बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा…

“आधीच मर्कट तशात मद्य प्याला”…अशी बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा; नाहीतर, यांना बेरोजगारी-अर्धरोजगारीने संत्रस्त झालेला भारतीय तरुणवर्ग भररस्त्यात जोड्याने हाणेल (अमेरिकेतल्या ‘युनायटेड हेल्थकेअर’च्या ब्रायन थाॅम्सन या CEOचं काय झालं, ते स्मरणात ठेवा)!

…’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी अब्जावधी डाॅलर्सच्या अन्याय्य-अनितिमान वरकड-कमाईने (Surplus-Value) आणि जवळपास निरंकुश सत्तेने…यांची मती फिरलेली असते.
अमेरिकेचा इलिऑन मस्क असो, जेफ बेझोस असो वा असोत भारतातला इन्फोसिसचा नारायणमूर्ती अथवा एल अँड टी चा सुब्रमण्यम…हे सगळेच तथाकथित बडे CEO अथवा भांडवलदार, ‘विकृत’ मानसिकतेचेच उत्तम उदाहरण असतात! तेव्हा, त्यांच्याकडून कुठल्या वेगळ्या अपेक्षा बाळगायच्या? त्यांच्या मेंदुचा एक भाग कमालीचा तल्लख; तर, दुसरा अहंगंड व पराकोटीच्या स्वार्थ-संवेदनशून्य बुद्धीने पूर्ण सडलेला असतो…त्याअर्थी, ते आधुनिक ‘रावण-बुद्धी’चेच असल्याचं कुणी म्हणाल्यास, किती चुकीचं ठरावं?? यांचीही ‘लंका’ सोन्याची असते…पण, रावणाच्या सोन्याच्या लंकेत जशी न्यायनीति नव्हती, सत्याचा अपलाप होता; तोच घृणास्पद प्रघात यांच्याही, कुबेराला लाजवणार्‍या काॅर्पोरेटीय-लंकेत फसफसत असतो. धंदा-व्यवसायातलं यांचं आकलन, शब्दशः लोकविलक्षण असतं; पण, त्यापलिकडे, तंत्रज्ञानालाच ब्रह्मज्ञान समजणारी ही काॅर्पोरेटीय मंडळी, जगण्याच्या आसाला भिडलेल्या समस्यांविषयी बव्हंशी अनभिज्ञ असतात अथवा त्या जाणून घेण्याविषयी ते पूर्णतया उदासीन असतात…जणू एका मर्यादेत परिघात ते ‘शहेनशहा’ म्हणूनच मिरवत रहाणं पसंत करतात. काॅर्पोरेटीय क्षेत्रात लोकांक्षा जपणं किंवा लोकशाही रुजवणं…म्हणजे, यांच्या बेलगाम शहेनशाहीला ते जणू आव्हानच समजतात…त्यामुळेच, कामाच्या ठिकाणी लोकशाहीचा लवलेश शिल्लक न ठेवता, ‘कंपनी-दहशतवादा’चं (Corporate-Terrorism) थैमान घालणं, त्यांच्या व्यवस्थापनाचं अविभाज्य अंगच बनतं…त्याशिवाय, त्यांची ‘शहेनशाही’ संबंधित सर्वांच्या छाताडावर कशी बसेल?

विद्यार्थीदशेत अतिरेकी ‘अभ्यास’ (तो ही बहुशः व्यवस्थापन-शास्त्राला वाहिलेला) आणि जोपासलेली फाजील ‘महत्त्वाकांक्षा’ यांचं दुपेडी इंधन, आपल्याच बुडाशी लाऊन, स्वतःचं तारुण्य जाळायचं आणि मग, हाती अनिर्बंध काॅर्पोरेटीय-सत्ता येताच (अलिकडे, भांडवलदारवर्गाचं अव्वल प्रतिनिधित्व करणारे काॅर्पोरेटीय CEOs, हे विशिष्ट काॅर्पोरेटीय-परिघातले “I am the state” म्हणणारे नवे ‘राजे-महाराजे’च तयार झालेले दिसतात) कंपनी-हिताच्या निरर्गल स्वार्थातून सर्व जग जाळत सुटायचं…त्याचाच अनिवार्य परिणाम म्हणून, एका बाजुला जग आर्थिक-विषमतेत होरपळत असताना, दुसर्‍या बाजुला जागतिक तापमानवाढीत पोळून निघतंय! हीच ती विकृती आहे…जी जगभरातल्या बदमाष राजकारण्यांना आपल्याकडच्या अफाट पैशाने पोसत असते आणि बदल्यात, त्यांच्याकडून आपापल्या काॅर्पोरेटीय-हितसंबंधांचं नीतिशून्य संरक्षण-संवर्धन करत असते.

