कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. आता त्या चळवळीचं धुळीत पडलेलं ‘मस्तक’, उरल्यासुरल्या ‘धडा’पासून छाटून टाकण्याचे उद्योगसुध्दा, षंढासारखे नुसते उघडया–थिजलेल्या डोळयांनी पहात बसणार आहात? अजुन किती काळ हा तमाशा चालणार आहे….चालायचा आहे, तुमच्या नामर्दानगीचा !!!
“९९%च्या मतदानातून आलेली, पण १%साठी राबविली जाणारी ही तथाकथित ‘लोकशाही’, नव्हे ‘नव–सरंजामशाही’ आपण कुठवर सहन करणार आहात, मित्रांनो ???”
तेव्हा, समस्त कामगार-कर्मचारी बांधवांनो उठा आणि आपल्या होणाऱया मुस्कटदाबीविरूध्द व आपल्यावर सातत्याने होणाऱया अन्यायाविरूध्द एकत्रित होऊन सनदशीरमार्गानं जोरदार संघर्ष करूया!
आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर, गलितगात्र होऊन पडलेल्या कामगार-चळवळीत प्राण फुंकू पाहणाऱया ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष श्री. राजन राजे तसेच नाशिक येथील ‘सीटू’चे कामगार नेते श्री……… कराड या लढाऊ व सचोटीच्या कामगार नेत्यांना (खऱया अर्थाने ‘टेड युनियन’ नेते… ‘ट्रेडिंग युनियन’ नेते नव्हे!) महाराष्ट्रातले सर्वपक्षीय राजकारणी, उद्योगपती व त्यांचे हस्तक-दलाल असलेले भ्रष्ट पोलिस अधिकारी ‘येन केन प्रकारेण’ संपवू पहात आहेत….ही अत्यंत धक्कादायक बाब आहे! सांगा, असे कुठले गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन या नेत्यांकडून घडलेले आहे, ज्यासाठी ही संपूर्ण शासनव्यवस्था त्यांच्या हात धुवून पाठी लागली आहे? याउलट जागोजागी व्यवस्थापकीय मंडळी राजकीय गुंडांना व त्यांच्या हस्तक मजूर-कंत्राटदारांना हाताशी धरून संपूर्ण कामगारविश्वात भ्रष्ट पोलिस अधिकाऱयांच्या सहकाराने प्रचंड दहशत माजवताना दिसतायतं. शेतातील व कारखान्यातील श्रमिकवर्ग हा खरंतर समाजातला मोठा घटक आणि खऱया अर्थान निढळाचा घाम गाळणारा वर्ग (बाकी बहुतांश त्यांच्या श्रमावर जगणारी बुध्दिमंत बांडगुळे आहेत!) होय. पण, हाच बहुजन वर्ग, आज देशातल्या राजकीय व आर्थिक व्यवस्थेच्या टाचेखाली गुदमरून मरतोयं! अशा अन्यायग्रस्त व शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणे आणि त्यांना काळनिद्रेतून जागं करत त्यांच्यात ‘राजकीय जागृति’ निर्माण करणे…. हा कुठला गुन्हा आहे ? या देशाच्या संविधानाने जे जनसामान्यांना सनदशीर मार्गाने संघटना बांधण्याचे, आपला आवाज बुलंद करण्याचे व त्याविरूध्द कायदेशीरमार्गाने लढण्याचे जे अधिकार दिलेले आहेत; त्याचा सुयोग्य व न्याय्य वापर करूनच तर, आम्ही शोषित श्रमिकांचे लढे उभारत आहोत ना? उलटपक्षी, जे काही थोडेबहुत कामगारांना संरक्षण देणारे कायदे आहेत, ते सुध्दा बेलाशक पायदळी तुडवून राजकारणी, उद्योगपती व नोकरशहा यांच गुन्हेगारी त्रिकूट समस्त कामगार-कर्मचाऱयांच्या छाताडावर थयथया नाचताना सध्या दिसतयं! या सर्वांचा एकत्रितरित्या सार्वत्रिक निषेध व प्रतिकार करण्यासाठी बाबांनो, आपण सर्वांनी पेटून उठायला हवं…. अन्यथा काळ मोठा कठीण आलायं! कामगारांनो, माझं अंथरूण पेटल्याखेरीज मी जागा होणार नाही अशी कुपमंडूक व क्षुद्रवृत्ती तशीच कायम ठेवलीत; तर केवळ तुम्हीच बरबाद व्हाल असे नव्हे, तर पुढच्या पिढयापिढयांच्या बरबादीच्या महापातकाचेसुध्दा तुम्ही धनी व्हाल, हे नीट ध्यानात ठेवा!
