जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व…

‘लोकप्रभातील १ एप्रिलच्या अंकातील ‘राजू परूळेकर यांच्या ‘जैतापूरची अणूगोळी’ या लेखावर अत्यंत घणाघाती प्रतिक्रिया ‘शिमगा आणि जैतापूर’ या शीर्षकाच्या आपल्या एप्रिलच्या अंकातून देणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सडेतोड उत्तर !!!

कोकणातल्याच एका खेड्यातली ही एक रूपक कथा ही प्रचलित लोककथा वीजेशीच संबंधित असल्यानं, जैतापूर प्रकल्पासंदर्भात चांगलीच प्रत्ययकारी ठरावी!


“एका गावाच्या मध्यभागी वडाच्या पाराखाली निवांत बसलेली गावकुत्री, अचानक गावकऱ्यांनी ढोलताशासह काढलेली मिरवणूक पाहून अचंबित होतात… त्यातला वयानं मोठा असलेला म्होरक्या कुत्रा कळपातल्या एका तरण्याबांड कुत्र्याला म्हणतो, “जा बाबा बघून ये, कशासाठी गावकरी एवढे मिरवणुकीत आनंदानं नाचतायतं?’’ तसा तो तरूण कुत्रा काय घडलं हे बघायला मिरवणुकीकडे धावत सुटतो आणि दुप्पट वेगानं परत येऊन अत्यानंदानं उड्या मारायला लागतो. तेव्हा तो म्होरक्या कुत्रा त्याला विचारतो, “अरे लोकांच्या आनंदाचं कारण तुला तपासायला पाठवलं, तर तूच काय वेड्यासारख्या आनंदानं उड्या मारतोयस?”… तेव्हा तो तरूण कुत्रा म्हणतो, “अहो आनंदाचं कारण काय विचारता? आपल्या गावात वीज येणार आहे, वीज! लोक त्यामुळे खूष असणारच, पण गावात वीज आली की, आपली सोय नाही का झाली? अहो, वीज आली की, ‘विजेचे खांब’ नाही का येणार ?” वरील लोककथेतल्या कुत्र्यांची जी क्षुद्र स्वार्थाची भावना आहे, तीच कोकणातल्या स्थानिक राजकारणी दलालांची! दोन-तीन लाख कोटींचा एवढा मोठा भांडवली खर्च असलेला जगातला आजवरचा सर्वात मोठा अणुप्रकल्प जैतापुरात येतोयं म्हटल्यावर वाचकहो सांगा, दलालीच आणि कंत्राटांचं केवढं पेव फुटेल? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात मंत्री राजकारणी, शास्त्रज्ञ-नोकरशहा आणि एकूणच सरकारी यंत्रणेला एवढा प्रचंड रस का, याचं प्रमुख कारण समजून घेतलं की, पुढील गोष्टींचा आपोआप उलगडा होत जातो.

“Capitalists have ‘NO’ nation!” व असं जे भांडवलदारांची स्वार्थी वृत्ती पाहून उच्देगाने अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष व विचारवंत थॉमस जेफर्सन म्हणाले होते, त्यात आता भारतातल्या धंदेवाईक राजकारण्यांची, भ्रष्ट खाजगी सरकारी अधिकाऱ्यांची, तसेच फक्त आपल्या ‘करिअर’कडे गिधाडासारखी नजर लावून बसलेल्या (आणि त्यापलीकडे दुनियेत माणुसकी किंवा भूतदया नावाची काही चीज असते, हे विसरलेल्या) विविध ज्ञान शाखांच्या तज्ज्ञ-शास्त्रज्ञ, अशा कितीतरी बुध्दिमंत बाळांची भर घालावी लागेल, एवढं भारतीय समाज जीवनाचं सध्या भयावह चित्र आहे! त्यामुळे जैतापूरसारख्या प्रकल्पांच्या मागचं खरं कारण हे ‘देशभक्ती’ किंवा ‘देशहित’ वगैरे नसून केवळ ‘बाजारू अर्थकारण’ हेच असतं… फार तर त्याला ‘स्यूडो-पॅटिऑटिझम्’ आपण म्हणू शकतो आणि अर्थातच अशा ‘दशावतारी’ देशभक्तीचा ‘स्यूडो पॅटर्न’ राबविणाऱ्या शास्त्रज्ञांना मग ‘स्यूडो सायंटिस्टस् नाही म्हणायचं, तर मग काय ?