तसं पहाता, नाक्या नाक्यावरचा गटारात लोळणारा (हल्ली गटारं बंदिस्त असल्याकारणाने त्यांची थोडी पंचाईत झालीय, इतकंच) ‘अल्कोहोलिक’ ‘भावड्या’ आणि CEO नावाचा वर्कोहाॅलिक ‘मावड्या’ यांच्यात तत्त्वतः फारसा फरक नाहीच…उलट, भावड्यांच्या व्यसनामुळे त्यांची कुटुंबच फक्त बरबाद होताना दिसतात; पण, या मावड्यांच्या मर्कटचाळ्यांमुळे प्रसंगी अवघी मानवजातच संकटात सापडते…तत्पूर्वी, यांच्या कृपेने त्यांच्या कंपनीतला कामगार-कर्मचारीवर्ग जेरीला आलेला असतो आणि समाजात आर्थिक-विषमतेचा नंगानाच सुरु झालेला असतो. वस्तुतः, हे CEOs स्वतः त्या ‘भांडवली-व्यवस्थे’चे खरंतरं ‘गुलाम’च असतात…पण, ते मरेपर्यंत त्यांच्या ध्यानी येत नाही…त्यांचा I.Q. (Intelligent Quotient) कितीही उच्चदर्जाचा असला; तरीही, E.Q. (Emotional Quotient) आणि S.Q. (Spiritual Quotient) यांचा त्यांच्या ठायी पत्ताच नसतो!

ज्या जर्मनीचा दाखला देऊन राष्ट्रकार्यासाठी आठवड्याचे ७० तास काम करा; असं (वा)नरायण मूर्ती सांगत होते…त्या जर्मनीचं दुसर्‍या महायुद्धाच्या अंति काय घडलं? जे घडलं, ते या अशाच ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ या राक्षसी-सैतानी वृतीनेच! किंवा, ज्या चीनचं उदाहरण देऊन हे L&T चे सुब्रमण्यम, चीनसारखी झपाटल्यागत प्रगती करण्यासाठी राष्ट्रकार्य म्हणून आठवड्याचे ९० तास काम करा, असं सांगताहेत…किंवा, “I regret that I cannot make you work on Sundays…How long can you stare at your wife and how long can she stare at you? Get to work instead!”, असं बरळण्याची हिंमत करताहेत; त्यांच्या कुणीतरी कानाखाली जाळ काढून सांगितलं पाहिजे की, “चीन हे काहीही झालं तरी, साम्यवादी (कम्युनिस्ट) राष्ट्र आहे” आणि जेव्हा, त्यांनी काळाच्या ओघात आपल्याच ऐतिहासिक घोडचुकांमुळे ओढवलेलं आपलं मागासलेपण झटकून टाकून पुढे झेपावायचं ठरवलं; तेव्हा, त्यांच्या डोळ्यापुढे एक निश्चित योजना होती…ती होती, अंततः, भांडवली-विचारसरणीच्या शत्रूराष्ट्र असलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला पंगू बनवण्याची (ज्यात, ते बर्‍याच अंशी यशस्वी देखील झालेत). त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काहीकाळ नाईलाजास्तव, अगदी ठरवून कामगार-कर्मचाऱ्यांकडून (‘कामगार-कायदे’ गुंडाळून) ठेऊन कमी वेतनात मरमर काम करवून घेतलं, हे नाकारता येणे नाहीच; पण, त्यानंतर विशिष्ट उद्दिष्टपूर्तिपश्चात, अगोदर ठरल्या योजनेबरहुकूम त्यांनी पुन्हा काहीकाळाने पूर्ववत आपल्या जगभरातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ‘कामगार-कायद्यां’ची अंमलबजावणी सुरु केली व ‘समृद्धी सर्वांची’ (Common-Prosperity) या साम्यवादी-तत्त्वाची अंमलबजावणी तेवढ्याच कठोरपणे लागू केली. परिणामतः, आज चीनमधलं कामगार-कर्मचारीवर्गाचं वेतनमान भारतासारख्या देशांना मागे टाकून सुसाटत पुढे निघालंय…चीन आता, स्वस्त मजुरांचा देश-प्रदेश मुळीच राहीलेला नाही. त्याउलट, १९९०-९१च्या ‘खाउजा-धोरणा’पश्चात (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) २०-२५ वर्षात भारतात एवढी संपत्ती निर्माण झाली की, तेवढी मागील २००-२५० वर्षात कधिही झाली नव्हती…पण, खाउजा-धोरण राबवताना “आधी संपत्ती निर्माण होऊ द्या, मग तिच्या न्याय्य वाटपाचं बघता येईल”, असं म्हणणार्‍या (वा)नरायण मूर्ती व एस. एन. सुब्रमण्यमसारख्या झारीतल्या शुक्राचार्यांच्या डोळ्यांनी, ती संपत्ती वरचेवर अडवली…’झिरप-सिद्धांता’नुसार (Trickle-Down Theory) ती खाली झिरपूच दिली नाही! यांनीच त्या काळात बेलाशक साम, दाम, दंड, भेद नीति वापरुन VRS/VSS (प्रत्यक्षात, CRS) देशात राबवली व कंत्राटी-कामगार पद्धती, OutSourcing वगैरेंची गुलामगिरी देशभर निर्माण केली व नव-अस्पृश्यतेचा कर्करोग (कॅन्सर) राष्ट्रपुरुषाच्या देहात खोलवर रुजवला!
थोडक्यात, चिनी राज्यकर्त्यांवर व चिनी व्यवस्थेवर, तेथील जनतेनं राष्ट्रकार्य म्हणून विश्वास ठेवणं ठीक…पण, भारतासारख्या (वा)नरायण मूर्ती आणि सुब्रमण्यमसारख्या ‘भांडवली-मुखवटे’ चढवलेल्या विकृत प्रवृत्तींची भरती असलेल्या, ‘व्यवस्थे’वर यःकिंचितही विश्वास ठेवणं…म्हणजे, आपल्याच हातानं कुऱ्हाडीचा घाव, आपल्या पायावर घालून घेणं! शिवाय, माओत्सेतुंगसारख्या आततायी राष्ट्रप्रमुखामुळे १९७८-७९ पर्यंत चीनमध्ये जी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती; तशी आपल्याकडे परिस्थिती कधिच नव्हती…कारण, आपल्याला पं. जवाहरलाल नेहरुंसारखे दूरदृष्टीचे, तरल बुद्धीचे व संवेदनशील नेतृत्त्व प्रथमपासूनच लाभले होते.

