२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!!

बरोब्बर सव्वादोनशे वर्षांपूर्वी अशाच हुजऱ्यांनी… आपल्या सत्तापिपासू स्वार्थासाठी इंग्रजांच्या सत्तेला आपल्या देशात आधार दिला होता आणि पुढे तब्बल दिडशे वर्षे, या गोऱ्या इंग्रजांना तमाम भारत लुटू दिला होता, गुलाम बनवू दिला होता… जालियनवाला बागेसारखं हत्याकांड घडूनही त्यांच्या अमानुष स्वार्थी भूमिकेत, तेव्हाही काडीमात्र फरक पडला नव्हता, एवढे ते संवेदनशून्य स्वार्थांध असे “गोऱ्यांचे पक्के हुजरे” होते ….आणि, हो, जालियनवाला बागेत गोळ्या झाडण्याचा आदेश जरी, गोऱ्या जनरल डायरने दिला होता तरी, आपलं पोट जाळण्यासाठी आपल्याचं बांधवांच्या रक्ताची, त्यांचा कुठलाही अपराध नसताना, ‘रक्तरंजित होळी’ खेळणारे ते बव्हंशी हिंदी सैनिक व हिंदी अधिकारीचं होते, हे ही विसरुन चालणार नाहीच!

आता, या “हूस्टन, हाऊडी मोदी”च्या निमित्ताने, गोऱ्यांसाठी राबणारे व संवेदनशून्य असलेले बव्हंशी देश-परदेशातील ‘उच्चमध्यमवर्गीय’ भारतीय, हे हूस्टनमधील उन्मादातून, त्यांचीच पुढील पिल्लावळ असल्याचंही सहजी निदर्शनास आलं. भारतात कुणाच्या पायाखाली काय जळतयं, कुणाच्या पायाखाली काय तुडवलं जातयं, कुणाचे जीव किती किती तगमगतायतं-तळमळतायतं…. याच्याशी, त्यांना काही देणंघेणं असण्याचा साधा प्रश्नही निर्माण होणे नाही, हे आम्ही जाणतोच. मात्र, भारतातील व्यापारउदीम सांभाळणाऱ्या, प्रामुख्याने गुजराथी भाषिक विशिष्ट जमातीच्या लोकांनी (ज्या, १% जमातीच्या हाती देशातील ६०% आणि महाराष्ट्रातील ७५% धनसंपत्ती, अपसंपदा मुठीत आलेली आहे), ‘जमातवादी’ राजकारण-अर्थकारण करत, या ‘खाउजा’ (१९९० नंतरचं, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) धोरणाचा फायदा झालेल्या, संख्येने जेमतेम १५-२०% असलेल्या बुद्धीजीवी नवश्रीमंतवर्गाला कशातऱ्हेनं घट्ट हाताशी धरलय… त्याचं, “हूस्टन, हाऊडी मोदी” हे जळजळीत उदाहरण आहे (ज्या १५-२०% वर्गाचा, “तळागाळातील वर्गाला अक्षरशः बरबाद करुन”, या ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’नं नाही म्हटलं तरी, चांगलाच फायदा करुन दिलेला आहे)!!!

‘हाऊडी’च्या तमाशात देशातल्या मंदीवरचा उतारा म्हणून १०% कार्पोरेट-टॅक्स’ कमी करण्याचा ढोल बजावला गेला… प्रत्यक्षात, असं करणं, म्हणजे खरंतरं ‘मंदीची संधि’ बनवून बड्या उद्योगपतींच्या झोळ्या फाटेस्तोवर भरणं आहे, हे ‘काळं-सत्य’ तिथे बेमालूम दडवलं गेलं… जेव्हा, ही ‘मंदी’, माल पुरवठ्यातल्या (सप्लाय-साईड) पेचप्रसंगाची नसून, टोकाच्या आर्थिक-पिळवणूकीतून व देशातल्या महाभयंकर आर्थिक-विषमतेमुळे तळागाळातल्या माणसाच्या हाती पैसाच नसल्याने बाजारातील ‘मागणीच घटल्या’च्या (डिमांड-साईड) पेचामुळे आहे!