पृथ्वीमातेच्या तव्येताची काळजी घेण्यासाठी… ज्यांची दृष्टी सदैव स्वहितापलीकडे. समष्टिच्या हिताकडे रोखलेली असेल, असे धोरणी, मुत्सद्दी-खरेखुरे लोकनायक आपल्याला शोधायला हवेत…

अणुप्रकल्पाच्या गुणदोषांविषयी फक्त अणुशास्त्रज्ञांनीच लिहावं, असं फर्मान सोडणाऱ्या डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी स्वतः मात्र एखाद्या कसलेल्या शास्त्रज्ञाच्या अभिनिवेशात ‘लोकप्रभा’त चांगलेच हातपाय ताणून घेतलेले दिसतात. कुलकर्णीसाहेब, एखाद्या डॉक्टरने रुग्णाला दिलेलं चुकीचं औषध फारतर त्या एखाददुसऱ्या रूग्णाचा जीव घेईल आणि मृत्यूचा सिलसिला तिथेच थांबेल, पण डॉ. अनिल काकोडकरांसारख्याचा ‘आण्विक अँटीबायोटिक्स्चा’ जैतापूरसारखा ‘हेवी डोस’ तर सोडाच, पण साधा तारापूर काक्रापारसारखा ‘माइल्ड डोस’ जेव्हा कधी चुकेल (हे अघटित कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात घडणे आहेच फक्त प्रश्न काळाचा आहे!) तेव्हा एखाददुसऱ्याचे नव्हे, एखाद-दोन हजाराचेही नव्हे, तर एक-दोन लाखापेक्षाही अधिक लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात आणि या धोक्याची तलवार अणुउत्सर्जनानं प्रभावित झालेल्या फार मोठया क्षेत्रात हजारो नव्हे, लाखो वर्षे टांगती राहू शकते!

बरं हे सारे भोग जे लोक भोगणार त्यातले कुणीही कधीही डॉ. अनिल काकोडकरांसारख्या शास्त्रज्ञांकडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे, ‘रूग्ण’ (ऊर्जेनं कुपोषित) म्हणून सेवा मागण्यासाठी गेलेले नसणार, एवढं समजण्याएवढंही शहाणपण प्रकल्प समर्थकांकडे नसावं, हे कोकणाचं दुदैव आहे.

या देशातल्या शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवायचा नाही का? असा प्रश्न करणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णींना आम्हाला सांगू द्या की…. “एक समस्या सोडवताना, जे दुसरी समस्या निर्माण करतात. दुसरी सोडवताना तिसरी, अशी ‘कापूस कोंड्याच्या गोष्टी सारखी ‘न’ संपणारी समस्यांची शृंखला चढत्या भाजणीनं निर्माण करतात आणि अखेरच्या निर्माण झालेल्या अक्राळविक्राळ समस्येबाबत ज्यांच्याकडे कुठलाही इलाज नसतो, त्यांना पूर्वी (ज्ञानाच्या वेगवेगळया शाखांचे) ‘शास्त्रज्ञ’ म्हटले जायचे, पण हल्ली ‘फुकुशिमा’ आणि ‘जैतापूर’ च्या पाश्र्वभूमीवर, त्यांना ‘अणुशास्त्रज्ञ’ असं म्हणतात! आपल्या ‘पृथ्वी’ नावाच्या हिरवाई व सजीवसृष्टीच्या वैविध्यान विनटलेल्या एकमेवाद्वितीय ग्रहाची या तथाकथित शास्त्रज्ञांमुळे ‘खेळ मांडियेला वाळवंटीकरणाचा अशी गंभीर अवस्था होऊ घातलीयं.

