आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता

नकोत आम्हा एलिऑन मस्क, नकोत बिल गेट्स… हवेत आम्हा गांधी महात्माआणि गुरुजी साने’!

मानवजातीच्या अंतिम कल्याणासाठी ‘ओशों’सारखा प्रबुद्ध पुरुष, प्रचलित शिक्षणपद्धतीवर टीका करत, “पुरुषांनी स्त्रीसारखं प्रेम, ‘ममत्व’ अंगी बाणवण्याची नितांत गरज असताना, आपल्या स्पर्धात्मक व गणित-सायन्सवरच भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे स्त्रियाच पुरुषांसारख्या कडव्या महत्त्वाकांक्षी म्हणून संवेदनशून्य होऊ लागल्याची” तीव्र चिंता व्यक्त करुन गेले; तर, दुसरीकडे ‘कोसला’कार ज्ञानपीठ-पुरस्कार विजेत्या भालचंद्र नेमाडेंच्या कवितेतल्या स्त्रिया, “पुरुषांना, स्त्रियांसारख्या बाळंतपण, दुग्धपानाच्या जबाबदार्‍या देणारे शोध लावा रे” म्हणत टाहो फोडतात….. त्या सार्‍याचा अर्थ एकच, तो म्हणजे, “समाजातलं हळवेपण, सहसंवेदनांचे पंख मिटत चाललेत आणि व्यावसायिक अथवा राजकीय यशासाठी क्रौर्यपूर्ण शोषक, अन्याय-अत्याचारी प्रवृत्ती उघड्यानागड्या स्वरुपात ‘कायदेशीर नंगानाच’ घालू लागल्यात… ज्याला ‘व्यावसायिकता’ अथवा ‘प्रोफेशनलॅलिझम्’ नावाचं गोंडस लेबल वर बेमालूम चिकटवलं जातंय!”

केवळ, पर्यावरणीय महासंकटकाळ आलाय उंबरठ्यावर म्हणून नव्हे; तर, तो येवो न येवो (तो येणारच, हे त्रिवार सत्य)… ममता, कारुण्य, भूतदया, माणुसकी या सद्गुणीवृत्तींवर चालणाराच मानवी-व्यवहार कुठल्याही युगात, कुठल्याही स्थितीत हवा… या सद्गुणांनी बहरलेलीच मानवी-संस्कृति कुठल्याही किंमतीवर हवी… हेच अंतिम-सत्य होय!

पण, माणसाला आत्यंतिक स्वार्थरत व आत्मकेंद्रित बनवून अंततः अमानुष बनवणारं आणि मोजक्या हातांमधून नियंत्रित होऊ लागलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रज्ञान… जर, सामान्य माणसांच्या जगण्याची कोंडी करुन प्राणच कंठाशी आणू लागलं तरं?

“जीवो जीवस्य जीवनम्”, हे वैश्विक सत्य, जीवनाचं आधारभूत तत्त्व असलं तरी; माणसाला कर्मबुद्धी नियतीने बहाल केलेली असल्याने, माणुसकी आणि भूतदया यावरच पूर्णतया मानवी-व्यवहार आधारलेला हवाच. त्यादृष्टीनेच, ‘नैसर्गिक’ शेती-व्यवहार हवा… मांसाहारसुद्धा होता होईल तेवढा ‘किमान पातळी’वर राखला जायला हवा (कायमचा त्यागता आला तर, उत्तमच), हे ही महत्त्वाचंच. शिवाय, “Life without ambition, is a ship without rudder”, यासारखी, प्रसंगी राक्षसी-महत्त्वाकांक्षेला आणि पर्यायाने अमानवीय स्पर्धेला बालपणापासूनच खतपाणी घालणाऱ्या पाश्चात्य म्हणी, व्यवहारातून कायमच्या बाद करायला हव्यात…. जर, औषधपाणी, नशापाणी करण्याची गरज न भासता, खरोखरीच सुखसमाधाने जगायचं असेल; तर, ‘गांधीबाबा आणि सानेगुरुजी’ यांना दुसरा पर्याय नाही. म्हणूनच, सध्याच्या काळात ‘सत्ता’ खर्‍याअर्थाने बड्या भांडवलदारांच्या सुसंघटित गटाच्या हाती असल्याने आणि मस्क, गेट्स सारखे CEO त्यांचेच ॲजेंडे राबवणारे ‘मुखत्यार’ असल्याने ठामपणे म्हणावयास हवं की, “औषधालासुद्धा कणव व संवेदना नसलेल्या, या विकृततेकडे झुकलेल्या ‘गैरबुद्धी’च्या बुद्धिमंतांच्या हाती सत्ता एकवटणं… मानवासह, संपूर्ण सजीवसृष्टीसाठी अंति घातक आहे!

