“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला अंगठीत कोंडून टाकणं होय! ..तो राष्ट्रीय नव्हे, तर, आंतरराष्ट्रीय’ असा एकमेव ग्रंथ आहे की, ज्यात कळीकाळाला पुरुन उरणा-या अशा, अखिल मानवजातीच्या कल्याणाच्या तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे.

राम आणि कृष्ण या भरतदेशात होऊन गेले अथवा नाही…..या, डाव्या विचारसरणीच्या पढतमूर्खानी वा जहाल ‘अपरिवर्तनवादी’ मानसिकता असणा-या परिवर्तनवाद्यांनी घातलेल्या वादा’ पेक्षाही या देशाचं मोठं दुर्दैव हे आहे की, “भगवदगीते”च्या बिलोरी तत्वज्ञानाचा आरसा समोर उभा ठाकला असूनही, त्यात दिसणारे आमचे मलिन चेहरे आम्ही साफसूफ करुन घ्यायला अजुनही तयार नाही….ही, मनोवृत्ती केवळ ‘कोती’च नव्हे, तर, अत्यंत घातकी आहे आणि म्हणूनच आजची देशाची व जगाची ही अवनत अवस्था आहे पर्यावरणीय महासंकटांची अखिल सजीवसृष्टीच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जोपर्यंत, माणसांच्या धमन्यांतून लाल रक्त खेळतयं….. मज्जातंतूमधून विद्युतभारित संवेदना सदैव वहातायतं; तोपर्यंत, समृद्धीची आधुनिक परिमाणं ( दरडोई तेल-वायू, सिमेंट, पोलाद, ऊर्जेचा खप वा राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या वाढीचा निर्देशांक इ.), मानवी मनाला शाश्वत व जैविक अशी सुखशांति कधिही देऊ शकणार नाहीत. आजवर, भौतिक समृद्धीच्या बरोबरीनं त्यांनी काही दिलं असेल तर, ती अहोरात्र छळणारी मानसिक अशांतता-बेचैनी…. व कधिही आणि कशानीही ‘न’ मिटणारी कर लो दुनिया मुट्ठी में’ अशी सर्वांना जाळू पाहणारी अखंड वखवख त्यादृष्टीनंही आणि शिवाय, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः अशी, जगण्याची अनवट कला म्हणून, गीतेचं महत्त्व अपरंपार आहे.

दुर्दैव या देशाचं पुढे चालूच आहे की, जे ही भगवतगीतेच्या महतीची पोपटपंची करतायतं, तेच बेगडी व ढोंगी हिंदुत्ववादी सर्वांत मोठे, गीतेच्या तत्वज्ञानाचे मारेकरी आहेत….. हिंदुत्व काय किंवा भगवतगीता काय….. यासारख्या गोष्टींना राजकारणाच्या बाजारात उभे करुन (सांप्रत संदर्भ… जम्मू-काश्मीरची निवडणूक) आपली दुकानदारी चालवणारी माणसं, बेगडी हिंदुत्वाचा आणि भगवतगीतेचा ठरव पुरस्कार करतात….. तेव्हा, काळजाचा ठोका चुकतो! कारण, इथली जनता ब-यापैकी भोळसट आहे, मायावी भाषेला आणि भाषणांना सहजी भुलून बळी पडणारी आहे. म्हणून तर, “माँ गंगाने मुझे बुलाया है…. असे नौटंकी बासरीचे सूर काढले की, वारासणीच्या पात्रातल्या पाण्यात दिवे पेटायला लागतात. भारतीय तत्वज्ञानाचं प्रतिक असलेलं कमळ, अंमळ आपलं नैसर्गिक निवासस्थान बदलून उद्योगपती व्यापा-यांनी लावलेल्या पंचवीस-तीस हजार कोटींच्या बोली ला स्मरुन दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर फुलायला लागतं आणि आपलं मूळ आध्यात्मिक स्वरुप विसरुन, काळ्या पैशांच्या राशी जशा, बोली लावणा-या उद्योगपती-व्यापा-यांच्या स्विस बँकेच्या तिजो-यांत जमा होतात, अगदी तसचं आधुनिक कमळ, सत्तालोलुपांच्या गल्लाभरु व बाजारु मतपेटी’त अलगद बंदिस्त होतं !!!

अजून भगवतगीते च्या दुर्दैवाचा पुढचा पाढा संपलेला नाहीच….. एक असा अमोघ ग्रंथ आ भारतीयांच्या भाग्यरेषेत असूनही आम्ही करंटे, त्यापासून वंचित राहण्यात काही वावगं आहे. असं समजत नाही…. एवढचं नव्हे, तर हे असलं हिरण्यगर्भासारखं तेजस्वी विचारधन आमच्या शिवारात नांदत असूनही, आध्यात्मिक विचारांचं आदानप्रदान होण्यासाठी, आम्हाला लाखोंचे कळप बाळगणारे आधुनिक संतमहंत लागतात…आम्ही, उन्हातान्हात-पावसापाण्यात वाटेल तेवढ्या हालअपेष्टा सोसून वर्षानुवर्षे या ‘सत्संगांना वा संतसमागमांना न चुकता हजेरी लावतो…. आम्हाला आमच्या जगण्याच्या सन्मानाचा संदर्भ पुसून टाकणा-या…. जगण्याचा आस कुरतडून टाकणा-या प्रश्नांपासून दूर पळण्यात धन्यता वाटते…. वाटत राहते. कुठला तरी अवतार’, या “छळणा-या जगण्या पासून आमची सुटका करुन, अमन सुखसमाधान व शांति प्रदान करणार आहे, ही आमची मनोधारणा व्यवस्थेनं पक्की केलेली असते. पण कुठेतरी, राजकारणाची दुकानदारी करणारे मौजूदा राजकारणी आणि असले भक्तजनांचे ‘कळप’ बाळगणारे तथाकथित संतमहंत, यांची आतून छुपी व्यवस्थात्मक युती असते. ती आम्हा बापड्यांच्या नजरेस कधि पडत नाही आणि पडलीचं तरी त्यानं काही आमच्या विचारात फरक पडत नाही….

अशी, ही वैचारिक संभ्रमता व गुलामगिरी भरतवर्षात एकाचवेळी नांदतेय… कारण आपणं, भगवतगीता आणि श्रीकृष्ण समजून न घेताच “भगवतगीता राष्ट्रीय प्रमाणग्रंथ व्हावा की, न व्हावा”, या वादात केव्हाच उडी घेतलेली असते !!!

राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)