“We are into a dangerous world of various specialists…. without ‘wisdom’, powerful rulers…. without conscience’ & ‘Nuclear-Giants… but ‘Ethical-Dwarfs’!!!” …म्हणूनच फार उशीर होण्याअगोदर निदान आतातरी आपल्या रोगग्रस्त व्याधीनं जर्जर पृथ्वीमातेच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी.. ज्यांची दृष्टी सदैव स्वहितापलीकडे. समष्टिच्या हिताकडे रोखलेली असेल, असे धोरणी, मुत्सद्दी-खरेखुरे लोकनायक आपल्याला शोधायला हवेत… ‘अणुकचया’ सारखे टाकाऊ व अत्यंत घातक असलेले आजकालचे ‘होल्सोल’ दळभद्री राजकारणी आणि काकोडकरांसारखे शास्त्रज्ञ नकोत!

‘कोकणात तुम्ही याल, पण तुम्हाला परत जाऊ देणार नाही’ ही एखाद्या गँगस्टरला साजेशी खुलेआम धमकी जेव्हा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री (आणि कोकणचे महसूल मंत्री!) देतात तेव्हा ते हिटलरच्या वंशावळीतले वाटतात की, महात्मा गांधींचे गणगोत शोभतात, याचे एकदा डॉक्टरांनी ‘निदान’ केले तर बरे!

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, अच्युतराव पटवर्धन, एस्.एम्. जोशी, सेनापती बापट, श्रीपाद डांगे यांसारख्या खऱ्याखुऱ्या समाजहितैषी राजकारण्यांची पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर ज्याच्यावर निर्भेळ विश्वास टाकता येईल, असं एकही राजकीय नेतृत्व गेल्या ४०-५० वर्षांत महाराष्ट्रात उभं ‘न’ राहिल्यामुळे जसा जनतेचा सर्वच राजकीय नेत्यांवरचा विश्वास पार उडालेला आहे, तव्दतच आपल्या ‘करिअर’ च्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आपली तार्किक बुद्धी व सद्सद्विवेक बुद्धी सत्ताधाऱ्यांच्या आणि धनदांडग्यांच्या चरणी गहाण टाकणाऱ्या काही शास्त्रज्ञांसारख्या बुध्दिमंत बाळांवर आंधळा विश्वास टाकण्याचे दिवस या आपल्या जगण्याच्या संपूर्ण बाजारीकरणाच्या प्रक्रियेत केव्हाच मागे पडलेले आहेत।

कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे १ ग्रॅम युरेनियममध्ये जशी ३००० किलो कोळशाइतकी ऊर्जा सामावलेली असते, तशीच अशातऱ्हेच्या विनाशकारक केंद्रिभूत शास्त्रीय प्रयोगांनी व केंद्रिभूत अर्थकारणाने आपापल्या ‘टोळ्या’ बनवून बसलेल्या मोजक्या राजकीय व उद्योजक घराण्यांच्या हाती प्रचंड सत्ता व पैसा केंद्रिभूत होतो. मग अशांच्या पालखीचे भोई होऊन ज्ञान पसरविण्याच्या बहाण्याखाली अज्ञान पसरविणारे अणुशास्त्रज्ञ तर ‘स्यूडो सायंटिस्ट्स’ या नामाभिधानापेक्षाही भयानक म्हटले पाहिजेत! इतर शास्त्रज्ञांसारखाच अणुशास्त्रज्ञ हा एक साधा शास्त्रज्ञ असतो. पण पूर्वी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढया देशांकडे असलेल्या अणुतंत्रज्ञानामुळे पूर्वापार एक प्रगाढ गूढतेचं वलय अणुशास्त्रज्ञांभोवती जमा झालयं आज बऱ्याच देशांना हे | अणुतंत्रज्ञान अवगत झाल्यावरही तो पांगुळगाडा (गूढतेच्या वलयाचा) सोडायला आपले अणुशास्त्रज्ञ तयार नाहीत, यातच ग्यानबाची मेख आहे! याच ‘स्यूडो पॅट्रियाटिक’ अणूशास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या छळस् नं काय धुडगूस घातलायं तो पहायला कुलकर्णीनी फार दूरवर जायला नको फक्त तारापूरला जाऊन एकदा चक्षुर्वेसत्यं पाहण्याची तसदी घ्यावी. अणुभट्ट्यांमध्ये हलाखीच्या आर्थिक स्थितीतील कंत्राटी कामगारांचा अत्यंत असुरक्षित व धोकादायक वापर, संपुष्टात आलेली पिढयापिढयांची कोळी बांधवांची मासेमारी आणि अणुउत्सर्जनाशी संबंधित गंभीर आजारांचं थैमान.. मात्र त्याची कुठलीही दखलपात्र नोंद ‘न’ ठेवण्याची दक्षता घेणारी, तसेच कुठल्याही अणूप्रकल्पाभोवतीच्या ५-२५ किलोमीटर परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचे सातत्यानं ठराविक काळानंतर खात्रीलायक व पारदर्शक कुठलंही सर्वेक्षण जाणीवपूर्वक ‘न’ करणारी संवेदनशून्य सरकारी यंत्रणा, एकदा या डॉक्टरांनी आमच्यासारख्यांच्या सोबत येऊन पहावीच, हे आमचं त्यांना उघड आव्हान आहे!