‘हाऊडी’च्या चावडीवर दामटवून २०१४-२०१९ या भूतकाळातले GDPचे आकडे (तेही तद्दन खोटे, अर्थात हाडामांसी खिळलेल्या खोटं बोलण्याच्या सवयीनुसार) फेकले गेले…. पण, सध्याचा GDP (राष्ट्रीय ठोकळ उत्पादनाचा वार्षिक दर) धड १% तरी आहे की, नाही (सरकार GDP ५% घोषित करतं; तर, त्यांचेच माजी अर्थसल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम् तो फक्त २.५% असल्याचं सरळ म्हणतात), याचीच रास्त शंका अनेक अर्थतज्ज्ञांना असताना… त्याबद्दल, तोंडातून ‘ब्र’सुद्धा, या ५० हजारांच्या झगमगत्या ‘हूस्टन’ चावडीवर काढला गेला नाही!

इथे, जनआंदोलने राक्षसी बळावर दडपली जात आहेत आणि बटीक बनलेल्या प्रसारमाध्यमांतून पूर्णतया ती ‘झाकली’ जात आहेत… तरीही, बिनदिक्कतपणे “सैतानाच्या तोंडी बायबल” या उक्तिनुसार, त्या ‘महात्म्या’चं ढोंगीपणाने नांव उच्चारलं जातं, ज्याने राजकारणात आणि अर्थकारणात कधि ठामपणे नितीमूल्यांचा आणि अहिंसेचा पाया घातला होता आणि तळागाळातील ‘दरिद्री-नारायणा’ला आपल्या नितीधोरणाच्या केंद्रस्थानी मानलं होतं (वाचा, मोहनदास करमचंद गांधी लिखित हिंदस्वराज)… म्हणून, तो ‘राष्ट्रपिता’ बनू शकला… ‘राष्ट्रपिता’ एवढं होणं सोपं नाही हो, ‘फसणवीस’ (की, ‘फसवणीस’?) मॅडम!

जेव्हा आज, भारतातील उच्चशिक्षित-अर्धशिक्षित तरुणपिढी भविष्यातील अनिश्चिततेनं चिंतित व प्रचंड संतप्त आहे… नोकऱ्यांमध्ये धड पगारमान नाही (आजच्या, महामंदीचं तेच प्रमुख कारण आहे) आणि उद्याची सोडाच, आजचीच निश्चिती नाही…. निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस विनाशाच्या कडेलोटापर्यंत पोहोचलाय, तरीही ‘विकासा’च्या (ज्याला हाऊडी मोदी, “सब से चर्चित शब्द” म्हणतात) नावाखाली निसर्ग-पर्यावरणाचा बेबंद विध्वंस बेगुमानपणे सुरुच आहे!

सध्या जगात अमेरिका, रशिया, चीन आणि भारत…. “एक्स्ट्रीम राईट ऑफ सेंटर” अशा माणूस व निसर्गाच्या ‘अंति विनाशकारी’ स्वरुपाच्या टोकाच्या शोषणासंदर्भातील ‘धोरणघातकी’ राष्ट्रप्रमुखांची चौकडी मौजूद आहे (महाभारतातील “दुर्योधन-दुःशासन-कर्ण-शकुनीमामा”, ही ‘चौकडी’ या संदर्भात आठवल्याशिवाय रहात नाही). या चौघाही राष्ट्रप्रमुखांमध्ये काही समान बाबी खचितच आहेत… १) या चौघांनाही “मुस्लिम आतंकवाद”, निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस करु पहाणारा ‘राष्ट्रीय विकास’, माणुसकीशून्य कडवा ‘राष्ट्रवाद’, भ्रष्टाचार-निर्मूलनाची ढोंगी आवई आणि प्रसारमाध्यमांची त्यांनी चालवलेली गळचेपी व त्यावर मिळवलेलं पूर्ण वर्चस्व… अशा काही समान धाग्यांनी एकत्र बांधलेलं आहे आणि ते आपापली राजकीय ताकद वाढवण्यासाठी, या बाबींचा फारच खुबीने उपयोग करुन घेण्याची, एकही संधि दवडत नाहीत (अमेरिकेचे अध्यक्ष पोपना जेवढा त्यांच्या अमेरिकेन दौऱ्यात वेळ देत नाहीत, तेवढा वेळ त्यांनी “हूस्टन, हाऊडी मोदी” कार्यक्रमाला दिला आणि त्याच कार्यक्रमातून “अब की बार ट्रंप सरकार”चा मोदीकरवी ‘टणत्कार’ केला, हे त्याचंच द्योतक आहे!)..

