केवळ साडेतीन लाख मूळ नागरिक व २३ लाखाच्या आसपास देशाबाहेरचे स्थलांतरित मजूर (त्यातले १० लाख भारतीय, अर्थातच प्रामुख्याने केरळी)…अशा, अंगाने अगदीच किरकोळ असलेल्या, एका कतार नावाच्या देशाने, भारतासारख्या खंडप्राय देशाला एकदा नव्हे; दोनदा फटकारत, आपल्या देशाची आणि देशाच्या तथाकथित ‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”???
…पहिल्यांदा भाजपाच्या नुपूर शर्मा-नवीन जिंदालकृत प्रेषित महंमद पैगंबरांच्या अवमान प्रकरणी आणि आता दुसर्यांदा, आठ भारतीय माजी नौसैनिकांना, इस्त्रायल देशासाठी हेरगिरी केल्याप्रकरणी, बेधडक फाशीची सजा कतारी-न्यायालयातर्फे फर्मावली जाण्यामुळे!
…शक्य आहे की, कतारी-बादशहाकडे नाक घासून (एकतर, २०२४ची लोकसभा-निवडणूक आणि दुसरं म्हणजे, त्यातील ‘पूर्णेंदू तिवारी’ हा ‘भोपाली’ असल्याने, मध्यप्रदेशची निवडणूक तोंडावर असताना तोंडावर आपटायला नको म्हणून, केवळ) या आठ माजी नौसेना अधिकाऱ्यांना सोडवले जाऊही शकेल… पण, “बूँद से गयी, वो हौद से नहीं आती” उक्तिप्रमाणे, ‘गोदी-मिडीया’तून फुकटचा फुगवला गेलेला ‘विश्वगुरुपदा’चा फुगा (विशेषतः, G20 च्या काळात), आता फट्ट फुटल्यागत झालाय!
जेव्हा, घरातल्या कारभार्याला घरात कुणी विचारत नाही… तेव्हा, बाहेर आपली कशी ‘वट’ आहे, हे तो कारभारी आणि त्याने पोसलेले त्याचे चमचे, छत्रपतींच्या तेराव्या वंशजांसारखे ‘काॅलर-टाईट’ करुन, गावभर हिंडत सांगत सुटतात… त्यातलाच, हा केविलवाणा प्रकार म्हणायचा.
हा सगळा प्रकार तब्बल गेले १४ महिने सुरु असूनही, ‘गोदी-मिडीया’ने आणि भारतीय परराष्ट्र खात्याने त्याची फारशी दखल घेतली नाही (त्याकाळात, आपलं सरकार ईडीच्या धाडी टाकून विरोधी पक्ष आमदार फोडाफोडीत आणि BBC सारख्या वाहिन्यांवर धाडी टाकण्यात मग्न होतं आणि कतारमध्ये तब्बल तीन महिने भारतीय राजदूत नेमला गेला नव्हता) आणि आज या थराला या गोष्टी गेल्यात की, ज्यामुळे भारतीय परराष्ट्रनीतिचा पोकळ डोलारा, जगासमोर साफ कोसळून पडलाय.
** जिथे चीनच्या तुलनेत भारतीय सैनिक मोठ्याप्रमाणावर शहीद झाले, त्या भूतान-चीन-सिक्कीम सीमेवरील ‘डोकलाम’ बद्दल, आम्ही आता ब्र देखील काढत नाही (ते आपल्या हातून चिन्यांनी हिसकावून घेऊन, तिथे रेल्वेमार्गासह गावच वसवलंय) आणि आता, लडाख-अक्साईचीन सीमेवरील ‘गलवान’ भोवती चीन, आपला गळा आवळत चाललाय.
** भूतानला एकदा का ‘डोकलाम’सारख्या ठिकाणाहून रेल्वेमार्गे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा (ज्यावर, तो देश आजपर्यंत पूर्णपणे भारतावर अवलंबून होता) चीनने सुरु केला की, आपल्या पारंपारिक मित्र भूतानचा ‘अवतार’ कसा बदलेल, तो पहाच. आजच, ज्या भूतान देशाच्या भूमिचं आपल्या पंतप्रधानांनी ‘चुंबन’ घेतलं होतं… तो देश, चीनशी चुंबाचुंबी करण्यात गर्क आहे आणि तिचं गत नेपाळची देखील.
