मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था

सर्व शाळांमधून (खरंतरं, हल्लीच्या भाषेत ‘स्कूल’मधून) मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था (मराठीचा उठताबसता उद्घोष करणाऱ्या राजकारण्यांकरवीच), तेवढी वाईट झालेली नसतानाची, ही कथा…. मात्र, तोपर्यंत, ‘‘द्रोणाचार्य-सानेगुरुजी-पुलं’चे चितळे मास्तर आणि आताचे भुजबळ सर’’… असा आचार्य, ते गुरुजी, ते मास्तर, ते थेट ‘सर’… हा लांबवरचा प्रवास घडून, ‘‘चुलीतलं ‘सरपण’ होण्यागत’’, शिक्षकांची वाईट अवस्था मात्र हळूहळू होऊ लागली होतीच! ‘कंत्राटी-शिक्षणसेवक’’ पद्धतीमुळे व खाजगी नफेखोर ‘शिक्षण-सम्राटां’चा(त्यात, बहुतांश छोटेमोठे राजकारणी प्रामुख्याने आलेच) शिक्षणासारख्या पवित्र ज्ञानदानाच्या क्षेत्रात, ‘अपवित्र-प्रवेश’ झाल्यानं उद्भवलेलं, हे अस्वस्थ करणारं वर्तमान!

तर, मित्रांनो, कथा अशी की…. ‘‘आपल्या शरीराचा कोणता भाग कोणता अवयव किंवा अंग सर्वाधिक संवेदनशील आहे?’’

… असा सहजच वर्गात ‘मराठीच्या तासा’ला, भुजबळ सरांनी विद्यार्थ्यांपुढे प्रश्न उपस्थित केला अन् क्षणभरातच उत्तर देण्यासाठी वर्गातले अनेक हात उंचावले गेले.

एकानं उत्तर दिलं… ‘‘आपली बोलणारी जीभ’’

दुसऱ्यानं उत्तर दिलं… ‘‘श्वास घेऊ शकणारं आपलं नाक’’

तर, तिसरा म्हणाला… ‘‘धडधडणारं आपलं हृदय’’

चौथ्यानं उत्तर दिल्यानंतर मात्र, ‘‘एक सोडून’’, सर्वांचेच हात खाली गेले…. चौथा उद्गारला, ‘‘आपलं मन, …जे नेमकं कुठे असतं, हे सांगता येत नसलं तरीही, ते आपल्या भावभावना अभिव्यक्तीचं, विचार-विकारांचं केंद्रस्थान असल्याने सर्वाधिक संवेदनशील होय!’’ सर्वांनी कौतुकाने माना डोलावल्या.

…. पण, जो एक हात अजूनही वर होता, त्याकडे वळत भुजबळ सरांनी विचारलं, ‘‘बोल, तुला ग काय म्हणायचयं मुली?’’ तशी, ती पोर परकर सावरत उभी राह्यली… तिची चर्या शांत आणि स्वर ओतप्रोत आत्मविश्वासाने भरलेला असा ठाम होता.

ती प्रत्येक शब्दावर भर देत संथलयीत म्हणाली, ‘‘माझ्या अगोदर ज्या कुणी सोबत्यांनी, जी काही उत्तरे दिलेली आहेत, ती अंशतः का होईना; पण, सगळी अगदी बरोब्बर होती… पण, या साऱ्या उत्तरांचा सन्मान राखून मी थोडसं वेगळं म्हणेनं की, आपल्या शरीरात, आपले डोळेहेच सर्वाधिक संवेदनशील आहेत. ते, केवळ यासाठी नव्हे की, जरासंही डोळ्यात काही टोचलं गेलं किंवा जरासं काहीही डोळ्यात गेलं की, खूप तीव्र वेदना होतात म्हणून…’’

‘‘मग, नेमकं कशामुळे, ते सांग बरं तू’’, भुजबळ सर तिच्याकडे रोखून कौतुकाने पहात म्हणाले.

‘‘कारण, ‘डोळेहे, शरीराचं एकमेव असं अंग किंवा हिस्सा आहे की, जो सगळ्यात जास्त दयाळू आहे आणि विशेष म्हणजे, शरीरातील सर्वच अंगप्रत्यंगाप्रति  प्रेमभाव-आपलेपणा जपणारा आहे…. असं बघा की, आपल्या शरीरात कुठेही जखम झाली, दुखलंखुपलं की, त्या शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या दुःखात अगदी न चुकता न सांगता-सवरता डोळेसहभागी होतात. एवढचं नव्हे; तर, अन्य कुणाचं दुःख पाहून वा कुणाच्या दुःखद निधनानेही ते तत्क्षणी पाणावतात!’’, त्या लहानग्या मुलीनं एखाद्या तत्ववेत्त्यासारखं सहजतेनं उत्तर दिलं आणि सरांसह अख्खा वर्ग थक्क झाला…

थोड्यावेळाने भानावर आल्यावर, वर्गात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या मार्मिक उत्तरासह ती मुलगी, त्या टाळ्यांच्या उत्स्फूर्त कडकडाटात जणू विरघळून गेली !!!

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)


(‘‘संवेदनशील’’, या सध्यानंद वर्तमानपत्रातील ‘झरोका’ सदरातील ‘मायकल ए. एस.’ यांच्या स्फूट लेखनावर बेतलेला, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा प्रेरणादायी व बोधप्रद संदेश….)