पाश्चात्य देशात, जनता स्वतः वर्गणी जमा करुन आपापल्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे उभारते…अगदी, अमेरिकन ‘स्वातंत्र्य देवतेचा पुतळा’ (Statue Of Liberty) देखील, विविध सार्वजनिक-उपक्रम राबवून, जनतेनेच पैसा गोळा करुन उभारला होता. पण, आपल्याकडे जनतेला भांडवली-व्यवस्थेनं एवढं ‘कफल्लक’ आणि राजकारण्यांनी एवढं ‘फुकटं’ बनवून ठेवलंय की, जनता पुतळे उभारण्यासाठी सोडाच; पण, निवडणुका लढवण्यासाठी देखील कपर्दिकही (जुन्या काळचं नाणं) देत नाही…हे सगळं आमच्या आकलनशक्ति पलिकडचं झालंय आणि कुणी आम्हाला ते प्रामाणिकपणे समजावून सांगत असेल; तर, समजून घ्यायची आमची मानसिकता नाही!
पं. नेहरुंच्या हस्ते उद्गाटन झालेला प्रतापगडावरचा शिवछत्रपतींचा पुतळा…सह्याद्रीच्या कडेकपारीतील धो धो पाऊस आणि वेगवान वादळवारे अंगावर झेलत, आजही दिमाखात उभा आहे आणि मधल्या ६० वर्षात तर, तंत्रज्ञान आपल्याला मागे टाकून इतकं पुढे गेलं असतानाही शिवछत्रपतींचा आधुनिक काळातला पुतळा कोसळून पडतोच कसा? याचा सरळ अर्थ हा की, जेवढ्या वेगाने ‘तंत्रज्ञान’ पुढे गेलं…त्याहीपेक्षा, कितीतरी अधिक वेगाने भ्रष्टाचाराचं ‘तंत्र’, त्या तंत्रज्ञानाला मागे टाकून सुसाट पुढे निघून गेलंय.
भ्रष्टाचार प्रामुख्याने दोन प्रकारे होतो…पहिला प्रकार, टक्केवारीतून पैसा वसूल करुन (त्यासाठीच, हजारो कोटींचे पायाभूत-प्रकल्प घाईघाईने आणले जातात आणि त्याकामी, महाराष्ट्रासारख्या राज्यांमधली विरोधी-पक्षांची सरकारे आमदारांच्या थोबाडावर पैसा फेकून पाडली जातात)…आणि, दुसरा प्रकार, जो जास्त गर्हणीय व घातक आहे, तो म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करुन चढत्या दराने आपल्याच ‘बगलबच्च्यां’च्या पदरात कंत्राटं घालून!
गेल्या १० वर्षातले सगळेच सरकारी-कंत्राटदार तपासून पाहिलेत तर कुणाचा संघाशी, कुणाचा सनातन-संस्थेशी; नाहीतर कुणाचा सरळसोट भाजपा किंवा मित्र पक्षांशी संबंध असल्याचं दिसेल…आणि, हेच लोक विरोधी-पक्षीयांवर ईडी, सीबीआय, आयटीची छापेमारी करणार?
जन्माने ठाणेकर नव्हे (ठाण्यात पोटापाण्याचा व्यवसाय व राजकारण नावाचा ‘धंदा’ करायला आलेले); तर, मूळचे सातार्याचे असलेले मुख्यमंत्री अथवा अन्य कोणी त्यांचे सरदार-बरकदार…शेकडो-हजारो मंडळांना (गणेशोत्सव, पूजा, दहीहंड्या, गरबे, भंडारे, खेळमहोत्सव इ. साजरी करणारे) जो एवढा, लाखो रुपयांचा चंदा, वर्षानुवर्षे देत आलेत आणि देत रहातील…तो शेकडो-हजारो कोटींचा पैसा त्यांच्याकडे येतो तरी कुठून, हे त्यांनी एकदा पारदर्शकपणे जाहीर करावंच…आहे हिंमत कुणाची?
