वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं अजिबात… पण, खिशाला अजिबात परवडत नसलं; तरीही, हल्ली सगळ्याचाच उत्सव साजरा करणाऱ्या, उत्सवी मराठी मंडळींना त्याचं फार अप्रूप…. म्हणून, लोकाग्रहास्तव का होईना; त्यानिमित्ताने, निदान व्यक्तिगत संपर्काचा संसर्ग व्हावा, हा या संदेशामागचा उद्देश!

एक अकेली छत्री में

जब आधे आधे भीग रहे थे

आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी….

गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो,

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो ……”

कवि गुलजारची ‘इजाजत’ मधली (गाणं कसलं ते, ती निखळ कविताच!) ‘कविता’, कुणाला “प्रेमाच्या गावा’ न घेऊन जाईल तर, नवल!

प्रेमातच जगावं…अन्, प्रेमातच मरावं,

अधेमधे, जगणं नावाचं, काही असूच नये!!!”

गुलजारच्या ऊर्दूमिश्रित हिंदीत सांगायचं तर…

प्यार मे जीना, प्यारही में मरना….

इसके बीच कहीं जीवन जीना,

नाम की, चीजही न होनी चाहिये….”

मलाही, “जगण्यातलं काव्य” कायमच वेढून राहीलेलं… ते ‘कवितेचं, हाका देणं’, जगाच्या व्यवहाराला अगदी पारखं होण्याइतपत तीव्रतर मनात !

पण, माझी सगळी कविता, हूरहूर, हरवलेपणं…. मनाच्या किनाऱ्यावर धडका देणाऱ्या त्या संवेदनाच्या लाटा, सततची हृदयाची धडधड…. या, इतरांसाठीच्या जगण्याच्या कडव्या, क्रूर संघर्षाने सगळं काळवंडत गेलं…. मला हे असलं जगायचं नव्हतं!

रानात, शेतात आयुष्यभर हुंदडायचं होतं… फुलावेलींसोबत डुलायचं होतं, पावसात भिजायचं होतं…. थेट, हाडांमासांत आणि मेंदूत शिरशिरी भरेपर्यंत !

अगदी साधं, कसल्याही लौकिकाचा साधा स्पर्शही नसलेलं… साधचं, पण, चारही बाजुंनी रसरसत्या प्रेमानं ओतप्रोत भरलेलं आयुष्य जगायचं होतं… हो, ते ओंजळीतल्या पाण्यासारखं हातात येतं राहीलंही आणि हाती धरता धरता निसटून जात राहीलंही!!!

पण, ‘संघर्षा’चं नेतेपण करताना… जगातलं दुःख, वेदना, अन्याय, अत्याचार त्यातून दूर होताना पाहीला… खरातरं, प्रत्यक्ष पावला पावलावर अनुभवला आणि मी मग, मी “माझा जगण्याचा विचार”, कडीपत्ता आमटी-भाजीतून काढून टाकावा…. अगदी, तस्साच घट्ट मनानं काढून टाकत गेलो; कारण, एव्हाना, या ‘संघर्षा’ला त्यातून बळ आणि जीवनरस  मिळणं, उरकून गेलेलं असायचं!!!

थोडक्यात सांगायचं तर,

जब सूरज की आग बुझेगी तब….

मै सोचता हूँ, उस वक्त अगर,

कागज पर लिखी एक नज्मकहीं,

उडते उडते बूझे सूरज में गिरे,

और, सूरज फिरसे जलने लगे….”

कवी गुलजारम्हणतो ती, ‘नज्म’…. हेच, माझं जीवन!!!

                                                     …. राजन राजे