(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या विनाशकारीप्रस्तावित जैतापूर अणूप्रकल्पाच्या निमित्ताने…..

महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे

गोतास काळठरणारा दांडाप्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”.

“जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं !

मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….

                                 -(नीरज जैन)

———————————————

 संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या महाराष्ट्राची एकेकाळची राकट-कणखर भूमि, गेल्या ४०-५० वर्षात आपल्या स्वार्थाचं ‘खाणकाम’ करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत पसरलेल्या राजकारणी उंदीर-घुशींनी एवढी कमालीची पोखरून भुसभुशीत केलीयं की… पॅरीस, लंडन, वॉशिंग्टन येथून कुणीही यावं आणि कोपरानं खणून जावं! गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, प्रबोधनकार ठाकरे, एस्. एम्. जोशी, कॉ. श्रीपाद डांगे….. यासारख्या खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या कल्याणाची पालखी वाहणाऱ्या दिग्गज राजकीय पुढाऱ्यांची परंपरा, जी एकदा खंडीत झाली, ती झालीच !!

छत्रपती शिवरायांची भाषणं कोणी ऐकली असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही….. लो. टिळक, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. ची ध्वनिमुद्रित भाषणे कोणी क्वचितच ऐकली असतील, तरी हे राजकीय पुढारी महाराष्ट्राच्या पिढ्यापिढ्यांचे ‘महानायक’ बनतात, याला एकमेव कारण त्यांची महाराष्ट्र आणि राष्ट्रहिताची निर्भेळ- निःस्वार्थ भूमिका व त्याला अनुसरूनच असलेलं त्यांच दूरदृष्टीचं पारदर्शक राजकारण! महाराष्ट्रातल्या राजकारणाची ही उज्ज्वल परंपरा खंडित झाल्यामुळे मोकाट सुटलेल्या धनदांडग्या परप्रांतीय परभाषिकांनी, महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय भ्रष्ट राजकीय नेत्यांना हाताशी धरून (खरतरं खिशात घालून), अवघ्या मराठ्यांची आर्थिक व सांस्कृतिक कोंडी करून टाकलीयं. या चक्रव्यूहातील ‘मराठी अभिमन्यू’… भय व आळस बाजूला सारून आणि सर्वपक्षीय भ्रष्ट राजकीय नेतृत्वाचे, तो आधारासाठी शोधत असलेले तकलादू ‘खांदे’ नाकारून… स्वतःच ठामपणे झाल्या ‘कोंडी’ विरुध्दचा ‘झेंडा’, हाती घेणार का, हा यक्षप्रश्न आहे !!!… कारण महाराष्ट्रातल्या विशेषतः कोकणपट्ट्यातल्या मराठी माणसाला यापुढे आपलं ‘अस्तित्वं’ टिकविण्यासाठी जीवाच्या आकांतानं संघर्ष करावा लागणार आहे.

“ज्या भूमिला कान लावले, तरी आजही शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्या घोड्यांच्या ‘टापा’ आणि शिवरायांनी घोड्यावर मारलेली ‘टाच’ ऐकू येईल, त्या मराठ्यांचा इतिहास जागवणाऱ्या भूमिवर… पिढ्यान्पिढ्या वास्तव करणाऱ्या कोकणी मराठ्यांच्या अस्तित्वावरचं तथाकथित विकास प्रकल्पांच्या बुरख्याआड तुम्ही ‘टाच’ आणू पाहताय? परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ‘भूमि’ बरबाद करू पाहणारे, कोण तुम्ही?”... हा प्रत्येक कोकणी मनातला धगधगता ज्वालामुखी आहे।

