‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट बिल’’ (CAB) किंवा आताचं त्याचं, ‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट’’ किंवा ‘‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’’त झालेलं रुपांतरण; हे, भाजपा राजवटीत अनेक समस्यांनी याअगोदरच कमालीच्या त्रस्त असलेल्या भारतात, अत्यंत खतरनाक अशा धर्माधारित ‘ध्रुवीकरणा’ला भयंकर चालना देणारी देशविघातक ‘बाब’ आहे…. हे गल्लीतला शाळकरी असलेला अथवा नाके तापवणारा एखाद्या ‘बाब्या’ही सांगेल!
पण, सध्या अति चर्चाचर्वित होऊन (जे ‘भाजप’च्या पथ्यावरच पडतय) चावून चोथा झालेल्या CAB अथवा CAA ची गुणात्मक-दुर्गुणात्मक छाननी करण्याचा मोह टाळून, ‘‘धर्मराज्य पक्षा’’च्या व्यासपीठावरुन सदरहू विधेयकाला कडाडून विरोध करणाऱ्यांना, काही थेट प्रश्न, यानिमित्ताने विचारु इच्छितो……..
विशेषतः, हे प्रश्न अलिगढहून १९२५ साली दिल्लीत स्थलांतरित झालेल्या आणि सध्या CAA विरोधी आंदोलनात हिंसाचारामुळे व पोलिसी अत्याचारामुळे जगभर गाजत असलेल्या ‘जामिया मिल्लिया’ व उ. प्रदेशच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना खास करुन आहेत. तत्पूर्वी थोडं, या ‘जामिया मिल्लिया’विषयी व अलिगढ मुस्लिम विद्यापीठाविषयी जाणून घेणं, औत्सुक्याचं ठरावं. ‘जामिया’ शब्दाचा अर्थ ‘विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ’ व ‘मिल्लिया’ म्हणजे ‘राष्ट्रीय’… म्हणजेच, ‘जामिया मिल्लिया’चा अर्थ ‘राष्ट्रीय विद्यापीठ’’. ही देशातली अव्वल दर्जाची शिक्षणसंस्था असून तिथे ५६ Ph.D, ८० मास्टर्स, १५ मास्टर्स डिप्लोमा, ५६ पदवी आणि शेकडो डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात. ‘जामिया’चा ‘मास कम्युनिकेशन’ हा अभ्यासक्रम, भारतातील सर्वोत्तमांपैकी एक मानला जातो. भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी ‘जामिया मिल्लिया’ नावारुपाला आणली तर, मणिपुरच्या राज्यपाल असलेल्या भाजपाच्या डॉ. नजमा हेपतुल्ला या अनेक वर्षे या विद्यापीठाच्या कुलगुरु होत्या. तर, मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थापन केल्या गेलेल्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने मा. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, सिनेकलाकार नसरुद्दीन शाह, पाकिस्तानचे मा. अध्यक्ष अयूब खान, ख्यातनाम इतिहासकार व निधर्मी विचारवंत इरफान हबीब यासारखे एकेक दिग्गज समाजाला आजवर दिलेत.
CAB किंवा CAA विरुद्ध एवढं तीव्र आंदोलन करणारे, खालील मूलभूत बाबींविरुद्ध आंदोलन करताना का दिसत नाहीत…???
