‘‘विद्यार्थ्यांच्या पायाखाली वितळणारे ‘हिमखंड’ आणि गळ्यात फासाचे ‘दोरखंड’…!!!’’

जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटामुळे मानवजात, कशी विनाशाच्या दिशेनं वेगाने वाटचाल करतेय, याचं पर्यावरणीय आयामातून कलात्मकरित्या कोलाॅन (मध्य जर्मनी) येथील ‘इकोसाईन’च्या अॅने सिकोरा, सोफिया कॅथरिन वगैरे तरुण विद्यार्थ्यांनी एका ‘‘शालेय शिक्षणातील प्रकल्पा’’अंतर्गत अत्यंत प्रभावी दिग्दर्शन नुकतचं केलं. या शालेय शिक्षण-प्रकल्पात (school project) सदर विद्यार्थ्यांनी गळ्याभोवती सैलसररित्या फासाचे दोर अडकवून घेतले होते व हे सर्व विद्यार्थी वितळणाऱ्या बर्फाच्या लाद्यांवर उभे होते…. जसजसा पायाखालचा बर्फ वितळत गेला, तसतसे विद्यार्थी खाली खाली येऊ लागले व त्यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जाऊ लागल्याचं थरारक दृश्य सगळ्या जगानं श्वास रोधून पाह्यलं.

….जरी, या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका न पोहोचण्याची पूर्ण काळजी घेतली गेली होती; तरीही, त्या प्रकल्परुपी आंदोलनाचा जळजळीत संदेश मात्र जगाच्या कानाकोपऱ्यात थेट पोहोचविण्यात, ते विद्यार्थी कमालीचे यशस्वी झाले.

‘‘जागतिक-तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील अब्जावधि टनांचा हिमखंडांच्या रुपातील गोठलेल्या पाण्याचा साठा वितळून महासागरांच्या पाण्याची पातळी निरंतर वाढत चाललीय…. त्यामुळे, आजच्या घडीलाच दरवर्षी ३ लाख लोकं, जागतिक तापमानवाढीमुळे जगभर मृत्युमुखी पडतायत. जसजशी ही समुद्री पाण्याची पातळी अजून वरवर जाईल तसतसा, हा मृत्युदर कैकपटीने पटीने वाढत जाईल!’’

उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाचं विध्वंसकरित्या बाष्पीभवन होऊन अनेक देशांमधले पाण्याचे साठे नाहीसे होऊ लागलेत. अगदी जर्मनीतसुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष्य अलिकडे चांगलचं जाणवायला लागलय. तप्त वायूंमुळे जंगलांमधून असंख्य वणवे नैसर्गिकरित्याच लागून सजीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात येतय…. सूर्य आग ओकू लागल्याने असे जगभर सर्वत्र आगडोंब उसळायला लागलेत आणि परिणामतः कुठे दुष्काळ, तर कुठे अतिवृष्टी, भूकंप, चक्रिवादळे, ज्वालामुखींचे उद्रेक इ. नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता व संहारकता प्रचंड वाढीस लागलीय….. याचाच अर्थ, मानवजातीच्या हातून झपाट्यानं वेळ निसटून चाललीय.

जनसंख्या, जीवनशैली, अर्थव्यवस्था, विकास, ऊर्जानिर्मिती, उद्योग-प्रक्रिया, वहातूक-व्यवस्था, शेती, घरबांधणी, पाणी प्रदूषित करणारे रंग-साबण-प्लास्टिक यांचा बेलगाम सार्वत्रिक वापर इ. बाबींवर अत्यंत कठोरपणे नियंत्रण आणून या जागतिक महासंकटाचा सामना युध्दपातळीवर केला गेला पाहीजे…. याकडेच, जगाचं लक्ष वेधण्यासाठी या विद्यार्थ्यांनी वितळणाऱ्या बर्फाच्या लाद्यांवर उभं राहून आपल्या गळ्यात प्रतिकात्मकरित्या ‘‘फासाचे दोरखंड’’ अडकवून घेतं, जर्मनीमध्ये जोरदार निदर्शने केली. याद्वारे, तरुण आंदोलकांनी, फार वेगानं वितळणाऱ्या उत्तर व दक्षिण ध्रुवांवरील बर्फाच्या (Polar Ice Caps) साठ्यांचं नजिकच्या भविष्यातलं विध्वसंक स्वरुप, जगापुढे ज्वलंतपणे प्रतीकरुपाने मांडलं!

पण, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशी जगभर पर्यावरणीय जागृती निर्माण होत असताना, ‘आरक्षणा’च्या भुलभुलैय्यातच कायम अडकलेला आणि… या आणि अशाच रसहिन, विवेकशून्य मुद्यांभोवती दशकानुदशके पिंगा घालणारा, आमचा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग अजून यात मागे का???

…..  राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी ‘हरित पक्ष’)