शांतपणं सुखासमाधानानं झोपलेल्या कोकणी माणसाला एके दिवशी तुम्ही अचानक झोपेतून धाडकन् उठवणार आणि म्हणणारं, “चल उठ कोकणी माणसा, आम्हाला कळलं तू दुःखी आहेस, म्हणून तुला सुखी करण्यासाठी आम्ही खाणकाम, औष्णिकऊर्जा काय नी अणूऊर्जा काय, असे अनेक विकास प्रकल्प घेऊन आलेलो आहोत, तू फक्त आता विस्थापनासाठी आणि पुनर्वसनासाठी तयार हो म्हणजे झालं, नाहीतर??”…. ही अशी अरेरावीची भाषा आणि घोर फसवणूक आहे.. कोकणी अस्मितेला पायदळी तुडविणारी राजकीय दादागिरी आहे। अवघा कोकण प्रदेश खणून नेणारे तब्बल ५६ खाणकाम प्रकल्प, ४३ खाजगी बंदरे, १९ औष्णिकऊर्जा प्रकल्प आणि आता कायमस्वरूपी सजीवसृष्टीला किरणोत्सारी बाधा पोहचविणारा, किनाऱ्याच्या समुद्रतळाशी वाळवंट निर्माण करणारा आणि पिढ्यापिढ्यांच्या अस्तित्वावरचं प्रश्नचिन्ह निर्माण करणारा माडबन-जैतापूरचा (१६५०x६=) ९९०० मेगावॅटचा विनाशकारी अणूऊर्जा प्रकल्प…. या साया तथाकथित विकासाच्या राक्षसी अट्टाहासानं नेमका कोणाचा ‘विकास’ साधला जाणार आहे? लाखो रुपयांचे धनादेश आणि ४-५ हजारांच्या दळभद्री ‘कंत्राटी-नोकऱ्या’, यांची आमिषं कोणाला दाखवतायं? आमच्या लाल-काळ्या आईचं हिरवगारं मखमाली वस्त्र फेडून, पर्यावरणाचा सत्यानाश करून आणि किरणोत्सर्गाची भीषण कायमस्वरूपी तलवार टांगती ठेऊन, तुमच्या काँक्रिटच्या चकचकीत भिंती उभारण्यासाठी काय, आमच्या हांडामांसाच्या लाल चिखलाचं लिंपण आम्ही करायचं?

‘हॉट केक’ सारख्या हातोहात खपणाऱ्या ‘विकास’ नांवाच्या ‘बॅण्डनेम’ खाली… ज्ञान पसरविण्याच्या बहाण्यानं अज्ञान पसरविणारे ‘करिअरिस्ट अणूशास्त्रज्ञ’ अतिश्रीमंत-नवश्रीमंत मूठभरांच्या विकासाच्या मॉडेलसाठी भूमिपुत्रांच जीवन ‘भकास’ करून टाकणाऱ्या भ्रष्ट राजकारणी नोकरशहांची अभद्र युती आणि या दळभद्री विकासाची मलई खाण्याचा मोह आवरू ‘न’ शकल्यामुळे, या साऱ्यांच्या आंधळ्या स्वार्थाच्या पालखीचे भोई’ होऊ पाहणारी, काही दलाल सुपारीबाज बुध्दीमंत बाळं… यांच्या सडक्या मेंदूतून उद्भवलेला माडबन जैतापूरचा तथाकथित ऊर्जाप्रकल्प, हा केवळ अणू-प्रकल्पनसून, पिढ्यापिढ्यांना घातक संसर्ग पोहोचविणारा विषाणू-प्रकल्पआहे !

कोकणपट्ट्यातीलच ठाणे जिल्ह्यात वेडेवाकडे केमिकल-कारखाने (जागतिकस्तरांवर बंदी असणाऱ्या घातक रसायनांचे उत्पादन करणारे) आणून त्याच्या खाडी किनारपट्टीची, त्यातल्या मासेमारीची तसेच मिठाच्या व भाताच्या ‘आगरां’ची वाट लाऊन, स्थानिक आग्री कोळ्यांना व दलित-मुसलमानांना उध्वस्त करणं केव्हाचचं पार पडलयं कित्येक कारखाने तर धड़ एका पिढीलाही नोकरी ‘न’ देताच पुढे बंद करण्यात आले… मात्र जाताना आमची जमीन व पाणी कायमचं नासवून गेले. एकेकाळी खाडी दर्याचा ‘राजा’ असणारा आमचा आगरी-कोळी भूमिपुत्र तरुण आता फडतूस ‘कंत्राटी-नोकरीचा’ हाती कटोरा घेऊन फिरतोयं! जर वेळीच सावध होऊन कडवा प्रतिकार केला नाही तर, ‘कोकणी-तरूण’ देखील ‘विनाशकारी विकासा’ची भळभळती जखम माथी घेऊन, परशुरामभूमित ‘अश्वत्थाम्या सारखा निरंतर फिरत राहीलं, हे दुर्दैवानं अटळ प्राक्तन आहे!

