“I am not at all concerned with appearing to be consistent. In my search after Truth I have discarded many ideas and learned new things. When anybody finds any inconsistency between two writings of mine, if he has still faith in my sanity, he would do well to choose the later of the two on the same subject” (Harijan April 29 1933)
“वैचारिक सुसंगतता कायम राखण्याची मला बिलकूल पर्वा नाही! सत्याचा शोध घेताना, मी अनेक संकल्पनांचा त्याग करत आलोय आणि नवनव्या गोष्टी शिकलोय. माझ्या दोन लिखाणांमध्ये जेव्हा कुणाला काही विसंगती आढळेल; तेव्हा, त्याचा जर माझ्या शहाणपणावर विश्वास असेल…तर, एकाच विषयावरच्या दोन लिखाणांमधलं माझं नंतरच दुसरं लिखाणं स्विकारणं, त्याच्यासाठी हितकारक ठरेल.” (हरिजन, ९ एप्रिल-१९३३)
कुठलाही आडपडदा न ठेवता, काडीमात्र अहंभाव न बाळगता असं बेधडक वक्तव्य, तिचं व्यक्ति करु शकते; जी, स्वतः तहहयात ‘प्रयोगशील’ राहून अनुभवातून स्वतः चुकतमाकत जीवनाचं गहन तत्त्वज्ञान शिकत आली असावी. म गांधींच्या जन्माच्या वेळी, त्यांच्या महत्ततेची कोणी भविष्यवाणी नव्हती केली; जशी श्रीकृष्ण, गौतम बुद्ध वगैरेंच्या जन्मप्रसंगी झाली होती. तळहातावरच जन्मतः चक्रवर्तीपदाची लक्षणं होती, असा चंद्रगुप्तासारखा कुठल्याही असामान्य लक्षणांनी, ‘मोहनदास करमचंद गांधी’ या बालकाचा तळहात भरलेला नव्हता! कुसंगती, त्यातून लहानपणी वाममार्गाला लागलेला एक मुलगा…कुणाचा आधाराला हात न घेताच, आपला अगदी सर्वसामान्य लक्षणांनी भरलेला हात कृष्णाची गीता घट्ट धरुन, जगाला पथदर्शन करण्यासाठी दीपस्तंभासारखा अस्मानात एवढा वर उंचावतो की, सगळं जागतिक-विचारविश्व, त्याच्या अस्मानी उंचीपुढे थिटं पडतं!
आजही, तोच महात्मा आणि त्याची ‘गांधीवादा’ची तिचं शिकवण…युद्धजन्य जागतिक-अशांतता, जागतिक सामाजिक अस्वास्थ्य, भांडवली आर्थिक विषमता-शोषण-अन्याय-अत्याचार व त्यातून घडलेलं सजीवसृष्टीच्या मुळावर उठलेलं निसर्गाचं विध्वंसन व त्यातील भौतिक-प्रगतीच्या राक्षसी अट्टहासातून निर्माण झालेल्या प्रलयंकारी प्रदुषणाने ग्रस्त जगाला पथदर्शक ठरतेय! अस्वस्थ-अशांत जगाला वाचवू शकणारा एकमात्र जीवनदायी-संजीवक विचार म्हणजे, ‘गांधीवाद’ होय!
हिंसाचारातून तत्काळ आर्थिक स्वरुपाच्या व अन्य प्रकारच्या समस्या सोडवणुकीचे मार्ग दिसतीलही; पण, तो मार्ग कधिही ‘शाश्वत’ ठरणे नव्हे; कारण, “हिंसाचारातून हिंसाचार आणि कुठल्या न् कुठल्या रुपात अधिकाधिक अत्याचारच अटळपणे जन्माला येतो!” ज्या अल्बर्ट आईनस्टाईनने,”असा जिवंत हाडामांसाचा माणूस, कधिकाळी या पृथ्वीतलावर वावरत होता, यावर भविष्यातील पिढ्यांना विश्वास ठेवणं देखील कठीण जाईल”, असे उद्गार काढले होते; त्याच आईनस्टाईनने हिंसाचारासंदर्भात, “हिंसाचाराकडे नीतिशून्य व्यक्ति अटळपणे आकृष्ट होतात, त्यामुळेच हिंसाचारावर आधारीत निरंकुश हुकूमशाहीत समाज नीतिभ्रष्ट होऊन आतून सडत जातो. इतिहास गाजवलेल्या कल्याणकारी; पण, क्रूर हुकूमशहांनंतर, कायमच बदमाष सत्तेवर आलेत…हे गतकाळानं आपल्याला दाखवून दिलंय.” असे प्रत्ययकारी उद्गार काढले होते.
…म. गांधींनी फक्त, आम्हाला स्वातंत्र्यच मिळवून दिलं का? तसं तर, आपापल्या देशाला प्रासंगिक योगदान देणारे असंख्य महापुरुष, जगभरात आढळतातच की! मग, असं कुठलं ‘असामान्यत्व’ गाधींमध्ये होतं की, सगळं जग एकमुखाने म्हणू लागलं, “अनेक महापुरुषांनी त्यांच्या काळाचा पट बदलला; पण, या एका माणसानं अवघं जगच कायमचं बदललं!” ते असामान्यत्व हेच की, त्यांनी ज्याला ‘अंतिम सत्य’ म्हणता यावं, असा शाश्वत स्थैर्य, सुखसमाधान व शांतिचा विचार जगाला दिला…जो कधिकाळी गौतम बुद्धाने जगाला दिला होता. पारतंत्र्यातील धकाधकीच्या भारतीय-राजकारणाची धुरा वाहताना; त्यांना ‘जीवनतत्त्वा’ची परखड मांडणी करणाऱ्या ‘अष्टावक्र गीते चा स्वीकार करणं अवघड गेलं; पण, सर्वांना प्रेमाने आपल्या कवेत सामावून घेणारी, कृष्णाची महाभारतातली गीता स्विकारतानाही…महाभारतातला हिंसाचार, आपल्या प्रज्ञेनं जमेल तेवढा त्यांनी नाकारला. १९४७च्या आसपासच्या अरुंद काळाच्या पट्ट्यात भारतासह अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली; पण, पाकिस्तानसह, अशा अनेक राष्ट्रांमधल्या ‘लोकशाही-स्वातंत्र्या’चा वारंवार व वेळोवेळी निर्घृणरित्या संकोच झालेला आपल्याला दिसतो…पण, भारतात, स्वातंत्र्यापश्चात निदान सातआठ दशके तरी असं घडू शकलेलं नाही; त्याचं एकमेव कारण, म. गांधींनी आपल्याला दिलेला शाश्वत विचार व पुरवलेलं जगण्याचं नैतिक व अक्षय इंधन!
…मात्र, गेले दशकभर, वर्ष-२०१४ नंतर प्रथमच काही विपरीत, या आपल्या भारत देशात घडू पहातंय…जे आसपासच्या देशांमध्ये घडताना आपण यापूर्वीच अनुभवलंय. प्रथमच, या देशातली लोकशाही, अशा विचारसरणीच्या लोकांमुळे संकटात सापडलीय; ज्या विचारसरणीने, या निःशस्त्र व कुठल्याही संरक्षणाविना वावरणाऱ्या, युगंधर महात्म्याचा डाव साधला होता!
…तेव्हा, रात्र वैर्याची आहे, “उषःकाल होता होता, काळ रात्र येऊ पहातेय; नव्हे, ती चोर पावलाने अवतरलीय… सावध व्हा!”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