ज्या हिटलरी प्रवृत्तींचा उल्लेख राजू परूळेकरांनी आपल्या लेखात केलाय तो वस्तुतः जैतापूर माडबन परिसरातील सरकारी दडपशाहीच्या संदर्भात व विशेषतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या जैतापूर भेटीनंतरच्या रात्रीच्या अंधारात बेगुमानपणे आणि निर्दयपणे राबवल्या गेलेल्या ‘हम करेसो कायदा’ वृत्तीच्या अटकसत्राला व पोलिसी छळवणुकीच्या संदर्भातील आहे. ‘कोकणात तुम्ही याल, पण तुम्हाला परत जाऊ देणार नाही’ एखाद्या गैंगस्टरला साजेशी खुलेआम धमकी जेव्हा महाराष्ट्राचे उद्योगमंत्रो (आणि कोकणचे महसूल मंत्री ।) देतात तेव्हा ते हिटलरच्या वंशावळीतले वाटतात की, महात्मा गांधींचे गणगोत शोभतात, याचे एकदा डॉक्टरांनी ‘निदान’ केले तर बरे! वर्षभर उनाडक्या करायच्या आणि परीक्षा आली की अभ्यासाची धावपळ करायची, अशी दारूण अवस्था या भारतातल्या राजकारण्यांची आणि शास्त्रज्ञांची आहे. चीन-जपान प्रान्सप्रमाणे लोकसंख्येच्या नियमनाचे पन्नास ते साठ वर्षांपासूनच कठौर शिस्तीचे धडे घालून देणे यांना तेव्हा जमले नाही किंवा ती दूरदृष्टीही नव्हती. शिवाय त्यांनीच राबविलेल्या धोरणांमुळे आणि शोषणतंत्रांमुळे निर्माण झालेल्या या चंगळवादी जीवनशैलीच्या लपलपणाऱ्या जिव्हा आटोक्यात आणण्याची कुठलीही इच्छाशक्ती वा धैर्य या हतवीर्याकडे नाही. पण फ्रान्स-चीन ‘जपानसारख्या विनाशकारी अणुऊर्जा (त्यातही हे तीनही देश आपल्या फुकुशिमाच्या अणू संकटानंतर आपल्या अणू धोरणात तातडीने बदल करीत आहेत, हेही ध्यानात घ्या!) धोरणांचा ‘जमालगोटा’ मात्र हे आम्हाला इतर पर्याय नाही म्हणत (TINA Effect) जबरदस्तीने द्यायला निघाले आहेत. ५०-६० वर्षांचा अक्षय ऊर्जा (विशेषतः सौरऊर्जा, जी आपल्या देशात मुबलक आहे) संशोधन व निर्मितीचा बॅकलॉग, हे आज जागे होऊन ५-१० वर्षांत अणुऊर्जेच्या महासंहारक पर्यायाने भरायला निघालेत!

