(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….)

‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ यांनी ‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास’, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज’, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire State System) आणि डोळ्यावर कातडं ओढून, कानात बोळे घालून बसलेल्या….. या देशातल्या, ‘जातधर्मा’त आणि ‘चंगळवादी-जीवनशैली’त अडकून पडलेल्या, स्वार्थी-बेजबाबदार भारतीय जनतेकडून भागवली जाईलच !!!

२४ जून-२०१८ पासून उपोषणाला बसलेल्या ‘संत गोपालदासां’ना या आठवड्यात दोनचार दिवसांच्या अंतराने, दुसऱ्यांदा एम्स (AIIMS) इस्पितळात हलविण्यात आलेलं आहे. गेले काही दिवस, गंगेच्या रक्षणासाठी सर्व उपाय थकल्यावर, अखेरीस परमेश्वरालाच साकडं घालण्यासाठी, पाण्याचाही त्याग करत, अनंताच्या प्रवास करायला ‘संत गोपालदास’ सिद्ध झालेत!

त्यापाठोपाठ, ‘संत शिवदासजी’ आणि त्यानंतर, भरतभूमितल्या अशा अनेक जातिवंत आणि जाज्वल्य संतांनी प्राणार्पण करण्याची तयारी केलीय. परिस्थिती एवढी गंभीर आहे की, कधिकाळी भूलोकीची पवित्रभूमि मानल्या गेलेल्या या भरतभूमिला, या संतांच्या अतिशय ‘पावन-पवित्र रक्ता’चीच जणू तहान लागलीय, असं विदारक चित्र या देशात निर्माण झालेलं दिसतय…. नेमके आपण, कुठल्या दर्जाचे आणि लायकीचे ‘नागरिक’ आहोत? आपण, नक्की ‘नागरिक’च आहोत (कारण, ‘नागरिक’ या संकल्पनेत, काही किमान पातळीवरची संवेदना आणि सुसंस्कृतता गृहित धरलेली असते) की, ‘जातधर्मा’च्या नांवाने शिमगा करत इतरांचं व निसर्गाचं शक्य होईल तेवढं, जळवेसारखं आकण्ठ-निर्मम शोषण करत जगणाऱ्या ‘रानटी जमाती’ आहोत?? अहो, रानटी जमातीसुद्धा आपल्यापेक्षा एका बाबतीत अधिक भल्या व सुसंस्कृत म्हणायला हव्यात. त्या जमाती, ज्याच्या जीवावर आपण जगतो, त्या निसर्गाला पूजतात… मग, त्याच्या मुळावर उठण्याची गोष्ट त्यांच्या हातून कालत्रयी घडू शकेल? काल-परवापर्यंतची आपली मराठी-संस्कृतीही अशीच ‘निसर्गपूजक’ होती…. पण, ‘विकासा’चं व्यसन जडलं आणि इतरांचं अंधानुकरण करत मौजमस्तीच्या नादात आम्हीही पुरते बिघडलो….  आमच्याच अस्तित्वाच्या मुळावर उठलो! आधुनिकतेचे आणि बुद्धीवादाचे दांभिक व आपमतलबी मुखवटे धारण करत, आम्ही राजरोस निसर्गाला ओरबाडत जगतो… पर्यावरणाचा समतोल उध्वस्त करत भावी पिढ्यांचं अस्तित्व धोक्यात टाकणारे ‘विकासा’चे अल्पजिवी फायदे उपटत रहातो… मग, सवड काढून कुठली तरी प्रार्थनास्थळं गाठतो (मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार), नाहीतर कुठल्यातरी बनावट,  संत-सद्गुरु-बाबाजी-स्वामींच्या कळपात सामील होतो आणि स्वतःला ‘धार्मिक’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो (कदाचित, जर कुणाची निसर्गाप्रति, प्राणीमात्रांप्रति थोडी कुठे ‘संवेदना’ शिल्लक असलीच, तर त्यातून आतून जाणवत असलेली ‘अपराधीपणा’ची बोच थोडी सौम्य होत असावी).

