भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….
—————————————
…त्यातून ताकद, संबधित मराठी राजकीय पक्षांची जरुर वाढेल; पण, ती ताकद, थेट महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची वाढेल, असं काही क्रांतिकार्य घडण्यासाठी…..

५ जुलैच्या मेळाव्यातून परतल्यावर मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवरचं ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं बसलेलं भूत उतरणार नसेल किंवा त्यांच्या घरात घुसलेली, ही ‘कंत्राटी-अवदसा’ नाहिशी होण्याची शक्यता खात्रीने निर्माण होणार नसेल…आणि मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमधील नव्यानं विकसित झालेल्या पनवेलसारख्या शहरांतून; तसेच नाशिक, नागपूरसारख्या शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे जास्तीतजास्त फक्त “एक दुकान, एक मकान” यासारख्या ‘संपत्तीचं पुनर्वाटप’ करण्याच्या राजकीय-धोरणातून…आपल्याच महाराष्ट्रात ‘जगण्याची कोंडी’ झालेल्या मराठी-माणसांच्या ताब्यात मराठी शहरं जाणार नसतील व कसबी-होतकरु, उद्यमशील-सुशिक्षित मराठी तरुणतरुणींचे संसार आणि उद्योग-व्यवसाय नव्याने फुलणार नसतील; तर, “कोण एकत्र आले आणि कोण फुटले” …यामुळे, महाराष्ट्राला नेमका काय फरक पडतो? महाराष्ट्रात जागोजागी मोठा ‘विकास’ होत राहील; पण, त्या विकासात मोजकीच प्रस्थापित मराठी-मंडळी (प्रामुख्याने मराठी-राजकारणी व मराठी-सरकारी अधिकारीवर्ग) ‘लाभार्थी’ असतील…तो विकास महाराष्ट्राचा नसेल; तर, महाराष्ट्रात वसलेल्या ‘गुजराथ’चा असेल! मग, महाराष्ट्रात मराठी-भाषा अभिजात ठरली काय किंवा हिंदी-गुजराथी-इंग्रजीच्या आक्रमणाने नष्टप्राय झाली काय… काय मोठा फरक पडतो? कारण, तसंही मातृभाषेतूनच जगभर मुलं शिक्षण घेत असताना (जे शिक्षण-तज्ज्ञांच्या मते, अगदी शंभर टक्के योग्यच असतं)…आपल्या महाराष्ट्रात, मराठी-शाळा एकतर भिकेला लावल्या गेल्यात किंवा बिल्डर-राजकारण्यांनी त्या आपल्या घशात घातल्यात (अर्थातच त्यासाठी, महापालिकांमधून सत्ता गाजवणाऱ्या पक्षांचे बिल्डर-राजकारणी प्राधान्याने जबाबदार आहेत)…अशा दुर्दैवाच्या दशावतारात कुठला मराठी-माणूस, मराठी-शाळेत आपल्या पाल्याला पाठवायला धजावेल किंवा पाठवू शकेल? अजून ग्रामीण भागात मराठी-शाळा आपलं अस्तित्व कसंबसं टिकवून आहेत, हे आपलं नशीब…पण, आता तिथेही ‘शिक्षणाचा धंदा’ मांडणाऱ्या इंग्रजी-माध्यमाच्या शाळा हळूहळू घुसायला लागल्यात.
लक्षात घ्या की, इंग्रजी-माध्यमातून शिकणारी बहुतेक मराठी मुलं, आता तोडकीमोडकी मराठी बोलतात…त्यांच्या धेडगुजरी भाषेतल्या शब्दाशब्दाला खेटून इंग्रजी-शब्द बाहेर पडत असतात…त्यांची संस्कृती आंग्रजाळलेली असते; महन्मंगल मराठी-संस्कृतिशी त्यांची नाळ तुटलेली असते…मग ती निसर्ग-पर्यावरणस्नेही आहे, ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी निखळ प्रेमळ आहे आणि केवळ, “जगवा आणि जगू द्या” असं नव्हे; तर, “जगा, जगवा आणि जगू द्या” अशी खऱ्याअर्थाने ‘पौर्वात्य-संस्कृति’ची जाज्वल्य मांडणी करणारी आहे…ही, मराठी-संस्कृतीची महानता, त्यांना कुठून कळणार?

