“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.१)

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.१)
——————————–
“We, the citizens of Thane….”
गेल्या चारपाच दशकांच्या राजकीय कालखंडातच ठाणे शहर, हे विविध धंदे-व्यवसाय करणाऱ्या गुर्जर धनदांडग्यांना हळूहळू निश्चितपणे ‘आंदण’ दिलं जाऊ लागलं होतं आणि त्यासोबतच, ठाण्याचा काँक्रिटीकरणाद्वारे विकृत विकास होत, “खाडी-विहीरी-तलावांचं व चराऊ कुरणे-बगीच्यांचं व प्रामुख्याने आगरी-कोळ्यांचं शहर” असलेल्या ठाण्याची हिरवाई नष्ट होत गेली, निसर्ग-पर्यावरण उध्वस्त होत गेलं. पुढे ती प्रक्रिया अधिक गतिमान होतं आणि त्यातून जैन-गुजराथी-मारवाड्यांनी ठाणे शहरातल्या जवळपास सगळ्या मोक्याच्या जागांचा आपल्या बेफाम अर्थबळावर आसुरी ‘कब्जा’ केला. उदा. साधारण चार दशकांपूर्वी, टेंभीनाक्याच्या देवीच्या उत्सवाला ठाण्यातील नागरिक स्टोअर्सने प्रथमच लाखाची देणगी देऊन सुरुवात करुन दिली होती…तिथूनच पुढे निव्वळ मतांची बेगमी करण्यासाठी, स्थानिक राजकारण्यांनी राबवलेल्या ठाण्यातील ‘उत्सवी राजकीय-उरुसा’ला, आर्थिक-पाठबळ देणारे गुज्जू धनदांडगे, ‘दाते’ (देणगीबहाद्दर) बनून पुढे आले… ठाण्यात, पुढे यथावकाश, या ‘दात्यां’चे खरे ‘दात’ही दिसले आणि त्यांची ‘जमात’ही दिसली, दिसत राहिली…ठाण्याचा ‘काळा इतिहास’ त्याचा दुर्दैवी साक्षीदार आहे!
मराठी राजकीय नेत्यांच्या टक्केवारीच्या व दलालीच्या राजकारणाने, हे सोन्यासारखं मूळ मराठी शहर, धनिक जैन-गुजराथी-मारवाड्यांच्या ताब्यात हळूहळू जात गेलं… आपल्या नेत्यांवर (आजही) आंधळा विश्वास ठेवणाऱ्या, याच भोळ्याभाबड्या कफल्लक मराठी-तरुणाईला ठाण्यात साधा आसरा शोधणं देखील, कठीण होऊन बसलं… आणि, त्यातून ते आधी गुन्हेगारी, खंडणीबहाद्दरी व नंतर वैफल्यग्रस्ततेतून अंमली-पदार्थांच्या नशेबाजीकडे वळले… “उडत्या पंजाब’सारखं झपाट्याने ‘उडतं ठाणं’ होऊ लागलं!”