मुद्दा महत्त्वाचा हा की, “जगात, बुद्धिमंतांची बिलकूल उणिव वा कमतरता नाही; तर, कमतरता आहे ती, चांगली व मंगल बुद्धी (अरिहंत अथवा करुणावान प्रज्ञा) असणाऱ्यांची!” जिंकणं, हे काही विशिष्ट परिस्थिती वगळता, अजिबात महत्त्वाचं नव्हे, ‘जगणं आणि जगवणं’ त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचं”… हा म. गांधी, सानेगुरुजींसारख्या  सत्प्रवृत्तींचा त्रिकालाबाधित संदेश आहे… कारण, जिंकणं, कुणाचा तरी पराभव करुन घडतं आणि अनेकप्रसंगी “राक्षसीप्रवृत्ती, या सत्प्रवृत्तींविरुद्ध संसाधनांचा बेलगाम गैरवापर, दडपशाही, फसवेगिरी, षडयंत्रांच्या बळावर जिंकताना… या भांडवली जगतात, मानवी जगण्याच्या व्यवहारातील अनेकोनेक क्षेत्रात फार मोठ्याप्रमाणावर हरघडी दिसतात!” त्यामुळे, “बळी, तो कानपिळी” हा सैतानीउन्माद थैमान घालायला लागलाय.

म्हणूनच, कुणाचंही ‘मूकआक्रंदन, आत्म्यांची तडफड’ बुडाखाली झाकून ठेवलेलं नसलेलं… “प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांति, अरिहंत” या महान तत्त्वांनी व्याप्त मानवी-जगणं हवं असेलं… तर आणि तर, म. गांधी, सानेगुरुजीच हवेत… अमानुष स्पर्धेच्या जोखडात आयुष्य बांधून ठेवणारे, आयुष्याच्या प्रत्येक पावलावर धापा टाकायला लावणारे आणि असुरक्षिततेनं क्षणाक्षणाला भयभीत करुन सोडणारे ‘मस्क किंवा गेट्स’ नकोत!

भांडवलदारांनो, आम्ही वन्यप्राण्यांसारखे जंगलात रहात नाही आहोत… जरा  निवांत सुखाने जगू द्याल की, नाही? नको आम्हाला तुम्ही निर्माण करत आलेली सुखसंसाधने, नको त्या सोयीसुविधा… ज्या, अंति आमचं माणूसपणचं हिरावून घेत, गुलाम बनवतायतं! कितीही, संसाधनांनीयुक्त झालो, नवश्रीमंत झालो; तरीही, आम्ही क्षणभरही थबकून खराखुरा ‘विसावा’ घेऊ शकत नाही… ही आमची आजची ‘शोकांतिका’ आहे! आम्ही, बालपणीच्या पुस्तकात वर्णिलेल्या त्या भित्र्या सशासारखे जगत असतो… जो, झाडाचं पान पडताच, आकाश पडलं म्हणून धडपडत घाबरुन धावत सुटतो… याचा अर्थ, मग या सगळ्या आधुनिक जगण्याच्या धडपडीतून आम्ही मिळवलं काय आणि आमच्या हाती लागलं काय? स्थूलता, सततची चीडचीड, वाढलेला रक्तदाब (BP), मधुमेह (डायाबिटीस), मणक्यांचे विकार, मनोरुग्णता, झोपेच्या गोळ्यांचा सर्रास वापर इ. इ. हीच आमची ‘खरी कमाई’ समजायची की, बँकेत, शेअर, बाॅण्ड्स गुंतवणुकीत पडून राहीलेला ‘बॅलन्स’?

म्हणूनच, “साधी रहाणी, उच्च विचारसरणी”… हेच जगण्याचं मूलभूत तत्त्व हवं… “सर्वांभूति निखळ प्रेम” आणि निसर्ग-पर्यावरणाला आपल्या अपत्यासारखं जपणं… हा, हा  म.गांधी-सानेगुरुजींचा संदेशच, वैश्विक विचार व जगण्याचा स्थायिभाव व्हायला हवा!

पहाता पहाता भांडवलशाही, तुमच्याआमच्या नसानसात, नसानसातल्या रक्तात एवढी सापाच्या विषासारखी भिनलीय की, क्षुद्र स्वार्थापोटी तिचे आपण संवेदनशून्य ‘पाईक’ बनत, काय काय नृसंश पातकं करतोय… याचं भान तर आपल्याला उरलेलं नाहीचं; उलट, आपण योग्य तेच करतोय… हीच, ‘व्यावसायिकता’ (Professionalism) होय, असा ‘मस्क आणि गेट्स’ सारख्या अनेक भांडवलदारांच्या प्रभावाखाली, मानवजात व उर्वरित सजीवसृष्टी घातकी काडीकचरा, आपल्या डोक्यात आपला आपणच एवढा ठासून भरुन घेतोय की, आपणच आपली बुद्धीच साफ बधीर करुन टाकलीय…. हेच, भांडवलीकरणाचं म्हणा, खाजगीकरणाचं म्हणा; विकृत पण, चमत्कारिक लक्षण आहे आणि त्याचा दुर्दैवी फैलाव, कोविड-ओमायक्राॅन विषाणूपेक्षाही भयंकर वेगाने आणि सर्व जगभरात झालाय!

त्याविरोधात, लसीकरणाचा डोस म्हणा किंवा रोग झाल्यास बरा करण्याचं औषध म्हणा… ते एकच, म्हणजे “म. गांधी आणि सानेगुरुजीं” सारख्या व्यक्तित्वांना संपूर्ण पृथ्वीतलावर आचरणात आणणे… आणि म्हणूनच तर आजवर, कुणी मारल्याने ना गांधी मरत, ना आत्महत्या करुन साने गुरुजी मरत!”

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)