“नूतन वर्षाभिनंदन….!!!”

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथमच (ता. मुरबाड, मौजे-साखरे) नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची केलेली शेती आणि पूर्णतः ‘रसायनमुक्त’ वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं ‘गुऱ्हाळ’ चालवून जागीच केलेली ‘गुळा’ची निर्मिती….. शेतीविषयक एक ऐतिहासिक घटना !!!

‘भाताचं कोठार’ (विशेषतः पूर्वीचा वाडा तालुका) वगैरे काही बाबी वगळता, आजवर ठाणे जिल्ह्यात शेतीविषयक फारसं उल्लेखनीय असं काही घडलेलं नाही. त्यामुळे, ठाणे ग्रामीण परिसरातील तरुणवर्ग शहरांमध्ये ‘कंत्राटी-कामगार’ म्हणून दाखल होताना, आजवर सर्वत्र आढळत आला. आपल्या ठाणे जिल्ह्याच्या रक्तात-नसानसात “एकमेका सहाय्ये करु, अवघे धरु सुपंथ” हा सहकारितेचा जाज्वल्य मंत्र कदाचित कुणी रुजवायचा राहून गेला असावा किंवा ग्रामीण भागाच्या उशाला असलेल्या शहरी भागाची ‘आर्थिक भूल’ पडली असावी… की ज्यामुळे, आपल्याचं भूमितून बव्हंशी स्वेच्छेनं ‘विस्थापित’ होतं, मिळेल ती (‘तुटपुंज्या’ पगाराची का होईना) नोकरी-चाकरी पत्करत शहराच्या प्रदूषित ‘कोंडवाड्या’त दाखल होणं… हा ठाणे भूमिपूत्र तरुणांसाठी जणू नियमच बनला! याच एका मोठ्या कालखंडात, “आमच्या ग्रामीण भागातील मुलीसुद्धा, शेतकरी ‘धनी’ पत्करेनाशा झाल्या… कंत्राटी-कामगार चालेल; पण, खात्यापित्या घरचा शेतकरी मुलगा, लग्नाच्या बाजारात नकोसा व्हायला लागला”!

पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मात्र, याच्याबरोबर उलट, असं आशादायक चित्र आढळतं. आजही तेथील बरीच तरुणाई, आपल्या काळ्या आईच्या पदराला धरुन शेती-व्यवसाय करत आनंदाने जगते आहे. फक्त, दुर्दैवं हे की, तेथील बव्हंशी शेती ही, रासायनिक व यांत्रिक आहे व हे चित्र नजिकच्या भविष्यात बदलावं!

आपल्या ठाणे जिल्ह्याला (विशेषतः, मुरबाड-शहापूर तालुक्याला), उदंड पावसाची शब्दशः ‘बरसात’ होऊनसुद्धा, पावसाच्या पाण्याची अडवणुकीची, मुरवण्याची व साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने (ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात डझनावरी धरणं आहेत, ती फक्त इथली जंगलं नष्ट करुन केवळ शहरी भागाची कधिही ‘न’ संपणारी अगस्ती मुनींसारखी शहरांना लागलेली तहान भागवण्यासाठी बांधली गेली… शिवाय, नव्या विनाशकारी धरणांचा घाट घातला जातोयं, तो वेगळाचं!) निसर्ग-पर्यावरणविरोधी अशा मोठ्या धरणांऐवजी हजारो शेततळ्यांचं जाळं वा गरजेनुसार छोट्यामोठ्या काँक्रिट वगैरेच्या पाणी साठवणुकीच्या टाक्या जर, या ठाणे जिल्ह्यात दूरदृष्टीने यापूर्वीच उभारल्या गेल्या असत्या; तर, आज आपल्याला दुबार शेतीसाठी वा ऊसासारख्या अक्षरशः पाणी पिणाऱ्या शेतीला, मुबलक पाणी मिळू शकलं असतं व कोरड्याठाक पडलेल्या पारंपारिक विहीरींनाही उदंड पाणी लागू शकलं असतं.

