इथून पुढे, त्याचा पृथ्वीवरील रंगमंचावरचा, दुसरा खलनायकी-अंक सुरु होतो… तो म्हणजे, “आधुनिक माणूस, हा पृथ्वीच्याच गर्भात वाढलेला आणि पृथ्वीच्या पोटात शिरलेला भयंकर ‘विषाणू’ या रुपाने!”
…असा एक विषाणू की, जो AIDS, अँथ्रॅक्स्, इबोला यापेक्षाही सहस्त्रपटीने खतरनाक व प्राणघातक ‘संसर्गजन्य विषाणू’ असून, त्याने संपूर्ण वसुंधरा ‘ज्वराग्रस्त’ झालीय… तिचा, ज्वर अथवा ताप, आता टिपेला पोहोचायला लागला असून (ज्याला, “जागतिक-तापमानवाढ” असं म्हणतात), त्यातून मानवासहित सजीवसृष्टीचा संपूर्ण संहार झपाट्याने अनिवार्य ठरु पहातोय!
तो कसा घडेल, कशातून घडेल? तो घडेल असं नव्हे; तर, दररोज घडतोच आहे, तो घडतोय पंचमहाभूतांच्या (हवा, पाणी, जमीन, प्रकाश, आकाश) खवळण्यातून…. असह्य तापमानवाढ, वादळे, भूकंप, तूफान, चक्रीवादळे, ज्वालामुखींचे उद्रेक, ओझोन थराची भगदाडे, समुद्रीजलाचे आम्लीकरण, अतिवृष्टी, दुष्काळ, रासायनिक-आण्विक-विद्युतचुंबकीय प्रदूषण, जलप्रलय इ. इ.
…’आधुनिक मानव’ नावाचा हा ‘सैतान’, हा ‘विषाणू’ रोखला तेव्हाच जाईल; जेव्हा, त्याची इतिश्री (शेवट) पृथ्वीमातेची सहनशीलता संपूर्णतया संपुष्टात आल्यानंतर होईल, तेव्हाच… तेव्हा, सगळंच संपलेलं असेल…. उरली असेल उजाड, विराण, एकाकी, विदग्ध पण, तरीही ‘रोगमुक्त’ पृथ्वी… जसं, संसर्गजन्य रोगानं जर्जर झालेलं एखादं कलेवर (प्रेत) भडाग्नीत भस्मसात होताच, रोगकारक सगळे जिवाणू-विषाणू जळून नष्ट व्हावेत अन् प्रेत ‘रोगमुक्त’ रक्षास्वरुप व्हावं… तद्वतच !!!
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)