आंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो!!!

गेल्या ४ ऑक्टोबर-२०१८ पासून अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को आणि सॅन जोस शहरातील एकूण ७ पंचतारांकित मॅरिऑट हाॅटेलमधील जवळपास २५०० कामगार (साधारण ९०% कर्मचारी) संपावर गेलेत. दीर्घकालीन वाटाघाटींद्वारे पगारवाढ, नोकरीची हमी तसेच, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता… या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झडूनही कुठलाही उभयपक्षी मान्य, असा सन्मानजनक तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर गेलेत.

या ९०%हून अधिक कर्मचारी-कामगारांनी संघटना-नेतृत्त्वासोबत निष्ठेनं रहात, केवळ अपुऱ्या पगारमानाविरुद्धचं नव्हे; तर, भविष्यकालीन पुरेशा ‘निवृत्तीवेतना’साठीसुद्धा संपाच्या बाजूने ९९% मतदान करुन ते संपावर गेलेयत. हे चित्र पाहून आपल्या इथल्या कामगार-कर्मचाऱ्यांना अक्षरशः फेफरं येईल!  ऊरुस भरवावेत तसे, इथल्या ‘धंदेवाईक’ राजकारण्यांकडून सालाबादाप्रमाणे भरवले जात असलेल्या…. सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंड्या-गरबे, इतर सण-उत्सव, सत्यनारायण पूजा यांच्या नादी लागत, आपल्या इथल्या ‘अस्तित्ववादी’ मराठी कामगार-कर्मचाऱ्यांना, फक्त “आजचा दिवस कसाबसा ढकलायचा”, एवढचं माहित्येय… उद्याचा विचार त्यांच्या डोक्यात नाहीच, मग दूरच्या भविष्याचा ते कसला कर्माचा विचार करु शकणार???

सदरहू ‘हाॅटेल मॅरिऑट’ संपाची झळ जवळपासच्या इतर ५० हाॅटेल्समधील ८००० हाॅटेल-कर्मचाऱ्यांना देखील पोहोचण्याची शक्यता वर्तवली जातेय, एवढी या संपाची व्याप्ती मोठी आहे. शेकडो कामगार, करार नाही… तर, शांति नाही” (No Contract? No Peace)! तसेच, “एक नोकरी पुरेशी” (One Job should be Enough)!…. असे फलक हातात घेत शहरातल्या युनियन-स्क्वेअरमध्ये जमले होते.

हाॅटेलमधली ‘फ्लोर सालाझार’ नांवाची, गेली ४० वर्षे हाॅटेलमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणारी महिला कर्मचारी, हातात घोषणा-फलक धरत म्हणत होती, माझ्यासारख्या अनेकांचा आजवर मोठा विश्वासघात झालाय. आम्हाला फक्त पगारवाढीची खोटी आश्वासनं दिली गेली, जी कधिही अंशानेही पूर्ण केली गेली नाहीत. माझा पगार किमान-वेतनापेक्षा फक्त थोडासाच अधिक आहे. गेल्या चार दशकात मला “ताशी फक्त ३५ सेंट”(सेंटम्हणजे, आपल्याकडचे सुटे पैसे) एवढीच जास्तीतजास्त पगारवाढ दिली गेलीय. हाॅटेलमधलं कामाच्या ठिकाणचं वातावरणसुद्धा आरोग्याला हानिकारक असून, अनेकांना कर्करोगासारख्या (Cancer) गंभीर व्याधी जडलेल्या आहेत. या असल्या पगारात, या महागड्या शहरात जिथे, साधं रोजचं जीवन जगणंही कठीण होत चाललयं… तिथे, असल्या गंभीर आजारांवर, या तुटपुंज्या पगारात कुठून इलाज करणार? मला खर्च झेपत नाही, म्हणून हे महागडं सॅनफ्रॅन्सिस्को शहर मला सोडून जावं लागेल… कुठे जाऊ मी, माझ्या तीन मुलांना घेऊन?? माझ्या मुलांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण व्हावं, म्हणून मी या हाॅटेल मॅरिऑटच्या नोकरीसोबत बाहेर दुसरी नोकरी करु लागले… दिवसाचे बारा-बारा, चौदा-चौदा तास मी राबतेय, तरी संसारखर्च भागायला तयार नाही. ….आणि म्हणून, मी आमच्या हक्कांसाठी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय… तो संप जीवाचा करार करुन, आमच्या रास्त मागण्या मान्य होईस्तोवर, अखेरपर्यंत मी लढणारच!”

हीच, ‘फ्लोर सालाझार’सारखी परिस्थिती, हाँगकाँगमधल्या मूळ कोळी समाजाची झालेली आहे… तो स्थानिक कोळी समाज, दिवसाचे चौदा-पंधरा तास राब राब राबतो. तरी, महागड्या हाँगकाँग शहरात घरखर्च त्यांना भागवणं कठीणं जातं… म्हणून, आता तिथला तरुणवर्ग, शहरातल्या प्रत्येक भिंतीवर “पोहणाऱ्या मासोळी” चं चित्र रेखाटतो व त्यातून स्वतःची केविलवाणी स्थिती दर्शवतो की, माशाला सतत पोहावं लागणारच, पोहणं थांबलं की, मासा संपला… तसं, आम्ही दिवसाचे चोवीस तास राबलो नाही तर, या शहरातलं आमचं अस्तित्व संपलच समजा!”