जेव्हा सह्याद्रीच्या कडेकपारीला तुमच्या आधुनिक संस्कृतिचा स्पर्श होण्याची, साधी स्वप्नं पाहण्याची देखील कोणी हिंमत करणं शक्य नव्हतं, त्या आदिम काळापासून रौद्र-सुंदर निसर्गाशी, हिंस्त्र श्वापदांशी, साप-विंचूकाट्याशी, सोसाट्याच्या थंडीवाऱ्याशी, थरकविणाऱ्या लाटांशी झुंजत कोकणी गडी पिढ्यान्पिढ्या जगतं आलाय….. आणि आता अत्याधुनिक संसाधने हाती आल्यावर, या विनाशकारी विकासकांची पाशवी नजर आमच्या निसर्गसुंदर कोकणावर पडलीयं?… पण या तथाकथित विकासाचं ‘दशावतारी’ सोंग धारण केलेल्यांना आम्हाला गर्जून सांगू द्या की, आता ‘तंबोरा’वाल्या नारदमुनींसारखं “नारायण… नारायण…” असं आम्ही म्हणणारं नाही, तर ढोंगी राजकारण्यांची भंबेरी उडवणारा, “जैतापूर अणूप्रकल्प रद्द झालाच पाहिजे”… असा ‘नारा’ लावणार !!!

तुमच्या दृष्टीनं निसर्गसंपन्न कोकणातला आमचा जन्म केवळ एक ‘अपघात’ असल्यामुळे, तुम्ही अस्तित्वाचा ‘घात’ करण्यासाठी सरसावला असलात, तर खबरदार! कोकणाची लाल-काळी माती आणि निळाशार समुद्र आमचा ‘श्वास’ आहे, त्याला तुमच्या आसुरी जबड्यातला ‘घास’ आम्ही बनू देणार नाही…. नाही म्हणजे नाहीच!

जैतापूरच्या अणूऊर्जाप्रकल्पाला प्राणपणानं विरोध, हे यापुढे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ‘कोकणी-वामना’चं पहिलं

पाऊल ठरो, जेणेकरून या कोकण महाराष्ट्रातील अवघं भ्रष्ट राजकीय नेतृत्व कायमचं पाताळात गाडलं जावं, ही ईशचरणी प्रार्थना !!!

राजन राजे


….. अशातऱ्हेनं अणूऊर्जा प्रकल्पअमानवी (म्हणूनच राक्षसी ऊर्जा भरलेला) असूनही, चला… आम्ही जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प उभारणीला होकारदेण्यास तयार आहोत, पण…पण त्याअगोदर खालील बाबी पूर्ण करा अथवा आमच्या प्रश्नांची उत्तर द्या…!!!