एक गोष्ट, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन छातीठोकपणे सांगतो…जे शिवछत्रपतींच्या पुतळ्याबाबत नौदलाकडून (म्हणजेच, मोदी-शहा या गुजराथी दुकलीच्या केंद्र सरकारकडून) आणि भाजपाई-संघीय महाराष्ट्र सरकारकडून घडलं (एकनाथराव काय किंवा अजितदादा काय…ते एकप्रकारे त्यांचे ‘मांडलिक’ सरदारच)…तसं, ते अहमदाबाद-मुंबई धावणाऱ्या ‘बुलेट-ट्रेन’च्या बाबतीत कधिच घडणार नाही…तिचं बांधकाम सहजी कोसळणार नाही; कारण, ती मूलतः श्रीमंत-अतिश्रीमंत ‘गुजराथी’ भांडवलदारांसाठी आहे (आरक्षणासाठी तळमळणार्या मायमराठ्यांसाठी नव्हे) आणि गुजराथी लोकं आपापल्या भाषिक-जमातीची संघटितरित्या पुरेपूर काळजी घेतात…आपल्याच जमातीशी ते सहसा गद्दारी करत नाहीत.
पण, आपल्याकडचे ‘निर्लज्जम् सदा सुखी’, असे हे कोडगे लोक, इतके निर्लज्ज झालेत की, “काय तो डोंगर, काय ती झाडी” म्हणणार्यांच्या कातडीची ‘जाडी’ पाहून गेंड्याला पण शरम वाटावी…दाढ्या कुरवाळत महाराष्ट्राशीच द्रोह करण्याचं टक्केवारीचं किळसवाणं राजकारण, तसंच मागील पानावरुन पुढे आपण चालू द्यायचं किंवा नाही, हे ठरवायची वेळ आलीय.
…कधि नव्हे ती (न भूतो) शिवछत्रपतींचा पुतळा पडण्याची भयंकर अशी आत्यंतिक वेदनादायक घटना घडली…पण, मराठी-माणसांचे ‘गोविंदा’ क्षणभर तरी थांबले? वाटलं त्यांना थबकावसं?? निदान, प्रत्येक मंडळाने प्रत्येक गोविंदाच्या ठिकाणी, या भ्रष्टाचारातून घडलेल्या शिवछत्रपतींच्या अवमानाच्या घटनेचा ‘निषेध’ म्हणून दहीहंडी फोडण्यापूर्वी मान खाली घालून ‘एक मिनिट स्तब्धता’ नको होती पाळायला???
ज्या शिवछत्रपतींनी मोगलांची सूरत लुटली, ते गुजराथी-भाषिक, आजचा मराठ्यांचा गोविंदाचा थरार नव्हे; तर, लाजिरवाणा थयथयाट पाहून आपल्याला मनातून खो खो हसत असतील. कालपरवा शिवसेना सहजी फोडून मा. उद्धवजींचं सरकार पाडलं गेलं…पुढे जाऊन शरदरावांची राष्ट्रवादी फोडली; आणि, आता भाजपा-संघाचा अभद्र हात, शिवछत्रपतींच्या पुतळ्यापर्यंतही पोहोचलाय? पुतळ्याचे नटबोल्ट सकट सगळा धातूच १० महिन्यात गंजायला लागतो, सूचना दिली जाते; तरीही कुणी सरकार-पातळीवर दखल घेत नाही, याचा एकूणच अर्थ काय लावायचा? तरीही, आम्हाला काही वाटत नाही…’जनाची नाहीतर निदान मनाची’ शरम नावाची ‘चीज’च कुठे शिल्लक राह्यलीय आमच्यात??
…तेव्हा, शिवछत्रपती, तुम्ही तुमच्या आयुष्याचा आमच्यासाठी होम केलात, त्या त्यागाला-धैर्याला गौण ठरवत…एवढंच काय तर, तुमच्याच पावलावर पाऊल ठेऊन केवळ नव्हे; तर तुम्हालाही काकणभर सरस ठरणाऱ्या तुमच्या सुपुत्राच्या, छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानालाही गौण ठरवत…आज तुमचा पुतळा भ्रष्टाचाराच्या नादान-तिर्थी धाराशायी पडलेला असतानाही आम्ही ‘गोविंदा गोविंदा’ करत पावसात न्हालो-नाचलो.
