‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३)

…अर्थातच, ‘कामगार-चळवळ’ आणि पावसाळ्यातील ‘गांडुळांची वळवळ’… हे जवळपास समानार्थी शब्द बनण्याचा संपूर्ण दोष, केवळ मराठी-कामगारांना देण्यात बिलकूल हशील नाहीच; कारण, चारपाच दशकांपासून आमच्या मराठी-मनावर ‘गारुड’ करुन बसलेल्या प्रभावशाली ‘भांडवल-धार्जिण्या’ राजकीय नेत्यांकडूनच टप्प्याटप्प्याने व अत्यंत पद्धतशीरपणे मराठी-कामगारांचं ‘खच्चीकरण’ करण्यात आलंय {ज्याचा पहिला टप्पा, हा साम्यवाद्यांना ‘लाल माकडं’ म्हणून हिणवत त्यांची प्रचंड नालस्ती करण्याचा…भडक माथ्याच्या अविचारी-अविवेकी मराठी-तरुणांना कृष्णा देसाईंसारख्या साम्यवादी (कम्युनिस्ट) नेत्यांवर ‘हल्लाबोल’ करण्याला प्रेरित करण्याचा; तसेच, भांडवली-व्यवस्थेकडून उघडपणे ‘सुपारी’ घेत डाॅ. दत्ता सामंतांसारख्या स्वतंत्र बाण्याच्या लढाऊ कामगार-नेत्याचे संप जागोजागी फोडण्याचा होता}… व त्या ‘महापातका’ची कटू फळं, आजही आणि उद्याही, सगळी मराठी-जमात भोगते आहे, भोगणार आहे!

…एका ‘बाबासाहेबा’ने मेल्या मनांच्या माणसांमध्ये गुलामगिरी-अस्पृश्यतेविरुद्ध स्फुल्लिंग चेतवलं; पण, एतद्देशीय गुजराथी-भाषिक आणि परदेशीय बहुराष्ट्रीय (मल्टिनॅशनल) ‘भांडवली-व्यवस्थे’शी हातमिळवणी करणाऱ्या आमच्या मराठी ‘राजकीय-दुकानदारसाहेबां’नी मात्र, “कारखाना जगला तर, कामगार जगेल”, अशी ‘कामगारद्रोही’ हाकाटी उठवून, हाकारे देऊन… ‘कंत्राटी-कामगार पद्धती’ची ‘गुलामगिरी’ व ‘नवअस्पृश्यता’ महाराष्ट्रात रुजवली-वाढवली!
ही हाकाटी-हे हाकारे, महाराष्ट्र नावाच्या उद्यमनगरीत तोवर गुंजत राहिले; जोवर, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ने, “कामगार सन्मानाने जगला; तरच, कंपनी-कारखाना जगेल…अन्यथा, नव्हे”, असा प्रखर प्रत्युत्तर देणारा नारा दिला नव्हता! पण, तो नारा देत कामगारांचं धैर्य, अस्मिता जागी करण्यासोबतच, “आळशी-उद्धट कामगार राष्ट्राला भार…मेहनती-नितीमान कामगार राष्ट्राला आधार”, असा कामगार-कर्मचारीवर्गात नैतिकतेची रुजवात करणारा विधायक नारा देखील ‘धर्मराज्य’ने न चुकता दिलाच!

‘आऊटसोर्सिग’ काय किंवा NEEM अथवा लष्करातील ‘अग्निपथा’वरील आगीत तरुणाईला पोळून काढणाऱ्या ‘अग्निवीर’सारख्या नवतांत्रिक-व्यवस्था काय… ही सारी, ‘रक्तपिपासू-निर्दय-शोषक व्यवस्थे’च्या (Vampire-State System) ‘कृष्णविवरा’ने प्रसवलेली, तिथल्या दाट काळोखाशी नात सांगणारी काळीकुट्ट ‘पिल्लं’च होतं… ज्यांनी, अवघ्या कामगारविश्वावर अंधारयुगाचं सावट आणलंय.
…त्याचीच परिणती, आजच्या कामगार-कर्मचारीवर्गाच्या अवनत-अवमानित अवस्थेत झालीय!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) (क्रमशः)