आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!)

मी सुरुवातीलाच हे सांगतो की, उद्धव ठाकरे यांच्या विषयी असणाऱ्या ‘न्याय्य’ सहानुभूतीची लाट, जी आनंद देवधरच्या अधू नजरेला स्टुडिओमध्येच फक्त दिसली…ती, प्रत्यक्षात EVMच्या हातचलाखीत, ईडी-आयटी-सीबीआयच्या देशभरातल्या बेकायदेशीर दडपशाहीत, इलेक्टोरल-बाॅण्डच्या आजवरच्या जगातल्या सर्वात मोठ्या घोट्याळात, निवडणुकीची आदर्श-आचारसंहिता सरळ सरळ धाब्यावर बसवून भाजपाकडून केल्या गेलेल्या जातधर्मीय विद्वेषी प्रचाराच्या राळीत व धुळीत आणि निवडणूक-आयोग नावाच्या अंपायरला ‘चिकी खायला’ घालून दडपली गेली होती… आणि, हे शोधण्यासाठी आनंद देवधरने दुर्बिणसुद्धा लावायची गरज नाही; फक्त, आपला चष्मा शोधून वापरावा व डोळे फारच अधू झाले असतील; तर, तेवढा झालेला मोतीबिंदू किंवा काचबिंदू, नेत्रतज्ज्ञाकडून शस्त्रक्रिया करवून काढून टाकावा, बस्स!

हे भाजपा-संघवाले निवडणुका हरले की, शहामृगासारखं टक्केवारीच्या वाळूत कायम चोच खुपसून बसतात. पण, ही डँबिस लोकं जिंकली की, मग सोयिस्करपणे टक्केवारी बाजुला सारत, किती जागा जिंकून आणल्या…याचा सारीपाट मांडून बसतात व जो जिता, वहीं सिकंदर म्हणतात! कारण, तेव्हा टक्केवारीचं गणित, त्यांना फारसं हितावह ठरत नसतं. उदा. २०१९च्या लोकसभा-निवडणुकीत यांना जेमतेम ३७% मतं पडली होती; म्हणजेच, देशातली ६३% जनता मोदी-सरकारच्या विरोधात होती; मग त्याबाबत, हे लोकं काही स्वतःहून बोलले का? तेव्हाच नेमकी, यांची दातखीळ कशी बसते??

उद्धवजी ठाकरे, ज्या तडफेने प्रचाराला लागले; त्यामुळेच, कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा, दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण झाला आणि ते उत्साहाने कामाला लागले. उद्धवजी, या प्रचंड मोठ्या संकटाने खचून गेले असते; तर, महाराष्ट्रात या निवडणुकीत विरोधी पक्ष, नावाला देखील शिल्लक राहिला नसता, हे सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट आहे…तेच, भाजपाई-संघीय लोकांचे मनसुबे होते व ते उद्धवजींनी आपल्या वज्रनिर्धाराने साफ ढासळवून टाकलेत आणि हेच खरंतरं निरतिशय महत्त्वाचं आहे. पण, हे भाजपाई-संघीय, त्याविषयी ब्र काढणार नाहीत.

त्याचबरोबर, यांची संपूर्ण ‘भांडवली व प्रशासकीय व्यवस्था’ हाताशी धरुन, बेकायदेशीरपणे व हडेलहप्पी पद्धतीने ‘निवडणूक-मॅनेज’ करण्यातली बदमाषीही मोठ्याप्रमाणावर, या सगळ्या त्यांच्या तथाकथित यशाला कारणीभूत असतानाही, उद्धवजींनी किल्ला यशस्वीरित्या लढवला, हे नाकारणं…हाच यांचा ‘पिढीजात करंटेपणा’ होय!

ना हे, आणि ना, यांचे पूर्वसुरी… कधि कुठे लढे लढले (उदा. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध)…ही षडयंत्री लोकं, केवळ आपल्या कटकारस्थानांमुळेच तात्पुरती का होईना; पण, राजकारण-समाजकारणात आजवर यशस्वी होत आलीत… They can’t and can never work on the ‘human-strength’, they only shamelessly work on ‘human-weakness’ …तिचं या खुज्या लोकांची मर्यादा, तेवढीचं त्यांची लायकी!

…राजन राजे


(हाच तो खालीलप्रमाणे संदेश, ज्यावर मी उपरोल्लेखित जळजळीत उत्तर दिलंय…..)

झुंजल्या सेना अशा….

लोकसभा निवडणुकीत सर्वात रंगतदार लढती होणार होत्या शिवसेना विरुद्ध शिउबाठा. एकूण १३ जागांवर शिंदे आणि ठाकरे एकमेकांना भिडले, नतीजा काय झाला ते बघा.

शिवसेनेने शिउबाठाला ७ ठिकाणी हरवले. थोडक्यात ही अत्यंत महत्त्वपूर्ण लढत शिवसेनेने ७-६ अशी जिंकली. या गोष्टींची मिडियामध्ये फार चर्चा झाली असेल असे वाटत नाही. कारण मिडियाचे डार्लिंग असलेले उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ही गोष्ट जाते.

शिवसेनेने १५ जागी उमेदवार दिले होते त्यापैकी ७ निवडून आले तर उद्धव ठाकरे यांनी २१ ठिकाणी उमेदवार दिले आणि ९  निवडून आले.

विजयाची टक्केवारी

शिवसेना ४७%

शिउबाठा ४३%

पडलेली एकूण मते.

शिवसेना ६२.६६ लाख

शिउबाठा ६०.३९ लाख

विजयी उमेदवारांचे सरासरी मताधिक्य

शिवसेना १०६९१५

शिउबाठा  ८६९४४

याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की प्रत्येक बाबतीत शिवसेना शिउबाठापेक्षा वरचढ ठरली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विजयाला खूप मोठी हिरवी किनार आहे हे विसरून चालणार नाही. जिथे मुसलमान उमेदवार होता त्या औरंगाबादमध्ये खैरे यांचा दारुण पराभव झाला आहे.

उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागणारा पराभव हा चंद्रकांत खैरे यांचा असेल आणि त्या खालोखाल विनायक राऊत यांचा. मुंबईबाहेर शिवसेनेची वाढ औरंगाबाद येथे झाली तर कोकण तर ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो.

शिवसेनेचे मुंबईतील यश मुस्लिम मतदारांमुळे मिळाले आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

आज जरी उद्धव ठाकरे कितीही फुशारक्या मारत असले तरीही त्यांचे भविष्य कठीणच आहे. याचे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दोघांनी मिळून लक्षणीय यश मिळवले आहे. विधानसभेच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे यांची नक्की कोंडी होणार आहे. जेमतेम १०० जागा लढवता आल्या तरी खूप झाले अशी परिस्थिती असेल.

उद्धव ठाकरे यांच्या विषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त, स्टुडिओमध्ये होती की काय ?

…आनंद देवधर