या देशातली खरीखुरी “आध्यामिक जाणिव” नुसतीच क्षीण होत चाललीय असं नव्हे; तर, नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे! या विनाशकारी ‘विकास-प्रक्रिये’त, “जनसंख्या आणि जीवनशैली” च्या विस्तारण्याने (खरंतरं, विस्फोटानं)… “जल, जंगल, जमीन” आम्ही बुद्धीवादी अहंकाराने नासवत-उध्वस्त करत चाललोय. ‘तंत्रज्ञाना’ला, आम्ही ‘ब्रह्मज्ञान’ समजण्याची घोडचूक करुन बसलोय…. तंत्रज्ञानाचा आधार घेत आम्हीच, आता जणू या ब्रह्मांडाचे “ब्रह्मा, विष्णू, महेश” बनू पहातोय! तंत्रज्ञानातून उद्भवू शकलेल्या समस्या, तंत्रज्ञानानेच सहजी दूर करता येतील, या मस्तीने आपण “निसर्गाशी द्यूत खेळतो आहोत…. त्यातूनच, गंगानदीवरचे अनेक ठिकाणचे भलेमोठे जलविद्युत-प्रकल्प काय किंवा कोकणातल्या जैतापूरसारखे महाकाय अणुविद्युत-प्रकल्प काय, नाणारचा महाकाय तेलशुद्धीकरण-प्रकल्प काय…. असे सगळे तथाकथित विकास-प्रकल्प अस्तित्वात येत जातात… जे अंति, महासंहारक विनाश घडवणार आहेतच. म. गांधी आणि जे. सी. कुमारअप्पांसारखे त्यांचे शिष्य, १० हेक्टरपेक्षा मोठं धरण, असताच कामा नये, असे सातत्याने प्रतिपादन करायचे. “मोठी धरणे, ही आधुनिक भारताची मंदिरे होतं”, असं म्हणणाऱ्या भारताचे पहिले पं. नेहरूंचंही मत कारकीर्दीच्या उत्तरार्धात बदललं होतं. त्याकाळी, मोठ्या धरणांविरुद्ध कुठलीही जनआंदोलनं उभी राहीली नसताना, केवळ उद्भवलेली भीषण परिस्थिती पाहूनच पं. नेहरूंनी मोठं मन दाखवतं, आपलं मत बदललं होतं (कारण, पं. नेहरू हे अतिशय ज्ञानी, तरल व संवेदनशील पंतप्रधान होते… नरेंद्र मोदींसारखे संवेदनाशून्य नव्हते). नोव्हेंबर-१९५८ मध्ये केंद्रीय पाटबंधारे व जल महामंडळासमोर, “छोट्यामोठ्या प्रकल्पांचे होणारे सामाजिक परिणाम”, या विषयावर भाषण करताना…. पं. नेहरूंनी, मोठ्या धरणांसारख्या महाकाय प्रकल्पांना, स्वतःच उभारलेल्या “मंदिरांच्या मखमाली सजावटी”तून ओढून बाहेर काढत, थेट “अवाढव्यतेचा महारोग” असं विषादपूर्ण व अर्थपूर्ण संबोधनं दिलं होतं! भाषणात पुढे जात, “हा, विकासाची कास धरणाऱ्या भारतातला अत्यंत धोकादायक विचारप्रवाह” असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं होतं…. पण, या अशा अतिशय विचारगर्भ व महत्त्वपूर्ण बाबी आमच्यासमोर कधिचं मांडल्या जात नाहीत (संदर्भ: Nehru Memorial Museum and Library-1988).

आमची मोठी धरणं, आजवरचे मोठे जलविद्युत-प्रकल्प, उरल्यासुरल्या जंगलांच्या जमिनीची प्रचंड धूप होऊन त्यात साठलेल्या अफाट गाळामुळे, आता आमच्या मार्गातली मोठी धोंड ठरु लागलीयत. तरीही, आम्ही मागे वळून पहायला, थबकायला तयार नाही…. संत निगमानंद, संत ज्ञान स्वरुप सानंद, संत गोपालदास, संत शिवदास यासारखी जाज्वल्य संतमंडळी तसेच, जागतिक पर्यावरणतज्ज्ञ केव्हाचेच इशारे देत आलेत; पण, आम्ही बहिरे-आंधळे झालेले आहोत. आता तर, ‘संतमंडळी’ जगाच्या कल्याणासाठी ‘प्राणार्पण’ही करु लागलीत…. तरी आमचं अंधत्व दूर व्हायला तयार नाही, बहिरेपण संपायचं नांव घेत नाही!

तरीही, केरळातल्या ‘शबरीमला’ देवस्थानात महिलांच्या प्रवेशावरुन निरर्थक चर्चा झडत रहातात, महाराष्ट्रात ‘धर्माचे अधिकारी’ नव्हे; तर, डँबिस राजकारण्यांच्या हातात हात घालून बसलेल्या ‘धर्माचे ठेकेदार’ बनलेल्यांकडून संत रामदासांच्या नांवाने दंड’बैठका’ काढल्या जातायतं, कुणी ‘मोहनदास करमचंद गांधी’ नांवाच्या जाज्वल्य ‘बापू’ला दूर सारत बेगडी ‘बापू’ला जवळ करतायत…. ‘रामनाम’ चोपडीत लिहीत (अंतःकरणात रामाला न रुजवता) व्यर्थ आयुष्य खर्ची घालतायतं, साईबाबांचे अवतार म्हणवणाऱ्यांचे संप्रदाय गडगंज संपत्ती धारणकर्ते बनून जातायत.. “शिमगा संपला तरी कवित्व संपत नाही”, तसं संप्रदाय उभारणारा सरला तरी संप्रदाय, व्यवस्थेची ढाल हाती घेत, पुढे चाल करत रहातात….. या कुणाकुणालाही, खऱ्याखुऱ्या धार्मिकतेशी काहीही देणंघेणं नसतं! असते फक्त, सत्ता-संपत्तीकांक्षा (जी, राजकारण्यांशी जवळीक साधली की, आपसूकच लाभत रहाते आणि राजकारण्यांना त्यातून लाभतात हुकमी मतं) आणि बसल्या जागी धार्मिकतेच्या ‘दुकानदारी’ची कांक्षा! योग-प्राणायामाचा बाजार भरवत शेकडो नव्हे; सहस्त्र कोटींची संपत्ती उभारणारे, यमुनेच्या तीरावरचा निसर्ग बिनदिक्कत उध्वस्त करणारे…. ‘संत’ म्हणवून घेण्याच्या किंचितसे तरी योग्यतेचे असू शकतात काय? फारतर, त्यांना यशस्वी उद्योगपती वा व्यावसायिक म्हणू शकतो आपण!