कुलकर्णी, वैशाली पाटील, मा. न्या. कोळसेपाटील, प्रदीप इंदुलकर, डॉ. विवेक मॉटरो यांना तुम्ही आणि तुमचे बोलविते धनी नारायण राणे ‘बाहेरचे लोक’ म्हणता, मग फ्रान्सचे अरेवा कंपनीवाले व अमेरिकेचे जी.ई. कंपनीवाले, फ्रान्सचे अध्यक्ष सारकोझी, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे काय कोकणचे ‘झिल’ का ‘जावबापू’ लागून गेलेतं? तसेच स्वतः अनिल काकोडकर, सी. बी. जैन, एस. के. जैन, शशिकांत धारणे, रवींद्र काळे यांच्याकडे काय कोकणचे सातबारे आहेत? अहो वैद्य, हा महाकाय विनाशकारी प्रकल्प आणि तदुषंगानी येणाऱ्या इतर नोकरीधंद्याच्या बाबी यामुळे कोकणाच्या संस्कृतीवर, उत्तरेतून येणाऱ्या लोंढ्यांमुळे जो ‘घाला’ पडणार आहे आणि अवघ्या कोकणाच्या संस्कृतीचा एकूणच जो ‘गोपाळकाला’ होणार आहे. त्या लोंढयांना वैद्यबुवा तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक कोकणच्या संस्कृतिचे मारेकरी, काय ‘घरजावई’ करून घेणार आहात काय? जैतापूरच्या संभाव्य किरणोत्सर्गाविषयक परूळेकरांच्या लेखातल्या माहितीला अशास्त्रीय म्हणता, मग जपानच्या फुकुशिमाचा किरणोत्सर्ग रोखताना तुमची सगळी शास्त्रीय तत्त्व कुठे गेली आहेत ? तुमचे ते डॉ. अनिल काकोडकर, त्यांच्या अमोघ ज्ञानाचा फायदा जपानच्या किरणोत्सर्गबाधित जनतेला करून द्यायला, तातडीनं जपानला का धावले नाहीत? निदान काकोडकरांना भविष्यात भारतात अशी परिस्थिती उद्भवली तर काय करायला हवं, याचे दोन-चार प्राथमिक धडे तरी गिरवता आले असते. आपल्या भारतात विशेषतः महाराष्ठात, ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ नसून ‘मॅनेजमेंटचं डिझास्टर’ आहे, हे २६ जुलै-२००५ आणि २६ नोव्हेंबर-२००८ ला तमाम जनतेनं फार वाईट रीतीने अनुभवलयं! त्यामुळे वैद्यबुवा, आपल्याकडे ‘जैतापूर’ सारख्या महाकाय अणुभट्टीत सोडाच, पण ‘तारापूर’ सारख्या लहानसहान अणुभट्टीत जरी कुठल्याही स्वरूपाचा आण्विक अपघात घडला तर काय भयानक तारांबळ उडेल, याची कल्पनाही करवत नाही (पण त्यासाठी प्रत्यक्ष तारापूरला जाऊन जागेची सखोल पहाणी करायला हवी!) अणुऊर्जेसारखे अन्य कुठलेही पर्याय हे पृथ्वीवरच्या सजीवांच्या अस्तित्वाच्या मुळावरच कुठल्याही बेसावधक्षणी उठू शकतात, याचं कारणच मुळी अत्यंत कमी मात्रेत त्यात निसर्गतः साठलेली अफाट ऊर्जा हे आहे!

