‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याच्या मागणीच्या निमित्ताने……

‘शिवाजी’, हे मराठी घराघरात शिरलेलं हक्काचं नुसतं ‘नाव’ नाही, मराठी नीतिमत्तेचं आणि बुलंद शौर्याचं नुसतं ‘गाव’ही नाही… तो आहे, प्रत्येक मराठी हृदयाचा प्रेमानं घेतलेला ‘ठाव’!!!

… ओसंडून वहाणाऱ्या अंतर्यामी प्रेमाला वरकरणी आदराची ‘क्षिती’ नाही, त्यामुळेच केवळ ‘शिवाजी’ उच्चारल्यानं कुठल्याही अनादराची काडीमात्र ‘भिती’ही नाही! छत्रपती शिवाजी महाराज, या नावात उत्तुंग आदर ओतप्रोत भरलेला जरुर आहे… तसा तो असावाच; पण, आमच्यासारख्यांनी, ज्यांनी रक्तात शिवछत्रपतीना खरंखुरं (केवळ, शिवसेनेसारखं, राजकारणात मतं मिळवण्यासाठी नव्हे) भिनवून घेतलंय, त्यांना प्रेमाचा, हक्काचा एकेरी ‘शिवाजी’ किंवा फारतर, ‘शिवछत्रपती’चं जास्त भावतो, हे ही त्रिवार सत्य आहे… जसं, ‘श्रीकृष्ण’ म्हणण्यापेक्षा, आपला हक्काचा मार्गदर्शक व पाठीराखा म्हणून फक्त, कृष्ण किंवा कान्हा अशी एकेरी साद घालणं अधिक भावावं, रुचावं तद्वतच… म्हणूनच तर, आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या मुखपत्राचं नाव “श्रीकृष्णार्पणमस्तु” न ठेवता, आपण प्रेमाच्या, जवळिकेच्या भावनेनं “कृष्णार्पणमस्तु” असंच ठेवलय !!!

संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…. राष्ट्रांतर्गत राष्ट्र, “स्वायत्त-महाराष्ट्र”… “शिवछत्रपती राष्ट्र”!!!

II जय महाराष्ट्र, जय हिंद II

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)