कोकणातील शिमगा (होळी) सणासारखीच ‘सोंगं’ नाचवत, आजवर अमेरिका जगावर आपलं अमानुष वर्चस्व गाजवत आलीय; सध्याचा अमेरिका-इस्रायलचा इराणवरील हल्ला, त्याच नितीशून्य ‘लष्करी-दहशती’च्या परंपरेतला….
आपल्या डोळ्यासमोर कोसळणारं अमेरिकेचं ‘आर्थिक-साम्राज्य’ पाहून, आधी बावचळलेल्या आणि नंतर भयंकर खवळलेल्या, अमेरिकेचा ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर झालीय…त्यातूनच, जगावर ‘शांतिदुता’चा मुखवटा धारण करत युद्ध पेटवणं, ट्रंप यांनी सुरु केलंय.
एव्हाना, अमेरिकेला समजलं असेल की, इराण म्हणजे व्हेनेझुएला नव्हे आणि खोमेनेईचा इराण, म्हणजे ‘सद्दाम हुसेन’चा इराक तर, नव्हेच नव्हे! सद्दाम हुसेनना जैविक व रासायनिक अस्त्रांचा साठा केल्याचा खोटा आरोप लावून मारल्यानंतर ISI चा जन्म झाला आणि त्यानंतर, स्थलांतरितांचा प्रश्न उग्र बनून संपूर्ण युरोपमधलं राजकारण कायमचं बदललं व अतिरेकी उजव्या राजकारणाचा उदय झाला…तसा तो भारतातही फोफावू लागला. त्यामुळे, या हल्ल्यानंतर अत्यानंदाने उड्या मारणाऱ्या ‘अंधभक्तां’नी हे ध्यानात घ्यावं की, इराणमधल्या आंतरखंडीय-क्षेपणास्त्रांवर (Ballistic Missiles) ‘गोबर’ किंवा ‘गोमूत्र’ लावलेलं नाही अथवा फ्रान्सच्या मिराज-२००० लढाऊ विमानांच्या शेपटांना भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी बांधली; तशी, इराणी-क्षेपणास्त्रांच्या शेपटांना ‘लिंबू-मिर्ची’ बांधलेली नाही…आणि, अचानक ‘ऑपरेशन-सिंदूर’समाप्तीसारखं ट्रंप यांच्या आज्ञेबरहुकूम शेळपटासारखं ‘कच खाणारं’ इराणी-सरकारही नव्हे! नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, ज्या ‘अँथ्राॅपिक’ कंपनीच्या ‘Claude AI’चा अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या संदर्भात वापर केला; त्याचाच वापर इराणवरील हल्ल्यादरम्यान सढळपणे केला गेलाय…विशेष बाब म्हणजे, अँथ्राॅपिकने ‘व्हाईट-हाऊस’समोर गुडघे टेकण्यास नकार दिल्याने सॅम ऑल्टमॅनच्या ‘Open AI’ (ChatGPT वाली) बरोबर ट्रंप यांनी AI सेवा पुरविण्यासाठी करार केलाय. अमेरिकन लोकांच्या ‘Mass Serveillence’साठी आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांसाठी ‘Claude AI’चा वापर करु देण्यास अँथ्राॅपिकने ठाम नकार दिल्यानेच त्यांचा करार वाॅशिंग्टनने संपुष्टात आणला…२०० मिलियन डाॅलर्सच्या कराराला, आपल्या काही कार्पोरेटीय-मुल्यांसाठी धुडकावण्यासाठी, जेवढं अँथ्राॅपिकचं कौतुक करायला हवं; त्यापेक्षा कित्येक पट, सॅम ऑल्टमॅनच्या ‘Open AI’चा तीव्र निषेध करायला हवा! इथे थोड्या विषयांतराचा दोष पत्करुन, हे आवर्जून सांगितलं पाहिजे की, ट्रंप-सरकारने खुन्नस काढण्यासाठी म्हणून अँथ्राॅपिकला चीन-रशियाच्या कंपनींसारखं शत्रू-कंपन्यांच्या यादीत टाकल्याची वार्ता पसरताच…अनेक अमेरिकन नागरिकांनी अँथ्राॅपिकच्या ‘काॅर्पोरेट-कार्यालया’बाहेर फुटपाथवर ‘थँक यू’ असं मोठ्या अक्षरात रंगवून ऋणनिर्देश तर केलाच; पण, जवळपास १० लाखावर अमेरिकन नागरिकांनी सॅम ऑल्टमॅनच्या ‘Open AI’चं ‘ChatGPT’ ॲप आपल्या मोबाईलवरुन काढून टाकलं व आजच्या घडीला ‘अँथ्राॅपिक’चं ‘Claude AI’ ॲप ‘प्ले-स्टोअरवर एक नंबर गणलं जातंय…अशी जागरुकता भारतीयांमध्ये कधि येणार? आम्ही तर सरकारी पातळीवरुन आमचा सोन्याहून मूल्यवान असा ‘डेटा’, अमेरिका-इस्रायलला द्यायला निघालोत…मग, भारताच्या ‘सार्वभौम AI’ संरचनेचा प्रश्नच कुठे उभा रहातो…जिथे, आम्ही आमच्या देशाचं ‘सार्वभौमत्व’च, अमेरिकन व्यापार-करारातून गहाण ठेवायला एका पायावर तयार झालोत!
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