सध्या, महाराष्ट्रात जेथे जेथे म्हणून कामगारांचा व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू आहे, तेथे तेथे जाणिवपूर्वक शांततामय व सनदशीर मार्गाने चाललेल्या कामगार आंदोलनाला बदनाम करून (Call the dog mad and kill him!) ते पोलिसांच्या राक्षसीबळाच्या आधारे चिरडून टाकण्यासाठी व्यवस्थापकीय मंडळी, स्थानिक बदमाष राजकारणी, गुंड मजूर-कंत्राटदार व भ्रष्ट पोलिस अधिकारी यांचे अभद्र गुन्हेगारी संगनमत झाल्याचे दिसते. बाहेरील गुंड कारखान्यात घुसवून कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्याबरोबरच जाणिवपूर्वक कारखान्यामध्ये नासधूस घडवली जाते आणि हे निमित्त साधून आंदोलक कामगारांवर पोलिसी वरवंटा फिरवला जातोयं आणि आंदोलक नेत्यांवर धादांत खोटया गुन्हयांचा बनाव रचून त्यांची जबरदस्तीनं बेकायदा धरपकड केली जाण्याचे फार मोठे षडयंत्र रचले जात आहे (उदा. महापे-नवी मुंबईस्थित ‘सिंडिकेट वायपर सिस्टिम्स्’ कंपनीत अशाच प्रकारे गेली ३२ वर्षे अतिशय सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱया व आजवर एकही पोलिस केस खात्यावर जमा नसलेल्या श्री. राजन राजे यांच्यासारख्या विधायक व सुसंस्कृत नेत्याला देखील खोटया गंभीर आरोपांखाली बेकायदेशीररित्या पोलिस कोठडीत डांबण्यात आले होते – दि.२१जुलै-२०१२). त्याचबरोबर प्रसंगोपात्त काही ठिकाणी अभावाने प्रदीर्घ काळ व्यवस्थापकीय दडपशाहीला तोंड देणाऱया कामगारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होऊन (कूकरमध्ये कोंडली गेलेली वाफ ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ फोडून बाहेर पडावी तसं!) फुटकळ हिंसक घटना घडल्यास, घडलेल्या हिंसक घटनेशी थेट वा अन्योन्य संबंध मुळीच नसलेल्या संबंधित कामगार संघटनांच्या प्रमुख नेत्यांनाच बेधडक गजाआड करण्याचा एक नवाच ‘पोलिसी खाक्या’ या महाराष्ट्रात अलिकडच्या काळात उभा रहाताना दिसतोयं(उदा. नाशिक येथे कामगारांच्या स्वयंस्फुर्त उद्रेकाबद्दल कामगार नेते श्री. कराड यांना पोलिस कोठडीत खोटया आरोपाखाली जबरदस्तीने डांबण्यात आलेले आहे). समस्त कामगार-कर्मचारीवर्गाने सर्वपक्षीय बदमाष राजकारण्यांचे, उद्योगपतींचे आणि नोकरशहांचे हे अत्यंत योजनाबध्द व कुटील असे गुन्हेगारी डावपेच वेळीच ओळखले नाहीत तर,…. यापुढे महाराष्ट्रात कामगार-कर्मचारीवर्गाला अश्रू ढाळायलासुध्दा कोपरा शिल्लक राहणार नाही!
