२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या  (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा घेतला गेला!!!

तसाही, आंतरराष्ट्रीय ‘इस्लामिक-दहशतवादा’ला खतपाणी घालणारा आणि विदेशात जाऊनही देशांतर्गत राजकीय खुन्नसबाजी (आठवा, आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला हादरवून सोडणारी सौदी बंडखोर पत्रकार ‘जमाल खशोगी’ची सौदी राजपुत्राकरवी इस्तंबूलच्या सौदी राजदूतावासात घडविण्यात आलेली भयंकर हत्या) अमानुषपणे पार पाडणारा देश, म्हणून ‘सौदी अरेबिया’ याअगोदरच पूर्णपणे बदनाम आहेच.

तेव्हा, देशांतर्गत खनिज तेलावर आधारित असलेली आपली अर्थव्यवस्था, IPCC च्या अहवालाची अंमलबजावणी करण्यामुळे साफ कोलमडून पडू नये, यासाठी आटापिटा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या व अमेरिकी अध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रंप’सारख्या संवेदनाशून्य राष्ट्रप्रमुखांच्या स्वार्थी-आपमतलबी, अदूरदर्शी व अक्षम्य हस्तक्षेपाला कंटाळून, ‘आयपीसीसी’ने यापुढे आपण, जागतिक तापमानवाढ रोखण्याकामी कुठले कुठले निर्णय कसे कसे घेतले जावेत, याचं आपण मार्गदर्शन वा दिग्दर्शन करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे… ही समस्त मानवजातिसाठी अतिशय अस्वस्थ करणारी बाब आहे. आजवर केलं, तेवढं शास्त्रीय मार्गदर्शन परिपूर्ण  व पुरेसं आहे, असंही ‘आयपीसीसी’ पुढे म्हणतेय.

सदरहू परिषदेत चर्चेद्वारे, संपूर्ण जगाला अतिशय गंभीर इशारा देत, “संयुक्त राष्ट्रसंघाच्या जलवायूपरिवर्तनासंबंधी नियुक्त परिषदे”चा (युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन् क्लायमेट चेंज) पोटविभाग असलेल्या “आयपीसीसी”च्या (IPCC) अहवालाचा हवाला देत प्रतिपादन करण्यात आलं आहे की, १७५० च्या सुमारास प्रारंभ झालेल्या औद्योगिकीकरणाच्या वेळच्या तापमानात, “कार्बन-ऊत्सर्जना”पोटी सुरु असलेली भयावह तापमानवाढ, जास्तीतजास्त १.५° सेंटिग्रेडपर्यंत रोखायची असेल….. तर, जीवनासंबंधी सर्वच क्षेत्रात कल्पनातीत व क्रांतिकारी असे आमूलाग्र बदल, करावेच लागतील.

…आणि, उद्योगपूर्व काळातील तापमानवाढ जर, १.५° सेंटिग्रेडपर्यंत रोखली गेली नाही; तर, संपूर्ण मानवजातीचा अत्यंत करुण अंत घडून येईल!!!

या अहवालात पुढे म्हटलयं की, सध्याचा “कार्बन-ऊत्सर्जना”चा कल पहाता, लवकरच म्हणजे, सन २०३० ते २०५२ च्या दरम्यान, ही विनाशकारी तापमानवाढ घडून येईल… परिणामतः होणारा, हा नरसंहार व अन्य सजीवसृष्टीचा प्रलंयकारी विनाश घडू द्यायचा नसेल; तर, आपल्याला “जनसंख्या, जीवनशैली” यांना कठोरपणे रोखावं लागेल. सध्याचं शहरीकरण, औद्योगिकीकरण बंद करुन प्रचलित अर्थव्यवस्था, विकासाचं प्रारुप यात बरोबर १८०° अंश कोनात माघारी जात, कल्पनाही करता येणं अशक्य, अशा स्वरुपाचे सर्वच बाबतीत मुळापासून क्रांतिकारी बदल करावेच लागतील आणि वर्ष २०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

याचाच सरळ अर्थ, महन्मंगल पारंपारिक मराठी-संस्कृतीने प्रसवलेल्या “ठेविले अनंते तैसेचि रहावे” अशा, निसर्गाप्रति शरणागत भूमिकेतून पुन्हा एकवार कायमचं ‘निसर्गा’कडेच वळावे लागेल… अन्यथा, आपल्याच हातांनी, आपल्याच कर्माने सर्वनाश अटळ आहे!!!

…..राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग आणि पर्यावरणस्नेही ‘हरित पक्ष’)