** जगातलं कालपरवापर्यंतचं एकमेव ‘हिंदू-राष्ट्र’ म्हणून भाजपा-संघीय लोकं ज्याला गौरवत आलेत आणि जो त्यांच्या काल्पनिक (जे त्यांच्या सहस्त्र जन्मात सत्यात उतरणे शक्यच नाही, हे ते स्वतः चांगलंच जाणून असावेत… पण, मुसोलिनीसारखं ख्रिस्तपूर्व रोमन-साम्राज्याच्या विस्ताराचा दाखला देऊन ‘ग्रेटर इटली किंवा अखंड इटली’सारख्या ‘अखंड हिंदू-राष्ट्रा’च्या मोठमोठ्या बाता मारायला कोणाचं काय जातं?) ‘हिंदू-राष्ट्रा’चा अविभाज्य भाग आहे… तो नेपाळ देशही, आता तुमच्याकडे गुरकावून बघतोय आणि चीनशी घनिष्ट मैत्री करतोय.
** चीन तर, आपला कायमचा शत्रूच; पण, इंदिराजी पंतप्रधान असताना बांगलादेश निर्मितीच्या संकटकाळात आपल्या पाठिशी उभा राहून पाकिस्तानच्या मदतीला आलेल्या अमेरिकेच्या सातव्या आरमाराला रोखणारा आणि आपल्याशी २५ वर्षांचा मैत्री-करार करणारा रशियादेखील (तत्कालीन, सोव्हिएत युनियन) आता, पाकिस्तानसोबत सैन्याच्या कवायती करायला लागलाय.
** पाकिस्तानचं सोडाच… पण बांगला देश, श्रीलंका म्यानमार या सख्ख्या शेजार्यांची चीनशी एवढी घसट वाढलीय की, ते तुमच्याशी एकदम फटकून वागू लागलेत.
** ना आम्ही रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी काडीमात्र योगदान देऊ शकत… ना इस्त्रायल-हमास संघर्षात कुठली ठाम भूमिका बजावून युद्धविराम घडवू शकत; तरीही, आम्ही ‘गोदी-मिडीया’कडून मिळवलेल्या बोगस प्रमाणपत्राने (तसंही आपल्याकडे बड्या राज्यकर्त्यांच्या शैक्षणिक पदव्या बोगसच असतात, त्यातलाच प्रकार) गेल्या नऊदहा वर्षांत ‘हिंदू-राष्ट्र’ घडवता घडवता, एकदम थेट हनुमान-उडी मारुन ‘विश्वगुरु’च बनलोय. या सगळ्या, ‘भाजपा-आयटी सेल’मधल्या मर्कटांच्या व गुजराथमधली जी लोकं बाहेरच्या देशांमध्ये गेलीत (प्रामुख्याने अमेरिकेत) त्यांच्या पुढाकाराने चाललेल्या लज्जास्पद प्रकाराला काय म्हणावं? आणि, जगात आपलं हसं तरी किती व्हावं (एका विश्वासार्ह अमेरिकन सर्वेक्षणात ‘स्वयंकेंद्रित जीणं जगणाऱ्या’ अमेरिकनांना पैकी ५६% लोकांना नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान आहेत, हेच ठाऊक नसल्याचं उघड झालंय)??
तेव्हा कृपया, रवीश कुमार आणि दीपक शर्मा यांचे वरील व्हिडीओ पाहण्याची तसदी घेऊन, सत्यस्थिती पूर्णतया जाणून घ्यावी, ही ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे वाचकांना नम्र विनंती!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
https://youtu.be/hq1HYpwJS3o?si=4iIn_yMP_hMAnzfw
https://youtu.be/G4hHyI6hazw?si=mQ6qsU0BPTkZTIsF