  • प्रथम अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी इ. कुठल्याही पाश्चात्यराष्ट्रानं त्यांच्या देशात एकाच ठिकाणी १०,००० मे. वॅट क्षमतेच्या जैतापूर अणूप्रकल्पाप्रमाणे ‘अणूप्रकल्प उभारावा, निदान अमेरिकेनं तरी किमान ३५०० मे. वॅट क्षमतेचा (जगातील अणूऊर्जा प्रकल्पाची एकाच ठिकाणची सर्वोच्च क्षमता) अणूप्रकल्प प्रथम उभारावा. (अमेरिकेने शेवटचा अणूऊर्जा प्रकल्प १९७७ साली उभारला होता.)
  • जैतापूर अणूप्रकल्पासंबंधित अणूशास्त्रज्ञांनी हजारो वर्षे टिकणाऱ्या महाभयंकर किरणोत्सारी आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीचं निर्धोक व परिपूर्ण तंत्रज्ञान जगजाहीर करावं! (जगात असं तंत्रज्ञान कुठेही परिपूर्णरित्या आजतागायत विकसित झालेलचं नाही!)
  • सुधारित तंत्रज्ञानामुळे जैतापूर अणूप्रकल्प अत्यंत सुरक्षित (FAIL SAFE) आहे हे गर्जून सांगण्याअगोदर ‘विमानशास्त्र’ अत्यंत प्रगत अवस्थेत असल्यामुळे, एकही ‘विमान’ भविष्यात कोसळणार नाही, अशी हमी शास्त्रज्ञ कधीतरी देऊ शकतील काय? (दुर्दैवी बाब ही की, कालच भारताच्या, जी सॅट-५ पी हा दूरसंचार उपग्रह नेणाऱ्या यानाचा स्फोट झाला!)
  • ज्या फ्रान्स देशाच सदैव एकमेव उदाहरण अणूविद्युत ऊर्जानिर्मितीच्या संदर्भात दिल जातं, त्या देशानं ‘अरेवा’ कंपनीच्या अणूभट्टया आम्हाला पुरविण्यापूर्वी… हे जाहीर करावं की, भारतासारखी मुबलक सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोमास, प्रचंड क्षेत्रफळ व इतर भौगोलिक अनुकूलता जरी यदाकदाचित आम्हाला लाभली असती तरीही, त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ‘महाप्रलयक्षम’ अणूविद्युतऊर्जेचाच ध्यास धरला असता काय ?
  • १९८१ च्या जून महिन्यात इस्त्राईलनं बॉम्बहल्ला करून इराकची ‘ओसिराक’ अणूभट्टी उध्वस्त केली, तशी सुधारित सुरक्षाविषयक तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या बॉम्बहल्यात जैतापूरची महाकाय अणूभट्टी मात्र कधिही उध्वस्त होणार नाही, अशी लोणकढी थाप मारणाऱ्या अणू शास्त्रज्ञांना असं म्हणायचं आहे का की, १९८१ ते २०१० या प्रदिर्घकाळात शत्रूच्या ‘बॉम्बफेक शास्त्र व मारक क्षमता यात काहीच सुधारणा झाली नसेल ?
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना विधीमंडळात सुपूर्द करताना उद्गारले होते की, “प्रत्येक पिढी एक स्वतंत्र राष्ट्र असते, जसा एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करण्याचा अधिकार नसतो, तसाच तो कुठल्याही एका पिढीला दुसऱ्या पिढीवर आक्रमक कुरघोडी करण्याचा अधिकार नसतो!” आमची बेसुमार वाढती लोकसंख्या (विशेषतः अमराठी) आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या पिढीतल्या धनदांडग्यांची अतिरेकी चंगळवादी- जीवनशैली… यासाठी लागणारी जास्तीची ऊर्जा आम्ही अणूभट्टया उभारून मिळवणार, आणि लाखो वर्षे टिकणारा अणूकिरणोत्सर्जन करणारा महाप्रलयंकारी आण्विक कचरा’ पृथ्वीच्या पोटात ढकलून, पुढच्या पिढ्यांवर त्याच्या भयानक घातकी परिणामांची जबाबदारी सोपवून मोकळं होणार, हे आमच्या पिढीनं पुढील पिढ्यांवर केलेले एक प्रकारचं अमानुष आक्रमण’ नव्हे काय ?