१) विनाशकारी जागतिक हवामान बदलाच्या सध्याच्या कालखंडात निसर्ग-पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून जीवनशैली-विकासाचं प्रारुप-अर्थव्यवस्था यासंदर्भात आमूलाग्र बदल व लोकसंख्या-नियंत्रण…
२) भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनलोकपालासारखी सशक्त ‘लोकपाल-यंत्रणा’ व ‘अर्थक्रांती-विधेयका’सारख्या क्रांतिकारी अर्थसंरचना…
३) गुलामगिरी व नव-अस्पृश्यता स्वरुप असलेल्या कंत्राटी-कामगार पद्धतीचं (CONTRACT-LABOUR SYSTEM) आणि ‘नीम’चं (NEEM….National Employability Enhancement Mission नव्हे; तर, National ‘Exploitation’ Enhancement Mission) चं युध्दपातळीवरुन निर्मूलन व कॉर्पोरेटविश्वातील ‘कंपनी-दहशतवादा’चा (Corporate-Terrorism) अंत…
४) शिक्षण आणि आरोग्यसेवेचं खाजगीकरण रोखून त्यांचं जनसामान्यांच्या हितासाठी ‘राष्ट्रीयीकरण’ करणे… ‘‘कल्याणकारी-राज्य’’ (Welfare-State) संकल्पना पुनरुज्जीवित करुन तळागाळातील वर्गाला दिलासा देणे…
५) देशात अमानुष थैमान घालणारी ‘आर्थिक-विषमता’’ नष्ट करण्यासाठी कॉर्पोरेट-विश्वात वेतन-संरचनेत किमान व कमाल वेतनात १ : १२ सारखं संतुलित प्रमाण कठोरपणे राखणे व गरीबी-रेषेप्रमाणे उच्चतम ‘श्रीमंती-रेषे’चीही आखणी करणे…
यासारख्या, जीवनाच्या आसाला भिडलेल्या व अवघ्या जगण्याची ‘कोंडी’ करणाऱ्या समस्यांविषयी आंदोलन करताना, हे कुठे शेपूट घालून बसलेले असतात? जर, या मूलभूत बाबी घडल्या तर, आपसूकच बीजेपी-RSS काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसारख्या सगळ्याच प्रस्थापित राजकीय पक्षांचा समाजघातकी प्रभाव झपाट्याने ओसरत जाईल व जनसामान्यांचं जगणं सुसह्य होईल!
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या, जामा मालिया वा सध्या अन्यत्र देशभर आंदोलनाचा भडका उडालेल्या अन्य विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना, हे कधि कळणार की, ते जेव्हा शिकून, सवरुन विद्यापीठातून बाहेरच्या जगात प्रवेश करतील; तेव्हा, ते असतील, या रक्तपिपासू-शोषक (Vampire-State System) व्यवस्थेच्या ‘कोंडवाड्या’तली मुकी जनावरं! ….त्याविरुद्ध, कधि तुम्ही आवाज उठवणार? कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष असो… मग तो, काँग्रेस पक्ष (‘भाजपा’ तर उघडानागडा भांडवलदारांचाच बटीक व लोकशाहीचा मारेकरी असल्याने, त्याच्याकडून काही अपेक्षा बाळगणे म्हणजे, बैलाकडून दुधाची अपेक्षा बाळगणे होय) असो, शिवसेना असो, अन्यथा कुठलाही निळेपिवळे झेंडेवाले पक्ष असोत अथवा अगदी स्वतःला डावे म्हणून मिरवून घेणारे ‘कम्युनिस्ट’ (ते ही याविरुद्ध फक्त, अंगवळणी पडलेल्या सवयीने, तोंडदेखली एक दिवस कामगार-कर्मचारीवर्गाच्या ‘राष्ट्रीय संपाची हाक’ देण्यापलिकडे काहीही करणार नाहीत… आणि, ते सुद्धा भांडवलदारांचे ‘दलाल’ असलेल्या शिवसेना व भाजपाच्या कामगार-संघटनांना सोबत घेऊनच) असोत अथवा आजकालचा अरविंद केजरीवालांचा ‘आप’सुद्धा याबाबत काही करताना दिसला, तर ती फारच आश्चर्याची बाब ठरेल, एवढं संतापजनक व निराशाजनक वातावरण असताना, आपण सारे ‘‘साप समजून भुई थोपटू’’ पहातोय. माणूस आणि निसर्गाच्या शोषणाविरुद्ध ‘‘शून्य तडजोडी’’चं (Zero-Tolerance) धोरण आखणं, ही काळाची निकडीची गरज असताना… आमची सगळी आंदोलनात्मक ऊर्जा, संसाधनं व वेळ भलतीकडेच खर्च होताना दिसतोय, हे दुर्भाग्याचं लक्षण होय!
हे मान्यच आहे की, सखोल चिकित्सा केल्यास CAA हे भाजपा-RSSचं फार भयानक षडयंत्र आहे. त्यात वाद घालण्यासारखं काहीही नाही… ते तसं आहेच. भाजपा-RSSवाल्यांचे कायमच ‘‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळेच असतात’’! भाजपा-RSS, ही या देशातली. ‘‘खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं’’ करणारी अत्यंत खतरनाक व धोकादायक अवलाद आहे… एवढं सांगितलं तरी बस्स झालं!
