तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता?

केवळ, आपल्या निसर्गदत्त भुकेला भागवणं, आपल्या पोटाचा खड्डा भरणं…. हा एवढा मोठा गुन्हाहोतो की, त्यामुळे ती स्वतःच वध्यठरावी??? अरेरे, अखेरीस, यवतमाळच्या १३ माणसांचे बळी घेणाऱ्या त्या, कथित नरभक्षकवाघिणीची शिकारयथासांग पार पडलीच….. त्या निमित्ताने, आपली आजवरची निसर्ग-पर्यावरणाप्रति केलेली महापातकं झाकण्यासाठी, सुसंघटित स्वरुपाच्या मानवी-क्रौर्यानं, एक नवा अध्याय रचलाय!!!

काय आणि कुठला दोष, त्या जंगलाच्या दिमाखदार राणीचा? किंवा, निव्वळ ईश्वरीप्रेरणेनं जगणाऱ्या अन्य, अशाच श्वापदांचा?? आम्ही, सगळे ‘निसर्गनियम’ तोडत बेबंद जगणार… आपल्याच बापाचा, हा ‘पृथ्वी’ नामक ग्रह आहे व अन्य कुठल्याही सजीवाचा तिच्यावर कुठलाही हक्क नाही… अशी भीषण मस्ती, आधुनिक संसोधनानं आणि संसाधनांनीयुक्त झाल्यानं, मानवी-रक्तात भिनवून पृथ्वीभर नाचणार… अरे व्वा मानवा!

सांप्रतकाळी, ‘कार्बन व प्रदूषणकेंद्रीसंवेदनशून्य चैनबाजीत जगण्याचा एक अमानुष व सैतानीउन्माद, जगभरात जवळपास सर्वच मानवी मनात संचारलेला आहे… हा आधुनिक मानव म्हणायचा की, हा पृथ्वीवरचा नवा सैतान???

आम्ही, आमच्या बेफाम गतीने वाढत्या लोकसंख्येला आवर घालणार नाही… आमच्या, अंति विनाशकारी ‘चंगळवादी’ जीवनशैलीला रोखणार नाही… पण, आपल्याच कर्माने, आपल्या जगण्यात जराही कुठल्या प्राणीपक्ष्यांची अडचण झाली की, मुक्या प्राण्यांना संपवायला, गोळ्या घालायला मोकळे होणार?

विविध सजीवांच्या जाती-प्रजाती, ‘सूर्याच्या स्थिरांकाच्या सिद्धांतानुसार (Solar-Constant), विवक्षित प्रमाणात ईश्वरी-संकेतानुसार निमूटपणे जीवनक्रम निभावत असताना, मानवी-उपद्रवानं पृथ्वीवरच्या जगण्याचा अवघा समतोलच ढासळवून टाकलाय!

जीव जगवण्यासाठी दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे बारा महिने दाही दिशांना नुसत पळणं, अखंड पळत रहाणं… मानवेतर सजीवांच्या नशिबी आलय! हे सगळं  नेमकं काय चाललय, कशासाठी चाललय…. याचं आकलन होणं, कालत्रयी अशक्य असलेले हे, ईश्वरीप्रेरणेनुसार चालणारे ‘कर्मबंधनमुक्त’ मानवेतर सजीव, सर्वत्र मोठ्याप्रमाणावर धाराशायी पडतायत… कित्येक प्रजाती तर, पृथ्वीवरुन कायमच्या अस्तंगत होतायत… त्या कधि भुकेमुळं, कधि सर्रास हत्यासत्रामुळं, तर कधि आपली आश्रयस्थानं उध्वस्त झाल्यामुळं!! त्यात, ईश्वरीअंश असलेले व निव्वळ आपल्या अस्तित्वासाठी झगडणारे वनस्पती, जलचर, उभयचर, कीटक, पशूपक्षी सारेच सजीव समाविष्ट झालेत…. यवतमाळची कथित नरभक्षण वाघिण, ही त्यातलाच एक अश्राप जीव! यवतमाळच्या वाघिणीला बेछूट नरभक्षक ठरवत ठार मारणाऱ्या आम्हा तथाकथित सुशिक्षित-सुसंस्कृत मानवांना, सर्व सजीवांचे संहारकर्ते‘, ही उपाधि कधि मिळणार? ती उपाधि, आता आपल्या कर्माने आपल्याला खरंतरं चिकटलेली आहेच…. तरीही, सुसंस्कृत-सभ्य म्हणून आपण निर्लज्जपणे व बेजबाबदारपणे मिरवतोय! या पापकर्माची, नजिकच्या भविष्यात रौद्रभीषण-प्रलंयकारी ‘सजा’, समस्त मानवजमातीला निसर्गदेवतेकडून मिळणार आहेच…. त्याचाच एक भाग म्हणून, मानवी निर्दय हस्तक्षेपानं पंचमहाभूते खवळल्याचे विनाशकारी संकेत, आज याअगोदच दृग्गोचर होऊ लागलेले आहेत!!!