शिवसेना आज आहे (ती अर्थातच उद्धवजींचीच निर्विवाद आहे), कालही होती आणि उद्याही असेल…पण, त्या शिवसेनेच्या नजरेसमोरच महाराष्ट्रातला सर्वसामान्य मराठी-माणूस उध्वस्त होत गेला, हे अस्वस्थ करणारं वास्तव नाकारण्याची हिंमत असेल कोणाची? उद्धवजींविषयी, मला व्यक्तिशः ममत्व आहे, आस्था-आदर आहे…मोठा उमदा माणूस आहे, हा सद्गृहस्थ! पण, त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी-माणसांच्या वस्तुस्थितीचे-भविष्याचे काळे रंग बिलकूल बदलत नाहीत. ते काळे रंग उद्धवजी आणि राजसाहेब ठाकरे, एकत्र येऊन व एकत्र राहून बदलू शकत नाहीत का?
…या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात, मी इथे कम्युनिस्ट चीन-रशियाचं उदाहरण देत नाहीय; तर, देतोय उदाहरण भांडवलशाहीची ‘मक्का-मदिना’ असलेल्या अमेरिकेचं! १९३०च्या जागतिक-महामंदीत व त्यानंतर दुसर्‍या महायुद्धापर्यंतच्या संक्रमण-काळात (१९३३-४५) अमेरिकेत आर्थिक-विषमतेनं टोक गाठलं असताना (सध्या आपल्याकडे, विशेषतः महाराष्ट्रात, त्याहीपेक्षा वाईट अवस्था आहे)…’फ्रँकलिन रुझवेल्ट’, या तत्कालीन अमेरिकन-अध्यक्षाने ‘न्यू डील’द्वारे जी ऐतिहासिक कामगिरी नोंदवून इतिहासात आपलं आगळंवेगळं असं…तीन सर्वोत्तम अमेरिकन-अध्यक्षांच्या अग्रगण्य पंक्तित, ‘अमेरिकन संपत्तीचं एकप्रकारे पुनर्वाटप’ करुन आपलं नाव सुवर्णाक्षरात कायमस्वरुपी नोंदवलं; तसं, नोंदवण्याची सुवर्णसंधी, आज आणि आताच या दोघांच्या हाती आहे! आपण इतरांसारखेच यशस्वी राजकारणी व्हायचं की, त्यापलिकडे जाऊन ‘स्टेट्समन’ म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी-माणसांचे ‘भाग्यविधाते’ बनायचं, हे अखेरीस त्यांचं त्यांनीच ठरवायचंय!
…महाराष्ट्राच्या आभाळी दाटलेले; पण, ‘समृद्धी’चा पाऊस भलत्यांच्याच पदरात टाकून, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाला कोरडे ठेवणारे ‘काळे मेघ’, राजसाहेब-उद्धवजी मिळून दूर करु शकतात का आणि फ्रँकलिन रुझवेल्टसारखे अद्वितीय शासक बनू शकतात का…त्याचं उत्तर खात्रीने ‘होय’ असं असलं; तरी, त्यासाठी त्यांना आपल्या पक्षांच्या राजकीय-धोरणात आमूलाग्र बदल आणि ते ही धडाक्यात करावे लागतील…हे ‘शिवधनुष्य’ पेलणं, त्यांना कितपत जमेल किंवा जमेल की नाही, हे तेच उभयता जाणो! पण, जो राजकीय-वारसा त्यांच्या हाती आलाय…तो पहाता, ते त्यांच्यासाठी खचितच महाकर्मकठीण आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. प्रबोधनकार ठाकरे व उद्धव ठाकरे वगळता, ठाकरे घराण्यातील कुणाला ‘कामगार’ या समाजघटकाविषयी फारसं ‘ममत्व’ असेल; असं आजतागायत तरी जाणवलेलं नाही. ठाकरे किंवा पवार, या महाराष्ट्रातील दोन बड्या राजकीय-घराण्यांचा, कायमच भांडवली-व्यवस्थेशी वा भांडवलदारवर्गाशी ‘खास घरोबा-दोस्ताना’ राहिलेला आहे…
…तेव्हा, हे मराठी-आर्थिक परिवर्तनाचं मूलभूत व फार मोठं आव्हानात्मक असं राजकीय-कार्य, सरतेशेवटी कदाचित मराठी कामगार-कर्मचारीवर्गालाच पुढे येऊन पार पाडावं लागेल, असंच एकूण चित्र दिसतंय.