आपल्या ग्रामपंचायती, उपलब्ध सरकारी ‘अनुदाना’ला सामूहिक ‘श्रमदाना’ची जोड देऊ शकल्या असत्या तर, खचितच चमत्कार घडला असता… आजही तो घडवता येणं, सहजशक्य आहे. फक्त, गरज आहे ती सकस-निरोगी, भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ सामाजिक व राजकीय मानसिकतेची!

या दिशेनं, पथदर्शक म्हणून काही करु शकता येईल का, या विचारप्रक्रियेतून सदरहू सेंद्रिय ऊसाच्या शेतीचा प्रयोग आम्ही हाती घेतला…. मुरबाडची जमीन, पाणी व हवामान ऊसाच्या शेतीला अतिशय लाभदायक असल्याचं ध्यानात येताचं, पुढचं पाऊल आपसूकच उचललं गेलं, यात नवल ते काय? त्याची परिणती म्हणून यंदा वर्ष-२०१८मध्ये, ठाणे-जिल्ह्यात ‘नवलाई’ घडली… प्रथमच, ठाण्याच्या शिवारात ‘सेंद्रिय गुळा’ची यशस्वी निर्मिती झाली! अर्थातच, याचा इथल्या साखरे-धारगाव-किसळ-साजगाव पंचक्रोशीतील समस्त गावकऱ्यांना साहजिकच खूप अभिमान व आनंद वाटला असणारच… तोच आनंद, “तीळ, सात जणांत वाटून घ्यावा”, या भारतीय आध्यात्मिक विचारधारेनुसार वाटण्यासाठी आम्ही आपल्या दारी, हा सेंद्रिय शेतीचा ‘प्रसाद’ व सोबत आरोग्यदायक व निसर्ग-पर्यावरणपूरक जीवनशैलीचा ‘सांगावा’ घेऊन आलोयं!

आपला यंदाचा “गुढीपाडव्या”चा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, घरक्रमांक पाहून “प्रत्येक घरटी एक” (मग, कुटुंबातील माणसांची संख्या कितीही कमीजास्त असो), याप्रमाणे एका छोटेखानी ‘सेंद्रिय गुळा’च्या ढेपेचं आम्ही, निरपेक्षबुद्धीने वाटप करीत आहोत…. तेवढा ईश्वरी प्रसाद, कृपया ‘गोड’ मानून घ्यावा, ही नम्र विनंती !!!

आता होऊया, सारे जागे… पर्यावरणीय महासंकटे लागली मागे !

पृथ्वी ‘माता’ आहे…. ‘भोगदासी’ नव्हे!!

पृथ्वी, ‘जीवन’ देण्यासाठी आहे…. प्रदूषणकारी ‘उद्योग’ उभारुन ‘नोकरी’ देण्यासाठी किंवा, यांत्रिक-रासायनिक ‘शेती’ करुन अब्जावधी जीवजिवाणूंची हत्या करणारी ‘अनैसर्गिक’ शेती करण्यासाठी नव्हे !!!

‘निसर्गविरोधी विकास’, हा ‘विकास’ नसून ‘विनाश’ आहे…. “जल, जंगल, जमीन” यांच्या सुरक्षेसोबतच  ‘जनसंख्या’ आणि ‘जीवनशैली’ यांना कठोरपणे रोखा…. अन्यथा, अनाकलनीय व अकस्मात होणाऱ्या “अनियंत्रित जागतिक हवामान-बदला”मुळे मानवी-अस्तित्वालाच धोका !!!

प्रदूषण रोखणारी ‘हिरवी झाडी’ हवी की, कार्बनचा धूर ओकणारी ‘गाडी’…. याचा, आता जगातल्या सर्वच शहरांना तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे !”

“नैसर्गिक जीवन व नैसर्गिक शेती…. मानवी अस्तित्वाची शाश्वती!

…..राजन राजे कुटुंबिय आणि सर्व सहकारीवर्ग