२) चौघांचेही आपापले निवडणुकीतील विजय अतिशय संशयास्पदरित्या व गैरमार्गाने झाल्याचं उघडपणे बोललं जातं…

३) चौघांचीही वाटचाल बिनदिक्कतपणे हुकूमशाहीच्याच स्वरुपातील आहे…

४) जागतिक पातळीवर वरपांगी त्यांच्यात कितीही संघर्ष दिसत असला; तरी ते WEF, WB, IMF वगैरेच्या माध्यमातून एकमेकांशी, आपल्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारं, प्रसंगी चांगलचं ‘संधान’ बांधून आहेत…

५) चौघंही एकतर स्वतः मोठे, उघडपणे वा छुप्यारितीने (बेनामी), उद्योगपती आहेत अथवा बड्या उद्योगपतींशी सत्ता मिळवण्यापासून टिकवण्यापर्यंत, सरळसोट हात धरुन आहेत…

कुठलीही हुकूमशाही टिकण्यासाठी, अशा अनेक क्लृप्त्या, हुकूमशहा कालही वापरत होते (उदा. हिटलर, मुसोलिनी वगैरे) व आजही उघडपणे वापरत आहेत…. उद्याही वापरत रहातील. पण, “हूस्टन, हाऊडी मोदी”सारख्या ऊरुसाचा अथवा धनदांडग्यांच्या बाजार-जत्रेचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होऊ द्यायचा, हे आता या देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील तरुणपिढीनं, ठरविण्याची वेळ येऊन दाराशी ठेपलीय…. ‘जमातवादा’च्या गुन्हेगारी संगनमतातून आणि तळागाळातील मराठी माणसांच्या शोषण-फसवणुकीतून महाराष्ट्रातील आपला उद्योग-व्यापारउदीम चहुबाजूने बेफामपणे वाढवत नेणाऱ्या या धनदांडग्या गुजराथीभाषिक जमातीकडून आपल्याच महाराष्ट्रातून आपली ‘गठडी’ वळली जाण्याची मोठी शक्यता ‘हाऊडी’च्या पार्श्वभूमीवर समोर उभी ठाकलीय….

१९७० नंतर, महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसाला ढोंगी, दलाली व भावनिक राजकारणाच्या बळावर हातोहात फसवून, ज्यांनी अवघा महाराष्ट्रच विक्रीला काढला, गुजराथीभाषिक जमातीला महाराष्ट्रात मुक्त संचारासाठी टक्केवारीतून राजाश्रय देऊन उद्योग-व्यापारउदीमावर संपूर्ण ताबा बहाल केला व सामान्य मराठी श्रमिकांचं अतोनात शोषण होऊ दिलं, त्या महाराष्ट्रातील दोन राजकारणी घराण्यां’चं (मुंबईकर व बारामतीकर), राजकारणात काय करायचं… त्यांचं ‘राजकीय-श्राद्ध’ घालायचं की, अजूनही त्यांचे अंधभक्त होऊन त्यांना गळ्यात लटकवून फिरायचं… याचाही फैसला, या “हूस्टन, हाऊडी मोदी”च्याच निमित्ताने तमाम मराठी माणसांना आता करावाच लागेल… त्यापासून, त्यांची सुटका नाही; अन्यथा, ‘अनर्थ’ अटळ आहे!!!

                       …. राजन राजे  (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)