डॉ. मिलिंद कुलकणीर्ंना आख्या कोकणवासीयांची, विशेषतः जैतापूर माडबनवासीयांची कुणी ‘पॉवर ऑफ अॅटनी’ लिहून दिली आहे की, आख्या कोकणाचा ‘सातबारा’ त्यांच्या नावावर लिहून दिलाये ? कोकणाचं निसर्गसंपन्नतेच्या सान्निध्यातलं सुखसमाधान वेगळं आणि गरिबी वेगळी! कुलकर्णीबुवा म्हणतात, त्याप्रमाणे जर कोकणात अठरा विश्व दारिद्र्य आणि बेरोजगारी नांदत असेल (स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६४ वर्षांनंतर) आणि जैतापूर-माडबनच्या आसपासच्या भागात ५३ टक्के रेशनकार्डे दारिद्र्यरेषेखाली असतील, तर तो प्रश्न त्यांनी राजू परूळेकरांना नव्हे, तर कोकणच्या पालक मंत्र्यांना विचारायला हवा. कोकणातली गरिबी नष्ट करण्याच्या बहाण्याखाली, त्यांचं नैसर्गिक सुखसमाधान आणि कोकणी-संस्कृती कायमची नेस्तनाबूत करायची आणि येणाऱ्या उत्तरेतल्या लोंढयांवर वचक ठेवून आपल्या ‘व्होट बँका’ आणि पिढ्यान्पिढयांच्या समृद्धीची कोठार निर्माण करायची, हे धंदे चालणार नाहीत! राहिला मुद्दा सौरशक्तीचा.. Gridless Power is always Grindless Power! ज्यात कोणी फारसं भरडलं जात नाही किंवा पर्यावरणाचं नुकसान होत नाही. तुम्हाला लाख, दरडोई दरवर्षांला ५००० किलोवॉट तास काय किंवा १०००० किलोवॉट-तास काय विद्युतऊर्जा हवी असेल, पण ती पृथ्वीच्या एकूण पर्यावरणाला कायमस्वरूपी झेपायला तर हवी ना? की, पुढच्या भावी पिढ्यांच्या वाट्याचं सगळं ओरबाडून याच दोन-चार पिढ्यांनी उन्मत्तपणे भोगून संपवून टाकायचं? आपली जीवनशैली आणि त्यासाठी ऊर्जेचा वापर हा केवळ आपण ‘जेवढं निसर्गाकडून घेऊ, तेवढं निसर्गाला परत देऊ’ याच तत्त्वावर व्हायला हवा.. तिथे पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार किंवा अनिल काकोडकर काय किंवा अन्य कोणी काय, या कोणालाही अखिल मानवजातीच्या अंतिम व अनंतकाळच्या हितासाठी दुसरा कुठलाही ‘चॉईस’ असण्याची सुतराम शक्यता नाही! सध्या जे चाललयं (त्यात पृथ्वीच्या पोटात ढकलला जाणारा हजारो-लाखो वर्षे टिकणारा अणुभट्टयांमधला घातक किरणोत्सारी हजारो टन कचरासुध्दा आला, याची जबाबदारी पुढील पिढयांवर ढकलून आपण मोकळे होऊ पाहतोय!) तो विकासाचा प्रवास नसून विनाशाच्या दिशेने प्रवास आहे. एखादा अर्धवट ज्ञानी डॉक्टर (MBBS किंवा तत्सम अर्हता प्राप्त नसलेला..डॉ. कुलकर्णीची अर्हता अजून तपासायचीच आहे!) अँटिबायॉटिक्स्चा बेलगाम वापर करून रोग्यांच्या जीवाशी किंवा रोगप्रतिकारक क्षमतेशी जसा खेळत असतो किंवा चांगल्या स्ट्रक्चल इंजिनीअरच्या सल्ल्याविना बांधलेली इमारत कितीही सुंदर असली तरी जशी टिकाऊ नसते, तशीच तथाकथित विकासाची तकलादू धोरणं, ‘हत्ती आणि चार आंधळे या कथेतल्याप्रमाणे आपल्या अपुऱ्या समजुतीच्या किंवा आकलनाच्या आधारावर आखण्याचं धोकादायक काम, आपल्या देशात मोठया प्रमाणावर चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘प्रत्येक पिढी हे एक स्वतंत्र राष्ट्र असते आणि ज्याप्रमाणे एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करण्याचा अधिकार नसतो, त्याचप्रमाणे एका पिढीला दुसऱ्या पिढीवर आक्रमण करण्याचा अधिकार नसतो’, असं जे म्हणाले होते ते या संदर्भात समजून घेणं फार गरजेचं आहे!

