प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व सेवाक्षेत्रातील नोकरीपेशात उभं राहीलेल आहे.

‘ट्रिकल्डाऊन्’ किंवा ‘परकोलेशन्’ सिद्धांतानुसार खाजगीकरणाच्या व जागतिकीकरणाच्या उच्च तंत्रज्ञानाच्या पर्वात निर्माण झालेली अतिप्रचंड संपत्ति, समाजाच्या खालच्या स्तरातील पददलित श्रमिकवर्गाला न्याय्य पद्धतीने वाटली जाईल, ही रास्त अपेक्षा केवळ ‘मृगजळ’ ठरली! त्यात जागतिक औद्योगिक महामंदीची संधि साधत, फायदा आमच्या बापाचा, पण नुकसान झाले तर त्याचे बाप तुम्ही अशी बदमाष निती व्यवस्थापकीय मंडळींनी सर्वत्र अवलंबिलेली आहे.

त्यामुळे या देशात अत्युच्च तंत्रज्ञानाचा औद्योगिक व सेवाक्षेत्रात वापर होऊनही कामगार व कर्मचाऱयांचे कामाचे तास कमी होण्याऐवजी बेसुमार वाढले आणि दरडोई वेतनमान काही पटीत वाढण्याऐवजी कमालीचे खालावले, अशातऱहेचा माणुसकीशून्य व्यवहार व विरोधाभास, या देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेनं निर्माण केलाय. न्याय व्यवस्था या धनदांडक्यांची बटिक बनणं, बेसुमार वाढत जाणारे परप्रांतीय लोकसंख्येचे लोंढे महाराष्ट्रात आदळणे, औद्योगिक व सेवाक्षेत्रात मजूर-कंत्राटदारीच्या भस्मासुरानं आणि औद्योगिक व सेवाक्षेत्रातील या नव-अस्पृश्यतेनं थैमान घालणं, प्रज्ञाहिन व क्षुद्रस्वार्थानं फाटाफूट होऊन ‘कामगार चळवळीच’ रूपांतर “गांडूळांच्या वळवळीत” होणं आणि अत्याधुनिक संपर्कमाध्यम वापरत व्यवस्थापकीय मंडळी, राजकीय नेतेमंडळी व शासकीय अधिकारी यांच भ्रष्टाचारासाठी झालेलं गुन्हेगारी संगनमत ….. या साऱ्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचा क्रम, एकाच कालखंडात व एकाच वेळी घडून आला.

थोडक्यात सांगायच तर, या साऱ्याचा परिणाम म्हणून अत्यंत तुटपूंज वेतनमान, नोकरीच्या ठिकाणी असुरक्षिततेची सतत टांगती तलवार आणि व्यवस्थापकीयदादागिरी व अनिर्बंध शोषण याला बळी पडलेला आणि पूर्णतः नागावला गेलेला हतबुद्ध-हतवीर्य कामगार-कर्मचारीवर्ग जागोजागी या महाराष्ट्राच्या व देशाच्या गल्लीबोळात दिसू लागलाय “Delay is deadliest form of denial” चाच प्रत्यय, षंढ न्याय व्यवस्था व जणिवपूर्वक पेरली गेलेली सरकारी दफ्तरदिरंगाई, न्यायासाठी आक्रोश कसणाऱ्या श्रमिकांना देतेयं. “‘जगणं’ नाकारला गेलेला आणि केवळ ‘तगणं’ नशिबी भोगायला लागलेला व असुरक्षिततेने भांबावलेला महाराष्ट्रातला भूमिपुत्र मराठीतरूण वर्ग” आज उद्रेकाच्या उंबरठयावर उभा आहे, हीच गोष्ट प्रेसिहोल मशिन टूल्स् कामगारांच्या संपाचा १००वा दिवस गर्जून सागतोयं!

…..या गर्जनेचा रौद्रसूर ऐकू न येण्याएवढे महाराष्ट्राच्या राजकीय व आर्थिकव्यवस्थेचे कान बहिरे-संवेदनाशून्य झालेले असतील, तर नजिकच्या भविष्यात या स्वरांच तांडवनृत्य जागोजागी एवढ तीव्रतम बनेल की, या अमानूष व्यवस्थेच्या कानांच्याच नव्हे, तर संपूर्ण देहाच्या चिंधडया उडाल्याखेरीज रहाणार नाहीत!!!

                                       प्रेसिहोल कामगार कमिटी

                                        प्लॉट नं. A१८८/१९७,

                                         वागळे इस्टेट रोड नं. १६, ठाणे.

न्याय मिळविण्यासाठी निधडया छातीनं उपाशी पोटी लढणाऱ्या,प्रेसिहोलच्या” कामगारांच्या ऐतिहासिक संपाच्या १००व्या दिनी पाठिंबा देण्यासाठी, आज रोजी (दि. १७ नोव्हेबर-मंगळवार). प्रेसिहोल कंपनीच्या गेटमिटींगसाठी दु.:०० वा. समस्त जनतेने यावे, ही नम्र विनंती.”

  राजन राजे

—————————————————————————————-

आळशी-उध्दट कामगार, राष्ट्राला भार

मेहनती-नितिमान कामगार, राष्ट्राला आधार ।।”

—————————————————————————————-

 कंत्राटदारीतला रोजगार’, पोटावर रोजमार आहे

करोडो आत्म्यांचाआक्रोश’, अन्यायाविरूध्द एल्गार आहे ।।”

—————————————————————————————-

“‘कंत्राटानं महाराष्ट्रात, मराठी माणसाला लागली घरघर

झालाय उशीर, मराठी गडया, आता उचल पाऊल भरभर ।।”

—————————————————————————————-

ना  पाणी, ना  लोणी, ना  अन्नाचा  घास  ‘पोटभर

मराठया, उपाशी मरण्याआधी, एकदा कंत्राटाविरूध्द जोरधर ।।”

—————————————————————————————-

उत्पादन सेवा-क्षेत्रात शिरकाव झालेल्या

कंत्राटदारीच्या कर्करोगाला समूळ नष्ट करा ।।”

—————————————————————————————-