दंगली घडवत किंवा घडवून आणतं, आपापली राजकीय दुकानं चालवणं, हे या देशातील एकूणच राजकीय-व्यवस्थेचं अत्यंत घृणास्पद लक्षण बनलेलं आहे! ऊठसुठ ‘खळ्ळ् फटॅ्क््‘ सारख्या ढोंगी हिंसक आंदोलने करणा-या नेत्यांना वा चिथावणीखोर भडक वक्तव्य करुन पुणे शहरातल़्यासारख्या दंगली घडविणा-या ‘हिंदुत्ववादी‘ नेत्यांना किंवा नुकत्याच घडलेल्या मुंबई-छत्रपती शिवाजी टर्मिनस् परिसरातील भीषण दंगलीच्या प्रकरणात ‘रझा अकादमी‘च्या प्रमुख नेत्यांना (पोलिसांच्याच म्हणण्याप्रमाणे, वरील सगळ्या प्रकरणांमध्ये ध्वनिमुद्रण व चित्रण उपलब्ध असूनही!) अटक करण्याची हिंमत …. ना रा़ज्य सरकारला, ना पोलीस-प्रशासनाला होतं; पण, कामगारांचा कधि नव्हे तो, पोटासाठी-सन्मानासाठी उभा राहू पहाणारा आवाज पुन्हा एकवार कायमचा दडपून टाकण्यासाठी, त्यांच्या निरपराध कामगार नेत्यांना संपविण्याचे उद्योग मात्र बिनधास्त व बिनदिक्कत सुरू आहेत…. आणि त्याबाबत भोंदू ‘हिंदुत्ववाद्यां‘ना आणि तथाकथित ‘महाराष्ट्रवाद्यां‘ना (‘राष्ट्रवाद्यां‘बद्दल तर काय बोला़यचं?) काही सोयरसुतक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!….याचं कारण मित्रांनो, कामगारांमधील राजकीय जागृतिचं साफ संपुष्टात आलीयं, हेच होयं! या दुर्दैवी स्थितीला आपणच जबाबदार आहोत. पाश्चात्य देशात सचोटीचे कामगार नेतेच देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात आणि सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करतात. निदान आता, एवढं आजवर आपलं प्रचंड नुकसान झाल्यानंतर तरी, आम्ही जागे होणार आहोत की, बाहेर वादळ घोंघावत असतानाही शहामृगासारखे वाळूत चोच खूपसून बसणार आहोत?
‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष श्री. राजन राजेंसारखे जाज्वल्य नेते कामगार-कर्मचाऱयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नेमकं जागोजागी काय गर्जून सांगतायतं….ते तर पाहूया!….
