नववर्षांचे स्वागत आणि संदेश……

नेमेचि येणारा पावसाळा, ‘नेमेचि’ बरसायचं हल्ली विसरलायं….. तरीही, कॅलेंडरची पानं मात्र, अगदी नियमितपणे उलगडली जात रहातात…. तशातच, ३१ डिसेंबरची रात्र येते, तिचं मुळी ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरनुसार आंग्ल नूतन-वर्षाचा सांगावा घेऊन. खरंतरं, आपलं मराठमोळं वर्ष चैत्र शुद्ध-प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढीपाडव्या’ला सुरु होतं…. जेव्हा, निसर्गाचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा शुभारंभ होणं अपेक्षित आहे…. गारठून गेलेली अवघि सृष्टी त्या वासंतिक मायेच्या ऊबेनं चैतन्न्यानं चोहोबाजुंनी रसरसून उठणार असते ! असं असलं तरीही, ही दोन्ही वर्षे तसा निसर्गाशी फारसा ताळमेळ राखू शकलेली नाहीत. यातल्या आंग्ल वर्षाचा ‘दोष’ अंगभूत आहे (म्हणूनच, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारतर्फे १९५२ साली ‘ मेघनाद साहा समिती’ स्थापन केली जाऊन, तिनं एक अत्यंत शास्त्रशुद्ध अशा ‘सौरवर्षा’च्या कॅलेंडरची मांडणी केली होती… जिचा, आपण खरं म्हणजे अंगिकार करायला हवा); तर, मराठमोळ्या वर्षाची निसर्गाशी… निसर्गातल्या ‘वसंता’शी नाळ सुटलेली आहे (गुढीपाडव्याच्या बर्‍याच आधी ‘वसंतऋतू’चं आगमन झालेलं असतं), ती प्रदीर्घ कालपरत्वे पृथ्वीच्या परिवलनामुळे (आपल्या पृथ्वीला एकाचवेळेस अनेक प्रकारच्या ‘गति’ आहेत) आणि शिवाय पूर्वीचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा…. वर्ष-प्रारंभाचा आधार, हा महाराष्ट्रापेक्षाही अधिक ‘उत्तर भारत सापेक्ष’ होता. राम-कृष्ण प्रभृती मंडळी उत्तर भारतातीलच. भगवतगीतेतसुद्धा तो स्थलकालसापेक्ष फरक आल्याचा परिणाम म्हणून “मासानाम् मार्गशीर्षोहम्’ असा श्रीकृष्णाच्या तोंडून उल्लेख केला गेलेला आहे (जेव्हा, सध्या मात्र मार्गशीर्षात हवामान वसंताच्या चाहूलीनं ऊबदार असण्याऐवजी, गारठून गेलेलं असं ‘शिशिर-ऋतू’चं असतं).

तरीसुद्धा, नववर्षांचे स्वागत हे व्हायलाच हवं आणि, त्यानिमित्ताने ‘संदेश’ म्हणून काही कार्यकर्त्यांना व वाचकांना हवचं असेल तर, लेखणी उचललीच पाहिजे.

मित्रहो, या नववर्षाच्या प्रारंभीच आपण हे ध्यानात घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे की, ‘निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणा’संदर्भात आपली घड्याळातील काट्यांशी ‘काँटे की टक्कर’ सुरु झालेली आहे (हा संदेश लिहीतं असतानाच….. महाराष्ट्रातल्या ‘माळढोक’ अभयारण्याचं १२२९ चौ. कि. मी. क्षेत्र दोन तृतीयांश कमी करुन केवळ ४०० चौ. कि. मी. करण्याचा, उद्योगपती-व्यापार्‍यांच्या आर्थिक हितासाठी भारतातील उरल्यासुरल्या जंगलांच्या जीवावर उठलेल्या, नरेंद्र मोदींच्या ‘खास’ मर्जीतल्या अशा “होयबा” केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं वृत्त येऊन थडकलयं….. यापुढे, अफाट गतीने वाढत्या अज्ञानी लोकसंख्येसाठी आणि पाशवी ‘विकासा’साठी, कुठल्या ना कुठल्या सबबींखाली, जेमतेम ‘तग’ धरुन राहिलेली जंगलं उध्वस्त होत रहातील….. वस्तुस्थिती एवढीच आहे की, आज आपणं सारे ‘सुपा’त आहोत तर, जंगलं ‘जात्या’त ! )…….

