कृष्ण, हा परिपूर्ण ‘अवतार’ की, सर्व वर्णांचा भ्रतार अन् विश्वव्यापी मानवधर्माचा प्रसार…???

ज्याच्या जन्माआधी, जन्मापासून आणि पुढे संपूर्ण बाल्यावस्थेत…त्याचा अंत घडवण्यासाठी शत्रूपक्ष दबा धरुन बसलेला असावा…शिशुपाल, दुर्योधन, दुःशासन, कंस, पौंड्रक आदी त्याला अवचित गाठून अवमानित करण्याची एकही संधि सोडीत नसावेत; तरीही, ज्याच्या बासरीवर जीवनसंगीताचे अलौकिक सूर छेडले जात रहावेत…सर्वांना आपल्या अनुपम प्रेमरसात न्हाऊमाखू घालीत, अवघा भवताल ज्याच्या प्रेमरसात आकण्ठ बुडून जात रहावा…सान्निध्यात येणाऱ्या हरेक जीवमात्राच्या अंतरी, ज्याच्या परीसस्पर्शाने ‘नादब्रह्म’ फुलत जावा….

…असा तो कृष्ण म्हणजे, “जीवापाड जपावं असं मैत्र अन् बलाढ्य शत्रू समोरील अजेय गोत्र!”

तो म्हणजे आसमंत दुमदुमवून टाकणारा, भयशंकित करणारा ‘पांचजन्य शंख’…तो म्हणजे बासरीने प्रसवलेला नाजूकसाजूक ‘आहत नाद’ अन् तो म्हणजे व्योम व्यापून उरणारा ‘अनाहत नाद’!

तो म्हणजे हृदयाच्या अंतर्हदयाला भिडणारं प्रेमसंगीत अन् तो म्हणजे शत्रू-हृदयाला भिवविणारं संगीत रौद्रभीषण!

तो म्हणजे अमन शांति-सलोखा राखू पहाणारा बुद्ध, तो म्हणजे दुर्जनांचा प्रचंड संहार घडवू पहाणारं अटळ युद्ध!

तो म्हणजे मुकूट वा सिंहासन नसलेला, अनभिषिक्त पृथ्वीसम्राट…तो म्हणजे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य अन् अर्जुनाच्या जीवनाचा अन्वयार्थ!

तो म्हणजे “न धरी शस्त्र करी मी’ म्हणणारा अन् निर्वाणीच्या क्षणी पितामह भीष्मांवर सुदर्शन-चक्र चालवू पहाणारा!

तो म्हणजे अवघ्या गोकुळाला वेड लावून मथुरेची वाट धरणारा अन् कुरुक्षेत्रावर अखिल मानवतेला गीतेचा जीवनसंदेश देणारा!

तो म्हणजे सदैव सत्याची कास धरणारा; तरीही, समष्टीच्या कल्याणार्थ प्रसंगोपात्त, असत्याचा सरळसोट आधार घेणारा अन् सत्याला नव्याने ‘परिभाषित’ करणारा!

तो म्हणजे, “चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः” असं म्हणत…स्वतः, चारही आश्रमांमधून मुक्त संचार करणारा अन् “जन्माधारित नव्हे, तर कर्मगुणाधारित” समाजव्यवस्थेच्या घुसळणीतून सौख्य व अक्षय आनंदाचं ‘नवनीत’, समस्त मानवतेच्या हाती देणारा!

गीतेचा अमोघ शास्त्रार्थ करताना ‘ब्राह्मण्य’, सुदर्शनचक्र प्रयोजनासमयी ‘क्षत्रियत्व’, मथुरेद्वारी दुग्धोत्पन्न-पदार्थांच्या व्यापाराप्रसंगी ‘वैश्यत्व’ आणि अश्वपालन-रथसंचालनात ‘शूद्रत्व’…तो अंगी लिलया बाणवताना दिसतो; त्यातूनच, “जन्माला येणारा प्रत्येक मानवी जीव, हा मूलतः ‘शूद्र’च असतो; पण, स्वतःच्या आंतरिक गुणांनी व बाह्य कर्मांनी, तो आपापला ‘समाजधर्म’ ठरवत जातो”, अशी पांचजन्य फुंकत उद्घोषणा करताना कृष्ण, आंतरिक गुणांचं प्राबल्य अधोरेखित करतो.

“प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार, क्षमतेनुसार कुठलाही ‘समाजधर्म’ निवडण्याचं मुक्त स्वातंत्र्य, ठामपणे अधोरेखित करतानाच कृष्ण, “आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस, अखिल मानवतेच्या हितासाठी…चारही वर्णांतून ‘उलट प्रवास’ करत, अर्जुनाच्या रथ-सारथ्याचं ‘शूद्रत्व’ स्विकारताना दिसतो!”

…याचाच अर्थ, “वर्णश्रेष्ठत्वाचा अभिनिवेश व त्यातून दुसर्‍या ‘वर्णा’विषयी वा ‘समाजधर्मा’विषयी निर्माण होणारी तुच्छतेची भावना”; या दोन्ही बाबी कृष्ण, केवळ त्याज्यच ठरवत नाही, तर तो त्यांना ‘प्रज्ञापराध’ ठरवतो…आणि, सर्व वर्णांमध्ये एकात्मिक व अतूट असा ‘जैव-बंध’, स्वतःच्या जीवन-परिक्रमेतून निर्माण करतो…एक असा ‘जैव-बंध’, जो समाजधारणेसाठीच केवळ व्युत्पन्न झालेला असतो; ‘समाज-विभाजना’साठी नव्हे!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)