हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

“महाराष्ट्रात महागुंतवणूक” अशा दिलखेचक शीर्षकाखाली लिथियम बॅटरी, EV, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मितीच्या वगैरे क्षेत्रातील ८१ हजार कोटींच्या राज्यातील गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांची व त्यातून, २०-२५ हजार थेट रोजगारांची; तर, ५० हजार अप्रत्यक्ष रोजगारांची राणाभीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मोठी गर्जना केलीय (उपमुख्यमंत्री अशा महत्त्वपूर्ण घोषणा करत असतात…तेव्हा, मुख्यमंत्री फक्त ‘तोंडी लावण्यापुरतेच’).

या घोषणांचे पतंग हवेत उडवले जात असतानाच, “मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि कोणी माझ्या नादाला लागलं; तर, मी त्याला सोडत नाही” अशी वल्गनाही फडणवीसांनी मा. उद्धवजी ठाकरेंना उद्देशून केलीय.
तोच धागा पकडून ‘धर्मराज्य’च्या व्यासपीठावरुन ‘वैदर्भीय’ फडणवीसांना (हा मुद्दाम उल्लेख अशासाठी कारण त्यांचा, पूर्वाश्रमींचा काँग्रेसवासी असलेला, ‘राजकीय-पोपट’ आशिष देशमुख याने मा. उद्धवजींना आव्हान देताना, विदर्भातून एकही आमदार निवडून आणल्यास ‘माझं नाव बदलीन’, अशी भीष्मप्रतिज्ञा केलीय…याच संदर्भात, मुंबईचे ‘बोलबचन’ भाजपा-नेते आशिष शेलारांची अशीच एक भीष्मप्रतिज्ञा, लोकसभा-निवडणुकीत मुंबईत ‘भाजपा’चा दारुण पराभव झाल्यापश्चात, अद्यापही महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीची धूळ खात पडून असल्याचं, वाचकांना स्मरत असेलच…तिचं गत, विदर्भातल्या दुसर्‍या ‘आशिष’च्या बनावट प्रतिज्ञेची होणार) महाराष्ट्रातील समस्त कामगार-कर्मचारीवर्गातर्फे आम्ही आव्हान देत आहोत (थोडक्यात, ‘त्यांच्या नादाला लागत आहोत’) की, “त्या नोकऱ्या महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवतींना देण्याअगोदर, त्या कुठल्या लायकीच्या व औकातीच्या देणार आहात, हे स्पष्ट करा… त्या नोकऱ्या ‘कायमस्वरुपी’ असणार की, ‘कंत्राटदारी’तल्या ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’च्या स्वरुपातल्या असणार, हे जाहीर करण्याची हिंमत दाखवा… त्या नोकऱ्यांमध्ये, तेच सध्याचं दळभद्री व तुटपुंज असलेलं ‘किमान-वेतन’ देणार की, ग्रामीण भागात सरासरी ५० हजाराचं सन्मानजनक वेतन देणार, ते ही एकदा जाहीर कराच… म्हणजे, तुम्ही देऊ करत असलेला रोजगार, हा ‘रोजगार’ आहे की, ‘अर्धरोजगारी’तला ‘पोटावर मार’ आहे, ते जरा ग्रामीण भागातल्या भोळसट तरुणाईला एकदा कळूच द्या!”

तुम्ही आणि तुमचा पक्का भांडवलदार-शेठजींचा पक्ष असलेल्या ‘भाजप’ला, मा. उद्धवजींच्याच मूळ व खऱ्या शिवसेनेने आपल्या हाताचं बोट धरायला देऊन मोठं केल्याचं, उभा महाराष्ट्र पहात आला…हेच महापातक, आपल्याला भोवल्याचंही मा. उद्धवजी अनेकदा बोलून गेल्याचंही आपल्याला चांगलंच ठाऊक असणार…तेव्हा, ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो; त्यांनाच उठसूठ आव्हान देण्याचा उफराटेपणा न करता, महाराष्ट्रभरातील तमाम कामगार-कर्मचारीवर्ग आपल्याला देत असलेलं उपरोल्लेखित आव्हान स्विकारा! मा. उद्धवजींचा करण्याऐवजी कामगारांचा ‘नाद’ करा…अन्यथा, तुम्ही हजारो रोजगारांचे हे जे ‘पतंग’, भर पावसात उडवू पहाताय…ते तुम्ही, दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर, महाराष्ट्रात लादू पहात असलेल्या “काळ्या ‘कामगार-संहिते’च्या ( Black Labour-Code) पिंजऱ्यात अवघ्या मराठी-तरुणाईला उंदरासारखं अडविण्याच्या षडयंत्री डावपेचांचंच ‘एक अंग’ आहे, हे महाराष्ट्राचा नवतरुण कामगार समजून चुकेल!
जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, गेल्या लोकसभा-निवडणुकीत जेवढा खंबीरपणे महाराष्ट्रातला कामगार, उद्धवजींच्या व राहुलजींच्या पाठिशी उभा होता…त्याहीपेक्षा, अधिक खंबीरपणे येत्या विधानसभा-निवडणुकीत त्यांच्या पाठिशी उभा राहील…
हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

…राजन राजे