प्रश्न केवळ ‘मानवी-शोषणा’पुरता गेल्या काही दशकांपर्यंत मर्यादित होता; तोपर्यंत, परिस्थिती आपल्या बर्‍यापैकी नियंत्रणात होती, असं म्हणायला हरकत नाही. एखादा कार्ल मार्क्स, मोहनदास गांधी, बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया…. ‘एकहाती’ किंवा परिस्थितीवशात निर्माण होणार्‍या सामाजिक-राजकीय चळवळी, त्या प्राप्तपरिस्थितीत मोठा बदल कधिही घडवू शकले असते…. पण, जिथे आपण निसर्गालाच वेठीला धरत, त्याच्याशी जणू ‘ब्रह्मा, विष्णू, महेश’ बनत, आत्मघातकी ‘द्यूत’ खेळू पहातोयं, तेव्हा खचितच परिस्थिती झपाट्यानं पूर्णतः मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ लागलीयं. सध्या आपण, निसर्गदत्त जबाबदाऱ्या टाकून देणारे (केवळ, टाळणारे नव्हे !) वरपांगी ‘निसर्गप्रेमी’, म्हणजेच निसर्गापासून तुटून वेगळे काही बनलेलो आहोत. असे हे आम्ही, तथाकथित ‘निसर्गप्रेमी’ सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्यमवर्गीय पालक जेव्हा आपलं, आपल्या मुलाबाळांवर…. भातवंडावर…. नातवंडांवर खूप प्रेम आहे, वगैरे म्हणतो…. तेव्हा, ते सगळं थोतांड असतं… शंभर टक्के ‘भाकड’ असतं ! आमचं फक्त “आमच्या जगण्यावर” प्रेम आहे….. पुढच्या पिढ्यापिढ्यांवरील आमचं कथित प्रेम वा आस्था, ही ‘वास्तविकता’ नसून, फक्त एक आभासी ‘व्हर्च्युअल रियॅलिटी’ आहे. आम्ही त्यांच्यासाठी गडगंज संपत्ती …. प्राॅपर्ट्यांचे इमले मागे ठेऊ पहातोयं; पण, कुठली हवा, कुठलं हवामान, कुठलं पाणी-अन्न, जमीन-जंगलांसारखी जगण्याची मुलभूत संसाधनं मागे ठेऊन जातोयं… याचा आम्ही पळभर थांबून, साधा विचार करायलाही तयार नाही.

हे सर्व घडण्याचं प्रमुख कारण म्हणजे, आपण “जगण्यात खराखुरा ‘आधुनिक शास्त्रीय-दृष्टिकोन’ आणण्याऐवजी, आधुनिक शास्त्रात आपला जगण्याचा संकुचित, स्वार्थी व चंगळवादी दृष्टिकोन घुसडलेला आहे, हे होय !” निसर्ग स्वयंभू स्वरुपात आपल्याला सातत्याने शास्त्रीय इशारे देत रहातो…. आपण त्याकडे कानाडोळा करणं पसंद करतो; कारण, त्यापाठीमागे, “कर लो दुनिया मुठ्ठी में”, हा भोगवादी जगण्याचा ‘न’ संपणारा हव्यास आणि त्यातून उदभवणारी जीवघेणी स्पर्धा आहे. म्हणूनच, आपला ‘महात्मा’ जे बोलून गेला की, “Mother earth can satisfy everybody’s need, but not the greed of a single individual “, त्याचं गांभीर्यानं या नववर्षप्रारंभी मनन-चिंतन व्हायलाचं हवं. काही हाताच्या बोटांवर मोजता येऊ शकणार्‍या पिढ्यांनी औद्योगिकीकरणापश्चात, पुढच्या असंख्य पिढ्यापिढ्यांवर केलेलं, हे फक्त ‘संक्रमण’ नसून, एकप्रकारे केलेलं हे ‘आक्रमण’चं आहे. दुर्दैव आहे की, ज्या गुजराथच्या मातीत तो ‘महात्मा’ जन्माला आला, त्याच मातीतल्या मूठभर लोकांनी, त्या महात्म्याची महन्मंगल विचारसरणी मातीमोल करुन देशातील अर्ध्याहून अधिक संपत्ती संगनमतानं हडप करुन ठेवलीयं….. आणि, आता ते ‘जग मुठीत घ्यायला…. जग जिंकायला’ बाहेर पडलेत ! “सैन्य जग पादाक्रांत करतात…. पण, उद्योगपती-व्यापारी, ते सरतेशेवटी स्वतःच्या रक्ताचा थेंबही न सांडवता, जिंकून घेतात”, हे वैश्विक-सत्य आपल्या महाराष्ट्रात फिरताना फार विपरितरित्या ठायी ठायी सामोरं येतयं…. तेव्हा, सावधान !

