मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या गुजराथी-भाषिकांच्या भांडवली व्यवस्थेला हादरे दिलेत, तरच तुमची मराठी भाषा आणि मराठी माणूस सुरक्षित राहील, नाहीतर त्याचं महाराष्ट्रातून उच्चाटन होईल. अनेक आंदोलनं करताना, पर्यावरणीय महासंकटाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं जातं की, कोण कुठे जन्माला येतो हा अपघात असतो. कोण कोकणात जन्माला येतो तर, कोण आणखी कुठे जन्माला येतो; मग, आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्रातला जन्मसुद्धा एकदाचा अपघात ठरवा आणि आम्हाला अरबी समुद्रात ढकला…नाहीतरी, आमच्या महापुरुषाचा-महानायकाचा पुतळा तुम्ही अरबी समुद्रात उभारत आहातच. मराठी तरुणतरुणींचे संसार आणि व्यवसाय फुलण्यासाठी (मुं. ठा. पु. रा. ना. म्हणजेच, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक अन् नागपूर) शहरं मोकळी करुन घ्यावी लागतील…. आपल्याला नजिकच्या भविष्यात प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे फक्त “एक दुकान-एक मकान” अशी कडक धोरणं राबवावी लागतील…तरच आणि तरच महाराष्ट्रात मराठी माणसाचा बोलबाला होईल, मराठी भाषेला पुन्हा एकदा कायमस्वरुपी महत्त्व प्राप्त होईल….
…राजन राजे