जगभरात ७२२९ हाॅटेल्स (एकट्या अमेरिकेत ४९९८) असलेल्या हाॅटेल मॅरिऑटचं व्यवस्थापनं, इतर बड्या काॅर्पोरेट व्यवस्थापकीय मंडळींसारखचं प्रचंड मुजोरीने या संपाविषयी बोलताना म्हणतय की, हाॅटेल मॅरिऑट साखळी, ही एवढी अवाढव्य मोठी आहे की, या सॅनफ्रॅन्सिस्कोसारख्या मोठ्या शहरामधला आमचा महसूलसुद्धा, एकूण जगभरातल्या महसुलाच्या मानाने अगदी नगण्य आहे… त्यामुळे, हाॅटेल-व्यवस्थापनाला संपाचा काहीही फटका बसण्याची शक्यता आम्ही साफ नाकारतो. आम्ही हा संप मोडून काढूच… We are too big to fail!”

….ही मस्ती आपण कधि उतरवणार…. ती आंदोलनातून उतरवणं कठीणं असलं; तरी, जातिवंत व सच्च्या राजकारणातून ही मस्ती उतरवणं बिलकूल अवघड नाही… त्यासाठीच, “धर्मराज्य पक्षा” चा जन्म झालाय, मित्रांनो!

अमेरिकेतल्या मॅरिऑट हाॅटेलमधली फ्लोर सालाझारकाय किंवा, आमच्या तळोजा (पनवेल) मधील फ्लेमिंगो फार्मॅस्युटिकल्स्मधील लढवय्यी निलिमा कवळेकाय…. दोघींचीही नाळ, या दोन्ही ठिकाणच्या एकाच प्रकारच्या मूलभूत मागण्यांसाठी संघर्ष करत असल्याने जुळलेली आहे!!! निलिमा कवळे‘, आमची भारतीय फ्लोर सालाझारआहे आणि फ्लोर सालाझारही अमेरिकन निलिमा कवळेआहे… एवढाच काय तो नांवाचा आणि देशाच्या नागरिकत्वाचा फरक!! अतिमहाकाय, अवाढव्य कंपन्यांनी अवघ्या जगातल्या कामगार-कर्मचाऱ्यांचं “सपाटीकरण” (Flattening Of The World) करायला घेतलय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात, पूर्वी आफ्रिकेमधल्या कृष्णवर्णीय गुलामांचा पुकारला जायचा तसा, ‘लिलाव‘ (Labour-Arbitrage) पुकारायला घेतलाय…. तर, भारतात (विशेषतः, महाराष्ट्रात) इथल्या “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”नं (Vampire State-System) ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धतीची नव-अस्पृश्यतारुजवायला घेतलीय(जिला, जन्माची ‘जात’ नसली तरी जन्माचं ‘पोट’ आहे आणि ते अर्धरिकामं आहे)!!!

हाॅटेल-मॅरिऑट आंदोलनातला महत्त्वाचा मुद्दा अजून पुढेच आहे…. ज्यावेळी, हा संप सुरु झाला तेव्हा, तिथे हिवाळा हुरु होण्याच्या पार्श्वभूमीवरची  विविध संमेलनांच्या निमित्ताने गिऱ्हाईकांची फार मोठी लगबग होती. धंद्याचा अनुकूल समय सुरु झालेला होता…. सगळी हॉटेल्स भरलेली, गजबजलेली असताना, अशा या व्यस्त मोसमात आसपासच्या विविध इस्पितळांतील मरणासन्न व गंभीर स्वरुपाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मदत करणाऱ्या व सेवा पुरविणाऱ्या, “शांति प्रोजेक्ट” (नांव भारतीयच आहे) नांवाच्या एका मोठ्या सेवाभावी (Non-Profit Organisation) संस्थेचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व अधिवेशनही त्या हाॅटेलात भरणार होतं. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर मॅरिऑट हाॅटेल्समधून अभ्यागतांसाठी आगाऊ नोंदणीही केलेली होती. पण, हाॅटेल कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन पहाता, “शांति प्रोजेक्ट”नं, हाॅटेल-व्यवस्थापनाची कळकळीची विनंति धुडकावून लावत, आपला संपूर्ण कार्यक्रमच रद्द केला….. या संदर्भात तिथे कार्यक्रमाला आमंत्रित केल्या गेलेल्या ५५० संस्था-प्रतिनिधींशी ई-मेलवरुन संपर्क साधताना, “शांति प्रोजेक्ट” चे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक श्री. कौशिक राॅय म्हणाले की, आपल्याला सर्वांना अशातऱ्हेनं कार्यक्रम अचानक रद्द केला गेल्याने जी गैरसोय, त्रास व मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो…. पण, मला हे ठासून सांगू द्या की, जरी आमचा इथल्या कामगार-संघटनेशी काहीही संबंध नसला तरी, आपल्या रास्त मागण्यांसाठी लढणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांसोबत आम्ही आहोत… आम्हीही आमच्या परीनं समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करत असतो…. मग, कुठलाही कामगार हा समाजाचा सर्वात मोठा व सर्वात महत्त्वाचा घटक असताना, भले आपल्याला कितीही त्रास भोगावा लागला तरी चालेल, पण आपण या अडचणीच्या काळात आपण त्यांच्यासोबत रहायलाच हवं!”