मात्र त्याविरुद्ध, राष्ट्रपिता म. गांधींच्याच अहिंसेच्या शिकवणुकीवर आधारलेली राजकीय जनजागृती देशभर केली जायला हवी. त्यात हिंसेला बिलकूल थारा नसावा आणि केवळ त्यातच आपली सगळी ऊर्जा, संसाधनं पणाला लावणं, तळागाळातील समाजाला आजच्या स्थितीत परवडणारं नाही.
देशाबाहेरच्या पाकिस्तान, अफगाणिस्थान आणि बांगलादेशच्या बिगरमुस्लिम हिंदू, जैन, शीख, बौद्धांचा एवढा ‘निवडक’ (Selective) खोटा कळवळा दाखवणाऱ्या (म्यानमार, श्रीलंकेतील स्थलांतरांविषयी मात्र कमालीचा आकस) या भाजपा-RSS प्रवृत्तींनी, या देशातल्या तळागाळातील हिंदुंची कधि काळजी व्हायलीय? …तर, त्यांना देशाबाहेरील हिंदुंची खरंच एवढी काळजी वाटावी?? सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या या भाजपा-संघीय सरकारचा हा धार्मिक-विद्वेष पसरवून मतांचं ‘ध्रुवीकरण’ करण्याचा, हा भयानक राजकीय डावपेच आहे, बस्स! शेकडो वर्षे अस्पृश्यतेच्या अमानुष गुलामगिरीत व कर्मकांडे-अंधश्रद्धांचा फैलाव करत बहुजनांना कायमचं अज्ञानाच्या अंधारात ढकलून अनन्वित शोषण करणारी, हीच ती, पूर्वसुरींच्या पिढ्यापिढ्यांची आजची भाजपा-RSSची पिलावळ होय. आजही त्यांचे, तेच संतापजनक व घृणास्पद धंदे ‘कॉर्पोरेट-विश्वा’त व अन्यत्र, सर्वच ठिकाणी सुरु आहेतच.
शंभर-दिडशे वर्षात ब्रिटीश वसाहतवाद्यांनी भारतातील हिंदू-मुस्लिम युती तोडण्यासाठी, या अशा शक्तिंनाच हाताशी धरुन भारतीय समाजमानसात मुसलमानांबद्दल कमालीची द्वेषभावना पेरली आणि त्याचे आज हिंदू-मुस्लिम, तुम्हीआम्ही सगळेच बळी आहोत! धर्मांधतेवर आधारलेली हिंसा कोणीही करो, ती कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, शिवछत्रपतींच्या बाण्याने अत्यंत कठोरपणे मोडून काढलीच पाहीजे, यात दुमत असूच शकत नाही. पण, सरसकट सगळेच मुस्लिम धर्मांध, क्रूर, हिंसक असतात… हा कायम यांच्या बदमाषीपूर्ण प्रचाराचा भाग राहीलेला आहे. त्यातूनच, ब्रिटिशांप्रमाणेच, ‘‘फोडा आणि झोडा… राज्य करा’’, या षडयंत्री-आखणीनुसार तळागाळातील कामगार-कर्मचारीवर्गात (अलिकडे, त्यात व्हाईट-कॉलर सुशिक्षितवर्गालाही, त्यांनी खुबीने असंच खोटानाटा प्रचार व बदमाषी करुन वेगळं पाडलय) भेदभाव निर्माण करुन, या भाजपा-RSSवाल्यांनी कॉर्पोरेट-विश्वात व संपूर्ण प्रशासनात आपली राक्षसी पकड बसवलीय.