जसजशी काँक्रिटच्या इमारतींची संख्या व उंची, ठाणे शहरात वाढत गेली…तसतशी गुन्हेगारी व राजकीय-दहशत, या शहरात भयानक वेगाने वाढत गेली…हा सगळा रक्तरंजित खेळ, प्रामुख्याने स्क्वेअर फुटामागे येणाऱ्या ‘मोठ्या पैशा’चाच! शहरातल्या गुन्हेगारीची पाळेमुळे स्थानिकांमध्ये केवळ खोलवर रुजलेलीच आहेत किंवा असतात, असं नव्हे; तर, त्याचे धागेदोरे किती वरपर्यंत पोहोचलेले असतात; ते आम्हाला अनेक प्रसंगी दृग्गोचर झालेलं असलं; तरीही, एक ज्वलंत उदाहरण मुद्दाम नमूद करतो (ज्याचं सूचोवाच, मी ९ ऑक्टोबरच्या ‘भयमुक्त ठाणे’च्या मोर्चात भाषण करताना केलं होतं). माझा उजवा हात म्हणून गणला गेलेला सहकारी, विक्रांत कर्णिकांवर २५ जून-२०११ रोजी, ठाणे शहरातल्याच एका लोकप्रतिनिधीने दोन रिक्षांमधून चाॅपरधारी गुंड पाठवून प्राणघातक हल्ला केला होता. शहराच्या सदसद्विवेक बुद्धीचा राखणदार (Conscious-Keeper) असलेल्या निधड्या छातीच्या विक्रांतची सुविद्य पत्नी वर्षा, हिचे वडील कै. आत्माराम सावंत, हे तत्कालीन ‘मुंबई सकाळ’चे संपादक असल्याने, त्यांची तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांशी घनिष्ट मैत्री होती व एकमेकांच्या घरी येणंजाणं होतं…. वर्षावहिनींना शरद पवारांनी अंगाखांद्यावर खेळवलेलं…आणि, म्हणूनच महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे व काँग्रेसचे सरकार असल्याने, त्यांनी आपल्या पतीवरील हल्लेखोरांचा तातडीने छडा लावण्यासाठी ‘पवारकाकां’ना स्वतः पत्र लिहीले. लागलीच शरद पवारांनी, तिला हल्लेखोरांना पकडून कायद्यानुसार कडक शासन करण्याचं पत्रातून लेखी अभिवचन देखील दिलं…त्याचा तत्काळ परिणाम होऊन पोलिस तपासाची चक्र वेगाने फिरुन हल्लेखोरांपर्यंत पोलिस पोहोचलेदेखील; पण तोपर्यंत, उशीर झाला होता. शरद पवारांना, त्या हल्ल्याचा ‘सूत्रधार’ असलेल्या अधम, खुनीवृत्तीच्या गुंड ठाणेकर लोकप्रतिनिधीने (जो लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याआधी, एका कुख्यात गुंडटोळीतला गुंड होता) विक्रांत कर्णिक, हा एक सामाजिक-कार्यकर्ता (Activist) असून, आपल्या भांडवली-व्यवस्थेविरोधात (Anti Establishment) सतत आवाज उठवणाऱ्या नेत्याचा (म्हणजे, मी स्वतः) जवळचा सहकारी असल्याचं कळवलं…लागलीच शरदरावांनी तो तपास, पोलिसांना बासनात गुंडाळून ठेवायला सांगितलं…हा सारा घटनाक्रम, नौपाडा पोलिस ठाण्यातीलच एका पोलिस अधिकाऱ्याने मला तेव्हा कळवला होता (ज्याच्या, पुतण्याला मी पोटाला लावलं होतं)…आजतागायत, त्या गुन्हेगारांपर्यंत ठाणे-पोलिस कधि पोहोचू शकलेले नाहीत; दरम्यान, विक्रांत कर्णिकांचा कर्करोगाने काही वर्षांपूर्वी मृत्यू होऊन गेलाय.
…याचा अर्थ एकच, तो म्हणजे शहरात होणाऱ्या राजकीय हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेले असतात…आणि, शहरात ‘माफियाराज’ चालवणाऱ्या ‘आका’च्या व ‘आका’च्या मंत्रालयातील ‘राजकीय बापा’च्या (God Father) सहभागाविना वा किमानपक्षी, त्याच्या संमतीविना, अशा गुन्हेगारी घटना घडूच शकत नाहीत! …लक्षात ठेवा, तेव्हा ठाण्यातील एकही राजकारणी वा स्थानिक लोकप्रतिनिधीने, विक्रांत कर्णिकांवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांना वा त्यांच्या कुटुंबियांना साधी भेटण्याचीही हिंमत दाखवली नव्हती…स्वाभाविकच, “काळ सोकावत गेला”! (क्रमशः)