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने आता, ऐतिहासिक चुका करणारे कम्युनिस्ट, खरेखुरे ‘कम्युनिस्ट’ राहिलेले नाहीत (दीपंकर भट्टाचार्यांच्या ‘कम्युनिस्ट-माले’चा ईशान्यपूर्वेकडील अपवाद वगळता)…ऐतिहासिक चुकांच्या मालिकेतील ही सर्वात मोठी चूक, म्हणजे घोडचूकच म्हणायची!
कोविड-१९ साथीपश्चात, द. मुंबईतील शे.का.प. च्या कार्यालयात (स्वतः शे.का.प. देखील आता, शेतकरी-कामगारांचा पक्ष राहिलेला नसून ‘शेठजी-कंत्राटदारां’चा पक्ष झालेला असल्यामुळे त्यांच्या ‘रायगड’ या बालेकिल्ल्यातच तो शेवटचे आचके देतोय, ते वेगळंच) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाॅलिटब्युरो-सदस्य काॅ. अशोक ढवळे, आम्हा उपस्थितांना कोविड-१९ काळात अंबानी-अदानींची संपत्ती किती व कशी लाखो कोटी रुपयांनी वेगाने वाढत गेली, याचं ‘लेक्चर’ देत होते…त्याच काॅ. अशोक ढवळेंचा डावा कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्ष, केरळात गौतम अदानीसारख्या कलंकित व भाजप-संघीयांचा घनिष्ट मित्र (Crony-Capitalist) असलेल्या, बड्या मक्तेदारी-भांडवलदाराला खास ‘आवतण’ व ‘आंदण’ देतो…हे कुठल्या साम्यवादी-तत्त्वज्ञानात (Communism) बसतं?
नुकत्याच एका वीज-कामगारांच्या कम्युनिस्ट कामगार नेत्याच्या (म्हणजे काॅम्रेडच्या) निवृत्ती-समारंभाचा, अगदी लग्न-सोहळ्यापेक्षाही झगमगणारा एकूणच थाटमाट पाहून, मला एक प्रचंड ‘सांस्कृतिक-धक्का’च (Cultural Shock) बसला! बरं, त्या वीज कामगार-कर्मचारीवर्गात जरा डोकावून, ‘कंत्राटी-कामगार’ नावाच्या मराठी ‘गुलामां’ची संख्या व अवस्था, कुणी तपासून तर पहा (पोस्टात आज आणि कदाचित, पोलिसात उद्या…ही आणि अशीच दारुण स्थिती असणार आहे)…कायम कामगारांची भरती साफ रोडावलेली…ग्राहकांना भविष्यात नडू शकणाऱ्या अदानीच्या वीजेच्या प्रीपेड स्मार्ट-मीटरची सक्ति चालू झालेली आणि चांगले पगार-बोनस घेणारे बहुतांश वीज-कामगार निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले…अशी कामगार-चळवळीची दारुण स्थिती असताना, अशा भव्यदिव्य समारंभांचं आयोजन, यांना सुचतच कसं? तासभर ताटकळत उभं राहून, मी ते सोहळ्याचं दृश्य पाहिलं आणि विमनस्क मनाने समारंभात सहभागी न होताच, आल्या पावली माघारी फिरलो.
लक्षात ठेवा “इथून पुढे, भारतातील कुठल्याही कामगार पुढाऱ्याचं ‘मूल्यमापन’ करायचं असेल; तर, तो आणि त्याची युनियन, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध व ‘सन्मानजनक किमान-वेतना’साठी (कायम-कामगारांच्या बाबतीत समाधानकारक ‘श्रेणीनिहाय Entry Level’ साठी) किती तीव्रतेनं टोकाचा लढा देताहेत”, यावरच व्हायला हवं.