भारताचं सोडाच, निदान महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी तरी, अशी संपकर्त्या कामगार-कर्मचाऱ्यांविषयी अनुकंपेची वा सहानुभूतीपूर्ण भूमिका कधि घेतलीय का? आम्हाला एसटी, रिक्षा-टॅक्सी, रेल्वे संपाचा किंवा इतर कुठल्याही संपाचा थोडा जरी फटका बसला की आपण संपकऱ्यांच्या नांवाने कडाकडा बोटं मोडायला तयार होतो… त्यांना शिव्यांची लाखोली वहात बसतो. पण, तेव्हा आपल्या ध्यानीमनीसुद्धा नसतं की, हीच आपली संवेदनाशून्य व बेजबाबदार भूमिका, आपल्या कधातरी अंगलट येणार आहे. “म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकावतो”, आणि हा सोकावलेला ‘काळ’ आता सर्वांनाच (निळे डगलेवाल्यांसमवेत पांढऱ्या डगलेवाल्यांनाही) आपल्या राक्षसी कवेत घ्यायला लागलाय…. कालपरवापर्यंतची, ‘आयटीची ऐटही त्यातूनच संपली! “मला काय त्याचं”, अशी कुठल्याही आंदोलनाविषयी बेफिकिरी व बेपर्वाई बाळगणाऱ्या सर्वच पांढरपेशेवाल्यांचही आता पद्धतशीर उध्वस्तीकरण सुरु झालयं…. फक्त, समाजातला एकमेकांशी संधान बांधून असलेला अभिजनवर्ग (Coalition Of Connected) आणि धंदेवाईक राजकीय पदाधिकारी मंडळी, हे समाजपुरुषाचं शोषणकरत मजेत, चैनीत जगतायत, बस्स! ते तसं जगू शकतात, याचं प्रमुख कारण सध्या भारतात-महाराष्ट्रात हातपाय पसरुन बसलेल्या तथाकथित बनेल-ढोंगी आध्यात्मिक संत, बाबाजी आणि सद्गुरु वगैरे विविध संप्रदायवाल्या मंडळींचा सुळसुळाट झालाय… जे, अशा कुठल्याही आंदोलनाला, अमेरिकेन NGO, “शांति प्रोजेक्ट”वाल्यांसारखा तोंडी लावण्यापुरताही पाठींबा देण्याची साधी हिंमत करु धजावणे, कदापिही शक्य नाही… कारण, तेच या ‘रक्तपिपासू-शोषक’ व्यवस्थेचे खरेखुरे ‘आधारस्तंभ’ आहेत… तेच, अन्याय व शोषणग्रस्त जनतेला मूर्ख बनवत “षंढ आणि थंड” करण्यात प्रमुख भूमिका बजावतायत. त्यांच्याकडून जाज्वल्य आंदोलनांना पाठींबा मिळण्याच्या भाकड अपेक्षा बाळगणे, हे आपल्या मूर्खपणाचे आणि अज्ञानाचे प्रदर्शन ठरेल. मात्र, त्यांची खरी ओळख करवून घेण्यात, महाराष्ट्रातली सामान्य मराठी-माणसं अशीच भविष्यात अपयशी ठरत राहीली, तर त्यांचे कुत्रा हाल खाणार नाही आणि त्यावेळी, साधं सांत्वन करालाही ही ‘सरकारी-संत’ मंडळी येणार नाहीत!

मित्रहो, शोषण, “निसर्गाचं की, मानवाचं”…. दोन्ही प्रकारचं शोषण‘, निर्धाराने रोखलं गेलचं पाहीजे! ते कुठल्याही किंमतीवर  रोखू पहाणारा… भारतीय आध्यात्मिक विचारधारेला स्मरुन चालणारा…. म. गांधींनीच दाखवलेल्या मार्गाने, ऐश्वर्यसंपन्न नव्हे तर, सुखसमाधानी “शाश्वत-जीवनशैली”चा पुरस्कार करणारा…. “धर्मराज्य पक्ष”, ही काळाची गरज, हाॅटेल मॅरिऑट आणि फ्लेमिंगो संपाच्या निमित्ताने पुन्हा एकवार अधोरेखित होतेय…

…..अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन्हीही संप निर्धाराने आजही (फ्लेमिंगो संपाला तब्बल सहा महिने झालेत) सुरुच आहेत, हा स्वतःच एक मोठा सामाजिक-संदेशआहे!!!

धन्यवाद…..

                        ….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)