मोहम्मद दिलावर या भारतीय पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने स्थापन केलेल्या, “नेचर फाॅर एव्हर सोसायटी ऑफ इंडिया” या सामाजिक संस्थेनं, फ्रान्स वगैरे देशांमधल्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्ष-२०१० मध्ये, प्रथमच २० मार्च रोजी “आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस” (world sparrow day) साजरा केला…. ही तमाम भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे!
२० मार्च रोजी प्रत्येक वर्षी हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश…. “चिमणीसारखे दैनंदिन जीवनातल्या साध्या पक्षी-प्राण्यांचं अस्तित्व, हे निसर्ग-पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते, हे अधोरेखित करणे, हा होय!”
सर्व पृथ्वीतलावर ‘चिमणी’ हा छोटेखानी पक्षी, वेगवेगळ्या स्वरुपात सर्वत्र आढळतो. निसर्ग-पर्यावरणात, या साध्या जीवाचं महत्त्वं चीनमध्ये १९५९-६१ च्या दरम्यान, चीनचे तत्कालिन अध्यक्ष माओत्सेतुंग यांच्या एका अविवेकी व अतिरेकी निर्णयाने सर्व जगाला कळून चुकले. चिमण्या धान्यपिकांच्या कणसातले दाणे टिपून खातात, म्हणून माओत्सेतुंग यांनी धान्य उत्पादन अधिक व्हावं म्हणून, चिमण्यांची सार्वत्रिक हत्या करण्याचे फर्मान सोडले होते व त्यासाठी त्याकाळी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या. अशातऱ्हेनं, फार मोठ्याप्रमाणावर चिमण्यांचा नाश करण्यात आल्यानंतर, थोड्याच अवधित चीनमध्ये विविध पिकांवरील किटक व किडीचे प्रमाण एवढे बेसुमार वाढले (ज्या, किडी-कीटक एरव्ही, चिमण्या खाऊन फस्त करायच्या) की, चीनभर सगळी पिके शेतकऱ्यांच्या हातची जाऊन २ कोटीच्यावर चिनी लोकं दुष्काळ पडून उपासमारीने मेले!
…..त्यामुळे, आपल्या आधुनिक राहत्या इमारतींमध्ये चिमण्यासारख्या छोट्या पक्षांना (जे, पूर्वी कौलारु घरांच्या आश्रयाने एखाद्या खोपटात वा खोप्यात आपला संसार थाटायचे) आश्रय मिळेनासा झाला. शिवाय, या मोबाईलने व्यापलेल्या जगात, भल्यामोठ्या शक्तिमान मोबाईल टाॅवर्समधून ऊत्सर्जित होणाऱ्या हानिकारक विद्युत-चुंबकीय प्रारणांमुळे (electro-magnetic radiation) व इतर प्रदूषणामुळे चिमण्यांसारख्या छोट्या सजीवांचं अवघं अस्तित्वचं धोक्यात आलय आणि त्याचबरोबर, निसर्ग-पर्यावरणाचा समतोलही पूर्णतया ढासळू लागलाय. यास्तव, “मानवी-अस्तित्वासह संपूर्ण सजीवसृष्टीला वाचविण्यासाठी युध्दपातळीवरुन सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत व पूर्वीसारखीच साधीसुधी निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैलीच माणसांनी अंगिकारली पाहीजे, हा ही या चा (world sparrow day) महत्त्वपूर्ण संदेश होय!!!”
….. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही पक्ष)