‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’…

स्टेट बँकेच्या १२ हजार कोटींच्या ‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा भाजपा कथित व रचित… ‘दिल्ली-दारुकांडा’तल्या सैतानी-सत्तेच्या ‘दारुची धुंदी’ डोळ्यावर चढलेल्या; पण, आतून अत्यंत ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधारी सैतानांना…२०२४च्या लोकसभा-निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याचं अजून दुसरं प्रभावी लक्षण, काय असू शकेल…???

या देशाला घडवलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं; त्यात वकिलीपेशाचं मोठं व महत्त्वपूर्ण योगदान होतं. डॉक्टर्स, प्राध्यापक-शिक्षक, तत्त्वज्ञानविषयावरील तज्ज्ञ मंडळी (नेताजी सुभाषचंद्र बोस, हे तत्त्वज्ञान विषयाचे पदवीधर होते) यांच्यासोबतच, ‘वकिली पेशा’तूनच प्राधान्याने जास्त बुद्धिजीवी मंडळी राजकारणात येत होती…त्यांना समाजाची नाडी अवगत होती व समाजाप्रति ‘जाण, ज्ञान आणि भान’ होतं; म्हणूनच, ते घडत होतं! तेव्हा, डाॅक्टरी, वकिली व प्राध्यापकी-शिक्षकीपेशाला समाजात फार मोठा मानसन्मान होता व बव्हंशी राजकारणी, याच उच्चशिक्षितवर्गातलेच असायचे. एकूण ३८९ घटना-समिती सदस्यांपैकी २५० सभासद, हे वकिलीपेशातूनच आलेले होते. घटना-समितीचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र प्रसाद, हे प्रख्यात वकीलच; तर, घटना-मसुदा समितीचे अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, हे ही बॅरिस्टर होते.

दादाभाई नौरोजी, सुंदरनाथ बॅनर्जी, मोतीलाल नेहरु, लो. टिळक, शरदचंद्र बोस (नेताजी सुभाषचंद्रांचे बंधू), सी. गोपालाचारी, लाला लजपतराय, मदनमोहन मालवीय, सी. आर. दास, सैफुद्दीन किचलू, भुलाभाई देसाई, म. गांधी, राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरु, कैलासनाथ काटजू (मार्कंडेय काटजूंचे आजोबा), अली बंधू (शौकत अली व मोहम्मद अली जोहर), अजमल खान, व्ही. जे पटेल, प्रताप गुहा राॅय, मौलाना आझाद…असे अनेक नामांकित वकील, स्वातंत्र्य-चळवळीत मोठं योगदान देणारे महान अग्रणी ठरले होते.
…ते देश घडवणारे, देशाप्रति समर्पित असलेले वकील-विद्वज्जन कुठे आणि आजचे मुकूल रोहटगी, हरीश साळवे, जेठमलानी, तुषार मेहतांसारखे व्यावसायिक यशाच्या ‘विकारी-धुंदी’त देश बुडवणारे वकील कुठे? ‘पाद्यपूजा’ करण्याच्या लायकीच्या या तथाकथित बुद्धिमंत वकिलांनी…संपूर्ण वकिलीपेशालाच भयंकर काळीमा फासलेला आहे. श्रीकृष्णाने गीतेत वर्णिल्याप्रमाणे, ही ‘सत्व’गुणाचा पूर्ण अभाव असलेली व रज, तम गुणांनी (खरंतरं, अवगुणांनी) युक्त, अशी ‘महापातकी मंडळी’ आहेत. यांच्याच ‘समाजघातकी’ बुद्धिकौशल्यामुळे व सकल समाजाप्रति असलेल्या संवेदनशून्य-निगरगट्टवृत्तीमुळेच, आजचे दिल्लीश्वर हुकूम’शहा’ (गुजराथी-लाॅबी) भयंकर मातलेत!
…ज्यांच्या हाती, भारताची लोकशाही व राजयघटनेचं पावित्र्य राखण्याची; तसेच, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी; त्यांनीच, या देशाचा ‘घात’ केलेला आहे. ‘भांडवली-व्यवस्थे’ची तळी उचलून ‘वाळवी’सारखं, या देशाला ‘फोडा व झोडा’ या नीतिने विद्वेष-गद्दारीचं विष पेरत साफ पोखरुन ठेवलंय.
…स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी, ८०% भारतीय जनता निरक्षर होती आणि आता देशात ८०% पर्यंत साक्षरता वाढल्यानंतर; तुषार मेहता, हरीश साळवे, मुकुल रोहटगी, महेश जेठमलानी वगैरे तथाकथित बुद्धिमंत वकिलांची औलाद, या देशात दुर्दैवाने पैदा होऊन सर्वोच्च न्यायालयात धुमाकूळ घालताना राजरोस दिसत्येय! ही वकिली-औलाद रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेकडून (प्रामुख्याने, गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाकडून) पोसली जातेय आणि अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, कंगना राणावतसारख्या निलाजरेपण अंगी भिनलेल्या ‘विकाऊ’ कलाकार-खेळाडूंकडून; तसेच, अनेक ढोंगी-बनावट धर्मसंप्रदाय चालवणाऱ्या बापू, बाबाजी, सद्गुरु, धर्मगुरुंकडून… उत्तेजना प्राप्त करतेय.
आपल्या देशात बुद्धिमान लोकांची बिलकूल कमतरता नाही; पण, चांगली बुद्धी असणाऱ्या बुद्धिमंतांचा फार मोठा दुष्काळ पडलेला आहे, तो असा! त्यात वकील आहेत, डाॅक्टर्स आहेत, शिक्षक-प्राध्यापक, कंपनी-व्यवस्थापक, तंत्रज्ञ असा सगळाच बुद्धिजिवीवर्ग आहे!

आज त्याचीच परिणती म्हणून या राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु नानक, गांधी-नेहरु-मौलाना आझाद-नेताजी सुभाषबाबू, भगतसिंग, आंबेडकरांच्या देशात…हुकूमशाही, अन्याय-अत्याचार-शोषणाचा नंगानाच सुरु आहे.
…सांगा, कुठल्या ‘हिंदुत्वा’च्या परिभाषेत हा ‘नंगानाच’ बसू शकतो? हिंदुत्वाच्या परिभाषेत नव्हे; तर, हा नंगानाच ‘हिंदुत्वा’च्या बुरख्याआड चाललेल्या राक्षसी ‘हिडीसपणा’च्या परिभाषेत नक्कीच बसू शकेल. कृपा करुन हिंदूधर्माला बदनाम करण्याचं महापातक करु नका…हिंदूधर्म अथवा महन्मंगल ‘भारतीय-अध्यात्म’, ही ‘कुबुद्ध’ भाजपाई-संघीय लोकांच्या मर्यादित बुद्धीच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. ते फक्त, परंपरेने चालत आलेले आत्यंतिक स्वार्थप्रेरित वर्णवर्चस्ववादी-शोषक धर्मसंप्रदायी ‘ठेकेदार’ आहेत किंवा पाशवी सत्तेचे ‘सौदागर’ आहेत, बस्स्…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)