त्यातले किती ‘कायम’स्वरुपी नोकरीत आहेत आणि त्यातले किती ५० हजारांहून अधिक पगार घेतात? तसा एकतरी ‘यशोदामाय का लाल’ आजच्या गोविंदातला दाखवून द्याच! ‘कंत्राटी-कामगार’ नव्हे; गुलाम व नवअस्पृश्य असलेले आमचे ‘गोविंदा’वाले, कुण्या राजकारण्याने, या असल्याच सार्वजनिक भ्रष्टाचारातून कमावलेल्या काळ्या पैशातून फुकटात वाटलेल्या, टीशर्ट्स आणि बक्षीसांसाठी, जीवावर उदार होताना पाहून शिवछत्रपतींच्या अंतःकरणाला किती यातना होत असतील…कुठल्या तोंडाने सांगू आम्ही महाराज तुम्हाला की, आमच्या नादान मराठी-तरुणाईला माफ करा म्हणून?
फुकटेपणाची भिकारटुकार संस्कृती थांबवा…अतिरेकी दारुबाजी, अतिरेकी जुगारी वृत्ती थांबवा…त्या घातकी वृत्तीनेच, सिंधुदुर्गी शिवछत्रपतींचा पुतळा धाराशायी होण्यापूर्वीच, तुमच्या अंतःकरणातला ‘शिवछत्रपती’ तुम्ही मारुन टाकलाय. हो, शिवछत्रपतींचे पहिले ‘मारेकरी’ तुम्ही स्वतः आहात…आणि, मगच ते “सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी” प्रवास-फेम एकनाथ शिंदें, ‘मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री’ असा अधोगतीचा प्रवास करणारे पाताळयंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी व (शरद पवारांच्या शब्दात सांगायचं तर ‘तडीपार’) अमित शहा यांची अनुक्रमे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारं आहेत!
पण, तुम्ही ते करणार नाही…तुम्ही एवढे नादावलेले आहात की, राजकारण्यांनी फुकट वाटलेली दारु, आपल्यापैकी अनेक गोविंदा पोटात ढकलतील आणि सगळेच मिळून थयथया नाचाल….तुम्हाला अशावेळी भान पण शिल्लक रहाणार नाही की, नाचताना पायाखाली आपल्या काय तुडवलं जातंय…पायाखाली, राजकारण्यांनी खात्यात टाकलेल्या “लाडकी बहीण, लाडका भाऊ” योजनेतल्या करकरीत नोटा तुडवल्या जातायत की, निवडणुकीदरम्यान घरोघरी वाटलेल्या चकचकीत पाकिटांतून थोबाडावर फेकलेल्या टक्केवारीतल्या टकाटक नोटा तुडवल्या जाताहेत…की, …की, पायाखाली भ्रष्टाचारी राजवटीला उघडं पाडत सिंधुदुर्गच्या किल्ल्यातील उताणा पडलेल्या शिवछत्रपतींच्या भग्न पुतळ्याचे अवशेष तुडवले जातायत…तुम्ही नाचा, असेच बेभान होऊन नाचा!
