सर्वत्र व्हायरल झालेल्या वरील संदेशावर, ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…आपल्या चरणी सादर!
——————
…मुळातूनच ‘भांडवली-व्यवस्था’, हे मनुष्यजातीला जडलेलं, स्वतःच एक भयंकर ‘व्यसन’ असल्याने…तदनुसारच, आजची ‘कौटुंबिक-व्यवस्था’ देखील आत्मकेंद्रित व चंगळवादी बनत चाललीय, यात नवल ते काय?
एकूणच भांडवली-व्यवस्थेतील अमानुष स्पर्धेला आपल्या अंगी भिनवूनच, त्याला समांतर अशी आपली आजची कौटुंबिक-व्यवस्था पुढे धावू पहाते. शिक्षण घेत असतानाचे भयानक ताणतणाव आणि आपल्यापेक्षा वयाने थोडे मोठे असलेल्या, शिकूनसवरुन नोकरीला लागलेल्यांचे… काॅर्पोरेटीय नोकरीतील गलिच्छ राजकारणामुळे व कंपनी-दहशतवाद अथवा Corporate-Terrorism पोटी होणारे भयंकर हाल, ती पहात असते. तसेच, कंपन्यांमधील ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धती’तील घृणास्पद शोषण, निर्ममता, संवेदनशून्यता; यामुळे झालेलं, पुढच्या पिढीचं आत्यंतिक ‘असुरक्षित’ जीवन, ही आजची शिकणारी नवतरुणपिढी पहात असते. ती पहाते, ते वयाने आठदहा वर्षे मोठे असणाऱ्या तरुणपिढीचे, परतीचे कापले गेलेले दोर, अचानक त्यांना गमवाव्या लागणाऱ्या नोकऱ्या…त्यांचा दिशाहीन असा पुढचा प्रवास, ज्याला अंतिम ‘गंतव्य-स्थान’ कुठलं, हे त्यापैकी कुणालाच काहीकेल्या उमगलेलं नसतं आणि हे सगळं पहात पहात शिकणाऱ्या, या तरुणाईच्या डोळ्यासमोर अंधार दाटत जातो. आजुबाजुचा नवश्रीमंतांचा चंगळवाद-जीवनशैलीचा उन्माद, नको त्या नवथर वयात, सतत खुणावत रहातो आणि त्याचा मोह टाळणं, त्यांना स्वाभाविकच खूप अवघड जातं, जाणारच. त्याचाच परिपाक म्हणून, त्यांच्या हातून वेडीवाकडी पावलं टाकली जातात. आपली साठी-सत्तरीतील पिढी, त्यादृष्टीने पहाता सुदैवी म्हणावी लागेल आणि श्रीमंत व संसाधनसंपन्न असूनही, ही आजची तरुणपिढी दुर्दैवी म्हणावी लागेल. आपण नैसर्गिक वातावरणात अल्पसंतुष्टता बाळगून जगलो, म्हणूनच सुसंस्कृत राहू शकलो. हे आजचं, घरोघरी व्यक्तिगत-अहंकाराचा विस्फोट झालेलं चंगळवादी-वातावरण, आपल्या प्राक्तनात असतं; तर, फार काही वेगळं न होता, आपणही बर्यापैकी तसेच घडलो असतो! आपल्याला अगदी एकत्रकुटुंब पद्धतीचा प्रसंगी नसला; तरीही, कौटुंबिक अकृत्रिम प्रेमाचा लाभ झाला व आजच्यासारख्या क्रौर्यपूर्ण-कठोरतेनं भरलेल्या अतिरेकी स्पर्धात्मक वातावरणाचा संसर्ग, बव्हंशी झाला नाही, हे विसरुन चालणार नाही.
धीरुभाई अंबानींना, “तुमचा रिलायन्स-साम्राज्य विस्ताराचा प्रवास, नेमका कुठे थांबणार आहे?”, असा एका चौकस पत्रकाराने प्रश्न विचारताच, अभावितपणे धीरुभाई बोलून गेले की, “मला फक्त पुढे जात रहाणं, एवढंच माहीतेय!” …ज्यांना, पुढे नेमकं कुठे व कुठवर जायचं, हेच ‘गंतव्य-स्थान’ माहित नसतं…तेच आपले आजचे आदर्श किंवा भाग्यविधाते असतात; “जगण्याच्या मूलभूत गरजाच केवळ, भागवणारं संजीवक-जीवन जगा (Need-Based Life…मर्यादित गरजांचं जगणं)”, असं म्हणणारे म. गांधी वगैरे कुणी नव्हेत…ही, रोज अनावश्यक नवनव्या गरजांचा (अतिशय मादक व आकर्षक जाहिरातबाजीतून ‘भांडवली-व्यवस्थे’ने वाढवत नेलेल्या) गुणाकार चक्रवाढ श्रेणीनं करणारी, दुर्दैवी व भयावह सद्यस्थिती आहे आणि त्यातूनच, उद्भवलेली ‘उडता पंजाब’सारखी, ‘उडता महाराष्ट्र’, ही परिस्थिती आहे!
…जेव्हा आपलं ‘भारतीय-अध्यात्म’ (आजच्या राजकारणातलं बनावट-बेगडी ‘हिंदुत्व’ नव्हे), आपल्याला ‘मोक्ष’ प्राप्तीसाठी आतून ‘विकास’ (आत्मिक-विकास) साधायला शिकवत असतं किंवा तेच आपल्या आयुष्याचं ‘इप्सित’ असतं…तेव्हा, तरुण मनामनांचं व पर्यावरणाचं भयंकर प्रदूषण करणार्या व ‘भौतिक-विकास’ साधण्याचा अट्टाहास करणाऱ्या, नफेखोर भांडवलदारवर्गाला मागे वळणं किंवा थबकणं-थांबणं…हे ‘कपाळमोक्ष’ करुन घेण्यासारखंच वाटत रहातं (भांडवली-व्यवस्थेचं तेच, अजब आत्मघातकी व समाजघातकी समीकरण आहे)…अशारितीने, ही ‘भांडवली-व्यवस्था’ एका अंधःकारमय दरीत पुढे चाल करत उडी मारायला निघालीय…तेच तिचं अटळ प्राक्तन असताना, तरुणाईला या कोवळ्या वयात ते उमगू शकणं अशक्यप्रायच असतं! आणि म्हणूनच, ही नवतरुणपिढी, अर्थकारणावर मगरमिठी घालून बसलेल्यांनी…निर्माण केलेल्या विधिनिषेधशून्य-नीतिशून्य बाजारपेठीय ‘भांडवली-सापळ्या’त, नकळत अचूक अडकून पडते (आठवा, गौतम अदानीच्या खाजगी मालकीच्या गुजरामधील मुंद्रा-बंदरात अनेकदा सापडलेले हजारो कोटींचे अंमली-पदार्थ)… तेव्हा, “साप समजून भुई कितीकाळ आपण थोपटत रहाणार”, हा मूलभूत प्रश्न आहे. “व्यवस्थेनं निर्माण केलेले प्रश्न, ‘व्यवस्था-बदल’ घडवूनच सुटू शकतात (No use, treating the symptoms…let’s treat the roots of the disease!)…अन्य सगळेच मार्ग, काळाच्या पटलावर तकलादू ठरत जातात”… धन्यवाद!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)