सौरऊर्जेसारख्या अक्षय व पर्यावरणावर किमान आघात करणाऱ्या पर्यायांचाच स्वीकार यापुढे जगाला करावयास लागेल आणि फुकुशिमाच्या आण्विक अपघाताच्या पाश्र्वभूमीवर अणुऊर्जेविरोधात जी जागतिक पातळीवर संतापाची तीव्र लाट उसळली आहे (जपानमधले नागरिक फार मोठ्या प्रमाणावर अणुभट्टयाबाबत सत्य लपवून ठेवल्याबद्दल तिथल्या सरकार व अणुशास्त्रज्ञांवर फार संतप्त आहेत, हे संबंधितांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे) त्यामुळे तर बहुतेक देशांच्या सरकारांची (यात चीन प्रामुख्यानं आला) झपाट्यानं सौरऊर्जा विकसित करण्याची धडपड चालू झाली आहे. त्यामुळे सौरऊर्जेला अणुऊर्जेच्या किती पट जागा लागते, हा मुद्दाच पूर्णतः गैरलागू असून अशा अक्षयस्त्रोतांव्दारे (त्यात सौरऊर्जेखेराज पवनऊर्जा, बायोमास, लहानसहान धरणे व बंधारे, सागरी लाटा इ.) आपण जास्तीत जास्त किती ऊर्जा मिळवू शकतो, तद्नुसारच आपल्या देशाच्याच नव्हे तर जागतिक लोकसंख्येबाबतची आणि पर्यावरणाला झेपेल इतपतच उच्च जीवनशैली राखण्याबाबतची धोरणं, तातडीनं आखावी लागतील, अणुऊर्जेसारख अन्य कुठलेही पर्याय हे पृथ्वीवरच्या सजीवांच्या अस्तित्वाच्या मुळावरच कुठल्याही बेसावधक्षणी उठू शकतात, याचं कारणच मुळी अत्यंत कमी मात्रेत त्यात निसर्गतः साठलेली अफाट ऊर्जा हे आहे! आपले अणुशास्त्रज्ञ हे कोणी ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ नव्हेत, तेव्हा हा निसर्गतः बाटलीत कोंडला गेलेला आण्विकशक्तीचा ब्रम्हराक्षस बाटलीतच राहू द्या, अन्यथा बाटलीबाहेर त्याला काढल्यास ‘पॅडोराज-बॉक्स’ उघडल्यासारखं होईल. महाभारतात अश्वत्थाम्यानं सोडलेलं ब्रह्मास्त्र रोखायला श्रीकृष्ण होता, पण आधुनिक भारतात अणुशास्त्रज्ञरूपी अश्वत्थाम्यांनी पेरलेली अणुऊर्जेची ब्रम्हास्ते रोखायला कृष्ण कुठेचं नाही. राजकारणी ‘कंस’ मात्र उदंड आहेत ! कुलकर्णी, तुमच्यासारखे अणुऊर्जेच्या ‘लाभाच्या’ लखलखाटाने आंधळे झालेले लोक, आम्हाला अशास्त्रीय ठरवून ‘लांडगा आला रे आला’ या कथेतल्या तरूणाप्रमाणे ‘व्यर्थ हाकाटी करणारे’, अशी आमची संभावना करतात. पण वैद्यबुवा शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की, त्या ‘लांडगा आला रे आला’ या कथेतसुध्दा शेवटी लांडगा आला होताच! फरक एवढाच आहे की… चेनरेबिल फुकुशिमासारख्या आण्विक अपघाताच्या ‘लांडग्याच्या जबड्यात, त्या कथेतल्याप्रमाणे एखादा हाकाटी करणारा तरूणच जाईल असं नव्हे, तर जैतापूर माडबनसह उभा कोकण, उर्वरित महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे, पुणे भागासकट जाईल, हे ध्यानात असू द्या!

डॉ. मिलिंद कुलकर्णी, शेवटी झोपी गेलेल्याला जागं करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करणं महाकर्मकठीण असतं. म्हणून अशा विज्ञानाच्या दशावतारी सोंगांना ‘भारतरत्न’ द्यायचं की, ‘चौदावं रत्न’ दाखवायचं याचा समस्त कोकणी जनता योग्य वेळी निर्णय घेतल्याखेरीज राहणार नाही!!!

राजन राजे