तंत्रज्ञानाची सतत बेछूट प्रगती होत राहिल्याने जगभरात उद्योग-सेवाक्षेत्रातील रोजगार-क्षमता मारली जाऊन ‘Jobless-Growth’च केवळ, नव्हे; तर, ‘Jobloss-Growth’सारखा समाजघातकी पायंडा पडत असल्याकारणाने कामाचे दिवस व दिवसाचे कामाचे तास कमी करण्याकडे सार्वत्रिक कल आहे! अशा पार्श्वभुमीवर, हे दोघेही भाजपा-संघाच्या आदेशाने, तशा श्रमिक-कल्याणकारी विचारप्रवाहाचा भारतात शिरकाव होऊच नये…म्हणून “राष्ट्रकार्याच्या गोंडस-फसव्या आवरणाखाली, दिवसाचे चोवीस तास राबा”, अशा ‘उलट्या बोंबा’ मारत असावेत!
ज्या लार्सन आणि टुब्रो या दोघा डॅशिंग डॅनिश-तंत्रज्ञांनी (Danish engineers) वर्ष-१९३८ मध्ये ‘Larsen & Toubro’ कंपनीची स्थापना केली, त्या त्यांच्या डेन्मार्क देशात आठवड्याचे सरासरी फक्त ३२ तास काम केलं जातं (कुणालाही अधिकचं काम अथवा ओव्हरटाईम करु दिला जातं नाही); त्यामुळेच, जगभरात ज्याला ‘Work-Life Balance’ म्हणतात, त्यात डेन्मार्कचा ३ रा नंबर लागतो, हे या दुढ्ढाचार्यांना काय माहित नसेल, असं समजता?

कामगार-कर्मचारीवर्गाविरोधात कायम विषारी ‘फुत्कार’ आणि बड्या भांडवलदारवर्गावर प्रेमाची ‘फुंकर’च घालत बसणार काय, हे लोक? याचं कारण, या तथाकथित बड्या लोकांच्या लेखी ‘राष्ट्र’ म्हणजे, फक्त हा सगळा भाडखाऊ भांडवलदारवर्गच होय…त्यांच्या व्याख्येत, तुम्हीआम्ही जनसामान्य अजिबात बसत नाही!
हे स्वतः यंत्रमानव (Robot) बनलेत आणि दुसर्‍यांकडून त्यांची तिचं अपेक्षा आहे… यांना खरंतरं खालून मिरचीची धुरी देऊन स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं पाहिजे की, “आम्ही काॅर्पोरेट्ससाठी जन्माला आलेलो नाही; काॅर्पोरेट्स आमच्यासाठी जन्माला आलीयत!”
…तेव्हा, खूप झाली यांची काॅर्पोरेटीय भांडवली-नाटकं. आता, ‘भांडवली-व्यवस्थे’ला लोकशाही-प्रक्रियेतून उलथवून ‘साम्यवाद-समाजवाद’ (Communism-Socialism) आणाच…म्हणजे, हे सगळेच ‘भांडवली-दुढ्ढाचार्य’ सुतासारखे सरळ येतील!
आपल्या राष्ट्रपित्याने प्रतिपादन केल्याप्रमाणे निसर्ग-पर्यावरणपूरक साध्यासुध्या नैसर्गिक आनंदी जगण्याला कवटाळायला आपण शिकलो; तरच, आपसूक हे सगळे मस्तीखोर लोक, ताळ्यावर येतील व जागतिक-तापमानवाढीमुळे उद्भवलेलं मानवजातीपुढचं पर्यावरणीय महासंकट टळेल…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)