‘‘निसर्ग हाच धर्म आणि पर्यावरण हीच जात’’…. ही भावना सगळ्यांनीच वैश्विक स्वरुपात अंगिकारण्याची गरज असताना… जगभरात युरोप-अमेरिकेत त्यासंदर्भात, फार मोठी जनआंदोलनं उभी रहात असताना, आम्ही संसदेत काय करतोय…. तर, आम्ही असल्या उघड्यानागड्या नीच राजकीय फायद्यासाठी CAA सारखे संसदेत कायदे करतो किंवा देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे व्हायला आली; तरीही, मागासवर्गीयांमधल्या फक्त मूठभरांचं भलं करत, भारतीय समाजात जातीपातीचे सवतेसुभे कायम मजबूत ठेवणाऱ्या ‘राजकीय आरक्षणा’ला, पुढे अजून १० वर्षे मुदतवाढ देतो. ….संसदेबाहेर काय घडतं; तर, अशा भुक्कड-भुलभुलैय्या कायद्याविरोधात धार्मिकतेला साद घालत दिल्ली शहर, ईशान्य भारत व अन्यत्र हिंसक आंदोलनं करतोय. आणि, ते नेमकं, ‘मोदी-शहा’ या खरतरनाक राजकीय दुकलीच्या आणि त्यांचे बोलवते धनी असलेल्या BJP-RSSवाल्या दुढ्ढाचार्यांच्या चांगलचं पथ्यावर पडतय! मोदी-शहा आणि इतर BJP-RSSवाले, हे सगळे, रक्तपिपासू-शोषक व्यवस्था (Vampire-State System) चालवणाऱ्या ‘सैतानी-शक्ति’ आहेत… भांडवलशाही शक्तिंना चरण्यासाठी, शोषणासाठी रान मोकळं करुन देऊन मोकाट सोडणाऱ्या पृथ्वीतलावरील ‘पाशवी-शक्ति’ आहेत! म. गांधी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेशसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या हत्याही, अशाच प्रकारच्या प्रवृत्तींकरवी घडवल्या जाऊ शकतात. ‘‘आपले फुकटे अर्थपूर्ण हितसंबंध जोपासण्यासाठी, अगदी अलगद ‘कारस्थानी’वृत्तीने समाजमनात खोलवर इतर धर्मींयाबद्दल टोकाचा विद्वेष याच प्रवृत्ती पेरतात’’, हे पाहूनच महात्मा फुल्यांनी, सरकारी शाळांमध्ये अशा प्रवृत्तीचे व विशिष्ट जातीचे शिक्षक नेमू नयेत, अशी ब्रिटीश सरकारकडे जोरदार मागणी केली होती.
त्या तशा… या शोषक, हिंसक, षडयंत्री प्रवृत्ती नसत्या; तर, समाजातल्या तळागाळातील कामगार-कर्मचारीवर्गाचे (ज्यात, उच्चशिक्षित तरुणवर्गही आलाच) जे देशात आज अतोनात हाल चाललेत… त्यांचं उद्योग-सेवाक्षेत्रात ज्याप्रकारे ‘‘कंपनी-दहशतवाद’ अथवा ‘‘कॉर्पोरेट टेररिझम’’ (जो देशातल्या काश्मिरी अथवा नक्षलवादी दहशतवादापेक्षाही खतरनाक आहे) द्वारे, शोषण व अन्याय केला जातोय…. त्यावर, यांनी हातात सत्ता असल्याने प्रभावी इलाज केला असता. तो प्रभावी इलाज करणं सोडाचं… अहो, ‘मोदी-शहा’ ही ‘गुजराथी दुकली’ आणि त्यांना पुढे करणारे इतर BJP-RSSवाले, हेच तर या सर्व ‘कंपनी-दहशतवादा’चे आणि टोकाच्या शोषणाचे कर्ते-करविते आहेत! पण, दुर्दैवाने, त्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या मूलभूत व अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बाबींविरुद्ध कुणी फारसा आवाज उठवताना दिसत नाही. पण, जरा कुठे धर्म आणि जातीपातीचा ‘राजकीय वास’ आला रे आला… की, सगळे ‘राजकीय श्वान’ ठो ठो भुंकायला लागतात, हेच या देशाचं सर्वात मोठं दुर्दैवं आहे. त्यांनी याविषयी काही करु नये, बोंबलू नये, असं आमचं म्हणणं नाही; पण, या बिनमहत्त्वाच्या प्रश्नांवर आम्ही आमची एवढी ऊर्जा व्यर्थ खर्च करतो आहोत व ‘मोदी-शहा’कृत BJP-RSSच्या सापळ्यात आयतेच सापडतो आहोत… या करंटेपणाला काय म्हणायचं?