…एवढंच नव्हे; तर, जर महाराष्ट्रातला मराठी-माणूस, थोडा जरी राजकीयदृष्ट्या सुजाण असेल; तर, प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि राजकीय नेत्याचं ‘मूल्यमापन’ हे, फक्त आणि फक्त…तो ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध आणि गुजराथी-मारवाडी-जैन जमातीने, सुसंघटितरित्या आपापल्या जमातीचं राजकारण करुन, जी ‘मराठी-जगण्या’ची कोंडी केलीय; ती मुळातून फोडण्यासाठी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘समतेचा संदेश’ व्यवहारात उतरवण्यासाठी…तो पक्ष व तो नेता, काय व कशी रोखठोक व ठाम भूमिका घेतोय, यावरच प्रामुख्याने व्हायला हवं. “या समस्या व उपाय म्हणून त्या समस्यांवरच्या भूमिका”, हा गाभा आहे; बाकी, सगळ्या किरकोळ व परिघावरच्या बाबी आहेत!
नागराज मंजुळेंचा महाराष्ट्रभरात गाजलेला ‘सैराट’ चित्रपट, जातिव्यवस्थेचं असली स्वरुप दाखवत असला; तरी अखेरीस भांडवली-व्यवस्थेचं सत्यस्वरुप दाखवताना कचरतो आणि आर्ची-परशाचा संसार, दोघांच्या भरभक्कम पगारात सुखनैव चालल्याचं भ्रामक चित्र रंगवतो…किंवा, मनोज जरांगे-पाटील मराठा-आरक्षणाच्या मैदानात शड्डू ठोकतात; पण, मराठा समाज, ज्या औद्योगिक क्षेत्रात प्राधान्याने काम करतोय, त्या भांडवली-व्यवस्थेतल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’ला आव्हान देण्यास कचरतात!
…तेव्हा, मराठी-माणसाची खरीखुरी काळजी घ्यायची; तर, मराठी-माणसाला पदोपदी नडणार्‍या भांडवली-व्यवस्थेच्या या आसाला भिडलंच पाहिजे…नाहीतर, महाराष्ट्राचं राजकारण, जसं काल होतं; तसंच, ते पुढे चालू राहील. ही भांडवली-व्यवस्था, आपल्या कळत-नकळत…मराठी ‘सात्विक-संतापा’च्या कोंडलेल्या वाफेला आपल्या प्रिय नेत्यांचाच खुबीने ‘वापर’ करीत, त्यांच्या राजकीय-भूमिकांमधून मोकळी वाट करुन देत राहील…आणि, मराठी-जगण्याची ‘कोंडी’ मात्र “जैसे थे” अशी, मागील पानावरुन पुढे चालू राहील. ती तशी चालू रहाता रहाता, एक दिवस असा येईल की, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या डाॅ. दीपक पवारांसकट, प्रमोद मसुरकर, प्रदीप सामंत वा रुद्रेश सातपुते वगैरे कुठल्याच मराठी-हितैषी सामाजिक-कार्यकर्त्याला विचारणारं काळं कुत्र महाराष्ट्रात शिल्लक रहाणार नाही… दुर्दैवाने तो दिवस, फार दूरवरचा नाही; कारण, भांडवली-व्यवस्थेच्या आसाला भिडत मराठी-माणसाची मूलगामी लढाई लढण्याची हिंमत, निदान अजूनतरी कोणीही दाखवायला तयार नाही…मग, त्यामागची ‘अपरिहार्यता’ वा कारणमीमांसा कुणासाठी कुठल्याही थराची असो!