सध्याची आपली जीवनशैली पाश्चात्यांची, तंत्रज्ञान व उत्पादनपध्दती पाश्चात्यांची, पायाभूत सुविधा–संपर्क माध्यमं–शिक्षण/आरोग्य/मनोरंजन साधनं पाश्चात्यांची…. जीवनातील सर्वच क्षेत्रांच अशातऱहेनं संपूर्ण पाश्चात्यीकरण झालेलं आहे, मग, फक्त कामगार–कर्मचाऱयांच्याच संदर्भात, हे पाश्चात्यीकरण का होत नाही? तेथील कामगार–कर्मचाऱयांचे उच्च पगारमान–राहणीमान, तेथील कंत्राटी–कामगारपध्दती (ज्यात कंत्राटी कामगाराला कायम कामगारांच्या दुप्पटच काय प्रसंगी चौपट पगार देण्याचे कामगार कायदे तेथे कठोरपणे राबवले जातात), कामगारांसाठी असलेले सामाजिक सुरक्षाव्यवस्थेचे संरक्षक छत्र-Social Security Measures (उदा. घसघशीत बेकारभत्ते, निवृत्तीपश्चात उत्तम दर्जाचं निवृत्तीवेतन, मुलांच्या दर्जेदार शिक्षणाची मोफत वा माफक दरात सरकारतर्फे व्यवस्था, दर्जेदार तहहयात सरकारी कौटुंबिक आरोग्यसेवासुविधा, सरकारी योजनेअंतर्गत माफक भाडेपट्टयाने राहत्या घरांची उपलब्धता इ.)…. याबाबत आमच्या देशातील राजकीय व अर्थव्यवस्था सांभाळणारे धुरिण, म.गांधीजींच्या तीन माकडांसारखे आंधळे, मुके आणि बहिरे का आहेत? रासायनिक शेतीच्या नादी लावून व सरकारी अनुदानांच्या कर्जमाफींच्या चक्रात अडकवून या देशातील छोटया शेतकऱयांना अत्यंत पध्दतशीरपणे शेतीतून उखडून टाकण्यात (De-peasantisation) आलेलं आहे व शहरं–उपनगरांमधून स्वस्त मजूर म्हणून त्यांची शासनव्यवस्थेनं खुबीनं रवानगी केलेली आहे. आपल्या देशात लाखोंनी होणाऱया शेतकऱयांच्या आत्महत्यांबरोबरच शहरं–उपनगरांत असंख्य घरांमधील दांपत्ये, मुलाबाळांसह आपल्या तुटपुंज्या वेतनावर घरखर्च चालवता येत नाही, म्हणून वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याच्या बातम्या, आपण रोजच विविध वर्तमानपत्रांतून वाचत असतो. केवळ एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या गंभीर स्वरूपाच्या आजारपणाचा खाजगी आरोग्यसुविधेचा खर्च ‘न’ झेपल्यामुळे, दरवर्षी या देशातील ३ते४ कोटी जनता दारिद्रयरेषेखाली ढकलली जाते. कुटुंबातल्या एखाद्या मुलाचा देखील व्यावसायिक वा तंत्र–वैद्यक अभ्यासक्रमाचा एका वर्षाचा खर्च, पालकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या काही पटींपेक्षा जास्त असतो. कुटुंबातल्या एका कर्त्या पुरूषाच्या वा महिलेच्या एका पगारावर समाधानानं घर चालण्याचे दिवस कधिचेचं सरले; त्यामुळे अनेक प्रसंगी घरातल्या स्त्रीला घरखर्च भागविण्यासाठी वा जीवनस्तर टिकविण्यासाठी जबरदस्तीने नोकरीधंद्यासाठी बाहेर पडावं लागण्याची उदाहरणे लाखो नव्हे, करोडो घरांमध्ये आढळतील. त्यातच भरीस भर म्हणून राजकारणीच बिल्डर बनल्यामुळे त्यांनी भ्रष्ट नोकरशहांच्या संगनमतानं राहत्या घरांच्या किंमती नफेखोरी करून एवढया भरमसाठ वाढवून ठेवल्या आहेत की, त्यासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना राहतं घर खरेदी करण्यासाठी ३०० ते ४०० मासिक पगार लागतात….ही सर्वच परिस्थिती अत्यंत चिंताजनक, म्हणूनच विस्फोटक आहे!
एकूणच आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान घटनाकाराला अभिप्रेत असलेली खरीखुरी लोकशाही मुळात अस्तित्वातच नसून निःसत्व व अज्ञानी गोरगरीबांची मते निवडणूकीच्या काळात ‘मतविक्री–केंद्रां’मार्फत जागोजागी बोली लावत विकत घेतली जाऊन, एकप्रकारची नवी ‘कंपनी–सरकार व्यवस्था’च (Corporate-State) केवळ या देशात निर्माण झालेली नसून, या भारत नावाच्या राष्ट्राची ‘व्हँम्पायर–स्टेट’ (रक्तपिपासूंच राज्य) या हिडीस संकल्पनेत रूपांतरण झालेलं आहे…की, ज्यात “एखाद्या देशातील मूठभर सत्ताधीश व अभिजनवर्ग, त्या देशातील सर्व संपत्ती व संसाधनांची शोषणाच्या माध्यमातून मनसोक्त लयलूट करतो!”