“घागर उताणी रे गोविंदा”, म्हणत थयथया नाचत गोविंदा करणाऱ्यांनो, घ्या गुजराथी-भांडवलदारांकडून (दुकानदार, कंत्राटदार, कारखानदार, काॅर्पोरेटवाले…एकूणएक सगळेच) ‘चंदा’! तुमचा तो पिढीजात वसुलीचा उघडानागडा धंदा, आता काहीही झालं तरी थांबणे नाही. शिवछत्रपतींनी, संभाजी महाराजांनी, म. गांधींनी, बाबासाहेबांनी शिकवलं…तसं, संघर्ष करुन हक्काचं काही मिळवायची दानत तुमच्यात नाही, ‘भांडवली व्यवस्था-बदल’ घडविण्याची हिंमत नाही…फक्त, कुठल्यातरी राजकीय-पक्षाचा टिळा लावून, ‘जय शिवाजी, जय भीम’ करत फुकटेपणाचा मळवट भरुन मिरवायचं, हेच ते तुमचं कार्यकर्तेपण! शिवछत्रपतींच्या आणि बाबासाहेबांच्या जयंति-मयंतिप्रित्यर्थ नशा करुन वर्गणी मागत ‘चंदा’ गोळा करण्याच्या धंद्याचा मोह तुम्हाला चारही बाजुंनी खुणावतच रहाणार, तो मोह तुम्हाला आवरत नाही…सर्वनाश झाल्याखेरीज आवरणारही नाही; कारण, त्यातूनच तुमचं आजचं तथाकथित ‘कार्यकर्तेपण’ उभं रहातंय…ज्यांनी तुम्हाला ती घातकी सवय लावली; ते त्यांचं राजकारण यशस्वी करुन गेले; पण, ही अवसानघातकी-परंपरा मागे ठेऊन गेले. कदाचित, त्यांना पुढील परिस्थिती महाराष्ट्रावर काय ओढावेल, याचं नीटसं आकलन झालं नसेल (त्यांचा हेतू वाईट नसेलही…केवळ, तुम्हाला संघटित करण्याचा असू शकेल)…गोपाळ गणेश आगरकरांना सार्वजनिक-गणपती रस्त्यावर आणून ठेवला; तर, काय होऊ शकेल, याचं यथास्थित आकलन झालं होतं…पण, पारतंत्र्यात थंडगोळा बनलेल्या जनतेला ऊब देण्यासाठी लो. टिळकांना त्यावेळेस त्याची अपरिहार्यता जाणवली होती; पण, त्या उदात्त हेतूचं, त्या परंपरेचं पुढे काय झालं, ते आजचं तुमच्याआमच्या पुढचं काळंकुट्टं वर्तमान दत्त म्हणत उभं आहे…त्यातलाच हा प्रकार!
ही अवसानघातकी परंपरा त्यागाल, त्यजाल…तेव्हाच, तुमच्या डोक्यात खरा प्रकाश पडेल; तोपर्यंत, अंधारयुगातच समाधान मानत रहा, “जातीपातींचा सावल्यांचा खेळ” खेळत बसा…सन्मानाचा प्रकाश तुमच्या नशिबी नाही; कारण, त्याकामी जातीपाती-धर्मभेदाचाही प्रसंगी त्याग करावा लागेल…किमानपक्षी, “मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा”, हा सच्च्या अंतःकरणाने मंत्र जपत, आपले मायमराठ्यांचे मूलभूत जगण्याचे हक्क…या भांडवली-व्यवस्थेकडून राजकीय-जागृती दाखवून, सनदशीर संघर्ष करुन व जागरुकपणे मतदान करुन हिसकावून घ्यावे लागतील…तरच, तो हक्काचा-सन्मानाचा प्रकाश तुमच्या जीवनात उतरेल; अन्यथा, तो तुमच्यासाठीही नव्हे आणि तुमच्या पुढील पिढ्यांसाठीही नसेल.
लक्षात ठेवा, “महाराष्ट्र ही पावनभूमि…तिच्यात धर्म चांगला रुजतो-वाढतो” म्हणून, गुजराथचे कृष्णभक्त चक्रधरस्वामी, गुजराथची ‘भांडवली’वृत्तीची ‘पातकी-भूमि’ सोडून महाराष्ट्रात आले…मोहनदास करमचंद गांधी नावाचा ‘महात्मा’ याच कारणासाठी गुजराथचा ‘साबरमती-आश्रम’ सोडून कायमचा महाराष्ट्राच्या वर्ध्यात स्थायिक झाला; कारण, पुन्हा ते आणि तेच! फरक एवढाच की, “चक्रधरस्वामी जातीभेदविरहीत ‘धर्मकार्य’ करण्यासाठी आले होते; तर, म. गांधी ‘राष्ट्रकार्य’ करण्यासाठी”!