मानवी-लोकसंख्येच्या विस्फोटाला खायला घालायला, बेछूट जीवनशैली निभावायला… आपण जंगलं तोडतं सुटलोय. त्या बेलगाम वाढत्या लोकसंख्येच्या उदरभरणासाठी, शेतीसुद्धा रासायनिक-यांत्रिक अशी अंति, घातकी स्वरुपाची करतो आहोत. मग, जंगल तुटल्यामुळे, सततच तुटत राहिल्यामुळे भक्ष्य मिळविण्यासाठी आणि आश्रयासाठी सैरावैरा धावत सुटलेल्या वाघ-वाघिणी, सिंहांसारख्या जंगली श्वापदांना त्यांच्या इलाक्यात अवांछनीय हस्तक्षेप करणारा मानवच जर भक्ष्यम्हणून शिल्लक राहीला असेल (जो, निसर्गतः त्यांचा सहसा भक्ष्यठरत नाहीच); तर, दोष कुणाचा…??? श्वापदांचा की, श्वापदांपेक्षाही क्रूर ‘जाणिवपूर्वक’ व्यवहार करणाऱ्या आधुनिक माणसांचा???

त्या सुंदर, पट्टेदार वाघिणीसारख्या अश्राप श्वापदांच्या निर्घृण व नाहक हत्येचं महापातककेवळ, ….राजकीयव्यवस्थेचं, वनविभागाचं वा वाघिणीच्या हत्येला परवानगी देणाऱ्या न्यायाधीशांचंच नाही; तर, अवघ्या मानवजातीचं आहे आणि ते भोगण्यासाठी आता आपण तत्पर राहीलं पाहीजे.

जर, त्या पातकातून थोडीबहूत सुटका हवी असेल आणि आपल्या मुलाबाळा-नातवंडांवर आपलं खरंखुरं प्रेम असेल तर, ….आपल्या जीवनशैलीत, अर्थव्यवस्थेत, विकास-प्रक्रियेत युध्दपातळीवरुन ‘निसर्ग-पर्यावरणपूरक’ आमूलाग्र बदल केले पाहीजेतच. जातधर्म, पंथप्रांत, कौटुंबिक आर्थिकगरज वगैरे सबबींखाली ‘लोकसंख्या’ वाढवत सुटलेल्यांना अत्यंत  कठोरपणे आवर घालायलाच हवा. या निमित्ताने, युरोप-अमेरिकेत मेक्सिको-अरब-आफ्रिकेतल्या लोंढ्यांनी जो धुमाकूळ घालून यक्षप्रश्न उपस्थित केलाय…. त्याचाही, धांडोळा घ्यावाच लागेल. बेताल-बेबंद वागण्यानं लोकसंख्येचा भयानक फुगवटा जगात जिथे जिथे म्हणून झालेला आहे… तिथून, भविष्यात हे लोंढे आक्रमक बनत शेजारच्या, बऱ्यापैकी स्वयंशिस्तीनं लोकसंख्येला आवर घालणाऱ्या, देशांवर आदळणार आहेतच (जसे, महाराष्ट्र नांवाच्या शिवबा-संतांच्या देशात, उत्तर भारतीय आक्रमकांचे लोंढे दीर्घकाळ थडकतायत). उद्या बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथील, आपल्या कर्माने उपासमारीने मरणारे मानवी लोंढे, भारतात येऊन आदळतील (आजच, ती समस्या याअगोरच उग्र बनलेली आहेच). मग, त्यांना दया दाखविण्यासाठी आम्ही पृथ्वीवरची उरलीसुरली वनसंपदा व नैसर्गिक संसाधनं सफाचट करुन टाकणार आहोत काय? या निर्वासितांच्या लोंढ्यांना, दया दाखवायचीच असेल तर, ….कुठल्याही परिस्थितीत, त्यांच्यापैकी प्रत्येकाचा, कायदेमंडळात कायदा संमत करत, “मुले जन्माला घालण्याचा अधिकार” नाकारुनच ती दाखवली जायला हवी. या अटीवरच मग खुशाल, अशा लोंढ्यांना माणुसकी दाखवा; पण, लहान मूल असो वा तरुणवृद्ध…. निर्वासितांपैकी कुणालाही, भविष्यात पुढे, आश्रय देणाऱ्या परक्या देशात “मुले जन्माला घालण्याचा अधिकार” कायमचा ठोकरुनच (प्रसंगी, यथोचित काळ पाहून, कुटुंबनियोजन-शस्त्रक्रिया करुन), ती दाखवली जायला हवी…

…अन्यथा, हे मान्य नसेल तर, बिलकूल दया दाखवली जाऊ नयेच!

यापुढील, आपले सगळ्याच बाबतीतील निर्णय केवळ आणि केवळ निसर्ग-पर्यावरणाचंच भान राखत घ्यायला हवेत…. निसर्ग, हाच देशधर्म आणि पर्यावरण हीच जात!!!

नाहीतर, यवतमाळच्या वाघिणीलाच काय, सगळ्याच जंगली सजीवांना, ही अक्राळविक्राळ वाढणारी मानवी प्रजावळ जगवण्यासाठी संपवावं लागेल…. आणि, मग वादळं, दुष्काळ, ढगफुटी, गारपीट, असह्य उष्णतामान, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ज्वालामुखींचे उद्रेक, प्रलयकारी भूकंप, तीव्र हिमपात यासह, भीषण संसर्गजन्य रोगराई व कर्करोगासारखे असाध्य रोग पसरवत, नियती पृथ्वीभर संहाराचं थैमान घालेल… यवतमाळ वाघिणीच्या शार्पशूटरसह व तसे आदेश देणाऱ्यांसह, ‘निसर्गभक्षकमानवी-अस्तित्वाची तिरडी बांधली जाणं, मित्रांनो मग किती दूर असेल ???

जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा !!!”

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)