ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे).

एकूणच विरोधकांच्या वैयक्तिक-जीवनाधारित ‘ब्लॅकमेलिंग’ची सगळी नौटंकी, हा सगळा निशिकांत दुबेकृत थयथयाट… अत्यंत घृणास्पद अशा आयटी-सेलवाल्या ‘भाजपाई-संस्कृती’ला (विशेषतः ‘गुजराथी-लाॅबी’च्या संस्कृतीला) धरुनच आहे…आठवा, संघाच्याच ‘संजय जोशीं’चं आणि पाटीदार-आरक्षण आंदोलनातल्या हार्दिक पटेलचं सीडी-प्रकरण (त्यातल्या, संजय जोशींच्या सीडी तर, चक्क बनावट असल्याचं पुढे सिद्ध झालं होतं). दिल्लीतील महिला-पहेलवानांचं आंदोलन ते महुआ मोईत्रा; व्हाया, मणिपूर आदिवासी महिलांवरील अत्याचार… अशी, ‘महिला-सक्षमीकरणा’ची भाजपाची बेगडी-बनावट भूमिका भारतीय जनतेसमोर एव्हाना पूर्णपणे उघडी पडलेली आहे. उद्या भाजपातील कुणी स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, नवनीत राणा, कंगना राणावत यांपैकी कोणी महिला-नेतेमंडळी ‘बगावत’ करतील….तर, भाजपा आयटी-सेलवाले, त्यांनाही त्यांच्या खाजगी-जीवनावरुन ‘ब्लॅकमेल’ करायला कमी करणार नाहीत… एवढ्या खालच्या थराला भाजपाई-नितीमत्ता गेलेली आहे.

आम्हाला महुआ मोईत्रा, खाजगी जीवनात काय करतेय (जोपर्यंत त्या खाजगी-जीवनाचा, तिच्या सार्वजनिक जीवनावर वाईट परिणाम होत नाही), याच्याशी काहीही देणंघेणं नाही… एवढंच काय, अदानीच्या संदर्भात ती कुठल्या परिस्थितीत किंवा कुणाच्या पाठबळावर प्रश्न विचारतेय, यांच्याशीही आम्हाला बिलकूल देणंघेणं नाही. मुख्य मुद्दा, तिने विचारलेल्या प्रश्नांवर आणि केलेल्या आरोपांवर… निःपक्षपाती सखोल चौकशी होणार का आणि त्याचे निष्कर्ष जनतेला पारदर्शकपणे कळणार का व महुआ मोईत्रांचे आरोप सत्य असतील; तर, त्यासंदर्भात अदानीवर कायदेशीर कारवाई होणार का, एवढाच भारतीय जनतेपुरता मर्यादित आहे.

त्यामुळेच, “माझी चौकशी होण्याआधी गौतम अदानीची चौकशी ईडी/सीबीआय/आयटीने करावी, एवढंच म्हणून थांबू नका, महुआ मोईत्राजी…अदानीच्या खास आतल्या वर्तुळातल्या तमाम ‘लाभार्थी’ राजकीय नेत्यांचीही सखोल चौकशी करावी”, अशीही मागणी करा!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)