…पण, दुर्दैव आहे त्या शिवबा-संतांच्या महाराष्ट्राचं की, आम्ही आमच्या हातानेच आमची ‘पावन-भूमि’ नासवायला घेतलीय आणि ती प्रक्रिया आता मराठी-हिताचा सर्वनाश होईपर्यंत थांबणे, शक्य वाटत नाही! मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, नागपूर सगळंच त्या गुजराथी-भाषिक भांडवलदारांच्या घशात घालून, त्यांच्याचकडून भिका मागत मिळवलेल्या पैशावर आमचे गणेशोत्सव, सार्वजनिक पूजा, दहीहंड्या, गरबे, भंडारे असेच पुढे तोपर्यंत साजरे होत रहातील; जोपर्यंत, ती शिवरायांची आणि भीमरायांची पावन-मराठीभूमी संपूर्ण सडूनकिडून जात नाही… जोपर्यंत, आमचं ‘मराठी-अस्तित्व’ कंत्राटी-कामगार पद्धतीच्या ‘गुलामगिरीत व नव-अस्पृश्यते’च्या अंधःकारात पूर्णतया ढकललं जाऊन दीडदमडीचं बनत नाही!
नित्यनेमाने आम्ही उत्सवांसाठी वर्गणी गोळा करायला गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाकडे जातो, आरपार भ्रष्ट असलेल्या राजकारण्यांकडे जातो…पण, आम्हाला हे माहितच नसतं की त्यांनी तो अतिरिक्त पैसा, तुमच्याच खिशात तुमच्याच नकळत दिवसाढवळ्या कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखा हात मारुन नेलेला असतो…हे ‘चौर्यकर्म’, जोवर या देशात आजची ही अपरिमित शोषण करणारी लुटारु ‘भांडवली-व्यवस्था’ आहे; तोवर, भांडवलशाहीचा तो ‘अदृश्य हात’…तुमची ‘पाकिटमारी’ सुखनैव विनाअडथळा कायम करत रहाणार!
आजचा दिवस कृष्ण-कन्हैय्याचा…सर्वांभूति प्रेम करत सगळ्यांसाठी न्यायनीतिचं ‘आनंदाचं गोकुळ’ निर्माण करत, आनंदानं मौजेत जगण्यासाठी आणि ‘सत्कर्म’ करत रहाण्यासाठी प्रेरित करणाऱ्याचा! श्रीकृष्णाचा ‘कर्मसिद्धांत’ आम्ही विसरलो…’कष्टानं आणि संघर्षा’नं आम्हाला काही मिळवायचं नाही…”शिक्षण, आरोग्य, वहातूक यासारख्या सार्वजनिक-सेवा दर्जेदार-विनाशुल्क मिळाव्यात, चांगलंचुंगलं किमान-वेतन मिळावं आणि परवडणारं हक्काचं किंवा सिंगापूर वगैरे प्रमाणे उत्तम दर्जाचं व वाजवी भाड्याचं डोक्यावर ‘घराचं छप्पर’ असावं”, ही आमची मागणी नसते… तो आमचा आग्रह नसतो; कारण, एकतर आमची राजकीय-समज तोकडी पडते आणि भरीला ‘फाजिल-उत्सवप्रियते’चं हळूवार रक्तात भिनणारं विष (Slow Poison), आम्हाला राजकारणी लोकं कौशल्याने सतत पाजत असतात, म्हणूनच!
…आम्ही अशा राजकारण्यांसाठी ‘लाडके बहीणभाऊ” वगैरे नसून, लाकडाचे-कचकड्याचे ‘बाहुले’ आहोत, हे बेरकी राजकारण्यांनी अचूक ओळखलेलं असतं, तिचं आमची लायकी. आम्ही बिनकामाचे फुकटे आहोत, फुकटे रहाणार आणि फुकटे म्हणूनच मरणार…जी गत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची झाली; तिचं गत, आमची आजही आणि उद्याही होत रहाणार…आमच्या सर्वसामान्य मराठी-जगण्याची, हीच काय ती एकूण गोळाबेरीज!
…राजन राजे