खरीखुरी ‘धार्मिकता’ आणि आजचा सजीवसृष्टीच्या मुळावर उठलेला ‘विकास’ व तो ‘विकास’ घडवणारी ही आजची आधुनिक ‘व्यवस्था’…. हातात हात घालून, एक पाऊल तरी सोबत चालू शकेल ??? एवढी साधी बाब, आपल्याला समजून घेणं अवघड जात असावं? …की, आपण साऱ्यांनीच आपल्या आजच्या आधुनिक सोयिसवलतींसाठी झोपेचं सोंग कायमच धारण करायचं ठरवलय?

आपल्या सगळ्या धर्मग्रंथात आंतरिक विकासावर भाष्य आहे, असल्या विनाशकारी बाहेरच्या ‘विकासा’वर नव्हे! माणसाकडून… नियतीला, परमात्म्याला सजीवसृष्टीची काळजी घेण्याची अपेक्षा असणार की, अवघ्या सजीवसृष्टीचीच थडगी रचून मोजक्याच पिढ्यांनी ऐशोआराम करत बेगुमानपणे व निर्दयतेनं सगळं संपविण्याची?

विविध धर्मसंप्रदायींच्या तोंडातून, वरपांगीसुद्धा, गंगाकिनारीचे आमचे जाज्वल्य संत, गंगेसाठीच प्राणार्पण करत असताना चकार शब्द बाहेर पडू नये…. त्यातच, या संप्रदायांचं, ‘व्यवस्थे’शी ‘हातमिळवणी’ असल्याचं व्यवच्छेदक लक्षण स्पष्ट दिसतय. या सगळ्या संप्रदायांची काय औकात की, ते या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”शी (Vampire State System) पंगा घेतील??? ….जी, आज खऱ्याअर्थाने, तातडीची आणि नितांत अशी काळाची गरज बनलेली आहे! कुणी एक भारतातलं ‘ईशा’ नांवाचं फाऊंडेशन, निघालयं भारतातल्या नद्या साफ-स्वच्छ करायला! कुणाच्या पैशानं, कुणाच्या प्रचंड आर्थिक पाठबळावर? …तर, रिलायन्ससारख्या अनेक रासायनिक व कार्बन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक सहयोगातूनच! ज्यांनी नद्या, समुद्र, तलाव, विहीरी नासवल्या, गडगंज नफा कमावण्याच्या राक्षसी लालसेतून आरपार प्रदूषित केल्या, त्याचं कंपन्या आता…. “सौ चूहे खाके, बिल्ली चली हाज को”, असा फसवा-गोंडस मुखवटा धारण करत आमच्या नद्या स्वच्छ करणार? त्यांच्याकडून केलं जाणारं ‘जलप्रदूषण’, कार्बन-प्रदूषण कारखाने चालू ठेऊन थांबू शकतं कधि?? कुणाला गंडवताय, उल्लू बनवताय आणि कितीकाळ बनवू शकणार आहात??? … सरतेशेवटी, नियती तुम्हालाआम्हाला सगळ्यांनाच अवचित गाठणार आहे सर्वनाशाच्या खिंडीत!!!

मित्रहो, …या औद्योगिकीकरणातून, आधुनिक चंगळवादी जीवनशैलीतून व अर्थव्यवस्थेतून रचले जाणारे, हे शोषण आणि प्रदूषणाच्या पातकांचे इमले, आपल्यालाच गाडण्याएवढे भलेमोठे झालेत…. ते कधि कोसळतील, आपल्याला खाली दडपून टाकीत आपला श्वास कायमचा रोखतील, याचा काही नेम नाही… हा, फक्त आता काही दशकांचाच खेळ उरलाय.

स्वामी निगमानंद, स्वामी ज्ञान स्वरुप सानंद… या पुण्यात्म्यांच्या महान बलिदानाचा हा इशारा, फक्त नरेंद्र मोदींच्या नृशंस प्रशासनालाच नाही…. तर, अवघ्या विश्वाला आहे!!!

……राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)

https://www.facebook.com/share/v/eFjvAtJa67tEKcjb/?mibextid=oFDknk