(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….)

मा. उद्धवजी,

६४व्या वाढदिवसानिमित्त, आपले आमच्या ‘धर्मराज्य-परिवारा’तर्फे; तसेच, तमाम महाराष्ट्रीय-भारतीय जनतेतर्फे अभीष्टचिंतन व आपल्याला शतकोत्तर निरोगी आयुष्य लाभण्यासाठी मनःपूत शुभेच्छा!

आपल्या वयाची ‘चौसष्टी’ पूर्ण करत, आपण आज वयाच्या ‘चांगदेव-पासष्टी’त प्रवेश करत आहात….

‘‘सुवर्णाचे दागिने घडवले, म्हणून त्याच्या सोनेपणात उणीव निर्माण होत नाही किंवा मातीची भांडी घडवली म्हणून मातीच्या गुणधर्माचा क्षय होत नाही वा चंद्रावर सोळा कलांचे आवरण घातले गेले, म्हणून चंद्राचा लोप होत नाही…तद्वतच, स्वतः परमात्मा विविध आकारांनी, रुपांनी नटला; तरीही, त्याच्या मूळ ‘परमात्मा स्वरुपा’त काहीही उणेपणा येत नाही…परमात्माच ‘द्रष्टा, दृश्य आणि दर्शन’ या त्रिपुटींच्या रुपाने व्यवहार करतो आणि ‘अविद्या’कारणे, एकाच परमात्म्याची द्रष्टादर्शनादि तीन रूपे आपल्याला दिसतात; मात्र, विचारजागृतीने त्या तिघांचाही नाश होतो व ‘मीपण माझे पक्व फळापरी गळले हो’, अशा आत्मसाक्षात्कारातून एक ‘आत्मतत्त्व’च काय ते शिल्लक उरते’’, असा चांगदेवाला रोकडा उपदेश करणाऱ्या, ज्ञानदेवांचं स्मरणही आपल्या वाढदिवसाच्या ‘पासष्टी’निमित्ताने आज झाल्यावाचून रहात नाही.

…असाच रोखठोक उपदेश, समस्त महाराष्ट्राला करत तत्कालिन व्यवस्थेला प्रचंड हादरा देण्याचं क्रांतिकार्य करणाऱ्या, आपल्या आजोबांच्या म्हणजेच स्व. प्रबोधनकार ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत, वर्तमानकाळात आपण ‘राजकीय आसुरी-शक्तिं’पुढे दंड थोपटून खंबीरपणे उभे ठाकलेले आहात!

तेव्हा, या निर्णायक स्वरुपाच्या राजकीय-संघर्षकाळात आपल्याला भव्यदिव्य राजकीय-यश मिळण्यासोबतच, प्रबोधनकारांकरवी तेव्हा घडली तशी, मोठी वैचारिक-घुसळण देखील महाराष्ट्रभरात घडो व त्यातून, सर्वसामान्य मराठी-जनतेच्या सर्वंकष हिताचं ‘नवनीत’, या ‘महाराष्ट्र-देशा’च्या हाती लागो…हीच, आजच्या दिवशी (२७ जुलै-२०२४) परमात्म्याचरणी प्रार्थना…धन्यवाद!

…राजन राजे