मित्रहो, या देशात (विशेषतः महाराष्ट्रात) राजकारण्यांच्या, उद्योगपतींच्या आणि खाजगी व सरकारी अधिकाऱयांच्या (उदा. I.P.S., I.A.S. इ.) राक्षसी ‘अहंकाराने’ अक्षरशः धूमाकूळ घातलेला आहे. ही मंडळी स्वतःला ब्रम्हा-विष्णू-महेश समजायला लागलेली आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची ‘भिक नको, पण कुत्रं आवर’ अशी केविलवाणी अवस्था झालेली आहे! या ‘बॉस्-कल्चर’ला आम जनतेनं छाती पुढे काढून ‘बस्स्’ म्हणण्याची वेळ आलेली आहे… त्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’सारख्या १००% जनहितवादी राजकीय विचारधारेची कांस धरून या देशात, निवडणूकीतून मतपेटीव्दारे ‘राज्यक्रांती’ घडवावीच लागेल! आपल्या देशातील राजकारणी, संपत्ती निर्मितीचा ‘दावा’ करणारे (पण संपत्ती-वाटपाच्या बाबतीत पाठ फिरवणारे!) उद्योगपती, नोकरशहा व त्यांची दलाली करत साथ देणारी बुध्दिमंत बाळं… ही या देशात सामाजिक व आर्थिक समता व समरसता निर्माण करण्याच्या मार्गातील प्रमुख ‘धोंड’ आहेत. देशात निर्मित झालेल्या संपत्ती वाटपाच्याबाबतीत जो ‘झिरप-सिध्दांत’ (Percolation OR Trickled Down Theory) मांडला जातो; तो पूर्णतः असफल ठरण्यामागे वरील मंडळी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. समाजाच्या खालच्यास्तरातील लोकांपर्यंत, आपल्या देशात गेल्या १५-२०वर्षांमध्ये निर्माण झालेल्या संपत्तीची अफाट मोठी ‘गंगा’ (जेवढी संपत्ती या अगोदरच्या १५०ते२००वर्षांत कधि निर्माण झालेली नव्हती!) पोहचू ‘न’ देणाऱया, वर उल्लेखिलेल्या ‘शुक्राचाऱर्यां’चे आर्थिक हितसंबध्ंाचे व अहंकारांचे ‘झारीतील डोळे’ तुम्हाला फोडावेच लागतील! नाहीतर जे निळे, पिवळे, भगवे, हिरवे झेंडे आपल्या वाकलेल्या खांद्यावर घेऊन जे तुम्ही नाचताय ना…. त्याच झेंडयांची विविध रंगी कापडं देखील तुमच्या उघडया पडलेल्या लज्जेला सावरू शकणार नाहीत! लक्षात घ्या, या झेंडयांच्या कापडांचा ‘धागा’ कुठेतरी समान गुणधर्माचा आहे(सर्वसामान्यांचा ‘विकास’ नव्हे, तर विकासाच्या नावाखाली त्यांना ‘भकास’ करणारा आहे!)….फरक फक्त रंगसंगतीचा आहे!…. या ‘धाग्या’नचं तुम्हाला पुरतं ‘गुंडाळलेलं’ आहे…. त्यानचं तुमची केवळ फसवणूकच नव्हे, तर पुरती कोंडी झालेली आहे!!! या कोंडीचा ‘चक्रव्यूह’ तुमचा तुम्हालाच फोडावा लागेल, त्यासाठी कोण कुठला ‘अभिमन्यू’ वा ‘अर्जुन’ बाहेरून येण्याची सुतराम शक्यता नाही. तो तुमच्यातच निर्माण व्हायला हवा; पण, त्यासाठी वेगळा विचार हवा!… वेगळी राजकीय जागृती हवी, जी यापूर्वी या देशानं कधिही पाहिली नसेल! देशात फैलावलेला विषमतेचा, भ्रष्टाचाराचा, पर्यावरणीय विनाशाचा आणि लोकसंख्येच्या विस्फोटाचा विषवृक्ष; त्याच्या मुळालाच हात घालून तुम्हालाच उखडून फेकून द्यावा लागेल!!