‘‘मुस्लिम समाज, संपूर्ण जगात कधिही कुठेही शांतपणे राहूच शकत नाही… मुस्लिम, मूलतःच कुराणातल्या शिकवणुकीनुसार ‘धर्मांध’ असतात आणि इतरे धर्मियांप्रति अत्यंत क्रूर व ‘असहिष्णू’ असतात’’, असा जो कायम विखारी प्रचार सातत्याने भाजपा-RSSवाले करत आलेले आहेत… त्यांना शिवछत्रपती-संभाजी महाराजांचा ‘जातधर्म-निरपेक्ष’ जाज्वल्य इतिहास दाखवा… ज्या ‘शिवराज्या’त सगळे जातधर्म अत्यंत गुण्यागोविंदाने रहात होते. ‘‘धर्मराज्य पक्षा’’चा दृष्टीकोन यासंदर्भात, थेट शिवछत्रपतींसारखाच आहे. जरा जरी कुणीही (मग, तो हिंदू असो वा मुस्लिम किंवा अन्य कुणीही) धर्मांधतेनं हिंसक कारवाया करु पाहील वा जबरदस्तीने अथवा आमिष दाखवून गोरगरिबांचं धर्मांतर करवू पाहील; तर, आमच्या ‘‘धर्मराज्या’’त ते अत्यंत कठोरपणे मोडून काढलं जाईल. अशी कृत्ये करणाऱ्यांच्या कल्पनेतही नसेल, एवढ्या कठोरतेनं त्यांना तत्काळ शिक्षा केली जाईल, जेणेकरुन, पुन्हा अशी वागण्याची हिंमत कुणाची होऊ नये. याबाबत, गुन्हेगार कोण, कुठल्या ‘जातधर्मा’चा आहे… याचा कवडीमात्र विचार केला जाणार नाहीच… शिवछत्रपतींची राजनीति, ‘‘जो चुकला, त्याला ठोकला’’ अशीच राहीलेली आहे!
दुसरा, यांच्या प्रचाराचा मुद्दा असतो तो, मुस्लिमांमधील अधिकच्या गुन्हेगारी प्रमाणाचा. त्याबाबतही, आम्ही सातत्याने सांगत असतो की, त्यावर भारतीय गुन्हेगारी दंडसंहितेतील (Criminal Procedure Code) ‘ब्लॅकस्टोन-तत्त्वा’चा फेरविचार केला जाऊन, त्यात गुन्हेगारांना ना मोकाट सुटता येईल, ना पोलिस अधिकाऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करता येतील; तसेच, खरे गुन्हे दाखल करण्यात ना चालढकल करता येईल अथवा गंभीर गुन्ह्यात जाणिवपूर्वक सौम्य गुन्हेगारी-कलमे टाकता येतील… अशा क्रांतिकारक सुधारणा व्हायलाच हव्यात! गुन्हेगारी निपटून काढण्यात बदमाषी करायला थाराच मिळणार नाही, अशी विलंब व भ्रष्टाचारमुक्त सक्षम-व्यवस्था करणं, बिलकूल अशक्य नाही. पण, हे करण्याची कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही; कारण, त्यातूनच, त्यांची ‘दमन-यंत्रणा’ (Muscle-Power) व समाजावरची ‘सैतानी-पकड’ तयार होत असते! सोबतीला, मुस्लिम समाजमानसातील अज्ञान, शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य, मुल्लामौलवींचा घातकी प्रभाव, लोकसंख्या-नियंत्रणाचा अभाव वगैरे बाबींवरही मूलभूतरित्या प्रभावी इलाज, कुणाचाही मुलाहिजा न राखता, राजकीय पातळीवरुन केले गेलेच पाहीजेत. पण, हे भाजपा-RSSवाले, हे असलं काही करणार नाहीत. फक्त, धार्मिक-विद्वेषाची चूल पेटवून त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतील… मग, कुणाचे किती जीव जातायत, किती अमानुष क्रौर्याचं थैमान देशात माजतय… याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही. फक्त, आपला नीच, अधम राजकीय स्वार्थ साधला गेल्याशी मतलब!
तेव्हा, ‘‘देशातल्या (विशेषतः, महाराष्ट्रातल्या) तरुणवर्गा, जागा हो आणि सजग राहून आयुष्याची वाटचाल कर… अन्यथा, या समाजघातकी प्रवृत्तींनी तुझ्या भविष्यातल्या जगण्याची वासलात लावलेलीच आहे, हे नीट समजून घे !!!’’
II जय महाराष्ट्र, जय हिंद II
….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)