…जसं फ्रँकलिन रुझवेल्टनं अमेरिकन भांडवलदारांना कडक शब्दात बजावलं होतं की, “संपत्तीच्या न्याय्य पुनर्वाटपाची धोरणं (दणदणीत किमान-वेतन वृद्धी, सन्मानजनक बेकार-भत्ता, सामाजिक-सुरक्षा योजना वगैरे ‘कल्याणकारी-राज्य’ धोरणांद्वारे तत्कालीन अमेरिकन समाजातील ‘आर्थिक-विषमता’ मोठ्याप्रमाणावर घटवण्याच्या एकमेव उद्देशाने आखलेली)…ही अंतिमतः तुमच्याही हिताची आहेत; त्याविना, अमेरिकन सामान्य जनतेच्या उद्रेकात वा उठावात, तुम्ही सारे भांडवलदार उध्वस्त व्हाल”…अगदी तसंच, महाराष्ट्रातल्या गुजराथी-मारवाडी-जैन व भांडवली-व्यवस्थेतल्या इतर धनदांडग्यांना (अगदी मराठी धनदांडग्यांना सुद्धा), कडक शब्दात समज दिली गेली पाहिजे व अशी कडक पाऊले राजकारणात उचलली गेली पाहिजेत!
…अन्यथा, भविष्यात महाराष्ट्रावर मराठी-माणसांचं आर्थिक व राजकीय वर्चस्व राखण्यासाठी आणि महाराष्ट्र, ‘भारतीय-संघराज्या’त टिकून रहाण्यासाठी…कुणाला तरी पुढाकार घेऊन या महानकार्याचा शुभारंभ करावा लागेल!
…आणि, समजा कुणीच पुढे सरसावलं नाही; तर, “शेवटी मदांध तख्त फोडते मराठी” असा, अन्याय-अत्याचार-शोषणाविरोधात विस्फोटक मराठी-संताप रस्तोरस्ती ‘निर्नायकी’ स्वरुपात ओसंडून वाहील आणि तो काय उत्पात घडवेल, याचं कुणालाही भाकित करणं शक्य होणार नाही!

मी हे तडफडून व तडकफडक लिहून काय करतोय…तर, जसं याहीपूर्वी कामगारहिताआड येणाऱ्या आर्थिक-हितसंबंधांची साखळी तोडून, भांडवली-व्यवस्थेतल्या असंख्य बड्यांना भयंकर दुखावलंय व अंगावर घेतलंय; तसंच, आता उरल्यासुरल्या राजकीय मित्रांना कुठेतरी दुखावतोय…हो, दुर्दैवाने दुखावतोय, दुखवावं लागतंय; कारण, मला ‘असत्य’ किंवा ‘दिशाभूल’ करणारं राजकारण नाही हो करता येतं आणि ते करायचं देखील नाही.
…एकदा का तुम्ही शिवछत्रपतींना रक्तात उतरवलंत (ज्यांनी, आम जनतेच्या निर्मम शोषणातून व लुबाडणूकीतून श्रीमंतीत लोळणार्‍या मोंगल-साम्राज्यातील ‘गुजराथी’ सुरतेला, मराठी-स्वराज्यहितार्थ जाणिवपूर्वक एकदा नव्हे दोनदा लुटली होती व ज्यांनी, रयतेला नडणार्‍या सरंजामदारांच्या जमीनजुमला व गडकोटांवर गाढवाचा नांगर फिरवून भूमिहीन कुळांना मालकी-हक्काने जमिनीचे पट्टे कसायला दिले होते…म्हणजेच, आजच्या भांडवली-परिभाषेत कंत्राटी-कामगारांना ‘कायम’ केलं होतं)…आणि, बाबासाहेबांच्या ‘समतेच्या संदेशा’ला शिरोधार्य मानलंत की…असं नाही वागता येत!
…या लेखामुळे सांप्रतचे काही राजकीय-मित्र दुखावले गेले जरी, तरी आम्ही ‘धर्मराज्य’वाले यथाशक्ती मराठी हितासाठी लढणारच, लढत रहाणारच… मी व्यक्तिशः माझं कर्तव्य म. गांधींच्या शब्दात सांगायचं तर, “हूं तो कर छूट जो”, या निष्काम भावनेनं करुन मोकळा होत रहाणार…”मराठी-माणसांना खरी जाग यायची असेल; तेव्हा ती येवो, त्या बापड्यांना”, पण तोपर्यंत हातची वेळ निघून गेलेली नसली; म्हणजे, मिळवलं!
तेव्हा, धन्यवाद…’जय हिंद, जय महाराष्ट्र’ नव्हे; बोला जय महाराष्ट्र, जय हिंद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)