अरे, महाराष्ट्रातल्या मराठी गडया, तुला गृहित धरलं जातयं…. कुत्र्यासमोर भाकरीचे तुकडे फेकले… हाडकं फेकली की, फेकणारा कोण आहे… हे ‘न’ बघता-‘न’ परखता धावत सुटणाऱया श्वानांच्या योनीतले आपण आहोत का? मराठयांकडे प्रामुख्यानं एक गुण होता, तो म्हणजे त्याची ‘नैतिकता’! ती सुध्दा आपण गमावत चाललोयं की, काय? अरे, गमावतोय कसली… या बदमाष राजकारण्यांनी फुकट वहयापुस्तके-दप्तरे, फुकट बॅट-बॉल, फुकटच्या हळदीकुंकवाच्या भेटी, फुकटे सणउत्सव-खेळ महोत्सव यांच्या नादी लावून तरूण पिढयापिढयांना नासवून कर्तृत्वशून्य व गुलाम बनवून टाकले आहे, ….ते केवळ त्यांच्या मतांच्या आणि सत्तेच्या बेगमीसाठी! आम्ही उंचच उंच दहीहंडीचे थर लावण्याची स्पर्धा करून आमचे हातपाय मोडून घेतोय-जीवाला मुकतोयं आणि या राजकारण्यांचा मात्र छान खेळ होतोयं. पूर्वी ग्रीसमध्ये अशाचतऱहेनं सत्ताधारी, आपल्याकडे कोंबडयांच्या झुंजी लावतात तशा, ‘गुलामांच्या झुंजी’ लाऊन मजा बघत बसायचे…. एका गुलाम ‘स्पार्टाकस’नं बंड करून ही अमानुष प्रथा बंद पाडली. पण आमच्या जिवघेण्या दहीहंडयांचं काय करायचं, ते ही बाबांनो तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल. एका बाजूला सार्वजनिक गणेशोत्सवातल्या गणेशमूर्तिंची, विविध मंडळांच्या आपापसातील स्पर्धेमुळे उंची वाढत चाललीयं, तर दुसऱया बाजूला महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसांची सामाजिक, आर्थिक व राजकीय उंची मात्र दिवसेंदिवस घटत चालल्याचे दुर्दैवी चित्र दिसतेयं!
मराठी माणसाच्या नावाने गळे काढणाऱया जुन्या आणि नव्या पक्षांनी ‘लोकजीवना’ ऐवजी ‘लोकभावने’चचं राजकारण करून, तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायचे आपले उद्योग, आजही तसेच सुरू ठेवलेत. मराठी हळव्या व दुखऱया नसेवर अचूक बोट ठेवत, या ढोंगी मराठी नेत्यांनी निर्माण केलेली ‘व्होट-बंक’, कधि ‘नोट-बँके’त परावर्तित झाली…. ते भोळयाभाबडया मराठी जनतेला कळलंसुध्दा नाही! तर दुसरीकडे, मोठयाप्रमाणावर अर्धशिक्षित बहुजनसमाज उद्योग व सेवाक्षेत्रात, ‘कंत्राटी-कामगार’ पध्दतीतील गुलामगिरीचे व नवअस्पृश्यतेचे लाजिरवाणे जीवन जगत असताना दलित चळवळ केवळ आरक्षण, नामांतर आणि स्मारकं उभारणीच्या खुंटीलाच बांधलेली दिसते, हे देशातील पददलित समाजाचे फार मोठे दुर्दैव आहे! बहुतांश दलित पुढारी देशातील ‘सिस्टीम’चे उघडउघड दलाल बनलेले दिसतायतं. तेव्हा या देशातील दलित जनतेनं ‘सिस्टीम’ म्हणजे काय हे नीट समजून आणि तपासून घेतले पाहिजे. सद्यस्थितीत आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य संकल्पना’ मोडीत काढून निर्माण करण्यात आलेली ‘कंपनी-सरकार’ व्यवस्था, ज्याला आपण ‘सिस्टीम’ म्हणून संबोधतो, ती ‘सिस्टीम’ म्हणजे पांढरपेशा बुध्दिजिवी चोर-दरोडेखोरांची ‘टीम’ बनलेली आहे…. ती अण्णा हजारेंची ‘टीम’ नव्हे!