आम्ही “कृष्णार्पणमस्तु”च्या माध्यमातून ‘धर्मराज्य पक्षा’चे विचार मांडण्याचे प्रयत्न करतो आहोत… Doesn’t matter if, there are hardly any ‘takers’ now….. will keep working relentlessly !

मित्रांनो, मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्ग, हा कुठल्याही कालखंडात तळागाळातल्या लोकांसाठी ‘कुंभारा’ची भूमिका बजावेल, असं सर्वसाधारणपणे अपेक्षित असतं…. “एका हाताने आतून आधार देत….. बाहेरुन दुसर्‍या हाताने मातीचं भांड घडण्यासाठी थाप देत रहाणं”, हीच ती ‘कुंभारा’ची भूमिका ! समाज नांवाचं न गळणारं, छानसं उपयुक्त ‘मृत्तिकापात्र’ तेव्हाच घडू शकतं…. जेव्हा, त्या समाजातील बुद्धिजीवी मध्यमवर्ग, ही आपली ‘निसर्गदत्त’ कुंभाराची भूमिका पार पाडतो किंवा एखादा महापुरुष त्यांना ती भूमिका पार पाडायला लावतो. पण जेव्हा केव्हा, मध्यमवर्गीय आणि बुद्धिजीवी वर्ग, ही आपली भूमिका सोडून ‘व्यवस्थे’चा हात धरण्यात धन्यता मानू लागतो…. ‘स्वान्तसुखाय’ असा आत्मकेंद्री बनून चंगळवादी जीवनशैलीला आपलसं करतो… तेव्हा, तेव्हा समाजाच्या तळागाळात आतून धरणीकंप व्हायला लागतात…. तो जातीपाती-धर्मपंथाच्या नांवावर फुटायला लागतो…. तुटायला लागतो…. सैरावैरा धावायला लागतो…. मग आधाराविना, ‘शिकार्‍यां’च्या हाकार्‍यांमुळे, एखाद्या ‘शिकार’ बनलेल्या जंगली श्वापदांनं अलगद जाळ्यात सापडून तडफडत रहावं; पण कधि सुटूच नये….. तसा ‘तो’ समाज मग, व्यवस्थेनं व्यवस्थित व पद्धतशीरित्या हाकारल्याने ‘करोडो मानवी आत्म्यां’चा आक्रोश, केवळ एक ‘अरुण्यरुदन’ बनतो !
………कधि त्यांचं नांव ‘अस्पृश्यता’ असतं…. तर, कधि ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धत’….. बस्स् !!!

तेव्हा, उशीर खूप झालायं….. निदान नव्यावर्षात मराठी तरुणाईची झोप उडू दे…. आळस झडू दे, प्रस्थापित सर्वपक्षीय राजकारण्यांचा ‘खरा परिचय’ घडू दे …… त्यातून संतांचा, शिवरायांचा, शाहू-फुले-बाबासाहेबांचा, साने गुरुजीं…. सेनापती बापटांचा, टिळक-आगरकर-सावरकरांचा ‘महाराष्ट्र’ घडू दे…. महाराष्ट्रातील ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धती’ची ईडापीडा टळू दे….. आणि, महाराष्ट्राच्या ‘जल, जंगल, जमिनी’चीच्या सुरक्षिततेसोबत… उत्तरभारतीय लोकसंख्येच्या विस्फोटातून महाराष्ट्रावर आदळणार्‍या लोंढ्यांना व ‘शेठजी-संस्कृति’तील चंगळवादी जीवनशैलीला…. ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. स्वायत्त महाराष्ट्र’, या ‘धर्मराज्य पक्षा’च्या राजकीय भूमिकेतून कठोरपणे आवर घातला जाऊ दे….. हीच, नववर्ष-२०१६ची ईशचरणी प्रार्थना !!!

……आणि, नूतन वर्ष-२०१६साठी, आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

जय महाराष्ट्र । जय हिंद ।।

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)