽऽ चिमणीऽऽऽ माझी चिमणी ऽऽऽऽ“
…माझी आर्त हाक अस्मानाला चिरत खाडीपर्यंत धावत गेली.
– राजन राजे