आम्ही जेव्हा ‘जय भीम’… ‘जय भवानी’…‘जय शिवाजी’ वगैरे म्हणत असतो; तेव्हा आम्हा मराठी तरूणांना पूर्ण कल्पना असते की, आम्ही आमचीचं फसवणूक करून घेत असतो… बाबासाहेब आणि शिवछत्रपतींशी आमची ‘नाळ’ केव्हाच तुटलेली आहे. आमच्याच नादानपणामुळे, आम्ही ‘सिस्टीम’च्या हातून आमच्या मराठी ‘सत्वा’ची आणि ‘स्वत्वा’ची ‘नसबंदी’ करून घेतलीयं!… आता काही चांगलं ‘प्रसवण्या’च्या क्षमतेतच आम्ही राहीलेलो नाही, ही फार मोठी मराठी सर्वसामान्य तरूणाईची शोकांतिका आहे!! ती रोखण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’चा जन्म झालेला आहे!!!
या देशात ‘गरीबीची रेषा’ आहे पण, घटनादुरूस्तीव्दारे आपल्या राज्यघटनेत ‘समाजवादी’ तत्त्व अंतर्भूत केलेले असूनही ‘श्रीमंतीच्या मर्यादा रेषे’चा मात्र कुठे थांगपत्ता नाही! या देशातील गरीबीचा लेखाजोखा कॉम्प्युटरमध्ये ‘फिड्’ करून ‘गरीबीच्या रेषे’चा ‘प्रिंट-आऊट्’ काढला जातो; तो देखील तद्दन खोटा असतो! स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६५वर्षांनतर देखील देशाला जडलेल्या अठराविश्व दारिद्रयाच्या ‘कॅन्सर’मागचं कारण, केवळ देशाची अफाट लोकसंख्या हेच एकमेव नसून, त्यामागील अनेक कारणांचा शोध आणि बोध आपण कधि घेणार आहोत व त्याचा समूळ नायनाट करणार आहोत; हाच मोठा यक्षप्रश्न आहे!… आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने श्री. अनिल बोकिल यांची ‘अर्थ-क्रांति’ संकल्पना, ‘टीम-अण्णां’चे भ्रष्टाचार विरोधी जन-लोकपाल विधेयक, उद्योग व सेवाक्षेत्रातील प्रचलित गुलामी कंत्राटी-कामगारप्रथेचं (Contract-Labour) निर्मूलन, लोकसंख्या विस्फोटाला तत्काळ आळा घालण्यासाठी मूलगामी उपाययोजना, पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत हानिकारक अशा अणुऊर्जा व औष्णिकऊर्जा प्रकल्पांना विरोध करून पर्यावरण संरक्षणाला अनुकूल अशा जीवनशैलीचा आग्रह; अशातऱहेच्या अनेक मूलभूत मुद्यांना हात घालून आपल्या देशात सनदशीर मार्गाने ‘क्रांतिकार्य’ करण्याचा संकल्प सोडलेला आहे, हे लक्षात घ्याल….. तो दिवस केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर समस्त भारतवर्षासाठी सोनियाचा दिवस ठरेल !!!
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)