  • परंपरागतरित्या ‘फ्रान्स’ हा देश अणूचाचण्या (विशेषत: समुद्रीचाचण्या) आणि अणूकचऱ्याच्या विल्हेवाटी संदर्भात आंतरराष्ट्रीय निर्बंध बेधडक घुडकावून लावणारा अत्यंत बेजबाबदार देश आहे. याशिवाय ‘अरेवा’ ही अणुभट्टया बनविणारी कंपनी आख्ख्या युरोपखंडातील राष्ट्रांनी ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये टाकलेली आहे, तसेच तीन भीषण अपघातांमुळे फ्रान्सच्या पर्यावरण मंत्र्यांना त्यांच्या ५८ अणुभट्ट्यांचा किरणोत्सर्ग मोजणी करण्याचा आदेश, या कंपनीला द्यावा लागल्याचे समजते. अशा फ्रान्स देशाची आणि त्यांच्या ‘अरेवा’ कंपनीची आम्ही ‘तळी’ उचलणार आहोत की, आमच्या कोकणाची ‘तिरडी’ खांद्यावर घेणार आहोत?
  • रशियाचे अध्यक्ष मेदवेदेव यांनी भारतीय नागरी अणूदायित्व कायद्याअंतर्गत अणूसाहित्य पुरवठादारांना आण्विक अपघात झाल्यास जबाबदार धरून नुकसान भरपाई देण्यास बांधिल केल्यामुळे, तामिळनाडूतील ‘कुडकुलम’ येथे दोन अधिक अणूभट्टया उभारण्यास नकार दिला. याचाच अर्थ रशियाचे अध्यक्ष, रशियाचे अणूशास्त्रज्ञ ‘आण्विक अपघाताची शक्यता निश्चितपणे गृहीत धरतात!. तर आमचे अणूशास्त्रज्ञ अणुभट्ट्यांच्या निर्धोकतेची छातीठोकपणे ग्वाही देतायतं. आमचे अणूशास्त्रज्ञ हे रशियन अणूशास्त्रज्ञांपेक्षा फारच अधिक बुध्दिमान-सक्षम आहेत, असं समजायचं की… ते या पृथ्वीवरील ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ आहेत, असं समजायचं?
  • महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणतात, त्याप्रमाणे भारतातील २० अणुभट्ट्यांत गेल्या २० वर्षांत एकही अपघात झालेला नाही असं म्हणता, मग ८ ऑगस्ट २०१० च्या ‘THE WEEK च्या अंकात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, तारापूरच्या अणूभट्टीत सतत होणाऱ्या लहानमोठ्या घातकी अणूकत्सर्जनामुळे, ती अणूभट्टी कायमची बंद करून टाकण्याच्या निर्णयाप्रत आल्या होत्या, याची पुराव्यासह सप्रमाण केलेली मांडणी, खोटी किंवा खोडसाळ होती, असा कुणाचा दावा आहे काय?
  • इतर प्रांतीय लोक आक्रमक स्वभावाचे व राजकीय दृष्ट्या अधिक सजग (उदा. प. बंगाल मधील हरीपूर येथील नियोजित अणूप्रकल्प स्थानिक बंगाली जनतेनं हाणून पाडला) तर तुलनेने महाराष्ट्रीयन लोक, विशेषतः कोकणी माणसं, शांतताप्रिय-सोशिक व पापभीरू वृत्तीचे, त्यामुळे इतर अनेक तांत्रिक बाबी विरोधात असूनही (उदा. जैतापूर- माडबन येथील भूकंपप्रवण क्षेत्र, हल्लीच तेथील जमिनीला पडलेली प्रचंड मोठ्या लांबीची भेग, विपुल भू व समुद्री जैवविविधता, प्रकल्पस्थळाची समुद्रतळापासूनची सरासरी ८० फूट उंची, वीजवहनासाठी करावी लागणारी प्रचंड जंगलतोड इ.) अशा संभाव्य प्रलयकारी अणूऊर्जा प्रकल्पासाठी मोकळी असलेली भारताची पूर्व किनारपट्टी सोडून, पश्चिमेची ‘कोकण किनारपट्टीच’ योग्य वाटली ना? शिवाय झालाच उठाव, तर कोकणी माणसाची मुस्कटदाबी करायला स्थानिक सरंजामदारी राजकारणी हाताशी आहेतच, असं नव्हे काय?
  • ‘डिलिमिटेशन्-अॅक्ट्’ मुळे ग्रामीण भागातील आमदार/खासदारांची संख्या शहरी लोकसंख्येच्या फुगवट्याच्या पार्श्वभूमिवर तुलनेनी खूपच घटल्यामुळे विविध विकास प्रकल्पांच्या बुरख्याआड ग्रामीण जनतेची आरंभलेली ही, सरसकट मुस्कटदाबी व क्रूरथट्टा नव्हे काय? की, हे करण्यासाठीच ‘डिलिमिटेशन्-अॅक्टू’चा डाव रचला गेला ?
  • हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीनं धावून जाण्यापासून ते दक्षिण-उत्तरेतल्या परप्रांतीय लोंढ्यांचा असह्य भार आपल्या छाताडावर आजवर पेलून धरण्यापर्यंत या महाराष्ट्रानं नको एवढा त्याग, या देशासाठी या अगोदरच केलेला आहे, आता अजून कुठला हा त्याग करून, कोकणाची ‘होळी’ पेटवून भारतात इतरत्र ‘दिवाळी’ साजरी करायचीय?

कोकणी माणसा,

खामोश मिजाजी तुझे जीने नही देगी !

इस दौर मे जीना है, तो कुहरम मचा दे….!!!